आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुतूहल जिवंत ठेवण्‍यासाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेतल्या अभ्यासाच्या विषयांमध्ये गोडी कशी निर्माण करावी, भीती कशी घालवावी याविषयी काही सुचवणाऱ्या लेखांचं हे नवीन सदर. काही खेळ, उपक्रम, विचार करण्याच्या, वागण्याच्या पद्धती याविषयी लेखन असेल. क्लास -अॅप-व्हिडिओ असे सोपे शॉर्टकट्स यात नाहीत. त्यांविषयी काही सूचना असतीलच, पण ती फक्त आयुधं आहेत. पालकांनीच ती योग्य प्रकारे वापरायला हवी. आपणच काही तरी करायला हवं, ते काय, हे यातनं सांगण्याचा प्रयत्न आहे.


मुलांचा ‘अभ्यास घेणं’ हे सर्वच पालकांच्या डोक्यावर ओझं बनतं. अभ्यासाला बसण्यासाठी पालकांनी कानीकपाळी ओरडणं, मुलांनी तो मारून मुटकून करणं हा अनेक घरांत रोजचा दिनक्रम असतो. शाळेत, क्लासमध्ये जाऊन तासन् तास टाकणं टाकणं, परीक्षा देण्यासाठी घोकंपट्टी आणि परीक्षा संपली की, मागचं सपाट करून एक काम उरकण्याचा आनंद मानणं - पुढच्या पेपरपर्यंत - हे सर्वत्र दिसणारं चित्र आहे. सर्व व्यवस्था मुलांना अत्यंत कार्यक्षम रीतीने परीक्षार्थी बनवते. शाळा, क्लास, मार्कं, मेरिट लिस्टा, दहावी-बारावी-प्रवेश परीक्षा हे मुलांची इच्छाशक्ती आणि आनंद पिळून काढणारे चरक जागोजागी उभे केलेले आहेत. दुर्दैवाने, नाइलाज म्हणून का होईना, आपण पालकही या व्यवस्थेचे भाग बनतो. मुलांच्या भल्यासाठीच घोकंपट्टी करवून घेणं, चुकलं तर शिक्षा देणं, आणि सतत ओरडणं हे आपण करतो.


यावर उपाय काय? शिक्षणव्यवस्था टाळता तर येत नाही. कारण आजच्या जगात अज्ञानी राहणं हा पर्याय नाही. आणि नुसती डिग्री उपयोगी नाही, तर मुलांचा सर्वांगीण विकासही व्हायला हवा. मग हे सगळं या मगजमारीशिवाय कसं साधायचं?
उपाय आहे तो ‘थ्री इडियट्स’मधल्या रँचोचा. शिकणं हा त्याचा आनंदाचा भाग होता, त्यामुळे त्याला शैक्षणिक यश मिळवण्यासाठी डोकेफोड करावी लागली नाही. काहीतरी शिकायला मिळण्याचाच आनंद त्याच्यासाठी पुरेसा होता. अभ्यासाचं लोढणं होण्याऐवजी शिकण्यातला आनंद त्याला पुढे नेणाऱ्या शक्तिवान इंजिनाप्रमाणे ठरला. पण हा उपाय सर्वच मुलांसाठी कसा राबवता येईल?
सर्वच मुलं जन्मतः हे इंजिन घेऊन येतात. प्रत्येकाकडे अगदी पहिल्या दिवसापासून कुतूहल असतं. हे जग काय आहे, ते कसं चालतं, हे जाणून घेण्यात सर्वच मुलांना आनंद वाटतो. हे कुतुहल जिवंत ठेवणं, त्याला खतपाणी देणं आणि शिकण्यातला आनंद जागता ठेवणं हा या परिस्थितीवर उपाय आहे. दुर्दैवाने संपूर्ण शैक्षणिक व्यवस्था हे कुतूहल मारून टाकण्यासाठीच बनवलेली असल्याप्रमाणे वागते. काही मोजके शिक्षक मुलांमध्ये असलेली ज्ञानाची ओढ जागी ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण ते सन्माननीय अपवाद. 


प्रत्येक मुलाचा एक व्यक्ती म्हणून सर्वांगीण विकास करून तिच्या गुणांचं पोषण करणं हे शिक्षणव्यवस्थेचं खरं उद्दिष्ट असायला हवं. पण एकच व्यवस्था लाखो विद्यार्थ्यांसाठी चालवायची तर लष्करी खाक्याची शिस्त, रचना येते. ज्ञान वाढवण्यापेक्षा, जी  मुलं या व्यवस्थेत यशस्वी होतात ती पुढे, जी नाही होत ती मागे, असे शिक्के मारणं हेच व्यवस्थेचं ध्येय बनतं. कोण वर, कोण खाली अशी बौद्धिक वर्णव्यवस्था तयार करून त्यानुसार ही व्यवस्था मुलांना नोकऱ्यांच्या जगात पाठवते. यातूनही काही मुलं शिकतात. पण अनेक मुलं हुशार असूनही, त्यांच्यात गुण असूनही, या व्यवस्थेपोटी मागे पडतात. मुळात एखाद्या गोष्टीची जबरदस्ती झाली की, मुलांना आपसूकच त्याविषयी तेढ निर्माण होते. या तेढीपोटी, बंडखोरीपोटी त्यांना शिकणं नकोसं वाटतं. त्यातून येणारं अपयश, नाचक्की यापोटी त्यांना त्या विषयांची भीती वाटायला लागते. भीतीपोटी टाळाटाळ वाढते, आणि हे दुष्टचक्र चालू राहातं. मात्र घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे या चक्रातून सुटका नसते. अतिरेकी ताणापोटी आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या बातम्या आपण वाचतो, पण त्यापेक्षा हजारो पटीने मुलंमुली शिक्षणाच्या जाचातून वर्षानुवर्षं जातात. अभ्यासाचा बोजा आपल्याला वाटतो तितका खरं तर नसतो. मुलांची क्षमता प्रचंड असते. एक उदाहरण देतो. काही वर्षांपूर्वी हॅरी पॉटरच्या पुस्तकांची लाट आली होती. शनिवारी सकाळी पुस्तक येणार म्हणून पाचवी-सहावीतली पोरं आईबापांबरोबर दुकानासमोर रांगा लावायची, शनिवार-रविवारी ते चारेकशे पानांचं पुस्तक वाचून काढायची आणि वर्षाच्या इतिहास-भूगोलाच्या पुस्तकांपेक्षा अधिक माहिती रिचवून सोमवारी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर त्याबद्दल बोलायची. हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. अभ्यासाबद्दल जर त्यांना इतकं प्रेम आणि ओढ वाटली, तर त्यांना परीक्षा कठीण जातील का? पण ज्ञानातला आनंद नष्ट करून ते कोंबण्याचा प्रयत्न सर्व व्यवस्था करते. म्हणजे गाडीत बसून ती चालवायला शिकवण्याऐवजी ती खेचून न्यायला लावते.


या लेखमालेतून एक पालक म्हणून मला असं सांगायचं आहे की, हे असंच चालू राहाण्याची गरज नाही. शाळेतले विषय कसे शिकवावे हे मी सांगणार नाही. या विषयांमध्ये गोडी कशी निर्माण करावी, भीती कशी घालवावी याविषयी काही लेखन करणार आहे. काही खेळ, उपक्रम, विचार करण्याच्या आणि वागण्याच्या पद्धती याविषयी लेखन असेल. क्लास-अॅप-व्हीडिओ असे सोपे शॉर्टकट्स नाहीत. त्यांविषयी काही सूचना असतीलच, पण ती फक्त आयुधं आहेत. पालकांनीच ती योग्य प्रकारे वापरायला हवी. सर्वांगीण विकासाकडे जर व्यवस्था लक्ष देत नसेल, तर आपणच काहीतरी करायला हवं. मुलांबरोबर योग्य नातं निर्माण करून त्यांना शिक्षणात आनंद घ्यायला शिकवलं तर व्यवस्थेत यशही आपोआपच मिळेल.


-  राजेश घासकडवी, न्यूयॉर्क
ghaski@gmail.com

बातम्या आणखी आहेत...