आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोलाची दृष्‍टी देणारे पुस्‍तक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी साहित्यात ललित गद्य वाङ्मय प्रकाराचे दालन समृध्द असले तरी तो वाङ्मयप्रकार हाताळणे आज दुर्मिळ होत चालले आहे. कारण चिंतन, मनन, विचार हा प्रकारच मुळात संकुचित होत चालला आहे. जीवन ृआणि ते जगण्याची गतिमानता इतकी वाढली आहे की, माणसाला त्याची जाणीवही राहू नये. प्राप्त झालेले जीवन जगण्याकडे सिंहावलोकन करून बघण्याची उसंतच कमी हात चालली आहे. अशात ‘हे जीवन सुंदर आहे’. हा डॉ.शुभदा ठाकरे यांचा ललित लेखसंग्रह नुकताच प्रकाशित होत आहे. सुक्ष्म निरीक्षणाला चिंतनाची जोड देण्यास ललित गद्य वाङ्मय प्रकारासारखा दुसरा वाङ्मय प्रकार नाही. म्हणून तो सूक्ष्म निरीक्षण आणि चिंतनशील पिंड असणाऱ्या संवेदनशील माणसासाठी अत्यंत जवळचा वाङ्मयप्रकार मानला जातो. डॉ. शुभदा ठाकरे यांचे एकूणच जीवनविषयक निरीक्षण आणि त्यान्वये केलेले चिंतन वर्तमान गतिमान जीवनाला समजून घेण्यात वाचकाला मोलाची दृष्टी देते.


प्रस्तुत ललित लेखसंग्रहात एकूण २२ लेख आहेत आणि या सर्वच लेखांना नगरीय वा नागरी पार्श्वभूमी आहे. लेखिका डॉ. ठाकरे  प्राध्यापक असून महाविद्यालय ते घर, दैनंदिन फेरफटका मारण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी घरातून बाहेर पडण्याच्या निमित्ताने घडून येणारी पायपीट आणि या पायपिटीदरम्यान त्यांना आढळलेले जीवनाचे अनेक पैलू व त्यांचे अत्यंत तटस्थपणे पण संवेदनशीलतेने केलेले निरीक्षण अत्यंत प्रांजळपणे प्रत्येक लेखातून व्यक्त झाले आहे. जीवनाचा विस्तार त्यातले परस्परविरोध, नियतीवाद आणि आशावाद, बाल्यावस्था, कुटुंबसंस्था, स्त्रीवरील मालकी हक्काचा संस्कार म्हणून विवाहसंस्था, मध्यमवर्गीय मनोवृत्ती, माणसाचा चाणाक्षपणा, माणसाला पुरून उरणारी भौतिकता, मानवी जीवनातली भ्रष्टता, भिकारी वृत्ती व त्यामागील कारणे, समाजातली विशेषतः खान्देशी समाजातल्या अंधश्रद्धा, तिची अर्थव्यवस्था व त्या अनुषंगाने माणसावर त्यांचे निर्माण झालेले नियंत्रण, समाजातली शैक्षणिक विषमता व त्यामुळे समाजात निर्माण झालेली दरी, दारिद्र्य व त्याचे स्वरूप, बदलत चाललेली सुखाची संकल्पना, निसर्गाची मानवाने चालवलेली अवहेलना, बधीर झालेली विवेकबुध्दी, धर्म-मूल्यांचा ऱहास, इतिहासाचा विपर्यास, टाकीव पाश्चात्य मूल्ये उचलण्याची भारतीय वृत्ती, मेरा भारत महानंचा मथितार्थ, आई तिच्या मातृत्वविषयक वेदना, भावना, माया इ. तरुणांच्या आधुनिकतेचे स्वरूप, वृक्ष संवर्धनातून जीवनमूल्ये जपणे, कालमहिमा,  मानवी जीवनातील आनंद, दुःख, जन्म, मृत्यू अशा कितीतरी मानवी जीवन विषयासंदर्भात लेखिकेने घटनाधारीत चिंतन अत्यंत लालित्यपूर्णरीत्या अभिव्यक्त केले आहे. त्यांची अभिव्यक्ती इतकी प्रगल्भ आहे की, त्या साहित्यक्षेत्रात नवख्या आहेत, असे एकदाही वाटत नाही. एकूणच वर्तमान मानवी जीवनातील विसंगती, परस्परविरोध अत्यंत लालित्यपूर्ण सुभाषित वजा भाषेत मांडण्याचा लेखिकेचा प्रयत्न नव्याने ललित गद्य लेखन करणाऱ्यांंसाठी मार्गदर्शनपर आहे.


हे जीवन सुंदर आहे (ललित लेख संग्रह)
लेखिका- डॉ.शुभदा ठाकरे
प्रकाशन-स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
मूल्य-रु. 150/-


- राजीव के. आरके, धुळे

बातम्या आणखी आहेत...