आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकडीचा शर्ट आणि तुळशीची पानं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिस्थितीच्या माऱ्याने माणसं खचत असतील कदाचित, पण माणुसकी? ती उत्तुंगच होत जाते. जिच्याबद्दल माझ्या मनात एक प्रकारची श्रद्धा आणि करुणा होती, त्या दूर देशातल्या रेश्मानं मला माणुसकीचा खरा अर्थ सांगितला होता...

 

मध्यरात्र उलटली होती. दुधाळ चांदण्यांनी आभाळ व्यापलेलं होतं. ती चांदणी लगडलेली आभाळाची चादर जमिनीला टेकू पाहत होती. पण मला आनंद वाटत नव्हता. राहून राहून डोळ्यासमोर रेश्माच येत होती. जीव दमला, शिणला तरी खोलीवर जावंसं वाटत नव्हतं. मनातली विचारांची वावटळ थांबता थांबत नव्हती. शेवटी घरी जाण्याचा रस्ता बदलला आणि कोणताही विचार न करता, तेवढ्या रात्री मी भाभीच्या घराचा दरवाजा ठोठावला. मला पाहताच भाभी दचकल्या. मी त्यांच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नव्हतो. मोठ्या भाभीनं पाणी दिलं. गटागटा पाणी पिऊन तांब्या खाली ठेवला. ‘आखिर जो नही होना था, वो हो गया।’ भाभी माझ्याकडे पाहत म्हणाली. त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याची माझ्यात हिंमत नव्हती. भाभीनं अडचण ओळखली होती. ‘दोनों में  झगडा हुआ क्या? आपसे बात नहीं करती वो? कोई दुसरा उसे चाहता है?’ त्या एकापाठोपाठ कित्येक प्रश्न विचारत होत्या...


मोठी भाभी थोडा वेळ थांबली. बारबालांच्या कामाचं स्वरूप तिनं विचारलं आणि बटन दाबताच लख्ख बल्ब लागावा, तशी भाभी म्हणाली,‘वो कस्टमर से बात करती है। उनके पास जाती है। ये बात आपको अच्छी नही लगती।’ भाभी अशी बोलल्यावर माझ्या तोंडातून पटकन होकार बाहेर पडला. हे ऐकून त्या दोघी खदाखदा हसू लागल्या. भाभीनं मनातल्या गोष्टीला हात घातला होता आणि आम्हां तिघांत बोलता बोलता ती रात्र सरत गेली.


...रात्रीचे नऊ वाजले होते. ऐश्वर्या, टिना, सुमन, बबली सगळ्या जणी टेबलवर होत्या. तेवढ्यात आठ नंबरच्या कस्टमरनं आवाज दिला. कस्टमरनं माझ्या हातावर शंभर रुपयांची कडक नोट ठेवली. ते म्हणालं, ‘हे शंभर रुपये घे आणि रेश्माला आमच्या टेबलवर पाठव.’ त्यांनी असं म्हणताच माझी तळपायाची आग मस्तकात गेली. पटकन ती हिरवी नोट मी तशीच टेबलवर टाकून दिली. "पैसे घे आणि रेश्माला टेबलवर पाठव,’ ही गोष्ट मला बिलकुल रुचली नाही.  कारण, रेश्माबद्दल माझ्या मनात प्रचंड श्रद्धा होती. करुणा होती.


 पण असे असूनही मी रेश्माला टेबलवर पाठवणार नाही, असे मला कस्टमरला सांगता येत नव्हते; म्हणून मी काहीही न बोलता टेबलपासून बाजूला झालो. मी एका कोंडीत अडकलो होतो. रेश्माला कोणत्या तोंडानं सांगावं आणि नाही सांगावं, तर काउंटरवर शेठची बोलणी खावीत. कस्टमरचा रोष नको म्हणून मी कांताला सांगितलं. तिचं स्वतःचंच दुःख तिची पाठ सोडायला तयार नव्हतं. ती माझ्यावरच खेकसली. ‘तेरेकू बोलना नही आता क्या? टेबल नहीं लगे तो, कैसे गुलूगुलू बाते करते बैठता उसके साथ। अब मुझे बता रहा है। जैसे मुझे कुच्छ समझही नही आता।’ मनात म्हणालो, ‘फुफाटा सोडून कशाला ह्या आगीत पडलो?’ समोर रेश्मा दिसली तशी तिला हाक मारली. ‘क्यूं इतना बैचेन हो रहा है। पानी पिने गई थी मैं। शहर छोडकर नहीं।’ 
 
 
रेश्मा बोलतच हॉलमध्ये गेली. पाच नंबरच्या कस्टमरनं तिला मध्येच बोलावून घेतलं. मी रेश्माला निरोप दिला नाही, म्हणून आठ नंबरचं कस्टमर काउंटरवर माझी तक्रार करण्यासाठी निघालं; तोच रेश्मा त्यांच्यापुढं हजर झाली. तिनं त्या सगळ्यांना पेग बनवून दिले. एकाने तिचा हात धरून गाण्यावर ताल धरला. माझ्यात हे बघण्याची ताकद नव्हती. मी लगेच किचनमध्ये निघून गेलो. वस्ताद फिश फ्राय तळत होता. त्याचा खमंग वास नाकातोंडात शिरला. किचन हेल्पर गाजर कापत होता. अस्वस्थतेत मी गाजराचे एक दोन तुकडे तोंडात टाकले. तेवढ्यात हॉलमधून एक हेल्पर पळत आला. माझा हात धरून हॉलकडं चल म्हणाला. रेश्माच्या अंगावर कस्टमर पैशांचा पाऊस पाडत होते. आतापर्यंत मीदेखील कोणत्याही कस्टमरला रेश्माच्या अंगावर एवढ्या नोटा उधळताना पाहिलं नव्हतं. ते बघताना मला आनंदही झाला आणि दुःखसुद्धा!


माझी बी.ए. ची परीक्षा पंधरा दिवसांवर आली होती. रेश्मा मला अभ्यासासाठी सुटी टाक, म्हणून मागे लागली होती. तिनं माझ्या खिशात तीनशे रुपये कोंबले. खर्चाला राहू दे म्हणाली. खिशातले पैसे काढून मी तिला परत केले; खरं तर तिला अभ्यासक्रम माहीत नव्हता, पण पेपर चांगला लिही, हे ती आवर्जून सांगायची. दुसऱ्या दिवशी पेपरबद्दल न चुकता विचारायची. म्हणूनच पेपरला जाताना रोज मी तिला भेटून जायचो. मी मराठीत एम.ए. करायचं ठरवलं होतं. मराठी एम.ए. करून नेट, सेट किंवा पीएच.डी. करून, एखाद्या कॉलेजात प्राध्यापकी करण्याची माझी इच्छा होती. कधी कधी काम करून थकून जायचो. तेव्हा भाभी, रेश्मा मला ‘दिवस बदलतील’ असे सांगत धीर द्यायच्या. त्यात मोठ्या भाभीचा घशाचा मागचा आजार पुन्हा उफाळून आला होता. इथं दोन-चार दवाखान्यात दाखवलं. गुण आला नाही. तेव्हा वाहिद आणि मेहबूबनं भाभीला पुण्याला न्यायचं ठरवलं होतं. एक दिवस चोरून मी त्या दोघांचं बोलणं ऐकलं. त्यांच्या बोलण्यातून भाभीला घशाचा कॅन्सर झाल्याचं मला समजलं. हे ऐकताच माझी पाळमुळं ढिली पडली. भाभीला कॅन्सर झालाय, ह्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नव्हता. भाभीबद्दल ऐकून सुमन, रेश्माला मोठा धक्का बसला. भाभींपासून मी कोणतीच गोष्ट लपवत नाही, हे त्या दोघींना माहीत होतं. मला समजावताना त्यांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. परीक्षा झाल्यावरसुद्धा भाभीच्या आजारपणात पुन्हा आठवडाभर ड्यूटीवर जाता आलं नव्हतं. माझी परीक्षा चालू आहे, हे शेठला माहीत होतं. भाभीला पुण्याला न्यायचा दिवस उजाडला. निरोप देताना मनाची खूपच घालमेल झाली. मनातली कालवाकालव बाहेर न येऊ देता, आम्ही हसत त्यांना निरोप दिला. त्यानंतर आतापर्यंत भाभीची कधीच भेट झाली नाही...


आज हॉटेलमध्ये रेश्मा, सुमन आणि कांता दिसत नव्हत्या. कुणाला विचारावं, तर जो तो आपल्या कामात अडकला होता. मात्र, टिना मला सगळीकडं शोधत होती. मी रित्या मनाने बाहेर पडत होतो.   ‘क्यू आज जल्दी निकला तू।’ ती माझ्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत म्हणाली. मी एक शब्दही बोललो नाही. टिनानं माझ्या मनातलं ओळखलं. ‘कल सुबह फ्लॅटपर आजा। तुझे कुच्छ देना है।’ असे म्हणत ती पाठमोरी होऊन चालती झाली.


दुसऱ्या दिवशी मी फ्लॅटवर गेलो. तिथंही रेश्मा, सुमन दिसत नव्हत्या.  कोणीच काही बोलत नव्हतं. टिना खाली मान घालून बसली होती. ‘रेश्मा कुठंय? सुमन दिसत नाही. कांता कशी आहे आता?’ माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही. माझी घालमेल टिनाच्या ध्यानात आली. ती सांगू लागली. ‘आम्हा बारबालांची हॉटेलमधली नोकरी कधीच पर्मनंट होत नाही. आम्हा बारबालांचा ठेकेदार मुंबईत राहतो. सगळ्या लेडीज बारमध्ये तरुण पोरींना पाठवण्याचा काम त्याच्याकडं आहे. हा ठेकेदार कोणत्याही बारबालेला एका ठिकाणी वर्ष, सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ ठेवत नाही. त्यामुळे ठेकेदाराच्या सांगण्यावरून प्रत्येकीचं हॉटेल, शहर बदलतं. तुझ्या रेश्माला आणि सुमनला दोन दिवसांपूर्वीच त्यानं मुंबईला बोलावून घेतलंय. तिथून पुढे त्या दोघींना कोणत्या शहरात पाठवतील, हे फक्त ठेकेदारालाच माहीत असतं.’ हे सांगताना टिनाच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं.


टिनानं सांगितल्यावर सगळा खेळ माझ्या लक्षात आला. रेश्माची आणि माझी आता कधीच भेट होणार नव्हती. मला एकापाठोपाठ दोन झटके बसले होते. बारबालांच्या चेहऱ्यावर त्यांच्या आयुष्याचा आलेख स्पष्ट दिसत होता. रेश्मा भेटून गेली नव्हती. याची जखम खोलवर झाली होती. मी जाण्यासाठी उठलो, तोच ऐश्वर्यानं एक बॉक्स आणि कागदाची पुढी माझ्या हातात दिली. ‘रेश्मानं जाण्याअगोदर तुझ्यासाठी ही भेट दिलीय. ती कागदाची पुडी मी खिशात टाकली आणि बॉक्स काखेत धरत जड अंतःकरणानं खोलीचा रस्ता पकडला.


रेश्मानं माझ्यासाठी सुंदर चौकडीचा शर्ट घेतला होता. कागदाच्या पुडीत तुळशीची हिरवीगार पाच पानं होती. ती कोणत्या जातीची, धर्माची हे माहीत नव्हतं. पण तिच्या भेटवस्तूनं माणुसकीला मोठं केलं होतं. क्षणाचाही विलंब न  करता, मी तो चौकडी शर्ट अंगात घातला आणि गावाकडची गाडी धरली. त्या दिवशी अवकाळी पाण्यानं सगळ्यांची दाणादाण उडवली. रात्री खेळणा नदीला दुथडी भरून पूर आला होता. पोरंसोरं सकाळीच पूर पाहायला नदीकडं पळाली. त्यांच्यातला एक मीदेखील होतो. एवढा मोठा पूर, पण नदी कशी शांत वाहत होती. नकळत माझे हात खिशांकडे गेले. मी पुडी उघडली आणि रेश्मानं दिलेल्या पुडीतली पाच तुळशीची पानं पुराच्या पाण्यात सोडून दिली. पाणी वाहत होतं. त्यावर तरंगलेली ती तुळशीची पानं दूर जाईपर्यंत मी भरल्या नजरेनं पाहत होतो...


- रमेश रावळकर
rameshrawalkar@gmail.com
लेखकाचा संपर्क :  ९४०३०६७८२४

 

बातम्या आणखी आहेत...