आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधवांचं हतबल जिणं कधी बदलणार?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने २०१० पासून २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून पाळला जातो. बहुतांश देशांत विधवांची स्थिती वाईट आहे. समाज त्यांना भेदभावाची वागणूक देत असतो. या परिस्थितीत सकारात्मक बदल व्हावा हा या दिनामागचा मुख्य उद्देश. या दिनानिमित्त आजची कव्हर स्टोरी.


जा गतिक स्तरावर विधवांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या लुम्बा फाउंडेशनच्या वतीने २०१५मध्ये एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात २४ देशातील विधवांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला होता. विधवांच्या संदर्भात अशा प्रकारे अभ्यास करून निष्कर्ष मांडणारी लुम्बा ही जगातली पहिलीच संस्था. विविध वयोगटातल्या विधवांची सविस्तर टक्केवारी या अभ्यासात मांडण्यात आली होती. जगाच्या पाठीवर सगळीकडेच विधवांच्या स्थितीत फारसा फरक नाही. त्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक कलहाला सामोरं जावं लागतं, असंही या अभ्यासात नमूद करण्यात आलं होतं. विधवांच्या वाईट परिस्थितीच्या निकषावर भारत आणि चीन वरच्या क्रमांवर असल्याचं तर विधवांच्या वाढत्या संख्येबाबत भारत दुसऱ्या क्रमांंकावर असल्याचं ‘लुम्बा’चा अभ्यास सांगतो.


भारताच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास, चित्र अर्थातच सकारात्मक नाही. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक अशा अनेक स्तरांवर विधवांना भेदभावाचा सामना करावा लागतो. या अन्यायाला शहरी, ग्रामीण, नोकरी करणारी, गृहिणी, शेतकऱ्यांच्या अथवा सैनिकांच्या विधवा, असा कुठलाच अपवाद नाही. विधवा कुटुंबात असणं अशुभ मानण्याच्या पारंपरिक मानसिकतेमुळे अशा महिलांना दैनंदिन कामकाजासाठीसुद्धा संघर्ष करावा लागतो. विधवांचं कुटुंबात वास्तव्य नको म्हणून उत्तर प्रदेशातल्या वृंदावन येथे दरवर्षी कृष्णजन्माष्टमीला विधवांना कृष्णमंदिरात सोडून दिले जाते, हे याचंच बोलकं उदाहरण.


राज्यातलं चित्रही देशापेक्षा वेगळं नाही. उलट राज्यात तर विभागनिहाय अशा महिलांच्या जगण्याचा संघर्ष अधिक तीव्र होत जाताना दिसतो. जगण्याच्या या संघर्षाला स्थानिक नैसर्गिक अडचणींचा एक वेगळाच कंगोराही जोडलेला जाणवतो. उदाहरणार्थ, मराठवाड्याच्या दुष्काळी स्थितीमुळे तिथल्या विधवांचा संघर्ष सामाजिक पातळीवर अधिक तीव्र होतो. कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या ‘आशा’ केंद्रामार्फत गेली दोन दशके एकल महिलांच्या, ज्यात विधवांचाही समावेश होतो, त्यांच्या सक्षमीकरण आणि जीवनमान बदलासाठी काम सुरू आहे. ‘आशा’ केंद्रात काम करणाऱ्या ९० % स्त्रिया एकल या प्रकारात मोडतात. या कामाचा एक भाग म्हणून मराठवड्यातल्या दुष्काळाचा अभ्यास करत असताना एकट्या महिला आणि पाणी प्रश्न या स्वतंत्र अभ्यास आम्ही केला. या दरम्यान, राज्याच्या अनेक भागांतील एकट्या महिलांची स्थिती जाणून घेण्यासाठी भेटी दिल्या. यातून विधवांचे अनेक मन सुन्न करणारे अनुभव आम्हाला मिळाले. 
मराठवाड्याचा दुष्काळ अभ्यासात असताना, १७ वर्षांच्या विधवेपासून वयाची सत्तरी पार केलेल्या महिलांना आम्ही भेटलो. 


जालन्यातील गवळी पोखरी या गावात प्रवेश करताच ५-६ महिला डोक्यावर किमान दोन हंडे आणि हातात एक कळशी पाणी भरून घेऊन जाताना दिसल्या. मी गावातील महिला आणि मुलीसोबत संवाद साधत होते. सुरुवातीला महिलांनी बोलण्यास नकार दिला. मात्र काही वेळातच मोकळेपणाने बोलू लागल्या. तेवढ्यात साठीतल्या आज्जी आल्या. ‘आमच्यासारख्या रांडमुंड बायांसाठी काही आहे का?’ असं त्यांनी विचारलं. रांडमुंड म्हणजे विधवा. आजी सांगत होत्या, “माझा मालक मारून १५-२० वर्षं झाली. तीन पोरं आहेत. गावात कामधंदा नाही. म्हणून तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी मजुरीसाठी जातात. मी म्हातारी काय करणार. डोळ्यात टिकली (मोतीबिंदू) पडली त्यामुळे नीट दिसत नाही. ऑपरेशन करावं अशी आर्थिक स्थिती नाही. मी एकटी करून खाते.’ पती गेल्यानंतर तिन्ही मुलं वेगळी झाली. जे घर होतं त्याची वाटणी झाली. एकट्या बाईला राहण्यासाठी खोली कशाला पाहिजे, म्हणून आजीला स्वत:च्या घरात ओसरीवर राहावे लागते. 


औरंगाबाद शहरामध्ये सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या संगीता. त्यांच्या निवृत्तीनंतर एकाच वर्षात त्यांचे पती वारले. वडिलांचा दिवस झाल्याबरोबर मुलांनी घराच्या वाटण्या केल्या. आईला सांभाळायला दोन्ही मुलांनी नकार दिला. आईची जबाबदारी त्यांनी घ्यायची असेल तर तिने तिच्या निवृत्तीनंतर मिळालेला सगळा पैसा मुलांना द्यावा; या अटीवर तिला सांभाळले जाईल असा हुकूम तिला दिला गेला.


अहिल्याबाई आणि लक्ष्मीबाई. दोघी वयाने ५०-५५च्या आसपास. दोघींचंही लग्न ‘वयात’ आल्यावर लगेच झालं. वयाची १८ वर्षं पूर्ण होण्याच्या आतच पहिलं मूल जन्माला आलं. अहिल्याबाईला तीन मुली आणि एक मुलगा झाला तर लक्ष्मीबाईला दोन मुली आणि तीन मुलगे. मुलं मोठी झाली. त्यांची लग्नं झाली. घरात सुना आल्या. कालांतराने जोडीदाराच्या मृत्यूनंतर अहिल्या आणि लक्ष्मीबाईच्या आयुष्याचा नवा संघर्ष सुरू झाला. 


अहिल्याबाईच्या मुलानं आईची जबाबदारी घेण्यास नकार दिला. अहिल्याबाई स्वत:च शेतात मजुरी करून पोट भरतात. लक्ष्मीबाईला तीन मुलं. सुरुवातीला त्यांना सांभाळणाऱ्या मुलांनी नंतर नकार दिल्यानं, लक्ष्मीबाई मजुरी करून गुजराण करत आहेत. 


दुसरीकडे शहरातली उच्चभ्रू, शिकलेल्या माणसांच्या वागण्यातही काही बदल नसतो हे सांगणारा हा अनुभव. सविता आणि तिची मुलगी दोघीचं कुटुंब. ५-६ वर्षांपूर्वी सविताचे पती अपघातात वारले. त्या वेळी मुलगी लहान होती. पतीच्या जागेवर सविताला नोकरी मिळाली. दोघी मायलेकी त्याच्या विश्वात आनंदी होत्या. सोसायटीच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा विशेष सहभाग नसे. काही दिवसांपूर्वी त्याच्या बिल्डिंगमधील एका मुलाचं लग्न होतं. सदरील कुटुंब पत्रिका देण्यास आलं त्या वेळी सविताने त्यांना चहापाणी केलं. त्या वेळी सविताची मुलगी म्हणाली, काका-काकू पत्रिकेवर आईचं नाव टाकायचं राहिलं आहे. मी तुम्हाला पेन देते, तुम्ही नाव टाकून द्या. यावर ते गृहस्थ म्हणाले, ‘अगं, नाव मुद्दाम नाही टाकलं. पत्रिका पुरुषाच्या नावाने देतात. तुझी आई तर विधवा आहे.’


कुणापुढेही हात न पसरता स्वाभिमानं जगणाऱ्या विधवांची ही काही प्रातिनिधिक उदाहरणं. अशा स्त्रिया स्वत:च्या पायावर उभ्या असल्या तरी समाजाचा म्हणावा तेवढा आधार त्यांना मिळत नाही. कारण पारंपरिक मानसिकता. दुर्दैवानं बायकोच्या मृत्यूनंतर पुरुषाला दुसऱ्या विवाहाची सहज परवानगी देणारा समाज विधवांच्या दुसऱ्या विवाहाबद्दल फारसा आग्रही दिसत नाही. उलट वैधव्य हा त्या बाईचाच दोष मानून तिला कौटुंबिक, सामाजिक सुखांपासून वंचित ठेवण्याकडे, सक्तीचं धर्माचरण पाळायला लावण्याकडे समाजाचा कल असतो. नैतिकता, संस्कृती, श्रद्धा वगैरेंमध्ये विधवांना सोयीनं अडकवून ठेवलं जातं. ही परिस्थिती बदलायची असेल तर विधवांना भावनिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या उभं करणं गरजेचं आहे. इतर सामान्य माणसांसारखाच विधवा या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. त्याही माणसं आहेत, इतकी साधी पण कालसुसंगत विचार व आचारसरणी आपल्या सर्वांचीच असायला हवी. शिवाय कमी वयात विधवा होणाऱ्या स्त्रियांच्या प्रमाणावर लगाम घालण्यासाठी बालविवाह कायद्याची सक्तीनं, जागरुकतेनं अंमलबजावणी व्हायला हवी.


लुम्बा फाउंडेशनच्या अभ्यासाचे निष्कर्ष 
१ - जागतिक स्तरावर विधवांची संख्या २५८,४८१,०५८ आहे.  
२ - मध्य आशिया आणि उत्तर आफ्रिका खंडात वर्ष २०१५मध्ये सिरिया आणि अन्य युद्धजन्य स्थितीमुळे विधवांच्या प्रमाणात २४ % वाढ झाली आहे. 
३ - जागतिक पातळीवर सातपैकी एक विधवा अत्यंत गरिबीच्या स्थितीत जीवन जगत आहे. 
४ - भारत आणि चीन या दोन देशांत दर तीन स्त्रियांमागे एक स्त्री विधवेचं जीवन जगत आहे. 
५ - विधवांची संख्या भारतात ४६ दशलक्ष, तर चीनमध्ये ४४.६ दशलक्ष आहे. 
६ - जागतिक स्तरावर विधवांचं सर्वाधिक प्रमाण असलेला भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

 

- रेणुका कड, औरंगाबाद
rkpatil3@gmail.com

बातम्या आणखी आहेत...