आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
रुचा अभ्यंकर मूळ अकोल्याच्या असून त्यांनी भौतिकीमध्ये एमएससी केलं अाहे, त्यासाठी Energy studies and materials science हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय होते. सध्या त्या पुण्यात Centre for Materials for Electronics Technology या संस्थेत नोकरी करतात. पर्यावरण या विषयावर त्या मधुरिमासाठी लिहिणार आहेत. त्यातला हा पहिला लेख.
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात दिल्ली-एनसीआर भागात फटाकेविक्रीवर बंदी आणली तेव्हा सोशल मीडियावर काही चर्चा, विधानं वाचण्यात आली. काही वाक्यं तर अतिशय धक्कादायक होती. भावना भडकावणं हे भावना जागवण्यापेक्षा कितीतरी सोपं काम आहे. यावरून एक लक्षात आलं की हवामान बदल (climate change) / ग्लोबल वॉर्मिंग याचं गांभीर्यच अजून बहुतांश लोकांना कळलेलं नाही. हवामान बदल ही जरी नैसर्गिक घटना असली तरी जागतिक सरासरी तापमानवाढीचा झपाट्याने वाढणारा दर (म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग) मानवनिर्मित आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत, पण हा प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर आपल्या जीवनशैलीत बदल केल्याशिवाय ही परिस्थिती नियंत्रणात येणं शक्य नाही.
बदल घडवून आणण्यासाठीचा पहिला टप्पा म्हणजे ‘जाणीव’. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी आपलं काहीतरी नातं आहे, आपला इवलासा जीव या विशालकाय पृथ्वीच्या वातावरणाचा ऱ्हास होण्यात काही ना काही वाटा उचलतोय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण करत असलेलं प्रत्येक काम, आपली एकएक सवय कमी-जास्त प्रमाणात यासाठी आपल्याही नकळत यासाठी कारणीभूत ठरतेय हे लक्षात येणं सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे.
कार्बन फूटप्रिंट (कार्बन पदचिन्ह)
खरं तर आपलं अस्तित्त्वच हवामान बदल घडवण्यात काही प्रमाणात योगदान देत असतं. आपण श्वासोच्छ्वास करतो त्याद्वारे सतत कार्बन डायऑक्साइड वायू हवेत सोडला जात असतो. रोज जी आपण साधनं, वस्तू वापरतो त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कार्बन डायऑक्साइड आणि अन्य हरितगृह वायू उत्सर्जित होत असतात. याचं मापक म्हणजे कार्बन फूटप्रिंट. कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखादी व्यक्ती, घटना, संस्था किंवा वस्तू यामुळे उत्सर्जित होणाऱ्या हरितवायूंचं कार्बन डायऑक्साइड समतुल्य प्रमाण. जागतिक सरासरी तापमानवाढ आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन याचा थेट संबंध आहे. गेल्या दीडशे वर्षात जे सरासरी तापमान ०.८ अंश सेल्सिअसने वाढलं होतं ते आता दर दशकाला ०.२ अंश सेल्सिअस या दराने वाढतंय. ही वाढ नियंत्रित करण्यासाठी आपलं कार्बन उत्सर्जन कमी करणं हाच उपाय आहे. पण आपण आपल्या प्रचंड वेगाने आणि अविचाराने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे त्यात आणखी भर टाकत जातोय.
आज बरेच लोक हवामान बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग हे मानवी हस्तक्षेपाचा परिणाम आहे, याविषयीच शंका उपस्थित करतात. साधं समीकरण आहे, तुम्ही पेराल तेच उगवेल. विकासाच्या नावाखाली अविचाराने संसाधनांचा आपण ओरबाडून वापर करतोय त्याचे दुष्परिणाम होणारच. असं होतं असेल तर जो होतोय तो खरंच विकास आहे का, हा मूळ प्रश्न आहे. हा शाश्वत विकास नाही.
साधं उदाहरण घेऊ. समजा बाजारात एखादी वस्तू आणायला गाडीने गेलात तर त्यासाठी वापरलं जाणारं इंधन, त्या वस्तूचं उत्पादन, त्याची वाहतूक, पॅकिंग इ. या सगळ्या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्याला जे उत्सर्जन होत असतं ते आपल्यामुळे होत असतं, त्याला आपण कारणीभूत असतो. आपला विजेचा वापर, अन्नाची नासाडी, विनाकारण घेतलेल्या आणि वाया गेलेल्या वस्तू, प्लास्टिकचा वापर या सगळ्या गोष्टी कार्बन फूटप्रिंटमध्ये गणल्या जातात. वरवर साध्या वाटणाऱ्या कितीतरी गोष्टींमुळे आपण आपल्या पर्यावरणावर आपला ठसा (कार्बन फूटप्रिंट) उमटवत असतो.
उद्या हेच ठसे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी घातक ठरणार आहेत, ठरू लागले आहेत. दुर्दैवाने आपल्या या पाऊलखुणा कुणी मागोवा घेऊ नयेत अशाच आहेत. त्यामुळे पुढचं प्रत्येक पाऊल आपल्याला तोलूनमापून, जपून टाकावं लागणार आहे.
- रुचा अभ्यंकर, अकोला
rucha.abhyankar15@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.