Home | Magazine | Madhurima | Rucha Abhyankar writes about how festivals add to the pollution

सण, उत्सव आणि पर्यावरण

ऋचा अभ्यंकर, अकोला | Update - Jul 24, 2018, 06:58 AM IST

मागील काही लेखांमध्ये आपण आपल्या बदलत्या आधुनिक जीवनशैलीचा पर्यावरणावर कसा घातक परिणाम होतोय हे पाहिलं.

 • Rucha Abhyankar writes about how festivals add to the pollution

  मागील काही लेखांमध्ये आपण आपल्या बदलत्या आधुनिक जीवनशैलीचा पर्यावरणावर कसा घातक परिणाम होतोय हे पाहिलं. जसा आपल्या दैनंदिन जीवनपद्धतीत बदल झालाय तसेच आपल्या सण-उत्सव साजऱ्या करण्याच्या पद्धतींतही आमूलाग्र बदल झाले आहेत. आपल्या सण-उत्सवांचाही पर्यावरणाची हानी होण्यात फार मोठा वाटा आहे, त्यात कसा बदल करायचा ते आपणच ठरवायचं आहे.


  खरं तर हा विषय माध्यमांतून किंवा सार्वजनिक ठिकाणी मांडणं आजकाल कठीण झालंय कारण लोकांच्या भावना लगेच दुखावल्या जातात. पण हा विषयही तितकाच गंभीर आहे. आपण स्वतःला कुठल्या धर्म व जातीच्या चष्म्यातून न पाहता आधी पृथ्वीवर राहणारा एक जीव म्हणून पाहायला हवं. संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या नावाखाली आपण जे रीतिरिवाज पाळतो किंवा सण साजरे करतो, ते किती योग्य आणि किती अयोग्य याचा विचार आता व्हायला हवा. काळानुसार कुठे बदल करावेत आणि कुठल्या गोष्टी मूळ स्वरूपात ठेवाव्यात याचा पर्यावरणाच्या दृष्टीनेही विचार व्हायलाच हवा.


  नुकतीच वटपौर्णिमा होऊन गेली. आता थोड्याच दिवसांत श्रावणापासून सण सुरू होतील ते दसरा-दिवाळीपर्यंत. वटपौर्णिमेला काही बायका सर्रास वडाच्या फांद्या तोडून आणून मग त्याची पूजा करतात. हरतालिका, मंगळागौरीला पाच किंवा सोळा प्रकारच्या पत्री (झाडांची पानं) तोडण्याची प्रथा आहे. पूर्वी आसपास झाडं-झुडपं मुबलक प्रमाणात असायची. आता झाडं कमी आणि लोकसंख्या जास्त झाली आहे. आपल्या जवळच्या मोजक्या झाडांवरच्या पत्री अनेक लोकांकडून तोडल्या जातात. यात कधी कधी फांद्यांच्या फांद्या निष्पर्ण होतात. बऱ्याचदा पूजेत पाच प्रकारची फळं लागतात. सण जवळ आले की, बाजारात अगदी छोट्या, न पिकलेल्या फळांचे वाटे विकायला आलेले असतात. ती कच्ची फळं बहुतांश वेळा पूजा झाल्यानंतर वाया जातात.


  महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव आणि संपूर्ण भारतात दिवाळी फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. गणपती ही बुद्धीची देवता असूनसुद्धा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात सगळ्यात जास्त सामूहिक निर्बुद्धता आपण दाखवून देतो. या उत्सवाचा मूळ हेतू केव्हाच हरवला आहे. प्लास्टिकच्या वस्तूंची सजावट, प्रसाद वाटण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकदाच वापरून फेकून देण्याच्या ताटल्या/चमचे/;वाट्या/पेले, मिरवणुकीच्या वेळी उडवण्यात येणारे फटाके, डीजे (यात ध्वनिप्रदूषणही आलंच) आणि त्यानंतर होणारा कचरा अशा अगणित गोष्टी आहेत. पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत तर नाहीच, शिवाय त्या रंगवताना रासायनिक रंग वापरलेले असतात. ते पाण्यात मिसळून त्याचा पाण्यातल्या व समुद्री जीवांना धोका निर्माण होतो. त्याचप्रमाणे मूर्तींबरोबर निर्माल्य, प्रसाद इत्यादी विसर्जित केल्याचा अप्रत्यक्ष परिणाम अन्नसाखळीवर होतो. यानंतरचा मोठा सण दिवाळी. फटाक्यांनी होणाऱ्या धुरामुळे तर दिव्यांची रोषणाईसुद्धा दिसेनाशी होते. यात खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण तर होतंच, शिवाय झगमगटाचा अतिरेक करून ऊर्जेचा अतिरिक्त आणि अनावश्यक वापर होतो.


  संक्रांतीच्या काळात पतंगाच्या धारदार मांज्यामुळे दरवर्षी अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. होळीच्या सणाला पुरेशी लाकडं मिळाली नाहीत की झाडं तोडली जातात. नैवेद्याच्या नावाखाली अन्न वाया घालवलं जातं. रंग खेळताना पाणी वाया जातं, प्रदूषित होतं. तसंच काही अतिउत्साही लोकांमुळे प्राण्यांनाही इजा होते. बऱ्याच चालीरीतींमध्ये लहानमोठ्या प्रमाणात अन्न वाया घालावलं जातं. या वरवर क्षणिक गोष्टी वाटल्या तरी याचे परिणाम मात्र दूरगामी आहेत. माणूस मुळात निसर्गपूजक आहे, अनेक सण साजरे करण्याचा उद्देश हा निसर्गपूजा आहे. मानसिक प्रसन्नता लाभावी, आनंद मिळावा, समृद्धी लाभावी हा सण साजरे करण्याचा मूळ हेतू आहे. परंतु हे सगळं अर्थहीन होऊन आपली खरी समृद्धी लोप पावण्याच्या मार्गावर आहे. सण, उत्सव साजरे करण्याच्या बदललेल्या पद्धती पर्यावरणातील बदलास कारणीभूत ठरायला लागल्या आहेत. या वर्षीच्या मुख्य सणांची सुरुवात अजून व्हायची आहे, वेळीच जागं होऊ या आणि आपली प्रत्येक घातक कृती थांबवू या. तरच निसर्गदेवता प्रसन्न होईल.

  - ऋचा अभ्यंकर, अकोला
  rucha.abhyankar15@gmail.com

Trending