आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिम अहंकाराला आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरुषसत्ताक व्यवस्था स्त्रीबाबत कमालीची ‘प्रोटेक्टिव्ह’ आणि ‘पझेसिव्ह’असते. पण हा प्रोटेक्टिव्हनेस किंवा पझेसिव्हनेस तिच्या योनीवर ताबा मिळवण्यातून आलेला असतो. मग पुरुषसत्तेचा धर्म हिंदू असो वा मुस्लिम, सगळ्यांचेच अंतिम उद्दिष्ट एकच असते. या ताबा ठेवण्याच्या मानसिकतेतूनच तिच्यावर जाचक प्रथा-परंपरा लादल्या जातात, तिला देवत्व बहाल करून प्रतिमेत कैद केले जाते...विचारी अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिगामी सतीप्रथेचं उदात्तीकरण करणाऱ्या ‘पद्मावत’चा दिग्दर्शक संजय लीला भन्साळीस लिहिलेल्या खुल्या पत्राचा हा आशय. पुरुषी मानसिकतेच्या मुळांवर घाव घालणाऱ्या, पुरुषसत्ताक व्यवस्थेला ‘रंगेहाथ’ पकडणाऱ्या त्या पत्राच्या अनुषंगाने हा लेख...


ऐतिहासिक घटना-प्रसंग  पडद्यावर भव्य-दिव्य स्वरूपात साकारण्याचं कसब निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याने चांगलंच साधलंय, हे त्याच्या गेल्या तीन-चार चित्रपटांमधून दिसून आलं होतंच. पण, तसे करताना इितहासासोबतच रूढी-परंपरांवर भर देऊन त्यांचं ‘लार्जर दॅन लाइफ’स्वरुपात उदात्तीकरण करण्यातही त्याने अनेकांना मागे टाकलं आहे. याला नुकताच प्रदर्शित  झालेला ‘पद््मावत’सुद्धा अपवाद नाही...


‘पद््मावत’ हा पक्षपातीपणा करत फक्त दोन भिन्न धर्मातील, संस्थानांमधील युद्ध दाखवत नाही, तर त्याला धरून महिलांच्या स्वतंत्र अस्तित्व, विचारक्षमता यांच्यावरही अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करतो. या सिनेमाचा शेवट जौहर अर्थात सती जाण्याच्या दृश्याने होतो. या प्रसंगाच्या करण्यात आलेल्या उदात्तीकरणामुळे व्यथित होऊन स्वरा भास्कर नामक विवेकनिष्ठ विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीने संजय लीला भन्साळी यास लिहिलेले संयत तितकेच सडेतोड खुले पत्र पुरुषप्रधान व्यवस्थेच्या आदिम अहंकाराला आव्हान देणारे असे ठरले आहे. पद्मावतीची गोष्ट १३ व्या शतकातली असली, तरीही ‘पद्मवात’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय, त्याला एकविसाव्या शतकाचा संदर्भ आहे. या शतकात बलात्कार आणि अत्याचारपीडित महिला निर्धाराने अन्यायाविरोधात उभ्या राहू पाहताहेत. त्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क अबाधित ठेवू पाहताहेत.  मात्र ‘पद्मावत’मध्ये दाखवण्यात आलेले जौहरचे दृश्य, या दृश्याची मांडणी, दृश्यांतले संवाद ‘मी कुणी  स्वतंत्र स्त्री नसून पुरुषांनी ताबा ठेवावी अशी एक केवळ एक योनी आहे’, अशी उद्विग्न भावना करून देणारे असल्याचे मत स्वरा भास्करने या पत्राद्वारे मांडले आहे. असे साधून स्वरा भास्करने  पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या थेट मुळांवर घाव घातलेला आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंधांच्या खेळात माहीर असलेल्या भन्साळीच्या विचारांचं अधुरेपण जगापुढे आणतानाच सिनेमासारख्या सशक्त माध्यमावर कब्जा असलेल्या भन्साळीसारख्यांनाही रंगेहाथ पकडलेलं आहे.  एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं तर, त्याच्याविरोधात तितकाच भक्कम आरोप आणि पुरावाही असावा लागतो.  स्वरा भास्करने भक्कम पुरावे आणि आरोपांसहित समस्त पुरुषसत्तेला आव्हान दिलेलं आहे. त्यात विचारांची स्पष्टता आहे, हे विचार सखोल आहेत. एक स्त्री, त्यातही सिनेमामाध्यमांत काम करणारी अभिनेत्री इतक्या धाडसाने व्यवस्थेला सवाल करू शकते, हीच या घडीची लक्षवेधी घटना आहे. स्वरा भास्करने जे पत्र लिहिलंय, त्यात तिची बुद्धिमत्ता झळकत आहेच, पण त्यात तिच्या संवेदना, तिच्या माणूस म्हणून असलेल्या अपेक्षा आणि भावना अत्यंत तीव्रपणे उमटल्या आहेत. यात अर्थातच भन्साळीच्या दिग्दर्शक म्हणून असलेल्या कौशल्यांचंही तिने मोकळ्या मनाने कौतुक केलं आहे. त्याला दिग्दर्शक म्हणून असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदरही केला आहे, प्रसंगी त्या रक्षणार्थ आपण स्वत: मैदानात उतरल्याचे तिने भन्साळी यांच्या निदर्शनासही आणून दिले आहे, आणि जेव्हा जेव्हा स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्री हक्काचा प्रश्न येईल, तेव्हा तेव्हा तुम्हाला प्रश्न करण्याचा हक्क मी बजावत राहीन, असेेही वचन दिले आहे. स्वराचे हे पत्र वाचताना मनात विचारांचे काहूर माजले. काही ठळक बाबी पुन:पुन्हा समोर आल्या. 


आजच्या स्त्रीच्या अवस्थेचे अर्थ नव्याने उलगडले. स्त्री शोषणाला बळ देणारा काळाचा पट डोळ्यांपुढे उभा राहिला.  सुरुवातीला स्त्री-पुरुष ‘नर-मादी’ म्हणूनच राहायचे. त्यातूनच बाईकडे मुलाला जन्म देण्याची ताकद आहे, हे समोर आलं. यानंतर ‘टोळ्या’ निर्माण झाल्या. टोळ्यांमध्ये असणारी बाई कुठली हे समजावं म्हणून मग पैंजण, अंगठी, मंगळसूत्र ही आभूषणं येत गेली. टोळ्यांमधूनच हळूहळू कुटुंबसंस्थेचा उदय झाला.  या संस्थेच्या माध्यमातून कुटुंबातील स्त्रीवर अधिकार प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली. मग, मालकी हक्क प्रस्थापित होत गेला. हा मालकी हक्क बजावताना पुरुषांनी सांगितलेल्या पद्धतीनेच पुरुष म्हणेल, त्याच पद्धतीने राहणं, वागणं असेल यावर कटाक्ष ठेवण्यात आला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुष म्हणेल त्याच स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवणं महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. ही व्यवस्था टिकावी, स्त्रीवर आपला ताबा राहावा म्हणून हे सगळं बाईच्या पवित्र असण्याशी जोडलं गेलं. बाईचं पावित्र्य म्हणजे, फक्त लग्नाच्या पतीशी संबंध ठेवणे, जे ‘संस्कारांना’ धरून वा साजेसं आहे, हे ठसवलं गेलं. काहीही झाले तरी पत्नीनं एकाच पुरुषाशी संबंध ठेवावा, यावर भर देण्यात आला. यालाच ‘योनी शुचिता’ म्हटलं गेंलं. ही शुचिता पाळ‌ण्याची सुरुवात बालपणापासूनच होत गेली. व्रत-वैकल्ये, उपवास यांमध्ये बाईला सोयीस्कररीत्या गुंतवण्यात आलं. प्रत्येक महिन्याला वेगवेगळे उपवास, व्रत-वैकल्ये जेणेकरून बाईने तिच्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन विचार करू नये. तिची ताकद दुसरीकडे कुठेही वापरू नये, याची डोळस खबरदारी घेण्यात आली. कौमार्य फक्त फक्त तिच्या ‘योनीशी’ संबंधित आहे. याला धक्का लागला तरी, ‘घराची अब्रू’ जाईल या भीतीने मुलींशी अघोरी पद्धतीने वागण्याचे उपाय लोकांनी शोधले. शहर असो वा गाव, कालानुरूप राहणीमानात  थोड्या प्रमाणात बदल होत गेला, पण तो फक्त कपड्यांपुरता आणि सोयी-सुविधांपुरताच मर्यादित राहिला. यात व्रत-वैकल्यं, योनीच्या शुद्धतेला झुगारून देण्याचा प्रयत्न कोणत्याही स्त्री-कडून झाला तर मात्र याच स्त्रीला अनेक प्रश्नांना आणि अपमानास्पद गोष्टींना सामोरं जावं लागलं. या सगळ्याचा परिपाक म्हणून  स्त्रीने जगायचं कसं हे पुरुषव्यवस्था ठरवते आणि पद्मावतीच्या संदर्भात मरतानासुद्धा तिला  व्यवस्थेची परवानगी घ्यावी लागते. जणू, स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व असूच शकत नाही.


भन्साळीचा ‘पद््मावत’ याच सगळ्या स्त्रीत्व नाकारणाऱ्या  पुरुषसत्तेच्या मनांतल्या कल्पनांना भरजरी चित्ररूप देतो. आपलं दिग्दर्शन कौशल्य पणाला लावून, मनसोक्त क्रिएटिव्ह फ्रीडम घेत अत्यंत भव्यदिव्यपणे त्या कल्पनांचा विस्तार करतो. चित्रपटातली राणी पद्मावती ‘जौहर’ करायची  परवानगी मागितल्यावरच पुढे जाऊ शकते. खरं तर, परपुरुषाला हात लावू देणं, न देणं, परपुरुषाची नजर पडणं  या बाबी तिच्या स्वतंत्र अस्तित्वाशी संबंधित आहेत, पण भन्साळी  इतिहासाची साक्ष काढत  त्या रूढी-परंपरेच्या बंदिस्त चौकटीत पेश करतो. नव्हे, पुन्हा हेच मनावर ठसवतो की, महिलांनी (त्यांच्या घराणेशाहीच्या) आज्ञेत राहणं गरजेचं आहे. कारण, घराणेशाही ही संस्कार आणि रूढी-परंपरेच्या परिणामकारकतेवर अवलंबून असते. या तत्त्वांनुसार घराणेशाहीने आखून दिलेल्या मर्यादांमध्ये राहणारी स्त्रीच फक्त ‘संस्कारी’ असू शकते. पुढे जाऊन परपुरुषाने नजर टाकली किंवा वाईट वागण्याचा प्रयत्न केला तर, स्वत:च अस्तित्व संपवावं हाच ‘संस्कारी’ पर्याय ही व्यवस्था तिच्या पुढ्यात ठेवते. भन्साळीला उद्देशून लिहिलेल्या आपल्या पत्रात स्वरा भास्कर याच पुरुषप्रधान व्यवस्थेच्या मानसिकतेला सवाल करते. स्वरा भास्करचं भन्साळीला एक प्रकारे समज देणारं पत्र व्हायरल होतं आणि त्याच सुमारास कंजारभाट समाजातील ‘कौमार्य चाचणी’ प्रकरणावरून वादंग उठतं, कंजारभाट समाजातले काही धाडसी स्त्री-पुरुष या प्रथेविरोधात एल्गार पुकारतात,हा योगायोग नक्कीच नसतो. स्त्रीला सती जाण्यास भाग पाडणारी मानसिकता आणि कौमार्य चाचणीची सक्ती करणारी मानसिकता एकाच पातळीवरची असते. इथेच स्वरा भास्करचा उद्वेग,त्रागा आणि संयत संताप अत्यंत गांभीर्यपूर्वक समजून घेण्यासारखा ठरतो.


स्वरा भास्करचं पत्र मला “योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या वंदना खरे अनुवादित नाट्यप्रयोगांदरम्यानच्या आलेल्या अनुभवांकडे घेऊन जातं. हे नाटक स्त्रीच्या लैंगिकतेचं उदात्तीकरण करणारं नाही किंवा स्त्रीच्या लैंगिकतेला नकारात्मक पद्धतीनेही घेत नाही. या नाटकात आम्ही प्रामुख्याने, स्वरा भास्करने तिच्या पत्रात उल्लेखलेल्या स्त्री सुंता, बलात्कार, लैंगिक अत्याचार, नवऱ्याच्या मालकी हक्कानुसार योनीचे केस कापणे आदी गोष्टींवर मोकळेपणाने बोलतो.  आपल्याला ‘व्यक्ती म्हणून अस्तित्व’ आहे की, नाही? पुरुषसत्ताक व्यवस्था एक स्त्री म्हणून आपल्या भावना कधी समजून घेणार आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कधी मिळणार? हेही  प्रश्न आम्हाला नव्याने प्रश्न पडत गेले होते.  मुख्य म्हणजे, स्वत:च्या योनीकडे बघण्याचा सकारात्मक विचारसुद्धा याच नाटकाने मला दिला होता. या पार्श्वभूमीवर जेव्हा मी संजय लीला भन्साळी आणि त्याचा कोट्यवधी रुपये कमावणारा ‘पद्मावत’हा भव्यदिव्य चित्रपट या दोन गोष्टींकडे पाहते, तेव्हा ‘उठवळ’ स्वरा भास्करने केलेला ‘अनावश्यक थयथयाट’ मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. तिचं पुरुषसत्तेला थेट सवाल करणं, प्रोटेक्टिव्हनेस आणि पझेसिव्हनेसच्या छत्राखाली संजय लीला भन्साळीसारख्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्त्री शोषणाचं समर्थन करणाऱ्यांना रंगेहाथ पकडणं मला लाखमोलाचं वाटतं...


- समीक्षा संध्या मिलिंद 
लेखिका सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत
sameeksha77@gmail.com 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...