Home | Magazine | Rasik | sampat more article in rasik

तुकाराम आकाशाएवढा...

संपत मोरे | Update - Jul 29, 2018, 10:20 AM IST

तुकादादा यांच्यासारखे लोकनेते गावगाड्यात गावासाठी आपलं आयुष्य वेचतात. त्याचा परीघ गावपुरता असतो, पण परिणाम वैश्विक असतो.

 • sampat more article in rasik

  तुकादादा गायकवाड यांच्यासारखे लोकनेते गावगाड्यात गावासाठी आपलं आयुष्य वेचतात. त्याचा परीघ गावपुरता असतो, पण परिणाम वैश्विक असतो. ही माणसं जरी काळाच्या पडद्याआड गेली तरी लोकांच्या स्मृतीतून जात नाहीत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या लोकनेत्यांच्या आठवणी सांगितल्या आणि जागवल्या जातात...

  तुकाराम दादा गायकवाड या माणसाला मी जाता येता बघत होतो,डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा घातलेला हा रांगडा माणूस. बैलगाडी घेऊन रानात जाताना दिसायचा. कधी गावातून चालत निघालेला असायचा. त्या वेळी या माणसासोबत जोडलेल्या विलक्षण गोष्टीही ऐकायला मिळायच्या. या गोष्टी ऐकूनच मी कधीकाळी दादांकडे वळलो. मला त्याची बोली भाषा खूप आवडायची, भिडायची. मीही मग तसंच बोलण्याचा प्रयत्न करायचो. दादा जसे हात बाहेर काढून रुबाबात चालायचे तसं चालण्याचा प्रयत्न करायचो.
  तुकादादा तरुण होते, तेव्हा पैलवानकी करत होते. एक दिवस गावात अस्वल घेऊन एक माणूस आला. अस्वलवाला मोकळ्या मैदानात त्याच्याशी कुस्ती खेळत होता. दादा ती गंमत बघत उभे राहिले. एका क्षणी अस्वलाने त्या माणसाला चितपट केले. दादांनी जवळ जाऊन विचारलं, "अस्वल कुस्ती खेळतं का?’
  "हो,’ मालक म्हणाला.
  "मग मी धरू का कुस्ती?’
  "आवं, माझी सवय हाय त्येला. गंमत म्हणून आम्ही खेळतो.तुम्हाला घोळसल. न्हाय ऐकायचं. त्येजी ताकद कुठं? आपली कुठं?’
  दादा म्हणाले, "नाही, त्याच्याबर मला कुस्ती धरायची हाय.’
  दादा हट्टाला पेटले आणि मग कुस्ती सुरू झाली. झटापट सुरू झाली. दादा अस्वलाशी आणि अस्वल दादाशी भिडले, बराच वेळ कुस्ती चालली. शेवटी दादांनी आपल्या हुकमी डावावर अस्वलाला चितपट केले. ती कुस्ती पाहून अस्वलवाला अवाक् झालाच, पण गावातील लोकांनीही तोंडात बोटं घातली!
  दादांबद्दलची ही दुसरी एक गोष्ट. त्याच्या ताकदीची प्रचिती देणारी. दादा शेजारच्या गावात पाहुण्याकडे जनावरांसाठी चारा आणायला गेले. त्या पाहुण्यांनी विचारलं, "दादा, बैलगाडी आणली न्हाई? कशी नेणार वैरण?’
  "कशाला पाच-पन्नास पेंढीला बैल आणि गाडी? नेतो डोक्यावरून.’ असं म्हणत दादांनी जवळपास पन्नास पेंढ्या डोक्यावर घेतल्या आणि मधल्या मार्गे गावाकडं यायला लागले.
  या झाल्या दादांच्या ताकदीच्या गोष्टी. पण दादाच्या इतर गोष्टी आहेत. दादा स्वातंत्र्यचळवळीत होते. १९४२ मध्ये जेव्हा इंग्रजी सत्तेने चळवळीतील नेत्यांना मुंबईत अटक केली. त्याला प्रत्युत्तर द्यायला सातारा जिल्ह्यातील तरुणांनी उठाव केला. ब्रिटिश राजवट खिळखिळी व्हावी म्हणून रेल्वेचे रूळ उखडून टाकले, डाक बंगले जाळले. त्यात दादा अग्रभागी होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांना ते देव मानत. त्यांनी आदेश द्यायचे आणि दादांनी ते पाळायचे! या कामाबद्दल त्याना सरकारकडून सन्मानपत्रही मिळालं. आणखी एक गोष्ट, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी दादांना लाल बावटा देऊन "शेकाप'मध्ये प्रवेश दिला. त्यानंतर दादा शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत अनुयायी बनले. नानांनी दिलेला लाल बावटा त्यांनी आयुष्यभर सन्मानानं मिरवला. नाना पाटील यांच्या निधनानंतरही दादा शेकापसोबत राहिले. क्रांतिवीर भगवानराव मोरे पाटील (बप्पा) यांच्यासोबत ते कार्यरत राहिले. सत्ताधारी मंडळींचे लक्ष वेधून घ्यायला शेकापचे जे अभिनव मोर्चे, त्यात काही वेळा बैलगाडी मोर्चा निघायचा. मग या मोर्चासाठी तुकादादा तर आपली बैलगाडी घेऊन जायचे. सोबत गावातल्या बैलगाड्याही असायच्या. बैलगाड्यांना लाल बावटे बांधलेले असायचे.
  दादांच्या आसपासच्या गावांत एसटी सुरू झाली. मग दादा एक दिवस तालुक्याच्या गावाला गेले. एसटीच्या साहेबाला म्हणाले, "साहेब, आमच्या गावाला कधी गाडी सुरू करताय?’
  एसटीच्या साहेबांनी दादांच्या गावात असलेल्या येरळा नदीवर पूल नसल्यामुळे तुमच्या गावाला एसटी येणार नाही, असं सांगितलं. नदीवर पूल नाही म्हणून गाडी सुरू होत नाही, असं ऐकल्यावर दादांनी काय करावं? एका सकाळी ते एकटेच गेले आणि पात्रात दगड टाकू लागले. मग गावात बातमी पसरली. हळूहळू गावातले दादांचे इतर सहकारी आणि गावकरी जमा झाले.सर्वांनी श्रमदान केलं. पूल तयार झाला. मग पूल बांधून झाल्यावर दादा तालुक्याला गेले आणि येताना एसटीत बसूनच आले. गावाला एसटी सुरू झाली. असे हे डोंगराएवढं कर्तृत्व गाजवणारे दादा.
  त्या वेळी दादांनी गावात आणलेल्या एसटीमुळे गावात जगाची माहिती आली. या माहितीने गावातल्या पोरांना जग समजलं. पोरं बाहेर पडली. शिकली. अभ्यास केला. पुण्या-मुंबईला गेली.शहाणी झाली. दादांनी त्यांचं गाव तालुक्याला जोडलं आणि या पोरांनी स्वतःला राज्याशी जोडून घेतलं. आज दादांच्या गावचे अनेक तरुण विमानाने प्रवास करतात. ही पोरं एअरपोर्टवरचे फोटो टाकतात तेव्हा "दादा, पूल आणि एसटी' या गोष्टी ठळकपणे लक्षात येतात.
  दादांनी आयुष्यात अनेक लढे लढले. एका वर्षी उसाचं उत्पादन वाढलं होतं. कारखानदार नोंद केलेल्या उसाची जबाबदारीही घेईनात. तोड देईनात. तशात कारखान्याचे अधिकारी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. ऊस पेटवा, अशी बेपर्वाईची भाषा त्यांच्या तोंडातून यायला लागली. काही शेतकऱ्यांनी वैतागून पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेला ऊस पेटवून दिला. या उसासोबत त्यांची स्वप्नेही जळाली. कारखानदारांची ही अरेरावी पाहून तुकादादा गायकवाड आणि येरळा काठच्या शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक अभिनव आंदोलन केले. त्यांनी स्वत:च्या रानातील ऊस तोडला आणि तहसीलदारांच्या कचेरीपुढे आणून टाकला. सगळ्या आवारात ऊसच ऊस. तहसीलदार आले. त्यांना आतही जाता येईना. दादांनी त्याला थांबवून विचारलं,
  "साहेबा, काय करतुयस आमच्या उसाचं?’
  दारात ऊस पाहून तहसीलदारसाहेब हबकले होते. मग त्यानी तत्काळ कारखानदारांना बोलावून घेतलं. त्यांना टोळ्या वाढवण्याचे आदेश दिले. या सगळ्या गोष्टीत दोन दिवस गेले. दादा व त्यांच्या सहकाऱ्यांचा ऊस दोन दिवस उन्हात तसाच होता. तो ऊस कारखान्याने नेला. उन्हात राहिल्यामुळे अर्थात वजन घटले. त्यांचे आर्थिक नुकसान झाले.
  लोक दादास्नी म्हणाली
  "दादा, तुमच्यामुळं आमचा ऊस गेलाय, पण तुमचं नुकसान झालंय. आम्ही भरपाई देतो.
  दादा म्हणाले, "पोरांनो, म्या काय वेगळं केल्यालं न्हाय.तुम्ही लै मनाला लावून घीव नका. पण जन्मात एक दिवस तरी तुकादादासारखं वागा...’
  ...एका दुपारी कॉलेज सुटलं. दुपारच्या गाडीनं घरी यायला लागलो. नदीत आल्यावर स्मशानभूमीच्या बाजूला धूर येत असलेला दिसला. बसस्टॉपवर उतरलो, तर दुकान बंद होती. विचारलं.
  "काय झालं?’
  "तुकादादा...’
  पुढलं काहीही ऐकू आलंच नाही. मधल्या बोळातून तुकादादांच्या घरी गेलो. गडीमाणसं दारात बसलेली. आतून बायकांच्या रडण्याचा आवाज. जिथं दादा नेहमी बसायचे, ती जागा रिकामी होती. बघवत नव्हतं त्या जागेकडं. भरून येत होतं. रडू वाटतं होतं. तसाच गप्प बसून राहिलो.
  दादांच्या शेवटच्या काळात दादांच्या पक्षाची ताकद कमी झालेली. अनेक नेते प्रस्थापितांच्या वळचणीला गेलेले. दादा मात्र म्हातारपणीही उन्हातली लढाई लढायला तयार होते.म्हणूनच कधी कधी दादा सकाळी खांद्यावर लाल बावटा घेऊन रस्त्यावर जायचे.गाड्या अडवायचे. चालकांना माहिती असायचं. तेही दादांना मान द्यायचे. मग बरीच वाहनं थांबल्यावर दादा म्हणायचे,"जावा आता रांगड्यानू. आमचं भांडणं सरकारबरोबर हाय. जावा आता..’अशी होती तुकादादा नावाच्या एकाकी शिलेदाराच्या आंदोलनाची पद्धत. लौकिक अर्थानं अडाणी असलेला हा माणूस, पण त्याला विरोध व्यक्तीला नाही तर धोरणाला करायचा असतो, हे माहिती होतं. जुन्या सांगली-सातारा रस्त्यावर असलेल्या रामापूर या गावातील एका आगळ्यावेगळ्या माणसाची ही थरारक गोष्ट. ही गोष्ट आणि गोष्टीचा नायक इतका रंध्रारंध्रात मुरलेला की गुलाबी फेटा घातलेला माणूस जगाच्या पाठीवर कोठेही पाहिला तरी या पंचक्रोशीतील लोकांना आजही आठवतात, ते आकाशाएवढे, मनाने निर्मळ नि नि:स्वार्थी "तुकादादा'...


  sampatmore21@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५

Trending