Home | Magazine | Rasik | sampat more write on prasad bhoete's struggle

याला म्हणतात जिगर !

संपत मोरे | Update - May 06, 2018, 01:51 AM IST

पाचवीला पुजलेल्या दुष्काळात प्रसादच्या डोळ्यांत ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचं स्वप्न तरळलं. या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी

 • sampat more write on prasad bhoete's struggle

  पाचवीला पुजलेल्या दुष्काळात प्रसादच्या डोळ्यांत ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचं स्वप्न तरळलं. या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी त्याने गाव सोडलं. स्वप्न बहरू लागलं आणि एका क्षणी सरावादरम्यान अपघात झाला. संघर्षाचा काळ दाटूून आला...

  सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात फिरताना मराठवाड्यातून आलेल्या कोणत्याही माणसाला आपल्याच प्रदेशात आलोय असं वाटायला लावणारी दुष्काळी परिस्थिती आहे. बघावं तिकडं उजाड माळ. याच उजाड तालुक्यातील जांब गाव. अर्थात,गाव दुष्काळी असूनही या गावातल्या लोकांनी रांगडे नाद जपलेत. म्हणजे काय तर, गावाला कुस्तीचा वारसा आहे आणि चांगले बैल पाळण्याचा नादही. गावच्या पैलवानांनी महाराष्ट्रातल्या नामांकित मल्लांना धूळ चारलीय. काही वर्षांपूर्वी गावात प्रत्येक घरात पैलवान होता. प्रत्येकाच्या दारात देखणा खिल्लारी बैल दावणीला बांधलेला होता...


  पै. बचाराम भाऊ शिंदे, बाजीराव ढाणे, शंकर पाटील, भानुदास निंबाळकर, रामचंद्र शिंदे, साहेबराव जाधव, पतंगराव चव्हाण, तुकाराम चव्हाण, ऑल इंडिया चॅम्पियन पंढरीनाथ चव्हाण, नीलेश शिंदे, सेनादलाचे कुस्ती कोच प्रताप शिंदे, सत्यवान सोनवले, महिपत मदने, बजरंग वायदंडे अशी कितीतरी नाव सांगता येतील, असे अठरापगड समाजातील नामवंत मल्ल या मातीत घडले. या मल्लांनी गावचे नाव कुस्तीच्या इतिहासात कोरले. या गावातल्या प्रतिकूल परिस्थितीत कुस्तीचा छंद जपणाऱ्या प्रसाद भोईटे यांची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे.


  प्रसाद हा बाजीराव भोईटे यांचा मुलगा. कुस्तीच्या वातावरणाने भारलेला. त्याचे आजोबाही पैलवान, वडीलही काही दिवस लाल मातीत खेळलेले. त्यामुळे शाळा सुटली की, त्याला तालमीचे वेध लागायचे. दप्तर घरात टाकलं की, तो तालमीत जायचा. दोन- तीन तास सराव करायचा. प्रसादच्या सरावावर वस्ताद खुश व्हायचेे. त्यांच्यामते, या पोराला खूपच गती होती. म्हणूनच त्याच्या वडिलांनी त्याच्या खुराकावर लक्ष द्यावं, असं ते सांगू लागले. गावाला असणाऱ्या कुस्तीच्या वारश्यात हे पोरगं भर घालणार, गावाला ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा मिळवून देणार, अशी खात्री वाटावी, अशी मेहनत पोरगं मेहनत घेऊ लागलं.


  प्रसाद शालेय कुस्ती स्पर्धांत चमकू लागला. तालुक्यापासून ते अगदी पुण्याच्या आखाड्यात कुस्त्या करू लागला. खटाव, कराड तालुकासह सातारा-सांगली जिल्ह्यांत त्यांचं नावं होऊ लागलं. याच दरम्यान त्याचं हायस्कूलचं शिक्षण झालं. वडिलांना वाटलं ‘पोरगा तयारीचा आहे. कुस्तीत गती आहे.' म्हणून त्यांनी त्याला शालेय शिक्षण आणि कुस्तीसाठी हिंदकेसरी आखाड्यात पुण्यात दाखल केलं. कधीही घराच्या बाहेर न राहिलेला प्रसाद वयाच्या पंधराव्या वर्षी गाव सोडून पुण्यात आला, केवळ कुस्तीसाठी!


  पुण्याच्या हिंदकेसरी आखाड्यात त्याचं मन रमलं. सरावही मनासारखा होऊ लागला. आत्मविश्वास एवढा वाढला की, आपण महाराष्ट्र केसरी होणार, असं तो ठामपणे आईवडिलांना सांगू लागला. त्याचा आत्मविश्वास पाहून आईवडीलही पोराच्या यशाच्या स्वप्नात रमलेे. पैपाहुण्यांतसुद्धा प्रसादचं नाव निघू लागलं. ७ डिसेंबर २०१५ हा दिवस नेहमीसारखा उगवला. पण हाच दिवस प्रसादसाठी काळा दिवस ठरला. नेहमीप्रमाणे प्रसाद आखाड्यात सरावासाठी उतरला. लढती सुरू होत्या. रोजच्या सारखी त्यानं एका जोडीदासासोबत लढत सुरू केली. लढतीत त्याची जोडीदारासोबत झटपट सुरू झालेली. एक क्षण असा आला की, तो खाली गेला, तसा त्याचा जोडीदार एकचाकी डावाने त्याच्यावर मात करायला गेला आणि त्याच वेळी प्रसादच्या मानेवर दाब पडला. त्याला कसं तरी वाटलं. कुस्ती संपली आणि प्रसाद उठायला गेला. पण त्याला उठता येईना. तो आखाड्यात असणाऱ्या पोरांना हाका मारू लागला. पोरं लगेच भोवती गोळा झाली. त्यांनी त्याला उठवून बसवलं. पण तो भेलकांडला. कळवळून म्हणाला, "माझ्या पायातून जीव गेल्यासारखा वाटतोय.’


  मग त्याला आधार देऊन उभं केलं गेलं. पण त्याचा तोल जात होता. तो खाली पडत होता. मग मात्र त्याच्या मित्रांचा धीर खचला. त्यांनी त्याला तत्काळ जवळच्या दवाखान्यात नेले, पण तिथल्या डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले, "मोठ्या दवाखान्यात घेऊन जावा.’ तोपर्यंत गावीही निरोप गेला होता. प्रसादला पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. तिथल्या डॉक्टरांनी मज्जातंतूला मार लागल्याचे निदान केले. त्याचे आईवडील पुण्यात आले, तेव्हा त्याच्या नजरेला कोमेजलेल्या चेहऱ्याचा आणि अधू होऊन पडलेला मुलगा दिसला. त्यांनी हंबरडा फोडला. एकुलत्या एका मुलावर हा प्रसंग आलेला. काय करावे हे सुचत नव्हते. "भैयाला बघून अवसान गळून गेलं. सुचत नव्हतं.’ वडील सांगतात. आई तर नुसती रडत होती. तिथल्या लोकांनी तिची समजूत काढली. "पोरगा बरा होईल’असा विश्वास दिला.


  त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले. सगळ्यांना खात्री होती. "भैया उठेल, पुन्हा शड्डू ठोकेल’ त्याच आशेनं त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण हा काही एक-दोन दिवसांचा आजार नव्हता. त्यामुळे त्याच्याजवळ दवाखान्यात थांबून राहणे आवश्यक होते. मग आई-वडिलांनी गाव सोडलं. पुण्याला राहायला आले. भाड्याने खोली घेतली. पुण्यात एक वर्ष राहिले. त्यानंतर प्रसादमध्ये थोडी सुधारणा झाली. म्हणजे, फक्त पाय थोडे हलायला लागले. पुण्यातील उपचारासाठी लाखो रुपये गेले. जमीन विकलेले सगळे पैसे, पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज, नातेवाइकांनी दिलेली उसनवार रक्कम उपचारासाठी खर्च झाली. नंतर कोणी तरी सल्ला दिला म्हणून, ते प्रसादला घेऊन वाईला गेले, तिथेही मुक्कामी राहून उपचार घेतले. प्रसादाचे आई -वडील आणि बहीण तिघेही तिथं राहिले.


  आता हे कुटुंब सातारला राहायला गेले आहे. तिथे एका फिजिओथेरपिस्टकडून प्रसादवर उपचार केले जात आहेत. दिवसाला पाचशे रुपयांच्या आसपास खर्च आहे. जवळची सगळी कमाई संपली आहे. आता पाहुणे मंडळीकडून उसनवारी सुरू आहे. "गावात जाऊन राहावं, तर रोज उपचाराला कसं यायचं? याला एसटीतून आणता येत नाही. मोठ्या गाडीचं भाडं परवडणारं नाही. रात्री-अपरात्री काही कमी-जास्त झालं, तर काय करणार?’ "मला खात्री हाय भैया उठंल' वडील विश्वास व्यक्त करताहेत...


  मी प्रसादला भेटायला गेलो, तेव्हा त्याची आई त्याला भरवत होती. मी काहीही बोललो नाही. पण ती माउली ढसाढसा रडायला लागली. आई रडते हे पाहून प्रसादचे डोळेही भरून आले. मग ती माउली आत गेली. एकटीच रडत राहिली. थोड्या वेळाने स्वतःला आवरत बाहेर आली. "कसं होणार माझ्या बाळाचं? सगळं पैसं गेलं. आता जरा गुण याला लागला आन् आमच्याकडं पैसे नाहिती. माझं बाळ नुसतं उठून उभा राहू दे. त्याला आम्ही सांभाळू. त्यानं कायबी काम नको करायला. त्याला आम्ही कष्ट करून जगवीन. पण हिंडाय-फिरायला आलं पाजये. रोज देवाला हात जोडतीय. मी काय करू? वाघासारखा गडी माझा, खुडूक हुन पडलाय. आम्हासनी एवढं वाईट वाटतंय, त्येला काय वाटतं, असलं? माझं प्वार शहाणं हाय. गप् सहन करतंय.’ माउलीच्या डोळ्यांतून पुन्हा पाणी यायला लागलं. मीही गहिवरून गेलो.


  वडिलांना पोरगा उठेल असा विश्वास आहे, पण आई खचून गेलीय. वडिलांनी प्रसादच्या कुस्तीची एक व्हिडिओ क्लिप दाखवली. अवघ्या काही मिनिटांतच प्रतिस्पर्धी पैलवानाला चितपट करणारा हा पोरगा आणि त्याची ती कुस्ती बघितली. विजयी झाल्यावर "मी जांबचा हाय बघ’ असं म्हणून आनंदाने उडी मारणारा तो व्हिडिओतला महाराष्ट्र केसरीचं स्वप्न बघणारा प्रसाद भोईटे माझ्यासमोर असाहाय्य अवस्थेत पडलेला होता. त्याची व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर त्याच्याकडं पाहू वाटत नव्हतं. मी आतून हलून गेलो होतो. "दिवसातून अनेकदा बघतो मी.’ वडील म्हणाले. त्यांचा आवाज जड झालाय, असं वाटलं.


  दुष्काळी भागातील प्रसादचं महाराष्ट्र केसरी व्हायचं स्वप्न होतं, त्यासाठीच तो कष्ट करत होता, पण तो आता एका जागी जखडलाय आणि सोबत त्याचं कुटुंबही खचलंय. मात्र, अलीकडे त्याला थोडं बरंही वाटू लागलंय. पायाची हालचाल होतेय. पण उपचारासाठी पैसे नाहीत, म्हणून आई रडतेय. तिला आता पैलवान नको आहे. तिला स्वतःच्या पायाने चालू शकेल, असा पोरगा हवा आहे. कुस्तीच्या फडात नियतीने चितपट केलेल्या या पोराच्या पायात कुस्ती खेळायला नाही, तर फक्त चालायला बळ हवं आहे...प्रसादला चालता यावं, एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. एवढंच त्यांचं मागणं आहे.

  - संपत मोरे

  sampatmore21@gmail.com

  प्रसादच्या वडिलांचा नंबर : ९७६७०३७५७७

  लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५

 • sampat more write on prasad bhoete's struggle
 • sampat more write on prasad bhoete's struggle

Trending