आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तनवादी कुटुंबाची प्रेरक कहाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक माणूस समजून घेणं, एक पुस्तक वाचण्यासारखं असतं. गोष्टीचे किती तरी पैलू उलगडणं असतं. एक दिवस प्रवासात सहज परशुराम माळी भेटले आणि ग्रामीण भागातल्या एका परिवर्तनवादी कुटुंबाची अनेक पदरी क्रांतिकारी गोष्ट उमगली...

 

नगुबाई तुकाराम माळी ही बाई कोणाला माहिती असण्याची शक्यता नाही. मलाही या बाईबद्दल खूपच उशिरा समजले. एकदा पंढरपूरवरून विट्याला येत असताना, एसटीत शेजारी एक मध्यमवयीन माणूस बसलेला. त्याच्या खिशावर शेतकरी संघटनेचा बिल्ला होता. त्या बिल्ल्यामुळे तो शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता होता, हे माझ्या लक्षात आलं. मी त्याच्याशी बोलायला लागलो. तो माझ्याच सांगली जिल्ह्यातील वांगी गावचा निघाला. त्याच गावच्या नगुबाई माळी या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तीचं निधन झालं होतं. तिच्या पोराची गाठ घ्यायला हा माणूस निघाला होता.

 

तो सांगत होता, "आम्ही शेतकरी संघटनेच्या कामाच्या निमित्तानं हिकडं यायचं. मग आमचा मुक्काम परशुराम माळी यांच्याकडे व्हायचा. तेव्हा ती माउली आम्हाला जेवण बनवून द्यायची. आम्ही ज्या घरात राहायचो, ते घर म्हणजे, साधं खोपट होतं. वर उसाचा पाला होता. पण त्या घरात आम्हाला मायेची उब मिळत होती. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या आम्हा पोरांवर तिचा जीव होता. परिस्थितीनं गरीब असणारं कुटुंब पण मनाची श्रीमती लै त्येंच्याकडं...’ "कार्यकता सांगायला लागला. मी ऐकत राहिलो. त्यानंतर मी या घराबद्दल माहिती घेतली. मला समजलं, नगुबाई माळी यांचा मुलगा परशुराम माळी, हा पूर्णवेळ शेतकरी संघटनेसाठी काम करायचा. आईचा या कामात त्याला पाठिंबा. आईच त्याला हे काम करायला सांगायची. काहीवेळा शेतकरी  संघटनेच्या आंदोलनात त्याच्या आईचाही सहभाग असायचा. परशुराम सतत चळवळीत राहिल्यामुळं कुटुंबाची आर्थिक स्थिती नेहमीच हलाखीची राहिली, पण नगुबाईनी पोराला कधीही दोष दिला नाही. उलट माझ्या पोरानं माणसं मिळवलीती, असं ती अभिमानाने म्हणायची. या चळवळीच्या वेडात नेहमी दौडत राहणाऱ्या परशुराम यांचं उर्जाकेंद्र असणारी आई निघून गेली होती. त्याच परशुराम तुकाराम माळी यास भेटायला खाल्ल्या भाकरीची, आणि आईच्या प्रेमाच्या आठवणी, वळख ठेवत हा कार्यकर्ता निघालेला.


हे सगळं मी सांगायचं कारण म्हणजे आपल्याला बरेच कार्यकर्ते माहिती नसतात आणि त्या कार्यकर्त्याची विचारांवरची निष्ठा, त्याचा आचार, बांधिलकी आणि सोबत त्याच्या कुटुंबातील लोकांचा सहभाग माहिती नसतो. नगुबाई माळी आणि त्याचा पोरगा परशुराम माळी यांच्यासारखे कित्येक कार्यकर्ते कुठं वाहिन्यांवर नसतात वा कुठं वृत्तपत्रात नसतात. त्याचं त्याचं चाललेलं असतं.नेहमी झोतात असलेल्या कार्यकर्त्यांची चर्चा होते, पण दूर राहून विचार जगणाऱ्या कार्यकर्त्याच्या वाटयाला मात्र उपेक्षेच जगणं येतं. 
परशुराम माळी यांच्याबाबत आजवर ते झालंय. म्हणूनच हा संवाद सुरू आहे.
परशुराम माळी यांचा मुलगा विक्रम माळी आणि नरसिंग चौगुले यांची कन्या सुप्रिया यांचं नुकतंच लग्न झालं. हा विवाह कसलाही मुहूर्त न पाहता, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस असलेल्या २६ जून या दिवशी सत्यशोधक पद्धतीनं झाला. मुहूर्त न पाहता विवाह होणार इथूनच या लग्नाची चर्चा सुरु झाली. कुजबूज व्हायला लागली. लग्नाच्या अगोदर दोन दिवस हळदी दळण्याचा कार्यक्रम असतो, या कार्यक्रमात गावातील सुवासिनींना बोलावून हळद दळण्यात येते. ग्रामीण भागात विवाह संभारभात या कार्यक्रमाला महत्व असतं. परशुराम माळी अगोदर एक दिवस गावात फिरून विधवा बायकांना हळद दळायच्या कार्यक्रमाला या असं निमंत्रण द्यायला लागले, तेव्हा बायका आक्रित करायला लागल्या. एक म्हातारी बाई म्हणाली, "परशु तुझं डोकं फिरलं का? आरं, मी कशी हळद दळायला यिवू? असं का येड्यागत वागतुयास?’


"न्हाई,आजवर डोकं फिरल्यालं हुतं. आता ताळ्यावर आलंय, म्हणूनच हे करतोय. उद्या ये.’ म्हणून परशुराम निघून गेले. बायका येणार नाहीत, त्याच्यावर रुढीचा प्रभाव आहे, हे माहिती असल्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः गाडी घेऊन परशुराम माळी यांनी सगळ्या महिलांना स्वतःच्या घरी आणलं. आल्या आल्या माळी यांच्या पत्नी महानंदा माळी आणि त्याच्या शेजारच्या महिलांनी या विधवा महिलांना पुस्तक देऊन त्याचा सत्कार केला. आणि त्याच्या हातांनी हळद दळून घेतली. परशुराम माळी यांच्या घरात सुरु असलेला हा रुढीच्या विरोधातील कार्यक्रम गावात कळायला वेळ लागला नाही. ‘ऐकलेलं खरं हाय का'?बघायला लोक आली.तर खरंच होतं. मग मात्र लोकांनी तोंडात बोट घातली. ‘असं कुठं असतंय का?'असं माणसं बोलू लागली, पण माणसं काय बोलतात, याकडं लक्ष द्यायला, या कार्यकर्त्याला वेळ नव्हता. लग्न दोन दिवसावर आलेलं.


लग्न  सत्यशोधक  पद्धतीने  झालं. प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सत्याच्या अखंडाचे वाचन करून विवाह लावला. भारत पाटणकर आणि नामदेव करगणे यांनी वधू-वरांना शपथ दिली. पण इतर सत्यशोधक लग्नापेक्षा या लग्नाची पद्धत वेगळी होती. लग्नात वधू-वर एकमेकाला "शेतकऱ्याचा आसूड’ हे महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेले पुस्तक देऊन विवाहबद्ध होणार होते. दुसरं म्हणजे, या लग्नात येणाऱ्या प्रत्येकास "शेतकऱ्याचा आसूड’,‘क्रांतिसिंह नाना पाटील चरित्र’ ही पुस्तके भेट दिली जाणार होती. याच पद्धतीने लग्न झालं. आलेल्या प्रत्येकास पुस्तक दिली गेली. लग्न झाल्यानंतर "असलं लगीन कवाच बघितलं नव्हतं. पण ग्वाड झालं.’ काही लोक बोलायला लागली. "लग्नात पुस्तक कुणीच वाटली नसत्याली.’ लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. या लग्नास जुन्या पिढीतील अभिनेते विलास रकटे आलेले. 


ते म्हणाले, "सांगली जिल्हा हा विचार देणारा जिल्हा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वतःच्या लग्नात स्वतः मंगलअष्टका म्हटल्या होत्या. तर क्रांतीअग्रणी जी डी बापू यांनी पत्नीस रक्ताचा टिळा लावून लग्न लावले होते. नंतर हे दृश्य चित्रपटातही आलं... बापूंनी प्रत्यक्ष तसं केलेल होतं. आणि त्यांचा विवाह झाल्यावर बंदुकीच्या फैरी हवेत झाडून ब्रिटिश राजवटीला इशारा दिला होता की, तुम्ही ज्या क्रांतीविरास पकडणार आहात, त्याचं आम्ही लग्न लावतोय, असेल हिंमत तर येऊन पकडा. म्हणजे लग्नातून विचार देण्याची इथली परंपरा आहे. परशुरामने ती जपली आहे.’ श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ.भारत पाटणकर, प्रसिद्ध विचारवंत गेल ओमवेट यांनीही या विवाहाचे कौतुक केले. विधवा संघटनेच्या कार्यकर्त्या लता बोराटे म्हणाल्या, "शहरी भागातील स्त्रीवाद खूप पुढे गेला आहे, पण ग्रामीण भागात अजून रूढी परंपरा यांचा पगडा आहे.विधवा बायकांना आजही शुभ कार्यापासून दूर ठेवले जाते. विधवा म्हणजे, अशुभ समजले जाते. आज मी माझ्या शहरातील भगिनींचे पुढे गेलेले लढे पाहते, त्यांचा अभिमान वाटतो. पण ग्रामीण भागात मात्र वेगळे चित्र आहे. आमचे प्रश्न विचारवंत लोकांना बाळबोध वाटतील, असे आहेत. त्यामुळे विधवांना हळद दळायला लावली, यात पुढारलेल्या लोकांना काहीही विशेष वाटणार नाही. पण घरात किंवा पैपाहुण्याकडे एखादा शुभ कार्यक्रम असेल, तेव्हा जी वागणूक खेड्यातल्या विधवेला मिळते, ती पाहिली तरच या हळद दळण्याच्या कार्यक्रमातील बंड समजेल. 


या लग्नाच्या निमित्तानं ते झालंय असं मला वाटतंय.’ परशुराम माळी म्हणाले, "मी लहान असताना माझे वडील वारले, त्यांनतरच्या काळात वेगवेगळ्या कार्यक्रमात माझ्या आईला मिळालेली वागणूक मी पहात होतो. तिला डावललं जात होतं. तिच्यासारखंच इतर विधवा बायकांना डावललं जात होतं. मी सगळं पहात होतो.तेव्हा माझ्या मनात विचार येत होते. माझी आई विधवा झाली, यात माझ्या आईचा काय दोष? नंतर मी मोठा झाल्यावर चळवळीत गेलो. चळवळीत गेल्यावर पुस्तक वाचायला लागलो.पुस्तकातून सगळं कळत गेलं. माझी आई खंबीर होती. तिलाही काही गोष्टी पटायच्या नाहीत, पण व्यवस्थेच्या विरोधात बंड करावं, अशी आमची परिस्थिती नव्हती. मी शेतकरी चळवळीत गेलो तेव्हा आई सोबत राहिली. तिनं आणि बायकोनं घर सांभाळलं. मला आईनं खूप साथ दिली. माझ्या चळवळ्या वृत्तीच तिनं पालनपोषण केलं. 

माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यानाही जपलं. त्या आईसाठी आणि केवळ विधवा होती, म्हणून तिला अनेक ठिकाणी नकार मिळाला म्हणून मी माझ्या पोराच्या लग्नात विधवा भगिनींना मान दिला. मला यातून एक सांगायचं आहे, जग कुठं गेलंय? आणि आपण आजही विधवांना कार्यक्रमापासून दूर ठेवतोय. पण मी असं नुसतं सांगून लोक ऐकणार नाहीती, हे मला माहिती हुतं. मग सुरुवात आपल्याच घरातुन करूया म्हणून हे केलं.दुःख एकाच गोष्टीच आहे, हे बघायला माझी आई आज नाही.’


‘शेतकऱ्याचा आसूड’ हे पुस्तक देऊन लग्न करणे, आलेल्या प्रत्येकाला हे पुस्तक देणे यापाठीमागची भूमिका सांगताना माळी म्हणाले, "आज शेतकऱ्याला एकाकी वाटतंय. आजवरचे कोणतेही राज्यकर्ते शेतकऱ्याला सुखी करू शकलेले नाहीत. कधीकाळी महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी एक पुस्तक लिहिले, हे पुस्तक आजही शेतकऱ्याला मार्गदर्शक ठरणारे आहे. त्याला लढाऊ बनवणारे आहे. या लग्नाला जास्तीत जास्त शेतकरीच येणार होते, त्याच्यापर्यंत हा विचार जावा म्हणूनच मी पुस्तके वाटण्याचा निर्णय घेतला. काय वाचलं पाहिजे लोकांना कळावे असं मला वाटतं.’


एका खेड्यात राहणाऱ्या एका साध्या कार्यकर्त्यांच्या पोराच्या आगळ्यावेगळ्या लग्नाची अशी ही गोष्ट होती. लग्न एकच, पण त्या लग्नाच्या पाठीमागे एवढ्या गोष्टी होत्या. अतिशय कमी वाचून एवढी मोठी प्रगल्भता प्राप्त केलेला हा कार्यकर्ता आणि रुढीच्या विरोधात जात एक नवा विचार देणारा हा माणूस आणि त्याच बंड आणि प्रयोगशीलता आपणास नक्कीच भावेल.
- संपत मोरे
sampatmore21@gmail. com
लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५

बातम्या आणखी आहेत...