'आताच्या मास्तरणी सुखी / 'आताच्या मास्तरणी सुखी आहेत'

कविता महाजन यांचा ‘हातात बुकं, मास्तरणी जशा’ हा लेख १७ जुलैच्या “मधुरिमा’मध्ये वाचला आणि जणू माझ्या आयुष्याचा, किंबहुना ज्या स्त्रियांनी आज साठी पार केली आहे, अशा सर्वांचा लेखाजोखा वाचत असल्याचा अनुभव आला.

Jul 31,2018 06:20:00 AM IST

कविता महाजन यांचा ‘हातात बुकं, मास्तरणी जशा’ हा लेख १७ जुलैच्या “मधुरिमा’मध्ये वाचला आणि जणू माझ्या आयुष्याचा, किंबहुना ज्या स्त्रियांनी आज साठी पार केली आहे, अशा सर्वांचा लेखाजोखा वाचत असल्याचा अनुभव आला.


मी १९७४मध्ये नोकरीला लागले. तेव्हा स्त्रियांचं नोकरी करण्याचं प्रमाण कमी होतं. जुन्या काळातील असूनही माझ्या आईने आम्हा भावंडांना शिक्षणाने समृद्ध केले होते. त्यामुळे आम्ही सगळीच नोकरी करत होतो. त्यामुळे लोक अनेकदा, “तुमचं काय बाई, सगळी मुलं नोकरी करतात, मुली नोकरी करून आपापल्या संसाराला हातभार लावतात,’ असं कौतुकाने म्हटल्यासारखं दाखवत असत. पण त्याआडचा मत्सर आवाजात डोकावल्याशिवाय राहत नसे.
आम्ही चौघी बहिणी घरची जबाबदारी पूर्णपणे पेलून नोकरी करत होतो. आमची पिढी थोडी दुर्दैवी म्हणा हवं तर. कारण आम्ही नोकरी करतो, त्याची काहीच गरज नाही, अशी मागच्या पिढीची भावना होती. त्यामुळे घराकडे अजिबातच दुर्लक्ष करून चालत नव्हतं. मागच्या पिढीकडून आलेली व्रतवैकल्यं, सणवार, पाहुणचार, मंगलकार्यं, आजारपणं हे सर्व व्यवस्थित पार पडायला हवं, असा त्या पिढीचा दुराग्रह होता. थोडं कमीजास्त झालं की शिक्षणाचा आणि नोकरीचा, पर्यायाने हे दोन्ही देणाऱ्या माहेराचा उद्धार व्हायचा. “शिकले तितके हुकले,’ हे एक अतिशय आवडते वाक्य मागच्या पिढीकडून तोंडावर फेकले जायचे.


त्यांच्या लेखी स्त्रिया नोकरी करायला लागल्या म्हणजे सारे काही बिघडले. त्या पुरुषांच्या बरोबरीने कमावू लागल्या म्हणजे पुरुषी वर्चस्वाला हादरा बसला. खरं तर अगदी उलट परिस्थिती होती. पूर्वी तिला चूल आणि मूल सांभाळलं की बाहेरच्या जगाचा सामना करण्याची गरज नव्हती. पण आताच्या स्त्रियांना घरच्या पुरुषांबरोबरच अनेक पुरुषांचा सामना करावा लागतो, अगदी त्याच्या नजरेचा आणि स्पर्शाचासुद्धा. पण हे कोणी विचारातच घेत नसत.
घरच्याबरोबरच इतर लोकदेखील नोकरी करणाऱ्या बायकांशी फटकून वागत. मला चांगलं आठवतंय. मी चाळिसेक वर्षांपूर्वी शेजारणींना हळदीकुंकवाला बोलावलं तेव्हा काहीजणींनी प्रांजळपणे सांगितलं की, “अहाे, तुमचं घरदेखील आमच्यासारखं स्वच्छ, नीटनेटकं, व्यवस्थित आहे. आम्हाला वाटलं, तुम्ही नोकरीला जाता, तुम्हाला घर आवरायला कुठे वेळ असणार. तुमच्या घरात व्यवस्थितपणा दिसणार नाही. पण आमचा समज तुम्ही खोटा पाडलात.’ कुणी म्हणालं, “तुमचं काय बाई, तुम्ही नोकरीवर निघून जाता. आम्हाला मात्र दिवसभर काम पुरतं. दूधवाला, पेपरवाला, कामवाली, येणारंजाणारं सगळं सांभाळावं लागतं.’ आता मला सांगा, नोकरीवाल्या बाईला हे सर्व चुकलंय का? तिलाही या दिव्यातून जावंच लागतं ना?
एकूण काय की, नोकरी करणाऱ्या स्त्रियांना कुणी चांगल्या नजरेनं पाहत नव्हतं, हे खरं.
पण समाधानाची गोष्ट म्हणजे आताची पिढी यापासून मुक्त आहे. आमच्या पिढीने या पिढीवर सणवार साजरे करण्याचा, व्रतवैकल्यं करण्याचा भडिमार केला नाही. जमेल तसं आणि जमेल तितकं करण्याची मुभा दिली आहे. त्यांच्या नोकरीचा सन्मान केला जातो. त्यांच्या शिक्षणाचं कौतुक होतं. तसंच त्यांच्या स्वातंत्र्यावर कशाही प्रकारची गदा येणार नाही, याची काळजी घेतली जाते. म्हणून आताच्या मास्तरणी बऱ्याच अंशी सुखी आहेत, मोकळ्या आकाशात भरारी घेण्यासाठी मुक्त आहेत.

- संध्या कुर्वे, अहमदनगर

X