आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडीच्या उसन्या अंगणात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागण्या आणि मोर्चे यातून समाजाला अंगणवाडी सेविकांची क्वचित ओळख होते, पण त्यांचं कार्यक्षेत्र, शोषित-वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची चाललेली त्यांची धडपड, त्यातले अडथळे, आव्हानं सुस्थापितांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे त्या किती मोलाचं काम करताहेत आणि शासनाचा त्यांना कसा प्रतिसाद आहे, हेही उमगत नाही...

 

वैदू जमातीची ३०० घरं आणि १७०० लोकसंख्या असलेल्या जनवाडीमधल्या अंगणवाडीमध्ये २९ जूनच्या सकाळी रडण्याहसण्याचा ऊनपावसाचा खेळ सुरु होता. अडीच-तीन-चार वर्षांची मुलं आई-आजीच्या कडेवर बसून, नाहीतर हात धरुन त्या छोट्याशा खोलीत येत होती. आत शिरताना आई-आजीला सोडताना, त्यातील बरीच व्यवस्थित भोकाड पसरत होती. अशा वेळी अंगणवाडीच्या ताई आई-आजीलाही आत बोलावत होत्या. आत आल्यावर रंगीत मणी, लहानमोठ्या आकाराचे प्राणी, कागदी गोट्या, अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये रमल्यावर मग रडण्याचा आवाज हळूहळू कमी होत होता.

 

वैदू समाजाची ही वस्ती पुणे शहरातील असली, तरी आजही ती शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेली नाही. त्यामुळे इथल्या अंगणवाडी ताईंना घरोघरी जाऊन सगळी मुलं अंगणवाडीत येत आहेत का नाही, हे काळजीपूर्वक पाहावं लागतं. अनेक कुटुंबांमध्ये शाळेत-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची ही पहिलीच पिढी आहे. या अंगणवाडीत येणाऱ्या तीन-चार वर्षांच्या मुलांचे वयाच्या तिशी पस्तीशीत असलेले बहुतेक पालक हे अर्धवट शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले आहेत. यातील कोणी रिक्षा चालवतं, कोणी मोलमजुरी करतं तर कोणी आजही जडीबुटी विकण्याचा पारंपरिक व्यवसाय करतं. यातल्या अनेक पालकांना आपल्या मुलांना शिकवण्याची इच्छा आहे. त्यासाठी आपल्या अल्प कमाईमधला मोठा हिस्सा खर्च करण्याची त्यांची तयारी आहे. पण घरांमध्ये शिक्षणाला पूरक वातावरण नाही. ज्या उच्च जात समूहांना शिक्षणाची परंपरा आहे, किंवा ज्यांची तिसरी-चौथी, पाचवी-सहावी पिढी शिक्षणाच्या प्रवाहात आहे, त्यापेक्षा जिथे आता पहिली-दुसरी पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे, तिथे अगदी पूर्व प्राथमिक स्तरावरच्या शिक्षणासाठी जे शैक्षणिक पर्यावरण लागतं त्याचाही अभाव आहे.

समाजातील विषमतावादी, उतरंडीच्या तत्त्वावर आधारलेल्या जातव्यवस्थेत भटके-विमुक्त, आदिवासी, दलित हे आजही परिघावरचं वंचित आयुष्य जगत आहेत. त्यांचा जगण्याचा, रोजगाराचा संघर्ष तीव्र आहे. त्यांचं परंपरागत ज्ञान, त्यांच्या कला आजच्या आधुनिक व्यवस्थेत ‘टाकाऊ’ ठरवल्या जात आहेत. त्यांची प्राचीन बोलीभाषा जी आजही त्यांच्या दैनंदिन जगण्याचा भाग आहे, ती ‘मागास’ ठरत आहे.

 

जनवाडी अंगणवाडीत येणाऱ्या अनेक मुलांसाठी मराठी ही प्रमाण भाषा परकी आहे. त्यांच्या घरी वैदू बोली बोलली जाते. त्यामुळे इथल्या अंगणवाडी सेविका मंदा चौरे यांना घरोघरी जाऊन पालकांनी घरी मुलांशी मराठीमध्ये बोलावं म्हणजे, अंगणवाडीत आणि नंतर शाळेत त्यांना मराठी समजायला अवघड जाणार नाही, हे सांगावं लागतं. अंगणवाडीतही भाषेची काही अडचण आल्यास वैदू समाजातल्या मदतनीस ताई सुजाता रेड्डी यांच्याकडून मुलांना त्यांच्या भाषेत समजून सांगावं लागतं. २०१८ मध्ये पुणे शहरातल्या अंगणवाडीत मराठी भाषा समजण्यामध्ये जर अडचण येत असेल, तर आदिवासी भागांमधल्या अंगणवाड्यांमध्ये भाषेचा प्रश्न किती तीव्र असू शकतो, याची कल्पना येते. घरी आपल्या जातजमातीची बोलीभाषा बोलणाऱ्या मुलांसाठी, प्रमाण मराठी भाषा ही इंग्रजी इतकीच परकी असते.

 

बहुतेक शिक्षणतज्ञ मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यायला हवं, असं मत व्यक्त करत असतात. पण महाराष्ट्रात मातृभाषेतून शिक्षण देणे, म्हणजे मराठीतून शिक्षण देणे, असंच आपण समजतो. मात्र वास्तवात केवळ गावांमध्येच नाही, तर पुणे-मुंबईसारख्या शहरांमधल्या वस्त्यांमध्येही मराठीपेक्षा वेगळी बोलीभाषा बोलणारे जातसमूह आहेत. त्यांच्या मुलांना अंगणवाडीच्या पूर्वप्राथमिक पायरीवरच भाषेच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागते. त्यामुळेच अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची नियुक्ती करताना, त्या दोघींपैकी एकीला तरी स्थानिक परिसरातल्या किंवा आपल्या अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलांच्या बोलीभाषेचे ज्ञान असायला हवे. जनवाडीच्या अंगणवाडीमध्ये तिथल्या मदतनीस, या त्याच वस्तीत राहणाऱ्या आणि वैदू समाजाच्या आहेत. त्यामुळे या अंगणवाडीमधल्या मुलांना मराठीतून शिकताना काही अडचण आली, तर त्या मदत करतात, वैदू बोलाभाषेतील पर्यायी शब्द सांगून शिकवतात. मात्र शासकीय धोरणामध्ये अद्याप याचा समावेश झालेला नाही. अंगणवाडीच्या टप्प्यावर मुलांच्या क्षमता खऱ्या अर्थाने विकसित व्हायच्या असतील तर भाषेच्या या प्रश्नाचाही विचार करायला हवा.

 

अंगणवाडी हे केवळ पोषक आहार मिळण्याचं ठिकाण नाही. ते खेळघर आहे. पूर्वप्राथमिक स्तरावर मुलांच्या क्षमतांचा विकास करण्याचं ते स्थान आहे. शाळेत जाऊन प्रत्यक्ष लिहावाचायला आणि विविध विषयांचा अभ्यास करायला सुरुवात करण्याअगोदर मुलांच्या विविध बौद्धिक आणि शारीरिक क्षमतांचा विकास करण्याचा तो अवकाश आहे. त्यामुळे या अवकाशातील भाषेचा प्रश्नही शासनाने, धोरणकर्त्यांनी समजून घ्यायला हवा. विशेषतः ज्या भागात भटक्या विमुक्तांची, आदिवासी जमातींची वस्ती आहे, त्या भागात या प्रश्नाची नीट दखल घ्यायला हवी. जिथे घरात सर्वस्वी भिन्न बोली बोलली जाते, तिथे शिक्षणाच्या अगदी प्राथमिक पायरीवरचा भाषेचा अडसर शिक्षणाविषयी अढी निर्माण करतो. ही अढी अंतिमतः शाळागळतीमध्ये परावर्तित होते. भटक्याविमुक्त आणि आदिवासी जातजमातींमध्ये शाळागळतीचं प्रमाण मोठं आहे. या शाळागळतीची वेगवेगळी कारणं असली तरी पूर्व प्राथमिक स्तरापासून भेडसावणारा भाषेचा प्रश्न हेही एक महत्त्वाचं कारण आहे.  

 

जनवाडीतील ही अंगणवाडी ११ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आली. सुरुवातीपासून मंदा चौरे इथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहेत. अंगणवाडीची ही शासकीय यंत्रणा शासनाच्या मदतीपेक्षाही अंगणवाडी सेविकांच्याच खांद्यावर जास्त उभी आहे, याचा प्रत्यय मंदा चौरेंसह पुणे परिसरातल्या इतर अंगणवाडी सेविकांचं काम पाहताना येतो. अंगणवाडीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी शासन प्रत्येक अंगणवाडीसाठी १००० रुपयांचा निधी देतं. मुलांना वेगवेगळे आकार कळावेत, रंगानुसार-आकारांनुसार वर्गीकरण करता यावं, स्पर्शातला-चवीतला-वासातला फरक कळावा, लेखनासाठी मुलांच्या बोटांचे स्नायू विकसित व्हावेत, नजर आणि हात यांचं योग्य समायोजन व्हावं, चालताना नीट तोल सांभाळता यावा, अशा विविध शारीरिक, बौद्धिक क्षमतांच्या विकासासाठी तक्ते, गोट्या, विविध आकारांमधील कोडी, मणी-दोरे अशा मुलांना रमवणाऱ्या नाना गोष्टींची गरज असते. शासन देत असलेला निधी त्यासाठी अपुरा पडतो. शिवाय निधी असला, तरी सगळ्याच गोष्टी बाजारात विकत उपलब्ध नसतात. पण मंदा चौरेंसह सविता माने, संगीता ठाकूर, वैशाली पवार अशा अनेक अंगणवाडी सेविका विविध साहित्य सामग्री स्वतः बनवतात. मंदा चौरेंनी लहान मुलांना चालताना नीट तोल सांभाळत चालण्याचं प्रशिक्षण मिळावं, यासाठी एका लांब जुन्या कापडावर लहान पावलांचे रंगीत ठसे एकामागोमाग एक असे काढले आहेत. रोज मुलं अंगणवाडीत आल्यावर हे कापड पसरलं जातं आणि त्यातल्या पावलांवर आपलं पाऊल ठेऊन मुलांना चालायला सांगितलं जातं. जुन्या रिळांच्या रिकाम्या गोलाकार पुठ्ठ्यांपासून त्यांनी मुलांसाठी रंगीत गोट्या तयार केल्या आहेत. मुलांना वेगवेगळ्या चवी कळाव्यात, म्हणून सहा चवींचे पदार्थ मुलांना चाखायला दिले जातात. स्पर्शांमधला फरक मुलांना कळावा म्हणून वाळू, दगड, बारीक माती, कापूस, जाड खरखरीत कापड अशा विविध गोष्टी आणल्या जातात. मुंबईकरांना अंगणवाडी सेविका माहीत आहेत, त्या त्यांच्या वारंवार मंत्रालयावर येणाऱ्या मोर्च्यांमुळे. पण अल्प मानधनावर काम करत असतानाही या सेविका आपल्यातल्या कौशल्यांना वाव देत, विविध शैक्षणिक साहित्य विकसित करुन मुलांच्या भावविश्वात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. 

 

‘युनिसेफ’ आणि "चरखा’ या संस्थांच्या माध्यमातून जनवाडी अंगणवाडीला भेट दिली होती. बालविकासाच्या प्राथमिक टप्प्यावर अंगणवाडी या उपक्रमाचं असलेलं महत्त्व अधोरेखित व्हावं, म्हणून पत्रकारांची ही भेट आयोजित करण्यात आली होती. आज बहुसंख्य उच्च मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय मंडळींसाठी अंगणवाड्यांचं हे वास्तव अपरिचित आहे. त्यांची मुलं महागड्या प्री-स्कूलमध्ये जातात. गरीब मुलांना पोषण आहार मिळण्याचं एक ठिकाण एवढीच अंगणवाड्यांची ओळख उर्वरित समाजाला आहे. पण ग्रामीण तसंच शहरी भागातील शोषितवंचित समूहांतील मुलांच्या पूर्व प्राथमिक विकासामध्ये अंगणवाडी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मागास जातसमूहांमधील मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहायला हवी असतील, तर त्यासाठी आधी अंगणवाडीच्या स्तरावर त्यांचं शारिरीक-मानसिक-बौद्धिक भरणपोषण नीट झालं पाहिजे. त्यामुळेच अंगणवाडी ही शासकीय व्यवस्था अधिकाधिक सक्षम बनवणं आवश्यक आहे.
आज शहरातल्या बहुसंख्य अंगणवाड्या या भाड्याच्या जागेत झोपडपट्टीलगतल्या किंवा चाळीतल्या छोट्याशा खोलीत भरतात. वीस ते पंचवीस मुलं तिथे अत्यंत दाटीवाटीने बसलेली असतात. प्रत्येक अंगणवाडीच्या डोक्यावर स्वतःचं छप्पर असेल, असा स्वातंत्र्यदिन केव्हा येईल?

 

sandhyanarepawar@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...