Home | Magazine | Rasik | Sanjay Arvikar article in RASIK

चिरंतन ‘पार’ स्पर्श!

संजय आर्वीकर | Update - Jul 29, 2018, 09:54 AM IST

दिग्दर्शक गौतम घोषने ‘पार’ नावाची पडद्यावर साकारलेली दृश्य-कविता एक चिरंतन सत्य समोर आणते.

 • Sanjay Arvikar article in RASIK

  वेदनेपासून दूर जाण्याच्या धडपडीत माणूस पुन:पुन्हा वेदनेकडेच झेपावतो का? दिग्दर्शक गौतम घोषने ‘पार’ नावाची पडद्यावर साकारलेली दृश्य-कविता हेच चिरंतन सत्य समोर आणते. तेव्हा जगण्याचा संघर्ष कितीतरी उन्नत घेऊन आपल्या पुढ्यात अवतरतो, जाणिवा-नेणिवेत खोलवर रुजतो...


  नदीचा घाट. घाटावरचं झाडं आणि झाडाच्या एका बाजूला शंकराची पिंड. या पिंडीवर श्लोक म्हणत फूल वाहणारा एक माणूस. नदीचा हा विस्तीर्ण काठ, जणू दोन विश्व एकाचवेळी सांभाळतोय. त्या श्लोकाच्या सुरांवर ‘ओव्हरलॅप’ होणारे, तिराजवळ बसलेल्या स्त्रीचे - रमाचे गुणगुणते मधुर सूर. शेजारी तिचा पती नवरंगिया-जमिनीवर पहुडलेला... शब्द थोडे स्पष्ट होताहेत. अंगनामें खेले बबुआ...
  रमा आपल्या नवऱ्याला सांगतेय, ‘बचुवा बढ रहा है. पेटमें चलत - फिरत है, तो सा॑फ मालुम पडत है. ऐ बुधबा के बापू, ई काम हो तो, गाव लौट चलेंगे. अम्मा-बाबा कितने खुशी होंगे. बहुत याद आता है उनका. ठीक...?’

  कितीतरी दिवसांनी दोघांच्याही चेहऱ्यावर मोकळं स्मित. गावाकडे जाण्याच्या केवळ कल्पनेनंच दोघे सुखावलेले. बिहारमधल्या मुंगेर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातलं हे दलित जोडपं. नवरंगियानं आपल्या गावातल्या जुलमी तरूण जमीनदारावर प्राणघातक ह्ल्ला केल्यानंतर, मोठ्या जमीनदाराच्या आज्ञेवरून सारी वस्ती पेटवून तिथे गावातल्या अनेकांची हत्या घडलेली. मग प्राणभयानं - रमाच्या आग्रह - विनवण्यांवरून पोटासाठी या जोडप्याचं कलकत्याला येणं. अनेक प्रयत्न करूनही काम न मिळाल्यानं, अखेर परतीच्या प्रवासापुरते पैसे मिळवण्यासाठी कुठलंही काम करण्यास तयार झालेला नवरंगिया, आता काम मिळवण्यासाठी नदीतटावर आलेला. रमाही अपमानित होऊन पूर्वीच तिथे आलेली. नवरंगिया मूर्तिमंत असहायतेचा चेहरा, तर रमा पदराआड लपवलेला अपमान.
  हातांना काम मिळण्याबाबत अनिश्चितता असलेले दीर्घ विराम. रमाच्या चेहऱ्यावर घामाचे निथळते थेंब. नवरंगियाचा निराशेनं कपाळावर हात. कॅमेरा त्यांच्या पायावरच्या मुंग्या-माशांवर. जणू समाजव्यवस्थेत त्यांचे स्थान-असेच पायाशी, किड्या-मुंगीसारखे. नवरंगियाच्या खांद्यावर, धीर देणारा रमाचा हात. तेवढ्यात पाठीमागून येणारा मोहन-दलालाचा आवाज.
  नवरंगियाकडे हात दाखवत, ‘वो... वो... रहा’ जणू खालच्या विश्वातील माणसं दाखवतोय.
  उंचावर दलाल, ज्याचा माल आहे तो मालक आणि त्याचा माल म्हणजे ३६ डुकरं.
  मालक विचारतो दलालाला - ‘सकेगा?’
  दलाल उत्तरतो- ‘जरूर, बहुत मजबूत मरद - जनाना भी है. वो आगे और ये पिछे. ठीक खिच लेगा... सकेगा महाजन सकेगा. मग जातीचा संदर्भ - ‘जात का मूसर है.’
  आता थेट मालक बोलतोय, व्यवहारासाठी ही दोन जगं एकत्र आलीत.
  ‘नदी पार कराना पडेगा... एक सुवर का बाराना.’
  नदीपार करण्यासाठी होड्या नाहीत, तुम्हालाच हाकत दुसऱ्या तिरावर न्यावे लागेल,असं मालकाकडून बजावलं जातं. शिवाय दर-जनावर, वीस पैसे कमिशन मोहन-दलालाचे.
  ‘ईत्ता चौडा पार...? (कराना है)’ असं विचारणाऱ्या नवरंगियाला ‘अरे, यो तो बच्चे लोगोका काम’ असे उत्तर दलाकडून तत्परतेनं दिलं जातं. शिवाय एकही डुक्कर इकडे-तिकडे गेलं, तर तुरूंगात पाठवण्याची मालकाची धमकी.
  निरूपाय असल्यानं कामास तयार झालेला नवरंगिया आता डुक्कर मोजण्यात मग्न. अशा जिवावर उदार होऊन कराव्या लागणाऱ्या कामाच्या भयावह रूपानं, त्यातल्या धोक्यानं भेदरलेली रमा हे काम करू नये, अशी वारंवार विनवणी करते. पोटातल्या वाढत्या गर्भाचा उल्लेख करत, पुन्हा विनवते. पण जगण्यासाठी-गावाकडे परतण्यासाठी हे काम करणं, भागच आहे, अशी खात्री पटलेला नवरंगिया तिच्यावर खेकसत ‘अरे मरे तू और मरे तेरा बचुआ, जा भाग’ यहाँसे, हम अकेले कर लेंगे’, असं जिवाच्या आकांताने तिच्यावर ओरडतो-तिला झिडकारतो-धुमसतोही.
  एकटेपणाची-हतबलतेची उलट प्रतिक्रिया होऊन जणू त्याच्यात नवा शक्ती-संचार झालाय. लगेच एकटाच डुकरांना नदीच्या दिशेनं हाकलणाऱ्या आपल्या नवऱ्याला बघताना नदीतल्या पाण्यापेक्षा मोठा पूर रमाच्या डोळ्यांत... अखेर जीवन-मरणाच्या या संघर्षात, नवऱ्यानं जमिनीवर फेकून दिलेली काठी उचलून, तिही त्याला सामील होते. तो आघाडीवर ती पिछाडी भक्कम सांभाळत.
  पाण्यात प्रतिबिंबित झालेला प्रकाश जणू त्यांना वाट दाखवतोय, उजेडाची दिशा सुचित करतो. आता डुकरांना हाकारणारे दोघांचेही सूर मिळतात, एकमेकांशी पूरक होतात. नदीच्या पाण्यात असलेल्या त्या डुकरांच्या कळपाला दिशा देत. डुकरांच्याही आवाजाचेही चित्कार. आकाशस्थ शक्तीला हात जोडत ‘सारे सुरळीत पार पडू दे’ अशी प्रार्थना करणारी रमा... अखेर किनारा दिसतोय. ‘पोहोचलो’ म्हणून पुन्हा आकाशस्थ शक्तीला हात जोडणारी रमा.
  किनाऱ्याआधी लागणारी चढण एकमेकांच्या साथीनं पार करणारे दोघे. अखेर किनाऱ्यावर पोहोचलो, या समाधानात जमिनीवर विसावलेले, संपूर्ण शक्तिपात झाल्यासारखे दोघेही.
  थोड्या वेळाने उठून नवरंगिया आजूबाजूला नजर फिरवतो. एकदम उच्चारतो ‘...बापरे... अभी इत्ता और...’ डुकराच्या मालकानं शंकराच्या मंदिराची खूण सांगितलेली. ती गाठण्यासाठी पुन्हा तेवढेच अंतर जावे लागणार.
  तो स्वतःला लगेचच सावरतो. ती मात्र पूर्णपणे खचून गेलेली ‘ना... हमसे नही होगा...’ असे कसेबसे उच्चारत, पुन्हा जमिनीचा आसरा घेत. तोही तिची अवस्था समजतोय... पण धीर देतोय. ‘उठ,जादा दूर नही है’ त्याचा आवाजाचा प्रतिध्वनी साऱ्या आसमंतात. जणू सारा आसमंत तेच सांगतोय. पोटावर हात ठेवत, विव्हळत ‘ना हमसे नही होगा... ना... हमार बचुवा...ना’ असं पुन्हा पुन्हा म्हणणारी रमा. ‘पार तर करावंच लागेल’ अशी परिस्थितीची कठोर जाणीव करून देत नवरंगिया रमाला पुन्हा पुन्हा हाक मारतोय. तिचा हात हातात घेऊन ओढतो. हातात डुकरांना हाकण्यासाठी काठी देतो. अखेर ती उठते. त्याच्याबरोबर हाकारे देऊ लागते. तेवढ्यात नवरंगिया म्हणतो, ‘रमा उस गाभीन सुवरियाको जरा संभाल.’ रमाच्या चेहऱ्यावर विलक्षण भाव. स्वतःचं गर्भारपण आणि ‘गाभीण सुवरिया’ यातल्या अनोख्या साधर्म्याचा अचानक लागलेला अर्थ जणू तिच्या चेहऱ्यावर उमटलेला. क्षणभरातच नव्या चेतनेनं ती ‘जगण्या-जगवण्या’च्या संघर्षात पुन्हा सामील. सगळ्या ३६ डुकरांना घेऊन, पुढच्या तिराच्या दिशेनं पुन्हा निघालेले दोघे.
  आता दोन जीवनरीतींमधला फरक अधोरेखित करणारे दृश्य. पलीकडच्या तिरावर जांभया देत ‘हे दोघे येत आहेत का?’ अशी चौकशी करणारा आणि ‘पहा, येत आहेत.’ अशा त्यावरच्या उत्तरावर काहीसे आश्चर्य-काहीशी अपेक्षापूर्ती यांनी एकदम उठून बसलेला मालक. आता ‘गाभीण सुवरिया’चा मालकाकडूनही उल्लेख.तिची अधिक चिंता,तिला पार करणं मुश्कील,या त्याच्या विधानामुळे, रमाचं गर्भारपण , या दोन गर्भारपणातील साम्यभेद, आधी डुकरांना ‘माल’ म्हणणाऱ्या मालकाची ‘गाभीण सुवरिया’बद्दल स्वार्थप्रेरित चिंता, जगण्याच्या संघर्षात एकाच पातळीवर येणारे पशू-माणसं, कदाचित श्रम विकत घेऊ शकणाऱ्या मालकाचे पशू निराधार माणसांपेक्षा अधिक मूल्यवान, या साऱ्या अर्थच्छटा मनात उमटून जातात. रमाच्या गर्भारपणाला एक आणखी शोकात्म छटा आहे आणि त्याबरोबरच पुनरागमनाचा अर्थ चिकटून आहे.

  रमा - नवरंगियाचा तीन वर्ष वयाचा-बुधवा नावाचा मुलगा - विहिरात बुडून मरण पावला आहे. अजूनही ती नवरंगियाला ‘बुधवाके बापू’ म्हणते, कारण बुधवा आपल्या नव्या गर्भाच्या रूपात परत येतोय, असं ती मानते. आधी विहिरीच्या पाण्यात आपल्या मुलाला गमावल्यानंतर, पुन्हा आयुष्यात उभे राहण्यासाठी - दूरवर पसरलेल्या जलाशयात, आपल्याशिवाय ३६ जिवांना - स्वतःच्या आणि ‘गाभीण सुवरिया’ च्या गर्भासह, तिरावर पोहोचवण्यासाठी, केवढे अपरंपार साहस-जीवनेच्छा- या जोडप्याला गोळा करावी लागली असेल, हे आठवले तरी एकीकडे डोळे झरू लागतात आणि दुसरीकडे- गांजवणूक करणाऱ्या समाजव्यवस्थेचा भाग म्हृणून मान शरमेनं झुकते. अशी भावना आपल्या मनात निर्माण करणाऱ्या कलाकृतींमध्येच सांस्कृतिक-सामाजिक परिष्करण-सुधारणेला गती देण्याची क्षमता असते.
  मूर्तिमंत अन्यायाचं प्रतीक असणाऱ्या हरिसिंग नावाच्या जमीनदारानं मजूर - दलितांना सरकारमान्य भावानं मजुरी मिळवून देण्यासाठी अहिंसक आंदोलनाची शिकवण देणाऱ्या एका शिक्षकाला जीपगाडीचा धक्का देऊन ठार मारलं आहे. त्याला तशीच शिक्षा देणाच्या प्रयत्नात, इतरांबरोबर सामील झाल्याने, स्वतःच्या मृत्युचं भय असूनही नवरंगिया-रमा आता पुन्हा ‘दहशतीच्या’ त्या गावाकडे परत जाण्यासाठी हे अदम्य साहस करतात.कारण कलकत्यातही जगणं आता अशक्य झालंय. जलाशयातून असा स्मृतीचा आणि संभाव्य आपत्तीचा मरण-गंध येत असतानाही प्रखर जीवनेच्छेनं, त्यावर मात करतात. अंतिमतः साऱ्या जीवांसह तीरावर पोहोचल्यावर, आता नवरंगिया पहिले कोसळतो आणि त्याला सावरत असते, रमा.
  मालकाच्या दृष्टीनं सारी कामगिरी फत्ते झाल्यावर, हात जोडत त्याच्याकडे जाणाऱ्या ,श्वास लागल्यानं केवळ हात-खुणांनी बोलू शकणाऱ्या, मटकन खालीच बसणाऱ्या नवरंगियासाठी मालकाचे शब्द असतात, ‘शाबास!’ शिवाय नवरंगिया-रमाच्या रात्रीच्या राहण्याची व्यवस्था झोपडीत करण्याचा आदेश मालक देतात.
  बाहेर वादळी पाऊस. झोपडीच्या आडोशानं एकमेकांना कुरवाळणारे - बिलगणारे नवरंगिया-रमा. मन शांत करणारं संगीत. जणू बाहेरच्या वादळाला आतल्या-अंतर्मनातल्या संगीतानं थोपवलेलं आहे...
  ‘रमाः बुधवा के बापू. बच्चा हिलता-डुलता नही, देखो कुछ हो तो नही गया.’
  पार्श्वभूमीवर डुकराच्या चित्काराचे आवाज. कदाचित ‘गाभीण सुवरिया’चे.
  पुन्हा रमाची आपल्या गर्भाबद्दलची चिंता-भीती- ‘वो नही बचा. (रूदन) हमरा बच्चा...हमने कहा था, ये काम हमसे नही करा, हमको हमरा बच्चा चाहिये...’
  नवरंगिया रमाच्या पोटावर कान लावतो... साऱ्या गात्राचे कान करून ऐकू पाहतोय आपल्या बाळाचं जीवनस्पंदन. तिच्या शोकाला रोखत... ‘सुनाता है... सा॑फ सुनाता है... जिंदा है’ असं सांगतो.
  इथंच आपणही रोखलेला श्वास सोडतो... शक्य असेल तर झरणारे डोळे पुसतो.
  गौतम घोषच्या ‘पार’ या चित्रपटातील या दृश्य-कवितेनं, स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून चिरंतनाला स्पर्श केला आहे. आशयाच्या अपरंपार शक्यतांसह. चहूबाजूनं संकटं कोसळत असतानाही, या सृष्टीत येणारं हे बाळ केवढा मोठा जीवनार्थ धारण करून येतंय. कदाचित त्याच्यासाठीच लिहिल्या असाव्यात गुरूनाथ धुरी यांनी या ओळी -
  जोपर्यंत दहशतीचा भक्कम जेल तोडून
  एकमेकांजवळ सरकण्याची ओढ नि उमेद
  जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात लुकलुकते आहे
  तोपर्यंत असंही काहीतरी होईलः
  अवकाशातून एखाद्या चिमुकल्या बाळाप्रमाणं रांगत
  सुकोमल काहीतरी या तुझ्यामाझ्या जगात येईल
  आणि स्वतःच्या मुताचं थारोळं थापटत बाळानं खिदळावं तसं
  या राक्षसी दहशतीकडे पाहून निरागस निर्भयपणं खिदळेल
  आणि तेव्हा ही सर्वव्यापी दहशत
  न कळे कसल्या भयानं आक्रसून
  अवघी त्या थारोळ्याएवढी होईल
  होईल -
  कधीतरी असंही होईल !

  arvikarsanjay@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४

Trending