आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थवाही कारंजे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घडलेला इतिहास हे दुुधारी शस्त्र आहे. अस्मिता आणि भावनांना धग देण्यासाठी राजकारणात ते यथेच्छ वापरात येत आहे. यात उघडउघड  समाजपुरुषांचाच पराभव होताना दिसतो आहे. वर्तमानाशी त्यांचं असलेलं नातं हास्यास्पद बनत चालल्याचं दिसत आहे. यातल्याच व्यंगावर बोट ठेवत ‘शोभायात्रा’ या नाटकाने सामाजिक - एेतिहासिक समतोल साधला आहे...

 

जाधव : कुणावरही अन्याय करू नका - खराखुरा इतिहास दाखवा (बार्बीला उद्देशून)... - दोन चार फोटो सुभाषबाबूंचेही काढ - म्हणजे इतिहासाला न्याय दिल्यासारखं होईल.
बापट : काढा - यांचे फोटो काढा - आम्हाला प्रसिद्धीची हाव नाही.
(बापट बाजूला होतात - जाधव सुभाषबाबूंच्या पोजमध्ये उभे राहतात. बार्बी कॅमेऱ्यातून बघते आहे. जाधव हळूहळू सुभाषबाबूंच्या भूमिकेत शिरतात.)
सुभाषबाबू जाधव : ... स्वातंत्र्य मागायचे नसते - ते मिळवायचे असते - आणि हे असे मिळाले तरी, त्याला काही किंमत प्राप्त होत नाही... 
(थांबतात, फ्लॅश पडत नाही - पुनःपुन्हा नाटकी हावभाव करत तेच तेच बोलत राहतात)
(बार्बी कॅमेरा क्लिक करू पाहते. पण कॅमेरा क्लिक होत नाही)
बार्बी : आय अ‍ॅम सॉरी जाधव -
जाधव : काय झालं?
बार्बी : रोल संपला वाटतं -
जाधव : यात नवीन काही नाही. सुभाषबाबूंना आयुष्यभर हेच ऐकावं लागलं आहे...

 

हे दृश्य आहे, सुप्रसिद्ध मराठी नाटककार शफाअत खान यांच्या ‘शोभायात्रा’ (हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली या भाषांमधूनही प्रयोग झालेल्या या नाटकाचा पहिला प्रयोग २ मे १९९९ ला मुंबईत  झाला. )या महत्वाच्या नाटकातले. आज उण्या-पुऱ्या दोन दशकांनंतर हे नाटक अधिकच समकालीन-सुसंगत वाटू लागले आहे. या नाटकाचे सादरीकरण आज झाले, तर वर्तमानाच्या भयावह चेहऱ्यावरचे अनेकपदरी वस्त्र दूर करून, काळाची दुखरी गोष्ट, तर ते सांगेलच. पण भूत-वर्तमान-भविष्यात, विस्तारलेल्या समाजपुरूषाचे हुंदकेही आपल्याला ऐकू येतील. ‘प्ले ऑफ सोशिओ-कल्चरल-हिस्टॉरिकल करेक्शन’ म्हणूनही या नाट्यकृतीची शक्ती-आवाहकता, आता अधिकच वृद्धिंगत झाल्याचे आपल्याला जाणवेल.

 

नाटकातले हे दृश्य किती वेगवेगळ्या पातळ्यांवर रंगावकाशात साकारते ते बघू ः जाधव या नटाने प्रारंभी म्हटलेले संवाद ‘सुभाषचंद्र बोस’ ही व्यक्ती ज्या काळात होऊन गेली, त्या काळाचा निर्देश करते तर  ‘थांबतात,फ्लॅश पडत नाही - पुनःपुन्हा नाटकी हावभाव करत तेच तेच बोलत राहतात,’ यात संभाषण-काळाचा संकेत आहे. इतिहासावर फक्त एकरेषीय काट मारत, त्यातली अक्षरे मात्र दिसतील, असा संदर्भ-जुन्या दरवाजासारखा, ‘कर-कर’ता ठेवत, इथे वर्तमान अवतरला आहे. बार्बीचं ‘रोल संपला वाटतं’- हे विधान वर्तमानकाळातील संभाषणकाळाचा निदर्शक तर आहेच, परंतु तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी स्वातंत्र्य-चळवळीतील सुभाषबाबूंच्या योगदानाकडे केलेल्या दुर्लक्षाचा, त्यातील ऐतिहासिक सत्याचा अंशही त्यात मिसळलेला आहे. काँग्रेसच्या राजकारणात त्यांना स्थान मिळाले नाही, नाटकातील प्रसंगांच्या अनुषंगाने, अधिक नेमकेपणाने सांगायचे, तर योग्य प्रकाशझोत (फ्लॅश) त्यांच्यावर पडला नाही. ‘रोल संपला वाटतं’ या विधानाला असे वर्तमान-भूतकाळ-ऐतिहासिक सत्य लगडून आहे.

 

काळाला  प्रतिभेनं  पकडू शकणारे थोडेच कलावंत असतात आणि त्यांनाही ते सगळ्याच कलाकृतीमध्ये जमतेच असे नाही. ‘जगण्याशी मी प्रामाणिक असेल तरच माझं नाटक स्थलकाळाच्या मर्यादा ओलांडून टिकून राहील’ अशी ठाम श्रद्धा असणाऱ्या नाटककार शफाअत खान यांनाही ते ‘शोभायात्रा’ या नाट्यकृतीत साधलं आहे. ऑगस्ट क्रांती मैदानावर आयोजित कार्यक्रमातून, नाटकाचा ‘इग्निशन पॉईंट’ कसा गवसला, ते नाटककार सांगतो, ‘...कार्यक्रमाशी संबंधित शेकडो माणसं लगबग करत होती... घोडे, तोफा... मी आत शिरत असतानाच पंडित नेहरू पटकन पुढे आले. म्हणाले,’ शफी लाइट आहे?’ मी गडबडलो. तो बापू कामेरकर आहे, आणि सिगरेट पेटवायला काड्यापेटी शोधतोय, हे कळायला थोडा वेळ लागला... पुढं तालीम बघितली. झाशीची राणी, टिळक, नेहरू, गांधी हे सगळे माझ्याशी गप्पा मारत होते, हे कुठेतरी मनात जाऊन बसलं. रेघोट्या मारता मारता हा घडून गेलेला प्रसंग आठवला आणि नाटक सुचल्यासारखं झालं.’ प्रत्यक्षातल्या  या अनुभवातून या नाटकाची संरचना उमलली आहे आणि त्याचे ‘तंत्र’पण अनुभवाच्या सच्चेपणात, जवळजवळ विरघळून गेले आहे.

 

स्वातंत्र्याच्या पन्नासवर्षांनंतर विकास होऊनही, साधन-संपत्तीचे समन्यायी वाटप न होता, नैतिक दृष्ट्याही वेगाने ऱ्हासाकडे जाणाऱ्या आमच्या समाजाचा हा धुमसता, तिरकस पण तरीही नव्या रचनेचा आरंभ सुचवणारा हा शोध आहे, जो निवडक दृश्य-मालिकेतून धोक्याचे लाल दिवे दाखवतो. त्रिकालाला नाट्य-संरचनेत सामावून घेतल्यानंतर, नाटककार आपल्या बहुतेक व्यक्तिरेखांना त्रि-मितीय परिमाण देतो. नाटकातील गांधीचे तीन स्तर - प्रत्यक्ष गांधी, बापटांना समजलेला गांधी, आणि बापट असे खुद्द नाटककारच सांगतो. पण हेच नेहरू, टिळक, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी, बाबू गेनू या व्यक्तिरेखांबद्दलही खरे आहे. शिवाय विशिष्ट भूमिका करणाऱ्या नटाची स्वतःची सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक पार्श्वभूमी आणि त्याला मिळालेल्या भूमिकेतील मूल्यात्मक ताण आणि मूल्य आणि मूल्यविहीनता यातील  विरोधात्मता असेही अनेकविध पैलू या नाटकाला आहेत.

 

नाटकातली शोभायात्रा ‘एक खुनी - खंडणी गोळा करणारा, दिवसाढवळ्या लोकांचे मुडदे पाडणारा-समाजात दहशत निर्माण एक गुंड - मवाली अर्थात भाई यानं आयोजित केली आहे, आणि हे माहीत झाल्यावर त्याला विरोध दर्शविणाऱ्या फक्त बाईच आहेत, यातून नाटककार अनेक गोष्टी सूचित करतो. या बाईच झाशीच्या राणीची भूमिका करताहेत, इतिहासाच्या शिक्षिका आहेत - बाबू गेनूची भूमिका करणाऱ्या बाबूच्या शिक्षिका आहेत - निराधार छोटूला थोपटणाऱ्या - त्याच्या अंगावर झेंडा पांघरणाऱ्या, भारतमाता आहेत - नवनिर्मिती करणारी स्त्रीपण आहेत. ही ‘सप्तरंगी’ व्यक्तिरेखा नाटकाच्या शेवटी ‘नव्या शोभायात्रेला सुरूवात झाल्याचा भास’ जागवते.
नाटकातले भूत-वर्तमानाचा समीपन्यास साधणारे अनेक प्रसंग-संवाद असे आहेत ही त्यातून जागोजागी अनेकार्थाची कारंजी उडावीत. उदा.
छोट्या : मला तुमच्या लोकांचं काय कळत नाय -
नेहरू : तुला इतिहास माहीत नाही का?
छोट्या : इतिहास? इतिहास म्हणजे काय?
नेहरू : अरे, तू शाळेत जात नाही का?
छोट्या : नाही -

नेहरू देशाचे सर्वशक्तिमान लोकप्रिय नेते-पंतप्रधान आणि ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ लिहिणारे इतिहासकारही. शिवाय त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. छोट्यानं सांगितलेलं सत्यं - ही नाटकातल्या नेहरूंसाठी नवी ‘डिस्कव्हरी ऑ॑फ इंडिया’ होती, असे तर नाटककार सुचित करत नाही ना?
अन्य एका प्रसंगात गांधीजींची भूमिका करणारे बापट म्हणतात,
‘छे हो, हे कसलं ओरिजिनल-सगळी बनवाबनवी. हे घड्याळ. हा हा चरखा. चाक फिरेल तर शपथ. कुठून चाकू-सुऱ्यांना धार लावायचं चाक शोधून आणलंय, कुणास ठाऊक-याच्यावर काय कपाळाची सूतकताई होणार-आणि कसलं स्वातंत्र्य मिळणार...’ (बापट चरखा आपटतात.)
या साध्याशा वाटणाऱ्या प्रसंगात केवढा अर्थ दडला असू शकतो.
गांधींच्या विचारप्रणाली-आदर्शांशी काहीही संबंध नसताना, त्यांच्याशी निगडित संकेतचिन्हांचा अगदी विरूद्ध हेतूंसाठी, सत्ता-प्राप्तीसाठी वापर करणारे, माणुसकीचे वस्त्र विणण्याऐवजी ते स्वतःच्या क्षुद्र हेतूंसाठी फाडणारे, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साऱ्या शस्त्रांना धार लावणारे, असे सारे यातून सूचित केले जाऊ शकते. वर्तमानात त्याला अर्थाचे नवे घुमारे फुटतील. शिवाय ‘कसलं स्वातंत्र्य मिळणार... (बापट चरखा आपटतात.)’ या संवाद आणि रंगसूचनांच्या आंतरक्रियेतून गांधींच्या भूमिकेबाहेरचे बापट आणि गांधीच्या भूमिकेतील बापट यांच्यातील द्वंव्दभाव व्यक्त होतो. ‘पुढे उगाच या इतिहासाच्या भानगडीत पडलो. गांधी मानगुटीवर बसले. गांधी सोडता येत नाही आणि बापट होता येत नाही’ या बापटांच्या विधानातून ‘गांधी-पण’ कसे माणसांमध्ये झिरपत जाते, याचाही संकेत मिळतो. शिवाय नट करत असलेली भूमिका आणि त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्व यात गुंतलेल्या मनोव्यवहाराचेही सूचन त्यात आहे. 

 

‘माझा चष्मा दंगलीत हरवला’ हे बापटांचे विधान आणि त्यानंतर येणारी’ गांधीची दृष्टीच हरवली’ ही रंगसूचना परस्पर सामंजस्यासाठी गाधींनी केलेले निकराचे प्रयत्न आणि खूपदा त्या फुटीरतावाद्याची झालेली, सरशी यांच्या आठवणी जागवते.
‘बार्बी’ (पाश्चिमात्य आकर्षण, दैहिक सौंदर्य, कृत्रिमता) आणि क्रिश्ना पावलस (सर्वशक्तिमान भाईचा उजवा हात-भाई तर प्रत्यक्ष ‘पावतच’ नाही) छोट्या (कुठलंही लहान मूल/कोणाच्याही मनातलं लहान मूल) ही पात्रांची नावेही सूचक आहेत. शफाअत खान यांच्या या नाटकातील रंगसूचनाही विशेष अभ्यास कराव्या अशा आहेत.
उदा. (गांधीचं बोलणं चालू असताना मागे रघुपती राघव राजारामऽऽ हे भजन ऐकू येत आहे. अचानक या शांत भजनाचा सूर बदलतो. भजनाला जोडूनच घाबरवून टाकणारं संगीत सुरू होतं. भजनाची चालही बदलते. बाहेर आरडाओरडा, किंकाळ्या ऐकू येतात. बाबू आणि इतर चार-पाच माणसं तिरासारखे आत घुसतात. ते भयंकर हिंसक...) 
सामाजिक परिस्थितील बदलाची सांगीतिक अभिव्यक्ती इथं जोरकसपणे होते. ‘क्षणभर बाबू इतिहासावरच चाल करून येतो.’ या रंगसूचनेचेही प्रतिध्वनी साऱ्या नाटकभर ऐकू येत राहतात.

 

इतिहासाशी निगडित या नाटकातील सूत्रात्मक वाक्ये, समाजशास्त्र आणि इतिहासाच्या  गुंतागुंतीच्या बहुपदरी नात्यावर प्रकाश टाकणारी आहेत. इतिहास चांगला दाखवा.प्रोग्रॅम भाईचा आहे/ झाशीची राणी पब्लिक फोनवरून बोलते हे लोकांनी बघितलं, तर लोकांच्या भावनेला धक्का पोचेल / माझ्याकडे तलवार नसेल पण म्हणावं माझ्याकडे इतिहास आहे, मी इतिहास गरागरा फिरवून त्यांना नाचवीन/मानसिक आजारच आहे हा-इतिहासात घुसल्याशिवाय चैनच पडत नाही / अरे भाई काय, शासन काय-हाच इतिहास स्वीकारणार / ज्या इतिहासाच्या आधारे मी जगू बघतोय-त्या इतिहासाबद्दलच तुम्ही माझ्या मनात घृणा निर्माण करताय / इतिहासाकडे पाठ फिरवलीत तर असं हे अंधारात खितपत पडावं लागणार या साऱ्यांतून इतिहास आणि समाजवास्तवाच्या उभे-आडवे धाग्यांनी विणलेले रंग-पोत जाणवते.  स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षातील ऱ्हासाचे चित्र काढतानाच, झाशीची राणी, टिळक, नेहरू, गांधी, सुभाषचंद्र यांच्यातील राष्ट्रनिर्मितीचे-नवनिर्मितीचे चैतन्यही, त्यांची भूमिका करणारी  पात्रे पात्रांच्या अंतरंगातून, आणि छोट्या-बाबूच्या सहाय्यानं प्रवाहित ठेवलं आहे. नाटकातलं समतोल-तत्व साधणारी, ही अवघड किमया आहे. या नव्या शोभायात्रेच्या अग्रणी आहे, छोटू. 
नाटकाचे शेवटचे दृश्य आहे - बाहेर ढोलताशांचा आवाज, हळूहळू बाबूच्या हातातलं पिस्तूल गळून पडतं. छोट्या इकडेतिकडे पाहतो. हळूच खिशातून सुभाषबाबूंची टोपी काढतो डोक्यावर चढवतो. दुसऱ्या खिशातून गांधींचा चष्मा काढतो. डोळ्यावर चढवतो. सगळ्यांकडे बघत निरागस हसतो. मोठा झेंडा उचलून रंगमंचावर धावत सुटतो. रंगमंच प्रकाशाने उजळून निघतो. हळूहळू बाई, बाबू त्याला सामील होतात. एका नवीन शोभायात्रेला सुरूवात होत असल्याचा भास होताहोताच... पडदा. 
छोटूनं सुभाष-गांधी यांचं चैतन्य-तत्व धारण केलं आहे, हा भास असेल पण असत्य नाही, कारण  या नाटककारानं स्वतःच सांगून ठेवलं आहे. ‘आज प्रेक्षकांना ...जगण्याचं बळ देणं... नाटककार म्हणून माझं काम आहे... प्रयोग करणारा  कलावंत बंडखोर असावा लागतो.बंडखोर फक्त तोडफोड करून थांबत नाही. तो पुन्हा नव्यानं मांडामांड करतो...’

 

arvikarsanjay@gmail.com
लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४

 

बातम्या आणखी आहेत...