Home | Magazine | Rasik | sanjay arvikar write on Socrates

सत्य प्रकाशात झळाळणारा सॉक्रेटिस !

संजय आर्वीकर | Update - May 06, 2018, 03:14 AM IST

नैतिकता ही तत्त्वज्ञानाची एक उपशाखा. तिचा उद्गाता सॉक्रेटिस. माणसाने कसं जगायला हवं, माणसाचं जगणं कसं अर्थपूर्ण होऊ शकतं

 • sanjay arvikar write on Socrates

  नैतिकता ही तत्त्वज्ञानाची एक उपशाखा. तिचा उद्गाता सॉक्रेटिस. माणसाने कसं जगायला हवं, माणसाचं जगणं कसं अर्थपूर्ण होऊ शकतं, याचा त्याने आयुष्यभर शोध घेतला. दाहक, प्रखर सत्याला भिडण्याची धमक त्याने दाखवली. मग, तो कसा लुप्त होईल या पृथ्वीतलावरून...?

  रंगमंच संपूर्ण उजेडात येतो,या वेळी रंगमंचावर फक्त सॉक्रेटिस.
  “ मी कसं बोलतो,यापेक्षा मी किती सत्य बोलतो,यालाच महत्व असायला हवं. ज्या माणसाला थोडंसुद्धा चांगलं करायचं आहे, तो स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारू शकतोः"मी करतोय ते चांगलं का वाईट? त्यानं मृत्युची गणितं मांडता कामा नयेत...' "चांगल्या माणसाला मारण्यानं मारणाऱ्याचंच जास्त नुकसान होत असतं...' "समाज एखाद्या सुस्त बैलासारखा असतो.त्याला जागवण्यासाठी माझ्यासारख्याची गरज असते. तुम्हाला सद्गुणांच्या मार्गावर नेण्याचा हा ध्यास,मनुष्याच्या सामान्य वर्तणुकीपेक्षा वेगळा आहे...' "आता शेवटची गोष्ट. माझ्या कुटुंबीयांना,मुलांना इथं आणून,त्यांच्या रडण्याभेकण्यातून न्यायासनापुढं दया मागण्याचं कृत्य मी करणार नाही...’’


  सॉक्रेटिसच्या भूमिकेत वावरणाऱ्या डॉ.श्रीराम लागू यांच्या धीरगंभीर आवाजानं मला खूप वर्ष मागे नेलं होतं. १९७७-७८ साल असावं. कुणीतरी मला ‘सॉक्रेटिस’ नावाचं पुस्तक दिलं होतं. मराठी. लेखकाचं नाव आता आठवत नाही. सॉक्रेटिसबद्दल पहिल्यांदा वाचलं, तेव्हा मनात पहिला प्रश्न मनात आला, असाही कुणी जगू-मरू शकतो? पुढं बी.ए.ला तत्वज्ञान हा विषय शिकत असताना तत्वज्ञ सॉक्रेटिसची अधिक ओळख झाली पण अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून नव्हे, अभ्यासाच्या अनुषंगानं शिक्षकांशी होणाऱ्या चर्चांमधून. पुढे तर काही दुसरं वाचत असलो तरी हा माणूस पिच्छा सोडायचा नाही. महेश एलकुंचवारांचं १९७२-७३ च्या काळात वादग्रस्त ठरलेलं नाटक होतं, ‘गार्बो’. खरंतर ते अत्यंत गंभीर स्वरूपाचं नाटक होतं.


  पुढे २००१ मध्ये मी एलकुंचवारांवर समीक्षेचं मोठं पुस्तकही लिहिलं. पण ‘गार्बो’ वाचताना मी त्यातल्या ‘इन्टुक’ नावाच्या पात्राच्या, एका विधानापाशी पुन:पुन्हा थबकत होतो. ‘गार्बो’तला ‘इन्टुक’ म्हणतोः “सॉक्रेटिस म्हणतो, समाधानी डुक्कर होण्यापेक्षा असमाधानी माणूस व्हावे. आपण डुक्कर आहोत....आणि असमाधानी. व्हावंच लागतं आपल्याला,नाही तर मरून जाऊ गुदमरून. आहे कुणात धैर्य, आतल्या पोकळीत वळून पाहायचं?’’


  हे वाचल्यावर मनात आलं की की बाबा, सॉक्रेटिसा, तू इथेपण आहेस...
  याच नाटकात ‘इन्टुक’ पुढे म्हणतो.....” मी काय थुंकावं जगावर? नि बंडाची भाषा करावी. बंडखोराची नीतिमत्ता निर्विवाद हवी, तर त्याचे शब्द शक्तीनिशी उभे राहतात.इन्टुकच्या विधानामध्ये स्वतःच्या क्षुद्रपणाचा उपहास आहेच, पण एका सच्च्या बंडखोराचे लघुत्तम स्वभावचित्रही आहे. प्रथम येणारा सॉक्रेटिसचा उल्लेख आणि नंतर सिनिसिझमचा, यात एक तात्विक सूत्राचा अंतःप्रवाह दिसतो. सिनिक पंथाचा संस्थापक अँटिस्थेनिस स्वतःला सॉक्रेटिसचा आध्यात्मिक शिष्य समजत असे.


  पुढे २००३ मध्ये कमल देसाईंशी माझी ओळख झाली. आम्ही केलेल्या पहिल्या दीर्घ मुलाखतीच्या वेळी, माझ्या मानवी ज्ञानाच्या मर्यादेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, "दी ओन्ली थिंग आय नो इज दॅट आय नो नथिंग' असं सॉक्रेटिसनं म्हटलं आहे, ते काही खोटं नाही. मानवी बुद्धीची झेप एका अंगानं जाते तिला अनेक फाटे फुटून भव्यता लाभत नाही....” .’ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या त्यांच्या कादंबरीतल्या प्रबोधचंद्र नावाच्या व्यक्तिरेखेच्या संदर्भात हा प्रश्न होता. सॉक्रेटिसचं कालातीत असणं अधोरेखित करणारी एक महत्वाची कलाकृती होती, मकरंद साठे यांचं ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे नाटक. या नाटकाचा कथानक-काळ म्हणजे प्लॉट टाइम- हा सॉक्रटिस ज्या काळात जगला तो काळ नव्हे तर सगळ्या मानवी संस्कृतीचा काळ - हा या नाटकाचा कथानक-काळ आहे. कारण या नाटकातल्या गुहेतील चार माणसं ही...कुठल्याही काळात सत्याचं सूर्यदर्शन होण्यासाठी अविरत प्रयत्नरत असणारी ही माणसं आहेत आणि सॉक्रेटिस हा केवळ माणूस नव्हे तर आपल्याला गवसलेल्या सत्याचा उच्चार करणारा आणि प्रत्यक्ष आयुष्यात अशा व्यावहारिकदृष्टया अशक्यप्राय वाटणाऱ्या जीवनशैलीचा अवलंब करण्याऱ्या मानवी चैतन्याचं नावं आहे, सॉक्रेटिस! सत्य-प्रतिपादनासाठी विषाचा प्याला पिऊन मृत्यदंडाला सामोऱ्या जाणाऱ्या निर्भयतेचं नाव आहे, सॉक्रेटिस!


  या नाटकातला छोटासा नाट्यखंड पहाः
  सॉक्रेटिसः( तो बोलत असता रंगमंचाच्या मागच्या बाजूस बोलल्यासारखे दृश्य दिसू लागते.) अशी रंगसूचना आहे.
  सॉक्रेटिस म्हणतोः ही बघा गुहा. सर्व मानवजात इथे वास्तव्याला आहे....
  (व्यक्ती)- म्हणतोः क्षमा करा. मला एक प्रश्न आहे....त्याला दिसलेला सूर्य, तुम्हाला दिसलेला सूर्य, आणि मला दिसलेला सूर्य वेगवेगळा असला, तर?
  सॉक्रेटिस म्हणतोः असे सूर्य पाहणारे लोकच गुहेच्या या भागात येतात.... विवेकानेच या सर्व सूर्याचं ज्ञान एकत्र होऊ शकतं, खरा सूर्य कळत राहतो,हळूहळू आयुष्यभर...
  नंतरच्या काळात मी ‘सॉक्रेटिस’विषयी अनेक पुस्तकं वाचली. पण त्याच्याशी माझी सगळ्यात घट्ट ओळख करून दिली, ती वसंत पळशीकरांच्या ‘सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण’ या पुस्तकानं. सॉक्रेटिस आणि महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वातील साधर्म्याबद्दल सूचित करताना यात ते लिहितात,” गांधींच्या आयुष्यात धर्म आणि राजकारण यांची जी विशेष स्वरूपाची व अर्थाने सांगड दिसून येते.म्हणजे असे की, धर्मपरायणता आणि सार्वजनिक/राजकीय जीवन या त्यांच्या आयुष्यात एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या.. सॉक्रेटिस आणि गांधी दोघेही अशा काळात जगत होते, की ज्यावेळी चिकित्सक बुद्धी स्वाभाविकपणे धर्मचिकित्सेकडे वळेल.”
  ईश्वरावर नितांत श्रद्धा असणारे गांधीजी सत्याग्रही म्हणून उत्तरआयुष्यात आणखी सर्वसमावेशक होतात. लुसान इथल्या संमेलनात ते म्हणाले होते, "यापूर्वी आपण ‘ईश्वर हे सत्य आहे असे म्हणत असू,परंतु आता ‘सत्य हेच ईश्वर आहे’ असे आपले मत आहे,कारण निरीश्वरवादीदेखील सत्याच्या सामर्थ्याला आव्हान देत नाहीत.सत्याच्या शोधात असताना ईश्वराचे अस्तित्व नाकारण्यास ते कचरत नाही.त्यांच्या दृष्टीने ते बरोबरच असतात.'


  टॉलस्टॉयच्या ‘कन्फेशन’मध्येही सॉक्रेटिस अवतरतो. टॉलस्टॉय सांगतात, आयुष्याची निरवानिरव करताना सॉक्रेटिस म्हणाला,” जीवनापासून आपण जितके दूर जातो, तितके सत्याच्या जवळ येतो.शहाणा माणूस सर्व आयुष्यभर मरणाचीच इच्छा करतो. म्हणून मरण हे त्याच्यासाठी भीतीदायक नसतं”


  माणूस मृत्युला सामोरा कसा जातो,याला खरेतर फार महत्व आहे.त्या क्षणी सत्व टिकले तर जीवनाला पूर्णत्व प्राप्त होते ,असं पळशीकर या पुस्तकात म्हणतात. तर तत्वज्ञान आणि जीवन या दोन्ही दृष्टीने फार महत्वाचे विधान ‘सूर्य पाहिलेला माणूस’ या नाटकाच्या शेवटच्या टप्प्यात सॉक्रेटिस उद्गारतो.पत्नी झांटिपीशी झालेल्या शेवटच्या संवादाच्या वेळी. तो म्हणतो ,“ झांटिपी,कुठल्याही तत्वज्ञानानं सर्वांना सामावून घेतलं पाहिजे. खरं आहे. आणि कुठली तडजोडही करता कामा नये, हेही खरं आहे.....या विना तडजोडीच्या भानगडीत माणूस स्वतःच्या बाहेर पाहणंच बंद करतो का गं?’’ सॉक्रेटिसच्या या विधानाला आत्मचिकित्सेचे टोक आहे.


  इथे आपल्याला माहीत असणाऱ्या सगळ्याच ध्येयनिष्ठ माणसांच्या –त्याच्या कुटुबियांच्या जीवन-कहाण्यांना उद्गार मिळतो. मग ते सॉक्रेटिस असोत,टॉलस्टॉय असोत ,महात्मा गांधी असोत वा आपल्याला माहीत असणारी, तत्वासाठी झगडणारी, आपल्या अवतीभवती असणारी सॉक्रेटिस- टॉलस्टॉय-गांधी यांचे सत्वांश असणारी प्रेरक व्यक्तित्वे असोत. भरतमुनी आणि सॉक्रेटिस भेटले असते, तर त्यांनी भरतमुनींना कोणते भरत-वाक्य ऐकवले असते, असे सारखे माझ्या मनात येऊन जाते. तो स्वतःच सांगतो’ आय कॅनॉट टीच एनिबडी एनिथिंग.आय कॅन ओन्ली मेक देम थिंक ‘’


  ‘सॉक्रेटिस हे मानवी वंशाच्या इतिहासातील एक असे चिकित्साकेंद्र आहे ,जे सर्वकाळात मानवी संस्कृतीच्या चिकित्सेची प्रक्रिया सतत जागी ठेवते.त्याच्या चैतन्य तत्वापासून निघालेली सत्य-किरणं प्रत्येक युगातील सत्याग्रहीला-प्रतिभावंताला नवा प्रकाश दाखवीत असतात. नूतनशील सॉक्रेटिसची ही कालातीत गोष्ट आहे. म्हणूनच जीवनाच्या रंगमंचावर मला, सतत दिसतोय तो, सत्याच्या प्रकाशात झळाळून निघालेला सॉक्रेटिस...!


  - संजय आर्वीकर

  arvikarsanjay@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४

Trending