आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुंदन आई, बिन पावस ऋत छाई!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी नातेसंबंध आणि सांगतिक पार्श्वभूमी यांची सांगड 
घालून कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेल्या नीरूचा आणि पर्यायाने एका सकस धारणेचा प्रवास आशाताईंनी आपल्या ‘मुद्रा’मध्ये उत्कृष्टपणे साधला आहे.

 

‘स ध्या काय वाचताय?’ अशा स्वरूपाच्या प्रतिथयश व्यक्तींना विचारल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रातल्या प्रश्नावलीत अश्विनीताईंनी (डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे) आशा बगे यांच्या ‘मुद्रा’चा उल्लेख केला होता. त्यानंतर पुस्तकाच्या मुखपृष्ठावरूनच पुस्तकाची शास्त्रीय संगीताशी नाळ जोडली गेल्याचं लक्षात येऊन ही कादंबरी वाचायला घेतली. केवळ आवडनिवड अशा सरधोपट शिक्क्यापेक्षा आस्ते आस्ते कब्जा घेणारं या कलाकृतीतलं ‘गुंगवणारं’ आणि ‘रेंगाळणारं’ असं नेमकं काय हा प्रश्न स्वत:लाच विचारून त्याचं विश्लेषण करायचा हा प्रयत्न! रूढार्थाने ही कादंबरी स्त्रीवादी नसून कलंदर कलावंताने तथाकथित समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्थेचे पाश आत्मबळाने बाजूला सारून केलेला अस्वस्थता ते अवस्था असा प्रवास अधोरेखित करणारी आहे. यशस्वी मैफल गायिका व्हावं या इर्षेने जडणघडण झालेल्या सतत दौरे करणाऱ्या, मानसन्मानाचे उच्चांक गाठणाऱ्या कलावतीचा हा प्रवास नसून कला ही व्यक्तिमत्त्वाचा भाग असणाऱ्या, अशाश्वततेच्या अथांग प्रवासात काहूर वृत्तीने सामोरं जाणाऱ्या निरंजनी महादेवकरचा आहे.


Tim O’Brien चे एक सुंदर वाक्य आहे. That’s what fiction is for. It’s for getting at the truth when the truth is not sufficient for the truth.”


आत्मशोधाच्या चिंतनाचा हा रस्ता खचितच ‘निरंजनी’ नीरूच्या आणि बाबा देवाशिष महादेवकर, आई ‘देवकी’, नीरूच्या मन्नू व अप्पी या पाठच्या बहिणी, राजशेखर, रामशरण, शास्त्रीजी, ललिताताई पाराशर, यमुनाआंटी, महेंद्र अशा मोजक्याच पण प्रातिनिधिक व्यक्तिरेखांनी उजळून टाकला आहे. कादंबरीचं बलस्थान म्हणजे त्यातील संगीतमय वातावरण, संगीत जगतातील व्यवहार, मान्यता, चालीरिती, रागलोभ, गरुशिष्य नातेसंबंध हे इथं अतिशय अस्सल उमटले आहेत. नीरू! ते बालगंधर्व होते. तसा शुद्ध निषाद लावण्यामागे त्यांची तशीच तपश्चर्या होती. आपण तिथे पोचलो नाही अजून. आपल्या मनातला भाव जसाच्या तसा सुरात उतरवण्यासाठी स्वरांची शिस्त लागते ते शास्त्र. केवळ रंजनाकरता शास्त्राला ओलांडणं गैर आहे आणि बालगंधर्वांची गोष्टच वेगळी! ते ज्या उंचीवर होते तिथे शास्त्र स्वरभावात विरघळून गेले होते. किंवा स्वरभाव शास्त्रात विरघळला असं म्हणा हवं तर. किंवा माणूस सदैव निर्मितीच्या अवस्थेत असत नाही. ती अवस्था धरून ठेवणं कठीण. किंवा माझी आई सांगत होती की पूर्वी म्हणजे फारच पूर्वी देवळातूनच गाणं आलं असलं पाहिजे.
नीरू, देऊळ हे इथं प्रतीक होऊनच उभं राहतं. निर्मितीच्या क्षणी ऐकणाऱ्यांचीही अपेक्षा न ठेवणारं निखळ निरंजन असं संगीत... हे तर मुद्राचं वैभव आहे.


‘एक सूर चराचर छायो
घर घर तुंबा बना उसीका
ऐसो नाद जगायो
तार अखंड अभेद हुए सब
जब यह सूर लगाओ
ताल काल से रहे अबाधित
सम से सम समझायो...
किसे सुनाना कैसे सुनना
सूर कहाँसे आयो
सुननेवाला कोई न था
जब अलख निरंजन गायो...’


असंख्य बंदिशी-रागांची स्वभावचित्रे, अष्टपदी, संतरचना, लोकसंगीताचा स्त्रोत हे त्यातल्या नाट्याला कमालीची खोली आणतात.
कादंबरीत घडणाऱ्या घटनाही अतार्किक आणि अवास्तव नाहीत. देवाशीष महादेवकरांचं दुसऱ्या घरी स्थिरावणं, प्रकट निर्मिती अवस्था थांबलेली जोखणं आणि तितकाच परिणामकारक मृत्यू, नीरूचं आयुष्य वाहातं राहावं यासाठी आईने मृत्युपत्रात राहातं घर अप्पीच्या नावे करणं व त्यायोगे संरक्षक गढीच्या बाहेर पडून नीरूने शारीरिक व्यंगाला न जुमानता, बाबा व आजीचा गाण्याचा वारसा दैदीप्यमान करावा यासाठी स्वत:ची शक्ती आजमावणं, अनोळखी प्रदेशात यमुनाआंटी, गुरू ललिताबाई आणि मग शास्त्रीजींशी संगीताच्या वाटेवरच पण गहिरे अनुबंध जुळणं या अशा विवेचनाची लय ‘मध्य लय’ असून विलक्षण परिणामकरक आहे.


कलाकार आणि भ्रमंती यांचं एक वेगळं सख्य असतं. सृजनप्रक्रियेला परिपोषक अशा जागांवर कधी कारणास्तव तर कधी निरुद्देश भटकंती कादंबरीलाही ताजेतवाने करते. महाराष्ट्र, दिल्ली, केदारनाथ, कलकत्ता, बनारस, अमेरिका अशी स्थळे कादंबरीचा भौगोलिक पट विस्तृत करतात. नीरूखेरीज इतरही सर्व व्यक्तिरेखा कमालीच्या स्वाभाविक आहेत. अधूनमधून फ्लॅशबॅक तंत्राचा वापर कथानकाच्या लयीला पूरक असे साहाय्यक बोल पुरवितो. गुरुशिष्य परंपरा, जी शास्त्रीय संगीत जगातली सर्वात वैभवशाली परंपरा आहे, तिचाही अनेक पदरी विस्तार नीरू आणि बाबा, नीरू आणि राजशेखर, राजशेखर आणि देवाशीष, देवाशीष आणि त्यांची आई सरस्वती, नीरू आणि ललिताबाई पाराशर, नीरू आणि शास्त्रीजी, नीरू आणि कस्तुरी यांमधून अनुभवायला मिळतो. श्रुतींच्या प्रवासातले सुरांचे मुक्काम, तसेच नात्यांचे प्रवाह, विहार आणि घडतबिघडत जाणारी समीकरणं चकित न करताही भारून टाकतात.


नीरू आणि महेंद्र यांच्यातलं वयाच्या चाळिशीत उभं राहणारं समंजस परिपक्व भावविश्व कुठल्याही रूढ नात्यामध्ये बंदिस्त न होणं हाही कादंबरीच्या आवाहकतेचा महत्त्वाचा घटक आहे. एकूणच उपदेशाचा अर्विभाव न आणता पोचवलेलं अध्यात्म, तत्त्वज्ञान यांना चिंतनाची डूब आहे. चमकदार, धक्कादायक, उपदेशात्मक, नाटकी घटनांचा अभाव ही कदंबरीतली सुखद गोष्ट आहे.


संगीताचा इतर ललित कलांशी असलेला संबंधही इथे नीरूच्या रेखाचित्रातून, देवळांच्या स्थापत्यशास्त्र वर्णनातून, काव्याच्या विपुलतेतून प्रकर्षाने जाणवतो. कादंबरीत नीरूच्या किंवा इतर व्यक्तिरेखांच्या कामविषयक आस्थांवर विवेचन मात्र अत्यंत त्रोटक वाटते. अप्पीचा नवरा जय याने साधू पाहिलेली त्रासदायक जवळीक किंवा नीरू व राजशेखर यांच्यातले फुलू न शकलेले संबंध व जवळीक यांचं ओझरतं वर्णन हा लेखिकेचा व्यक्तिगत निर्णय म्हणून स्वीकारार्ह असला तरी थोडा अस्वाभाविक वाटतो.


वासना जेव्हा क्षीण होत जाते तेव्हाच तर नाती आकार घेतात, सजतात, टिकतात, अक्षय होतात.
इतक्या प्रदीर्घ सहवासात दोघांमधले हे धागे इतके क्षीण तरी कसे राहिले. काय अडवतं माणसाला, काय थांबवतं आणि काय तोडूनमोडून टाकायला लावतं. हे मानवी नातेसंबंधांबाबतचे विवेचन असो किंवा तिचं अनावृत्त शरीर पाहून तो लुभावला. वेदनेची एक कळ आत कुठेतरी उमटत असतानाच त्याने तिचं अवघं शरीर जणू सचेत केलं. हलका हळुवार अनुनय. तिने स्वत:ला त्याच्या स्वाधीन करून टाकलं, हे दैहिक विवेचन असो किंवा असे पुष्कळ असतात बुद्धीने गाणारे, गाण्यात इमॅजिनेशन हवीच, पण गायचं असतं ते मात्र हृदयानेच. गाणं म्हणजे जिंकणं थोडंच असतं. ते समजणं असतं, अशा कलेच्या बाबतीतल्या  धारणा व्यक्त करणारी वर्णनं, गद्याला काव्यातल्या तरलतेचा स्पर्श करून देतात.


काम, क्रोध, मोह, मदमत्सर या सगळ्यांपासून कटाक्षाने दूर असलेली नीरू, थोडक्यात सर्वगुणसंपन्नतेकडे झुकणारी नीरू, हा चर्चेचा विषय होऊ शकतो. याला अपवाद तुरळक. बाबांच्या पश्चात आईशी मानसिक जवळीक घडतानाच मृत्युपत्रात राहातं घर आईने कल्पना न देता अप्पीच्या नावावर केल्याचा आलेला राग नीरूचे पाय मातीचेच असल्याचं दाखवितो. किंवा पायाचं अधूपण व त्यामुळे आलेली मर्यादा यांचं भान, त्या व्यंगाचा स्वीकार करूनही उराशी बाळगलेलं शल्य, नीरू एक कणखर स्त्री असताना तात्पुरती का होईना पण मानवी रागलोभाने हत होते हे मला जास्त मोहवून टाकतं. अन्यथा नीरू निरस आणि कृत्रिम वाटते.


‘आवर्तन’ या पंडित सुरेश तळवळकरांनी लिहिलेल्या पुस्तकात सृजनप्रक्रियेचे शास्त्र, तंत्र, विद्या, कला असे चार टप्पे विषद केले आहेत. शास्त्र काय करू नये अर्थात निषिद्ध गोष्टी म्हणजेच नियमन शिकवते. तंत्र शरीरक्रियांचे आचरण शिकवतं, तर परंपरेने संक्रमित केलेले ज्ञान म्हणजे विद्या. या तीनही टप्प्यांवर परिश्रमाने हुकमत मिळवता येते मात्र उपलब्ध साधनांची योग्य व्यवस्था लावून जी उपज होते ती कला. मानवी नातेसंबंध आणि सांगतिक पार्श्वभूमी यांची सांगड घालून कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेल्या नीरूचा आणि पर्यायाने एका सकस धारणेचा प्रवास आशाताईंनी उत्कृष्ट साधला आहे. आशय, शब्दसामर्थ्य, घटनांची गुंफण, संगीत व्यवहारांचे आकलन, ध्येयवादी-आदर्शवादी भूमिका, चटकदार संवाद हे सर्व घटक बेतूनही परिणामकारक कलाकृती गवसेलच अशी खात्री न देता साधलेली शब्दमैफल आपला ठसा मुद्रांकित करते हे कादंबरीचं यश वादातीत आहे. ‘मौज’ प्रकाशनातर्फे आलेली आशा बगे यांची ‘मुद्रा’ ही कादंबरी लौकिकार्थाने गाते गळे नसलेल्यांनाही स्वरांच्या वर्षावात न्हाऊ घालेल असा मला विश्वास वाटतो.


- सारंगी आंबेकर, मुंबई
saarangee2976@yahoo.co.in 

बातम्या आणखी आहेत...