Home | Magazine | Rasik | Sarfraz Ahmed write Based on the historical records of Babar

बाबर कोण होता?

सरफराज अहमद | Update - May 13, 2018, 02:00 AM IST

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचा गेल्या चार वर्षांचा कार्यकाळ निवडणुकांचाच काळ ठरला.

 • Sarfraz Ahmed write Based on the historical records of Babar

  नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचा गेल्या चार वर्षांचा कार्यकाळ निवडणुकांचाच काळ ठरला. या काळात विधानसभा निवडणुका नजरेपुढे ठेवून हिंदू-मुस्लिम, पाकिस्तान, टिपू सुलतान हे विषय सातत्याने चर्चेला आणले गेले.रामजन्मभूमीचा मुद्दा यात सर्वात कळीचा ठरत आला. नुकतीच पार पडलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूकही त्याला अपवाद नव्हती. मात्र, ज्याच्या नावे मशीद बांधली गेली, तो बाबर नेमका कोण होता, हेच कोणी धडपणे सांगितले नाही. कोणी समजूनही घेतले नाही. अशा वेळी ज्याचे नाव घेऊन जातीयवादी राजकारण रेटले जात आहे, त्या बाबरचा ऐतिहासिक नोंदींच्या आधारे घेतलेला हा वेध...

  चँग इज कहन हा मंगोलचा पराक्रमी पुरुष. पुढे या चँग इज कहनचे अपभ्रंशाने चंगेज खान हे नाव इतिहासात प्रचलित झाले. विशेष म्हणजे हा चँग इज कहन मुसलमान नव्हता. उलट मुलसमानांचे सर्वाधिक नुकसान याच चँग इज कहनने केले. मुसलमानांची कित्येक शहरे याने बेचिराख केली. गावे उठवली. माणसे कापली. बाबरची आई याच्या वंशाची. त्यामुळे बाबर तिला अर्धचगताई तुर्क म्हणायचा आणि स्वतःला मात्र तुर्क म्हणवून घ्यायचा. बाबरच्या दुर्दैवाने भारतीय इतिहासात मोगल म्हणूनच तो ओळखला गेला. आणि मोगलशाहीचा संस्थापक ठरला.


  बाबर स्वतःला तुर्क1 समजणारा योद्धा. इतिहासाने त्याला मोगलशाहीचा संस्थापक ठरवले. लोदी सत्तेचा पराभव करुन इतिहासाला कलाटणी देणारा किंबहुना इतिहास घडवणारा इतिहासपुरुष देखील हाच बाबर. त्याच्याविषयीचा इतिहास लिहिताना अनेकांनी त्याला राजकारणापुरते बंदिस्त करुन टाकले आहे. बाबर जसा राज्यकर्ता होता तसा तो हळव्या मनाचा कवी होता. जसा तो कवी होता, तसा तत्वचिंतक होता. त्याच्या चिंतनाची फलश्रुती म्हणजे त्याने सुफीवादावर लिहलेली मसनवी. पण हा बाबर इतिहासातल्या काही घटना आणि बाबरनाम्याच्या पलिकडे स्मरला जात नाही. बाबरने राजकारण केले. त्याने आक्रमणं केली. सत्ता गाजवली. पण त्याने स्वतःमधल्या माणसाला पावलोपावली उन्नत केले. त्याचा वसिअतनामा हि त्याची साक्ष मानता येईल. बाबर जसा होता तसा कधी मांडला गेला नाही. बाबर जसा हवा तसा मात्र मांडला गेला. इतिहासाची विटंबना करण्याची परंपरा वृद्धींगत होत राहिली, आणि बाबर विकृतीच्या ढिगाऱ्यात गाडला गेला. बाबर संपला नाही. आणि संपणारही नाही पण बाबराविषयीची चर्चा मात्र अभिनिवेषांच्या सिमेत बंदीतस्त झाली. आणि इथे बाबराचा इतिहास खुंटीत झाला. इथे बाबराच्या राजकीय इतिहासाची चर्चा आपल्याला देखील करायची नाही. आपल्याला जो बाबर शोधायचा आहे. तो एका तुर्क सेनापतीने त्याच्यात जपलेला विद्वान आहे. सुफीवादाच्या तात्वीक बैठकीवर चर्चा करणारा मर्मज्ञ साहित्यीक शोधायचा आहे. बाबर हा मुळी राज्यकर्ता नव्हता. त्याला परिस्थितीने राज्यकर्ता बनवले. तो मुळचा अभ्यासू, निसर्गाची निरीक्षणे टिपणारा, निसर्गातले एखादे तत्व शोधून त्यामागील सूत्र मांडणारा, साध्या - साध्या गोष्टींवर हळहळणारा, नेहमी सर्जनाची साक्ष देणारा सर्जक होता. अशा या बाबराच्या साहित्यावर, काव्यावर आणि त्याच्या चिंतनावर आपण चर्चा करणार आहोत.

  बाबराचे साहित्य
  प्रख्यात इतिहाससंशोधक आणि आधुनिक काळातील बाबराचे चरित्रकार राधेश्याम यांनी बाबराच्या साहित्या वर चर्चा केली आहे. ते लिहितात, ‘त्याने जवळपास ११६ गजल, ८ मसनवी, १०४ रुबाई, ५२ मुआम्स, ८ कोते, १५ तुयुग तथा २९ सीरी मुसुन्न ची तुर्की भाषेत रचना केली. याव्यतिरिक्त फारसी भाषेत त्याने गजल, किता तथा १८ रुबायांची रचना केली आहे.’ याव्यतिरिक्त त्याने फारसी भाषेमध्ये एक दिवानदेखील लिहले आहे. बाबरचे साहित्य आणि काव्यावर अनेकांनी लिखाण केले आहे. मध्ययुगीन फारसी साहित्याचे अधिकारीक अभ्यासक सय्यद अतहर अब्बास रिजवी यांनी बाबरच्या साहित्यिक रचनांची माहिती विस्ताराने दिली आहे, ते लिहितात, ‘दिवान आणि बाबारनाम्याच्या अतिरिक्त त्याची त्याची एक अन्य महत्त्वपूर्ण रचना ‘मुबीन’ आहे. ज्याला त्याने ९२८ हिजरी (१५२२-२३) मध्ये पूर्ण केले. हे तुर्की पद्य आहे. जे फिकह (इस्लामी धर्मशास्त्र) च्या संदर्भात आहे. मीर अला उद्दौला ने ‘नफायसुल मुआसीर मध्ये लिहले आहे. ‘त्यांनी (बाबरने) फिकहच्या विषयावर ‘मुबीन’ नावाच्या पुस्तकाची रचना केली आहे. यामध्ये इमामे आजम यांच्या सिद्धांतावर पद्यरचना केलेली आहे. कुरोह तथा मैलाच्या हिशोबासंदर्भात त्याने बाबरनामामध्ये ‘मुबीन’चा संदर्भ दिला आहे. शैख जैन यांनी यावर टिका देखील लिहली आहे. ब्रेजीन ने क्रेस्टोमयी टरके नावाच्या रचनेत याचा खूप मोठा भाग १८५७ मध्ये प्रकाशित केला आहे.’


  ऑगस्ट १५२७ मध्ये बाबरने अरुज (कवितांच्या सिद्धांताचे ज्ञान) संदर्भात एका पुस्तकाची रचना केली. १५२८मध्ये त्याने ख्वाजा उबैदुल्लाह एहरार यांच्या वालिदिया नावाच्या पुस्तकाच्या पद्य रचनेला प्रारंभ केले. बेवरीज यांनी त्याच्या बाबरनामाचे भाषांतर केले आहे. त्या म्हणतात, ‘बाबरची आत्मकथा एक अनमोल ग्रंथ आहे. ज्याची तुलना संत ऑगस्टाईन, रुसोचे स्वीकृती पत्र तथा गिब्बन आणि न्युटनच्या आत्मकथांशी केली जाऊ शकते. आशियाच्या साहित्यात (ही रचना) अप्रतिम आहे.’ डेनिसन रास यांनी देखील बाबरच्या बाबरनाम्याला साहित्याच्या इतिहासातील रोमांचक आणि अप्रतिम कलाकृती मानले आहे. बाबरच्या साहित्यात त्याच्या फारसी भाषेत लिहिलेल्या सुफीवादावरील मसनवीला विशेष महत्त्व आहे. पण दुर्दैवाने सुफीवादावरील या ग्रंथाचे अनुवाद अद्याप होऊ शकले नाही.


  बाबर हा बहुभाषी विद्वान होता. त्याने त्याच्या एकाच ग्रंथात अनेक भाषेतील शब्दांचा वापर केला आहे. बाबरने आयुष्यात एका ठिकाणी दोन वर्षापेक्षा आधिक काळ ईद साजरी केली नाही. तो सतत प्रवासात राहिला. तो जिथे गेला, तिथल्या भाषेचे त्याने रसग्रहण केले. त्यामुळे त्याच्या ग्रंथात मध्ययुगीन जगातील अनेक भाषांचा परिचय होतो. हैरात शहरातल्या साहित्यिकांना पाहून त्याच्या प्रेमात पडला. त्याने आपल्या आत्मवृत्तात हैरात ‘बुद्धिजीवींची’ नगरी म्हणून गौरवले आहे. बाबर सतत प्रवासात आणि मोहिमांत राहिल्याने त्याला लिखाणाला खूप कमी वेळ मिळत असे. तरीही त्याने आपल्यातला लेखक जपला. थोडीशी उसंत मिळाली, तेव्हा अथवा रात्रीच्या वेळी तो लिखाणाला बसत असे. परिस्थिती कितीही विपरीत असली, त्याने लिखाणात कधी खंड पडू दिला नाही. तो सातत्याने वाचत राहिला, लिहित राहिला. ग्रंथ जमवणे व ते सोबत बाळगणे त्याला आवडत असे. मोहिमावर असताना नैसर्गिक संकटात त्याने जमवलेले अनेक ग्रंथ गहाळही झाले. त्यामूळे तो खूप व्यथित झाल्याचे, त्याने स्वतः बाबरनाम्यात लिहून ठेवले आहे.

  भाषा आणि लिपीच्या निर्मितीत योगदान
  आयुष्यभर बाबर देशोदेशी भटकत राहिला. स्वतःची बौद्धिक भूक भागवण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. जितके त्याने राजकारण केले, तितकेच किंबहुना त्याहून आधिक त्याने साहित्याची सेवा केली. सय्यद अतहर अब्बास रिजवी ‘बाबरनाम्या’च्या प्रस्तावनेत बाबराने नव्या लिपीचा अविष्कार केल्याचा संदर्भ दिला आहे. ते लिहितात, ‘९१० हिजरी मध्ये ‘बाबरी’ नामक एका लिपीची निर्मिती देखील केली होती. निजामुद्दीन अहमदने लिहिले आहे की, बाबरने या लिपीत कुरआन लिहून भेटस्वरुप मक्का येथे पाठवले होते. नफायसुल मुआसीर मध्ये लिहले आहे की, मीर अब्दुल हुई मशहदीच्या शिवाय कोणालाही या लिपीचे ज्ञान नव्हते. मात्र मीर्जा अजीज कोका यांचे मत आहे की, मीर अब्दुल हई चे बाबरी लिपी चे ज्ञान अत्यंत साधारण होते. मुल्ला अब्दुल कादर बदायुनीने देखील मीर्जा अजीज कोका च्या मताचे समर्थन केले आहे.’ बाबरने ज्या पद्धतीने नव्या लिपीच निर्माण केले आहे. त्यापद्धतीने उर्दु भाषेच्या निर्मितीची बीजं ही साहित्याच्या प्रांगणात पेरली आहेत. त्याने फारसी भाषेमध्ये काव्यरचना करत असताना आग्र्याच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या ब्रिज किंवा हिंदवी भाषेतील शब्द फारसी भाषेत वापरले आहेत. फारसी लिपीत भारतीय शब्द वापरण्याची पद्धत रुढ करण्यात कुली कुत्बशहा पाठोपाठ बाबराचे योगदान महत्त्वाचे आहे. कुली कुत्बशहाने इसवी सन १५१२ मध्ये कुत्बशाहीची स्थापना केल्यानंतर साहित्यनिर्मिती सुरु केली. त्यामानाने कुली कुत्बशहा बाबरचा पूर्वसूरी आहे. त्याच्या नंतर बाबरने तसाच प्रयोग फारसी लिपीत केला आहे. त्यामूळे उर्दुच्या निर्मितीत बाबरचे योगदान देखील महत्त्वाचे मानायला हरकत नाही. पण यासंदर्भात सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.


  बाबर स्वतःचे भाषाप्रभुत्त्व वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील होता. एकाच पुस्तकात त्याने अरबी, तुर्की, फारसी भाषेचे शब्द वापरले आहेत. शब्द वापरताना त्याने कुठेही शब्दावडंबर माजवण्याचा प्रयत्न केला नाही. जिथे गरज आहे किंवा जो शब्द जिथे वापरणे सांयुक्तिक असेल तिथेच त्याने त्या शब्दांचा वापर केला आहे. बाबरनाम्याच्या शैलीसंदर्भात अनेकांनी लिखाण केले आहे. बाबरनाम्याच्या शैलीने अनेकांना मोहीनी घातली आहे. बाबर हा बहुभाषाप्रभू होता हे डेनिसन रास पासून बेवरीज पर्यंत सर्वांनीच मान्य केले आहे.

  बाबरची निरिक्षणे
  बाबरनामा निरीक्षणशास्त्राचे एक उत्तम अभ्यास ग्रंथ सिद्ध होउ शकते. बाबर एका प्रवाश्याप्रमाणे भटकत राहिल्याने, त्याला अनेक प्रदेशातील नव नव्या गोष्टींची माहिती मिळत गेली. मध्ययुगीन भारतात भूगर्भातील पाणीसाठ्याचा वापर शेतीसाठी कशापद्धतीने केला जायचा याची माहीती देखील त्याच्या ग्रंथातून उपलब्ध होऊ शकते. विहरीवर रहाट बसवून त्याद्वारे पाणी काढण्याची प्रक्रिया त्याने कित्येकवेळा पाणी काढायला लावून समजून घेतली. एखादा पक्षी त्याचा समोरून गेला की, तो तातडीने त्याची माहिती घ्यायचा. एखादे वृक्ष त्याला आवडले की, त्या वृक्षाचे निरिक्षण करुन त्याची माहिती नोंदवून काढायचा. कुठे बाजारात गेला की तेथे देखील त्याने हीच पद्धत अवलंबली. साध्या विक्रेत्याच्या तोलन मापनाच्या पद्धतीवर देखील त्याने लिखाण केले आहे. सामान्य माणसाच्या जीवनाची निरिक्षणे देखील बाबरनाम्यात त्याने टिपली आहेत. बाबरनामा निरिक्षणावर आणि चिंतनावर आधारीत असल्याचे त्याचे वाचन करताना सातत्याने जाणवत राहते. ज्या प्रदेशात तो गेला त्या प्रदेशाच्या नावापासून भाषेपर्यंत, लोकजीवनापासून परंपरेपर्यंत, धर्मापासून चालीरीतींपर्यंत माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. कश्मीरचे नाव कश्मीर का पडले किंवा काबूल हा साहित्याचा प्रदेश आहे, की तलवारीचा ह्यावर त्याने मोठी चर्चा केली आहे. एखादा विषय त्याच्या समोर सादर करण्यात आला की, त्याची खोलात माहिती घेतल्याशिवाय त्याचे कुतुहल शमत नव्हते. गजनीच्या प्रदेशात असणाऱ्या एका ओढ्याविषयी देखील त्याने कित्येक दिवस माहिती घेतली. त्याच्या काही दंतकथांचा उल्लेख देखील त्याने आपल्या ग्रंथात केला आहे. बाबर हे जाणून होता की, निसर्गाने प्रत्येक ठिकाणी काही तरी वैशिष्ट्ये निर्माण केली आहेत. त्या वैशिष्ट्यांच्या शोधात तो नेहमी असायचा. त्याची माहिती घेत राहायचा. भारताविषयी अथवा भारतीय समाजाविषयी देखील त्याने अशा पद्धतीनेच लिखाण केले आहे.

  बाबरची भारताविषयीची मते
  बाबरने प्रत्येक प्रदेशाविषयी त्याच्या बाबरनामामध्ये लिखाण केले आहे. भारताविषयी त्याने व्यक्त केलेली मते, काही प्रमाणात स्वीकारता येत नाहीत. मात्र त्यामध्ये द्वेषाचा अंश नाही. किंवा स्वतःच्या मातृभूमीच्या तुलनेतला तिटकारा नाही. निरीक्षण टिपण्यात बाबर निरपेक्ष होता. टिपलेल्या निरिक्षणांवर त्याने कधी अभिनिवेष लादले नाहीत. भारतात जे काही दिसलं ते जसं च्या तसं त्याने आपल्या आत्मवृत्तात मांडलं. त्यातील सौंदर्यस्थळे त्याने दाखवून दिली. बाबर मर्मग्राही चिंतक होता. त्याच्या चिंतनात निसर्ग हा मुख्य घटक आहे. मानवी समाजाच्या विविध रुपांचे अनेक पडसाद त्याच्या समग्र लिखाणात सातत्याने जाणवत राहतात. भारताविषयी देखील त्याच्या निरिक्षणात अशा अनेक गोष्टींचा भरणा आहे. भारताच्या समग्र वर्णनात तो म्हणतो, ‘हिन्दुस्तान मोठा विस्तृत प्रदेश आहे. मनुष्य आणि सर्जनाने हा प्रदेश परिपूर्ण आहे. हिंदुस्तान पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या इकलिमांमध्ये (ऋतुंमध्ये) मध्ये स्थित आहे. याचा कोणताच प्रदेश चौथ्या इकलिममध्ये स्थित नाही. हा खूप आश्चर्यजनक देश आहे, जर आपण याची आपल्या देशाशी तुलना केली, तर तो एका वेगळ्या विश्वासमान भासू लागतो. येथील पर्वत नद्या, जंगल, नगर, शेती, पशु आणि वर्षा तथा हवा सर्व भिन्न आहेत. काबुलच्या जवळच्या स्थानातील गरम सीर ( गरम भूभाग) च्या काही गोष्टी हिंदुस्थानशी मिळत्या जुळत्या आहेत. मात्र सिंधु नदी पार केल्यानंतर सर्व गोष्टी हिंदुस्थान सारख्या दिसू लागतात, भूमी, जल, वृक्ष, टेकड्या, मानवी समूह, आचार विचार आणि प्रथा’ भारतातल्या मानवी समाजाविषयी बाबरने त्यांच्या व्यावसायिक परंपरावर केलेले भाष्य महत्त्वपूर्ण आहे. इथले लोक वर्षानुवर्षे परंपरेने हे काम करत असतात, असे बाबर म्हणतो. त्याचे हे निरिक्षण अल्‌ बेरुनीच्या जातसंस्थेवरील भाष्याशी साम्य पावणारे आहे. भारतीय समाजाच्या विविध घटकांवर देखील बाबरने अशाच पद्धतीने विश्लेषण केले आहे.

  बाबरचे धार्मिक विचार
  बाबर हा वृत्तीने धार्मिक होता. पण विचाराने सहिष्णू होता. बाबरने धार्मिक कारणामुळे मंदिर पाडण्याचा आदेश दिल्याचे एकही उदाहरण नाही. उलट त्याने वसिहत नाम्यामध्ये हुमायुंला सहिष्णू धार्मिक दृष्टीचा अंगिकार करण्याची सूचना केली होती. बाबर सुफींच्या प्रभावात आला होता. त्याने अनेक सुफींच्या कबरींची जियारत केली. मीर सैय्यद अली हमदानी, ख्वाजा खाविन्द सईद, शेख निजामुद्दीन औलीया यांच्या दर्गाहला त्याने भेटी दिल्या होत्या. सुफीवादामुळे उदारता हा त्याचा स्वभावधर्म बनत गेला होता. ज्यापद्धतीने मुस्लीम सुफी संताच्या कार्यात त्याला रुची होती, त्याचपद्धतीने अनेक हिंदू योगींची देखील त्याने माहिती घेतली होती. इस्लामी फिकहवरील त्याची चर्चा देखील धर्ममूल्यांशी निष्ठा सांगणारी होती. तर सुफीवादावरील भाष्य त्याच्या सहिष्णू धार्मिक प्रवृत्तीचे पडसाद होते. प्रख्यात इतिहाससंशोधक राधेश्यामदेखील बाबर सुन्नी विचारांचा आणि हनफी पंथी असला तरी त्याने राजकारणात धर्मांधतेचे प्रदर्शन टाळले असल्याचे मत मांडतात. धर्माचा प्रभाव राजकारणावर त्याने निर्माण होऊ दिला नाहीत.


  बाबरनामामध्ये त्याने ईश्वराविषयी श्रद्धा व्यक्त करताना लिहिलेल्या दोन वाक्यांचा दाखला अनेक इतिहासकार देतात. त्यामध्ये बाबर म्हणतो, ‘हे ईश्वरा आम्ही आत्म्याच्या प्रती खूप अत्याचार केले आहेत. जर तू आम्हाला क्षमा केली नाही, तर आम्ही नि:संशय त्या लोकांत सामाविष्ट होऊ जे नष्ट होणार आहेत.’ आणि ‘जर सर्व जगातील तलवारी एकत्र आल्यातरी त्या एक नस देखील कापू शकत नाहीत, ईश्वराची इच्छा नसेल तर’ बाबरचे हे विचार असीम ईश्वरभक्तीचा नमुना आहेत. बाबरने भारताविषयीची निरिक्षणे देखील हळवेपणाने नोंदवली आहेत. धार्मिक भेदामुळे टीका करण्याचे त्याने टाळले आहे. बाबरचे धार्मिक विचार बाबरनाम्यात अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. काही ठिकाणी त्याने केलेल्या लिखाणातून अप्रत्यक्ष सहिष्णू मूल्य व्यक्त होत राहतात. विसहतनामा सोडला तर अन्य ठिकाणी त्याने धार्मिक धोरणावरील थेट भाष्य केलेले आढळत नाहीत. मात्र वसिहतनामाचे आकलन केल्यास बाबरच्या समग्र धार्मिक धोरणाचा परिचय होऊ शकतो.


  बाबराने जीवनाच्या अनेक पैलूंवर भाष्य केले. तो एक उत्तम निरिक्षक होता. निरिक्षणातून कळलेल्या अनेक बाबी त्याने चिंतनाच्या आणि तर्काच्या माध्यमातून उलगडून दाखवल्या. बाबर राज्यकर्ता असल्याने राजकारणाविषयी त्याने काय लिहले असावे हा अनेकांच्या कुतुहलाचा विषय आहे. हुमायुंला दिलेल्या वसीहतनाम्यावरुन त्याची राजकीय दृष्टी कळण्यास आपल्याला मदत होते. हुमायुं दिल्लीला गेल्यानंतर त्याने खजिना ताब्यात घेउन तो उघडला हि बाब बाबरला योग्य वाटली नाही. खरमरीत पत्र लिहून बाबरने त्याचा समाचार घेतला. त्याला राजकारणसंहिता सांगितली. बाबर जसा राजकारणी तसा सेनापती होता. बापाचे राज्य मिळवण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर तो अफगाण, सिध आणि कालांतराने भारतात आला. त्याने अनेक युद्धे लढली. तुर्क वंशीय असल्याने त्याला युद्धशास्त्रातले अनेक बारकावे माहित होते. त्यामूळेच तो भारतीयांची या बाबतीत निंदा करायचा. बारनाम्यात तो लिहतो, ‘जरी हिंदुस्थानचे लोक तलवार चालवण्यात दक्ष असतील. पंरतू अनेक लोक सेनेचे संचलन आणि आक्रमणाच्या कारवायांपासून अनभिज्ञ आहेत. त्यांना सैन्याला आदेश देण्याच्या संबंधात कोणतेच ज्ञान नाही.’ बाबर पुढे बाबरनाम्यात अनेक ठिकाणी युद्धाचे शास्त्र सांगतो. त्याने काही विषयांवर एकाच ठिकाणी विस्ताराने लिहले आहे. मात्र युद्धशास्त्राच्या संदर्भात त्याचे लिखाण संबंध बाबरनाम्यात विखुरले गेले आहे. अफगाणच्या डोंगरातील युद्ध लढण्याच्या पद्धतीविषयी देखील त्याने काही नोंदी करुन ठेवल्या आहेत. बर्फाळ प्रदेशातून मार्ग काढताना शत्रूचे आक्रमण कसे परतून लावायचे याविषयी त्याने दिलेली माहिती इतिहासाच्या इतर साधनांपेक्षा भिन्न आहे. लोदीवंशाला पानिपतात पराभूत केल्यानंतर बाबरने काही निरिक्षणे त्याच्या ग्रंथात नोंदवली आहे. तीदेखील त्याच्या युद्धशास्त्राविषयीचे विचार समजून घेण्यास सहाय्यभूत ठरतात.


  संदर्भ-
  * प्राचार्य एम. उस्मान, तुर्क, एशिया - युरोप - अफ्रिका, पृष्ठ क्र. २१८, सन २०११ नवी दिल्ली.
  * राधेश्याम , बाबर, पृष्ठ क्र. ४७०-४७१
  * बाबर, दिवाने बाबरी, रामपूरच्या रजा लायब्ररीने मुळ दिवान फारसी भाषेत हस्तलिखित प्रतींच्या फोटोकॉपीस प्रकाशीत केले आहे.
  * रिजवी सय्यद अतहर अब्बास, मुगलकाली भारत (बाबर), पृष्ठ क्र. ३७, ३८ सन १९६०, नवी दिल्ली
  * बेवरीज, एच. कलकत्ता रिव्ह्यु, सन १८९७
  * बूल्जे ह, वेग, द केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया ( संपादित) भाग - ४, पृष्ठ क्र.४
  * सय्यद अतहर अब्बास रिजवी पुर्वोक्त पृष्ठ क्र. ३८
  * तत्रैव पृष्ठ क्र. १६४-१६९
  * राधेश्याम पुर्वोक्त, पृष्ठ क्र. ४५९-६०

  - सरफराज अहमद

  sarfraj.ars@gmail.com

 • Sarfraz Ahmed write Based on the historical records of Babar

Trending