आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shashank Kulkarni Write About Problems Of Public Service Commission Examinations

लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींच्या समस्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हल्ली सध्या whatsapp आणि facebook वर एक विनोद फोरवर्ड होतोय की ‘एक वेळ माणसाने लोकसभेची तयारी करावी पण MPSCची करू नये, ६९ जागांसाठी पाच लाख उमेदवार.’मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची जाहिरात पहिली तेव्हा खरंच अतिशय निराश आणि वाईट वाटलं की, जागेची पूर्तता असूनही आयोग का विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी घालण्याचे काम करतंय. हा खूप मोठा अन्याय आम्हा विद्यार्थ्यांवर झालेला आहे. आज राज्यात आणि केंद्रात असंख्य रिक्त जागा आहेत, तरीही जागा का निघत नसतील, का पोस्टिंग होत नसतील, असा प्रश्न पडला. सरकारचे धोरण हेच आहे का, की मुलांनी नुसती तयारीच करावी. जागा जर निघणार नसतील तर मुलांनी अभ्यास करून काय करायचे? हो, त्याचा एक फायदा होतो, बरेच विद्यार्थी आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी क्लास टाकून देत आहेत, पण बहुतांश मुलांची परिस्थिती वेगळी आहे.


गरीब विद्यार्थ्यांसाठी ही खूप अत्यंत वाईट स्थिती निर्माण होत आहे. कित्येक गरीब पालकांना असं वाटतं की, आपल्या मुलाला सरकारी नोकरी लागावी. कित्येक मायबाप तर शेती विकून मुलाला पुण्यात वा मोठ्या शहरात पाठवतात, mpscची तयारी करण्यासाठी. पण सरकार त्या मुलांच्या स्वप्नांवर घाला घालण्याचे काम करत आहे. एक तर या संपूर्ण प्रवासात विद्यार्थ्यांना सातत्य ठेवणं हे खूप अवघड काम आहे. सोबतच्या मित्रमैत्रिणींना नोकरी लागते आणि आपण मात्र अजूनही अभ्यास करतोय, असं वाटत राहातं. त्यात वाढती महागाई, आणि वाढणारे वय आणि त्यामुळे लांबणीवर पडत चाललेलं लग्न.


यात दोष आयोगाचा बिलकुल नाही, यात दोष आहे तो सरकारचा. सरकार २०१९च्या निवडणुका समोर ठेवून त्या वर्षी जागा भरतील, हे अगदी बरोबर आहे. पण सध्या बेरोजगार तरुणांची संख्या वाढतेय, त्याचं काय?


आणि त्यात नवीन करप्रणालीमध्ये केलेला बदल म्हणजे वस्तू आणि सेवा कर GST. विविध स्पर्धा परीक्षांवर पूर्वी एवढा कर आकरण्यात येत नसे. पण आता चक्क 12% gst. कसं परवडणार आम्हा मुलांना? पूर्वी जर ३०० रुपये लिपिक पदासाठी शुल्क आकारण्यात येत होते तर त्यावर कर ४०-५० रुपये लागे. मात्र आत तर चक्क ५०० रुपये झालेत. जी मुलं आज पुण्यात राहून अभ्यास करत आहेत त्यांची खूप मोठ्या प्रमाणात तारांबळ होत आहे. पुण्यात राहण्यासाठी किमान १५०० भाडे, अभ्यासिका १००० रुपये, खानावळ २००० रुपये. म्हणजे साधारण महिन्याकाठी ५००० रुपये खर्च येतो आणि त्या gst मुळे होणारे बेहाल.


एक विद्यार्थी या नात्याने सरकारला हात जोडून विनंती आहे, वाटाण्याच्या अक्षदा दाखवून आम्हा मुलांचे खच्चीकरण करू नका. जर हा युवक एक झाला तर निश्चितच २०१९साठी दुसरा पर्याय निवडू शकतो. सगळ्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की, मोदी आणि फडणवीस सरकार पूर्वीच्या सरकारपेक्षा चांगले असेल पण प्रत्यक्षात ‘फडणवीस’ सरकार मुलांची ‘फसवणूक’ करतंय.


- शशांक कुलकर्णी, जालना
shashankk796@gmail.com