Home | Magazine | Rasik | shekhar deshmukh writes about violence and party workers

कार्यकर्ता नावाचे दिशाहिन अस्र

शेखर देशमुख | Update - Jul 29, 2018, 09:37 AM IST

स्वत:ला जाळून घेणे, विष पिऊन वा नदीपात्रात उडी घेऊन जीव देणे हा देखील कार्यकर्त्यांकडून अवलंबला जाणारा हिंसेचाच प्रकार

 • shekhar deshmukh writes about violence and party workers
  राजकीय-सामाजिक बदलाचे खरेखुरे शिलेदार (चेंज एजंट) बिनचेहऱ्याचे कार्यकर्ते असतात. मात्र बदलत्या अस्मिताकेंद्री राजकारणात त्यांना एक चिंताजनक चेहरा देण्याचा प्रयत्न होतो आहे. हा चेहरा जसा अहिंसक आहे, तसाच तो हिंसक आणि आत्महत्याप्रवणही आहे. एक कार्यकर्ता कुणाच्या तरी आदेशावरून झुंडीत शिरून हिंसक होतो, अन्याय सहन न झाल्याने एक कार्यकर्ता विष पिऊन वा नदीत उडी घेऊन स्वत:चा जीव देतो. हे राजकारण आणि समाजाच्या पातळीवर विचार करता कशाचे लक्षण आहे? हा कशा-कशाचा प्रभाव -दुष्प्रभाव आहे? कार्यकर्त्यांचे मोहोळ असलेल्या महाराष्ट्राची ही कोणती नवी ओळख आहे?

  एका छायाचित्रात पाठमोरा आंदोलनकर्ता बसवर दगड फेकताना दिसतोय. दुसऱ्या छायाचित्रात हेल्मेटधारी पोलीस बंदुकीच्या फैरी झाडताना दिसताहेत. तिसऱ्या छायाचित्रात धुराचे लोट उठलेत, उपड्या पाडलेल्या गाड्या जळताहेत, चौथ्या छायाचित्रात आंदोलनकर्ते दगडफेक करताहेत... कोण आहेत हे, समाजकंटक की कार्यकर्ते? महाराष्ट्राचा आजवरचा लौकिक सांगतो, ते परिवर्तनवादाची कास धरलेले कार्यकर्ते असूच शकत नाहीत...

  शिस्तबद्धता, सामंजस्य आणि सबुरी या तीन गुणवैशिष्ट्यांमुळे कौतुकास पात्र ठरत अालेल्या मराठा क्रांती मोर्चावर नाहक बदनामीचा डाग लागला. दगडफेक करणारे आंदोलनकर्ते , गाड्या जाळणारे फोडणारे आंदोलनकर्ते, पोलिसांना पिटाळून लावणारे आंदोलनकर्ते ही सारी दृश्ये आता सवयीची झाली असली, तरीही महाराष्ट्राच्या संदर्भात शांतताप्रिय समाजाला ती सून्न करणारी होती. आंदोलनाच्या घटना महाराष्ट्रातल्या नव्हे, काश्मिरमधल्या भासाव्यात अशी अशी होती. हिंसा हा मराठा आंदोलनाचा उद्देश नक्कीच नसणार, तो यापूर्वीही नव्हता. परंतु, आंदोलनकर्ते नेते आणि सत्ताधारी यांच्यातला विसंवाद आणि तणाव वाढला तसे, आंदोलन आक्रमक होत गेले. पण आक्रमक आंदोलनाची एकच दिशा निश्चित असते आणि ती बहुतांश वेळा चुकलेली असते. तसंच अलीकडच्या टप्प्यातल्या आरक्षणाच्या आग्रही मागणीसाठी पुकारलेल्या आंंदोलनाच्या बाबतीत घडत गेले. आंदोलन दिशाहिन झाल्यासारखे झाले. हिंसेचा अप्रिय चेहरा त्यातून पुढे आला. अर्थात हिंसा करणारे खरेखुरे आंदोलनकर्ते नसणार हे निश्चित. संधी साधून समाजकंटकांनी डाव साधल्याचाही तर्क सुबुद्धांना पटण्यासारखा, परंतु समाजकंटकांनी आंदोलनात शिरकाव करेपर्यंत नेतृत्व कसं गाफिल राहिलं? सच्चा कार्यकर्त्यांनी आपली बदनामी करणाऱ्या घुसखोरांना वेळीच का टोकलं नाही? हे ही तर्काला धरून असलेले प्रश्न आहेत. त्याची उत्तर सरकारपेक्षाही आंदोलनाच्या नेतृत्वाला यापुढच्या काळात द्यावी लागणार आहेत.


  सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी पुकारलेलं आंदोलन न्याय्यच आहे, त्याबाबत अनेकांच्या मनात दुमत नाही. मात्र आता प्रश्न कायद्याचा नव्हे तर घटनादुरुस्तीचा बनला आहे. सत्ताधाऱ्यांची भूमिका इथे महत्त्वाची आहे. त्यांचा प्रतिसाद इथे लाखमोलाचा असणार आहे. हा प्रतिसाद अद्याप सुस्पष्ट नसल्यानेच बहुदा आंदोलनकर्ते नेता आणि कार्यकर्त्याचा संयम सुटला आहे. तो एका पातळीवर जसा समजून घेण्यासारखा आहे. तसाच तो कठोर टीकेसही पात्र आहे, याची जाणीव विशेषत: विद्यमान आंदोलनाच्या नेतृत्वास असणे, हीच पुढारलेल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे.

  प्रश्न कोणताही, समस्या कोणतीही असो सर्वस्व झोकून देऊन आंदोलनात उतरणारे कार्यकर्ते हे नेतृत्वाचे सगळ्यात मोठे भांडवल राहिले आहे. याच प्रामाणिक नि विचारनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर महाराष्ट्राला ‘पुरोगामी’ ही ओळख प्राप्त झालेली आहे. नेतृत्वाने बांधिलकी जपणाऱ्या या कार्यकर्त्यांचा जीवापाड सांभाळ करणे अपेक्षित आहे. या कार्यकर्त्यांमध्ये विघातक नव्हे, विधायक जाणीवा पेरणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या तीन दशकांत नेत्यांच्या सत्ताकांक्षेपायी कार्यकर्ता नावाच्या व्यक्तीचे सार्वजनिक चरित्र आणि चारित्र्य बदलून गेल्याचेही देशाने अनुभवले आहे. १९९० मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या देशबंधू कॉलेजमध्ये शिकणाऱ्या राजीव गोस्वामीने सर्वप्रथम अंगावर रॉकेल टाकून सर्वांसमक्ष स्वत:ला पेटवून घेतले आणि त्यानंतर मंडल आयोगाच्या शिफारशींविरोधात आत्मदहनाचे अनेक प्रयत्न या देशाने अनुभवलेे आहेत. त्या घटनांचा आताच्या वर्तमान राजकीय-सामाजिक स्थितीशी काहीही संबंध नसला तरीही अशाप्रकारच्या घटनांमागचा नेतृत्वाचा असलेला अमर्याद प्रभाव दुर्लक्षण्यासारखा नाही. आतासुद्धा मराठा मोर्चादरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी कायर्कर्त्यांनी असेच टोकाचे पाऊल उचलल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. असे टोकाचे पाऊल उचलणे समस्येची तीव्र झळ बसण्यातून येते हे खरेच पण, कार्यकर्ता नामक व्यक्तीच्या वैयक्तिक अपयशात, नैराश्य आणि हतबलतेतही या आत्मघातकीपणाची मुळं दडली आहेत का, हाही मुद्दा इथे विचारात घेण्यासारखा आहे.

  एरवी, अशी वैयक्तिकदृष्ट्या अस्थिर असलेली बिनचेहऱ्याची कार्यकर्तानामक माणसं सत्तेची महत्त्वाकांक्षा असलेल्या विविध पक्ष-संघटनेतल्या नेतृत्त्वाचे अॅसेट ठरू लागलीय. देव, देश आणि धर्मासाठी प्राण हाती घेऊन चालणाऱ्या संस्कृतीत अाता राजकारणासाठीही प्राण देण्या-घेण्याची तयारी असलेले कार्यकर्ते पुढे येऊ लागले आहेत, हे राजकारणातच धर्म आणि अस्मितेने शिरकाव केल्यानंतरचे वास्तव आहे. याचेच प्रतिबिंब अलीकडच्या काळात महाराष्ट्रात विविध कारणांनी झालेल्या आंदोलनादरम्यान पाहायला मिळाले आहे. यात जसे झुंडीने जाऊन प्राणघातक हल्ला करणारे विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आहेत तसेच स्वत:ला जाळून घेऊन वा विषप्राशन करून आत्महत्या करणारेही कार्यकर्ते आहेत. हत्या आणि आत्महत्या हे आजच्या कार्यकर्त्याचे दोन चेहरे बनले आहेत.
  त्या अर्थाने हे दोन्ही खरे तर हिंसेचेच प्रकार. एक परघाती, दुसरा आत्मघाती. पक्ष-संघटनांच्या पातळीवर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांचा, चिंतन बैठकांचा हाच परिपाक यापुढेही असणार असेल, तर ज्या महाराष्ट्रात समर्पित नि संयमित कार्यकर्त्यांच्या बळावर परिवर्तनाच्या राजकीय सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या, त्या महाराष्ट्राची ही चिंताजनक ओळख आहे.

  आंदोलनात गाड्या फोडणारे, आगी लावणारे, स्वत:ला संपवून टाकणारे कार्यकर्ते समाजकंटक आहेत, असा आताच्या आंदोलनाच्या नेतृत्वाचा विश्वास आहे. या समाजकंटांची जबाबदारी नेतृत्वाला झटकून टाकता येण्यासारखी असली तरीही आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखणे या जबाबदारीपासून त्यांना सुटका नाही. तशी ती मिळूही नये. किंबहुना, जे समाजकंटक असतात, ते हिंसाच पसरवत असतात. पण स्वत:ला जाळून घेणे, विष पिऊन वा नदीपात्रात उडी घेऊन जीव देणे हा देखील कार्यकर्त्यांकडून अवलंबला जाणारा हिंसेचाच प्रकार आहे, हे नेतृत्वाने कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवणे अर्थातच त्यांना त्या कृत्यापासून रोखणे अत्यंत महत्वाचे आहे. हे खरेच की, कोणत्याही प्रश्नावर रस्त्यावर उतरणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आर्थिक - सामाजिक स्तरावर अन्यायाची भावना आहे, त्यांच्या मनात शासन-प्रशासन आणि न्याय व्यवस्थेबाबत चीड आहे. पण दबावाचे राजकारण रेटण्यासाठी अशा ‘व्हल्नरेबल’ कार्यकर्त्यांना हिंसक कारवायांपासून वा आत्मघातापासून न रोखणे हेही एकप्रकारचं नेतृत्वाने केलेलं शोषणच आहे.

  एरवी, एक असतं शस्त्र आणि एक असतं अस्त्र. शस्त्र हे वापरणाऱ्याच्या जवळच राहतं. परंतु, विघातक हे शस्त्र नव्हे त्यातलं अस्त्र हे असतं. म्हणजे, धनुष्याचा बाण हे अस्त्र असतं, बंदुकीची गोळी, तोफेमधला गोळा हे अस्त्र असतं. ते परत येतच नसतं. नष्ट होणं हाच त्याचा गुणधर्म असतो. आजचा कार्यकर्ता हा नेतृत्वाकडून अनेक प्रसंगात असा अस्त्र म्हणून वापरला जातोय का, हा या घडीचा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. अस्त्र होऊन दिशाहिन संपणाऱ्या रस्त्यावरच्या राजकीय कार्यकर्त्यांची महाराष्ट्राला होऊ लागलेली नवी ओळख, नेतृत्वाच्या सोयीची असली तरीही समाज नक्कीच खच्चीकरण करणारी आहे. या पाश्वर्भूमीवर "हिंसक आंदोलनामुळे वातावरण तापले तरीही त्यातून हाती काहीही लागत नाही. आत्मघातकी मार्ग पत्करून ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही' हे प्रा. एन. डी. पाटील, डॉ. जयसिंगराव पवार आदी मराठा समाजाच्या धुरिणांनी केलेले आवाहन लक्षवेधी आहे. सत्तेच्या समीकरणांपलीकडे जाऊन या आवाहनाला कार्यकर्त्यांइतकाच नेतृत्वाचाही प्रतिसाद मिळणं नितांत गरजेचं आहे.


  महात्मा गांधी महाराष्ट्राला कार्यकर्त्याचं मोहोळ मानत. गांधीजींचं विधान सामाजिक अंगाने अधिक होतं, तरीही आज या सामाजिक असो वा राजकीय कार्यकर्त्यांच्या या मोहोळाला धर्म आणि राजकीय सत्तेची धग भाजून काढू लागली आहे. त्यातून येणारी कार्यकर्त्यामधली दिशाहिनता, भावनातिरेकातून घडणारे अपमृत्यु परिवर्तनवादी महाराष्ट्राची मान नक्कीच खाली घालणारे ठरणार आहेत.

  divyamarathirasik@gmail.com

 • shekhar deshmukh writes about violence and party workers
 • shekhar deshmukh writes about violence and party workers
 • shekhar deshmukh writes about violence and party workers
 • shekhar deshmukh writes about violence and party workers

Trending