आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाद्वारे शिक्षणाचा प्रसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल विद्यार्थी सोशल मीडियावर किमान दोन ते तीन तास तरी घालवतात. याकरिता पालक आणि  शिक्षकांच्या नाराजीलाही त्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, किमान त्यातली काही मिनिटं एखाद्या विषयाला धरून शिक्षणात भर घालणारी करता येतील? अभ्यास आणि सोशल मीडियाची जोडणी करून अभ्यासाविषयी एक शिस्त निर्माण करता आली तर...?


घराघरातून ऐकू येणारं एक वाक्य म्हणजे आधी तो फोन बंद कर! 
शाळा, कॉलेज, ऑफिस, आणि घर या सर्व ठिकाणी वापरले जाणारे माध्यम म्हणजे फोन. सोशल मीडियाचा सर्वाधिक वापरसुद्धा स्मार्टफोनद्वारे अधिक आहे. हा फोन बंद कर, फोन बाजूला ठेव असा धोशा सगळेजण लावत असतात. अशा वेळी फोनच्या माध्यमातूनच सोशल मीडियाचा वापर करून आपल्याला काही शिकता येईल, काही नवीन गोष्टी माहीत करून घेता येतील, ही संकल्पनाच मनाला पटणारी नाही. कॉलेजमध्ये सगळ्यांकडे मोबाइल फोन असतो. त्याचा वापर शिकण्याऐवजी वेळ घालवणे (टाइमपास) वा करमणूक याकरता जास्त होतो असे दिसते. म्हणूनच शिकवणे सुरू करण्याआधी शिक्षकांना फोन बंद करून बाजूला ठेवा, ही सूचना करावी लागते. विद्यार्थ्यांना या वाक्याची अर्थातच चीड आहे.


आपण संपर्कात राहण्याची माध्यमं आणि साधनं उपलब्ध करत असू तर त्याचा योग्य वापर करायला शिकवायला हवं. तसेच त्या योग्य वापर करण्यासाठी अनेक संधीसुद्धा उपलब्ध करायला हव्या. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनी समाजमाध्यमांचा वापर शिक्षणासाठी करणे हा त्यातला सुवर्णमध्य आहे.


समजा कॉलेजची वेबसाइट आहे, प्रत्येक शिक्षकाचे एक वेबपेज आहे, त्यावर आपल्या विषयासंबंधित पोस्ट केल्या जातात तसेच सोशल मीडियावरती शिक्षणासंबंधित नियमित पोस्ट करणं गरजेचं आहे. शिक्षकांनी शिक्षणासंबंधीचे विविध रिसोर्सेस तिथे उपलब्ध करून देणे फायद्याचे आहे.


सोशल मीडियावर नियमितपणे विद्यार्थ्यांशी संपर्क करणे हा मार्ग जर शिक्षकांनी अवलंबला तर विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर असताना येणारे नोटिफिकेशन्स त्यांच्या अभ्यासासंबंधी असू शकतील. अभ्यास वा प्रकल्प देण्याची तारीख बदलली आहे, पाठ्यपुस्तकातली तीस ते चाळीस पानं तुम्ही वाचून या, लॅब वर्क द्यायची तारीख उद्या आहे, अशा प्रकारची नोटिफिकेशन्स प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाली तर त्याचा फायदा आहे. शिक्षकांनी वर्गात फक्त शिकवायचं आणि माना डोलवत विद्यार्थ्यांनी तिथे बसायचं, यापेक्षा काही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना वाटून दिला, त्यांना वाचून यायला सांगितलं आणि वर्गात प्रश्न विचारले, अथवा  तेच प्रश्न  सोशल मीडियावर विचारायला सांगितले आणि त्याची उत्तरं विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर दिली, असा एक पर्याय वापरता येऊ शकतो. 


सोशल मीडियावर आपली एक प्रतिमा असावी, असे सर्वांना वाटते. विद्यार्थी त्याला अपवाद नाहीत. म्हणून ते अभ्यासाविषयी पोस्ट्स बघतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. माहीत नव्हते, गैरहजर होतो, विसरलो अशा सबबी यामुळे पुढे करता येणार नाहीत. अभ्यास आणि सोशल मीडियाची जोडणी यामुळे जबाबदारीची जाणीव होऊ शकते आणि पर्यायाने अभ्यासाविषयी एक शिस्त लागण्याची ही एक संधी आहे.


विद्यार्थी सोशल मीडियावर तास-दोन तास, तीन तास घालवणार असतील हे आपण गृहीत धरलं तर किमान त्यातली काही मिनिटं एखाद्या विषयाला धरून शिक्षणात काही तरी भर घालणारी असावी. त्याकरता शिक्षक आणि शिक्षणसंबंधित संस्था याकडून तसे प्रयत्न व्हायला हवेत. जे वेबसाइटवर पोस्ट करतात ते आणि त्याशिवाय अधिक माहिती सोशल मीडियावरही पोस्ट करावी. पाठ्यपुस्तकाबाहेरचं काही माहीत करून घ्यायचं असेल तर हे पर्याय शिक्षकांनी सोशल मीडियाद्वारे, त्यांच्या वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांपुढे नियमितपणे मांडले तर विद्यार्थांना त्याचा फायदाच आहे. जगभरातल्या कोणत्याही विद्यापीठातली अशी खुली माहिती सगळ्यांना उपलब्ध आहे ही या माध्यमाची शक्ती आहे. आपल्या विद्यार्थ्यांना अशा स्रोताची ओळख करून देणे हे सोपे काम आहे. 


शिक्षण संस्था, शिक्षक आणि विद्यार्थांनी संघटित होऊन सोशल मीडियाचा वापर कसा करावा? 
विषयासंबंधी, संस्थेसंबंधी सोशल मीडिया पेज, ग्रुप, कम्युनिटी तयार करणे व नियमितपणे त्याचा वापर करणे.
एखाद्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून नियमित व्याख्याने/ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम करावा. (यूट्यूब, फेसबुक व्हिडिओ, ट्विटर)


विषयवार, मुद्देवार वा प्रसंगानुसार हॅशटॅग तयार करावा, शोधावा आणि वापर करावा. विषयवार माहितीचे स्रोत शोधून त्याचे नियमित संकलन इन्स्टाग्राम, पिंटरेस्ट, टंबलरवर करत राहावे. हे काम शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनी मिळून करावे. अभ्यासाच्या नोट्स वा माहितीकरता तसेच ग्रूप प्रोजेक्टकरता गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, गुगल प्लसचा वापर करावा.


विद्यार्थांचे प्रोफेशनल प्रोफाइल तयार करण्यासाठी लिंक्डइनचा वापर करावा. भावी विद्यार्थांना आकर्षित करणे, माजी विद्यार्थ्यांशी संपर्क कायम करणे या दोन्हीसाठी सोशल मीडिया अतिशय प्रभावी आहे.


- सोनाली जोशी, ह्युस्टन, अमेरिका
sonali.manasi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...