आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गादीखालचा खजिना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्लास्टिक बंदी आवश्यक आहे यात शंकाच नाही. मात्र त्यामुळे प्लास्टिक उत्पादक, कचरा वेचणारे यांचं काय असा प्रश्नही दुसरीकडे उपस्थित होतो. शिवाय ऊठसूट प्रत्येक गोष्टीसाठी प्लास्टिक पिशव्यांना शरण जाणारी आपण सामान्य माणसं... कळतंय, पण वळत नाही या वर्गातली. याच वृत्तीला केंद्रस्थानी ठेवत प्लास्टिक बंदीवर खुसखुशीत पण नेमकं भाष्य करणारा लेख. 
 
आम्हा बायकांचे सिक्रेट खजिने असतात. बालपणी साधारणतः गुंजा, चिंचोके, लाखेच्या खडे जडवलेल्या बांगड्यांचे तुकडे, जरीच्या चिंध्या, पतंग, गोट्या, भोवरे, आवडत्या गोष्टीचे पारायण केल्यामुळे फाटलेले पुस्तक अशा स्वरूपाचे खजिने असतात. भयंकर गुप्त जागी म्हणजे दप्तरात, कपड्यांच्या घडीखाली वगैरे लपवलेले असतात. मग तुमची जन्मजात हितशत्रू, तुमची आई, कधीतरी तुम्ही शाळेत वगैरे गेल्यावर हे सगळं उचलून केरात फेकून देते. नंतर भोकाड पसरून काहीही होत नाही. फक्त रडक्या रम्य आठवणी उरतात. 
 
वय वाढतं. लग्नं होतात. मनातली छोटी अजून खजिने जमवायचे विसरलेली नसते. आता त्यांची जागा वेगळ्या वस्तूंनी घेतलेली असते, इतकंच. लग्नात मिळालेले डबे, तुटक्या फोटोफ्रेमी, मुलांनी प्लेग्रुपमध्ये जिंकलेले पहिले बक्षिस. पण या सगळ्यांचा लसावि काढला तर एक पसंदीदा आयटम कॉमन निघतो. प्लस्टिकच्या पिशव्या! 
 
 
विकत आणलेले कपडे, साड्या यांच्यासोबत मिळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचे पण तितकेच कवतिक असते. ‘साडी तीन लिया है तो पिशवी एकच कैसा? और दो द्येव. हमकू दो नणंद और एक जाऊ को अलग अलग देणेका हय,’ असे फेकून चिकटपणाने वसूल केलेल्या पिशव्या अतिरिक्त आनंद देतात. आहेरासोबत आलेली पिशवी हा उपआहेर मानला जातो. जो दुकानदार पिशवीचे वेगळे पैसे घेतो तो ‘जळ्लं लक्षण मेल्याचं’ असा शिक्का मारून ब्लॅकलिष्टीत टाकला जातो. मग हा सगळा अमोल गुप्त खजिना आम्ही नवीन सिक्रेट जागी ठेवतो. हो, गादीच्या खाली. कुणी मागितल्यास अत्यंत नाईलाजाने, त्यातल्या त्यात जुनी, पातळ, नकोशी पिशवी शोधून दिली जाते. एरवी भूमिगत गुप्त खजिन्यावर जसे एखादा मणिधारक नागराज वारूळ बांधून, त्यावर वेटोळे घालून राखण करत बसतो; तशीच त्या घरची खडूस बाई पिशव्या ठेवलेल्या गादीवर विस्तृत बूड रुतवून आपला हा खजिना खिंड लढवावी तसा प्राणपणाने सांभाळते. आणि हाय रे कर्मा! इतक्या कष्टाने जपलेला ठेवा, हे निर्दय मायबाप सरकारा, त्वा निव्वळ एका हुकूमाने मातीमोल करावास? नोटाबंदीने जसे दाबून ठेवलेले नोटांचे गड्डे रद्दीत जमा झाले तसेच आमच्या या खजिन्याचे झाले की वो. 
 
सकाळी उठून पेपर हाती घेतला तर या दुष्ट बातमीने दिवस वाईट केला. हातात प्लास्टिक पिशवी दिसली की दंड म्हणे. ह्याला काय अर्थय? घरी दळलेले खमंग मेतकूट, पूडचटणी, भाजणी यांचे वानगीदाखलचे नमुने इकडून तिकडे कसे द्यायचे? स्टीलच्या डब्ब्यात द्या सांगायला तुमचं काय जातं हो. डबे एकदा घरातून गेले की थेट भूमिगत तरी होतात किंवा स्वर्गवासी तरी. घर सोडून गेलेला डबा पुनरपि परतून मायदेशी कधीही येत नसतोय, मग दर वेळी आणायचे कुठून नवे डब्बे? तुम्ही देणार का? देणार का पिशवीच्या किमतीत स्टीलचे डबे विकत? नाही नं? मग फुकटचे सल्ले देऊ नका. अहो एक सोय काढून घ्यायची तर त्याआधी त्याला पर्यायी सोय उपलब्ध करायची हे साधे उपाय कळेनात का तुम्हाला?
पिशवी विकत घ्यायला, वापरायला बंदी आहे. मग बनवायला का बंदी नाही? तुम्ही वस्तू बनवू देऊ नका. आम्ही वापरत नाही. अमुक तमुक मापाची चालते म्हणे. तिची ती विवक्षित रुंदी कशी मोजायची म्हणे? इकडे स्वतःच्या मापाला मोजताना पंचाईत. 
 
 
प्लॅस्टिकमुळे होणारे नुकसान, प्रदूषण, हानी या सगळ्यांशी आम्ही सहमत आहोत. त्याबद्दल दुमत असूच शकत नाही. पण रस्त्याने जाणाऱ्याच्या हाती प्लास्टिक पिशवी दिसल्यास तत्क्षणी दंड, हे चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखे आहे. आग रामेश्वरी नि बंब सोमेश्वरी. 
 
आई जेवू घालीना नि बाप.... तसे झाले हे. मधल्या वेळात या गादीखालच्या खजिन्याकडे खालसा झालेल्या संस्थानिकाने आपल्या सुस्थित परंतु निर्मनुष्य राजवाड्याकडे हताश नजरेने पाहावे, तसे  बघत बसले आहे. या खडीसाखरेच्या हिऱ्यांचे करू तरी काय?
 
- सुचरिता, पुणे
ramaa.nadgauda@gmail.com

बातम्या आणखी आहेत...