आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा पाकिस्तान, नवा इम्रान ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे नाव घेतल्याशिवाय विद्यमान सत्ताधारी-समर्थकांचा हल्ली दिवस उजाडत नाही. निवडणूक काळात हा पाकिस्तानद्वेष विशेषत्वाने उफाळून येताना दिसतो. यात एकतर पाकिस्तान आपल्या देशात हस्तक्षेप करत असल्याची हाकाटी पिटली जाते किंवा मुस्लिमांची बाजू समजून घेणाऱ्यांना, मोदी विरोधकांना  पाकिस्तानात निघून जाण्याची धमकी तरी दिली जाते.  खुद्द पंतप्रधानही संधी साधून हा आगीचा खेळ खेळतात. आगामी लोकसभा निवडणुका नजरेपुढे ठेवून हा खेळ पुन्हा एकदा सुरु झालेला असताना तिकडे पाकिस्तानात २५ जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक प्रचारात भारतद्वेष पसरवून मत मागितली जाताहेत का, या निवडणुकीचे महत्वाचे मुद्दे काय आहेत, कोण प्रभावी ठरतंय आणि निकालांचा भारत-पाक संबंधांवर काय परिणाम संभवणार आहेत, याचाच घेतलेला हा वेध...

 

२०१५चा डिसेंबरचा महिना.‘इंडिया टुडे’ नियतकालिकाच्या वार्षिक कार्यक्रमात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तुळातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. त्यात मोठे आकर्षण होते ते पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान याचे. इम्रान खान तसा भारतात वरचेवर येणारा सेलेब्रिटी क्रिकेटर, पण डिसेंबरमध्ये त्याचे भारतात येणे, राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते. कारण, २०१३च्या  सार्वत्रिक निवडणुकीत केवळ ३३ जागा राखलेल्या  या वादग्रस्त आणि वलयांकित इम्रानची भेट ठरली होती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी.


मोदींनी २०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारात पाकिस्तानविरोधातील काँग्रेसच्या बोटचेप्या (?) धोरणाविरोधात देशभर राळ उडवून दिली होती. त्यांच्या भाषणात पाकिस्तानशी मैत्री कशाला, इथपासून सत्ता मिळाल्यास ‘लव लेटर’ची भाषा कायमची बंद केली जाईल, असे ‘मर्दानी’ आश्वासन होते.  इम्रानची भेट होण्याअगोदर काही दिवस परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफ यांना भेटल्या होत्या. दोन्ही देशांदरम्यान सहचर्य, शांतता नांदावी, असे राजकीय पातळीवरचे प्रयत्न होते. अशा आशावादी वातावरणात इम्रान भारतात आला होता. मोदींच्या भेटीत इम्रानने त्यांना म्हटले, दोन्ही देशांदरम्यान शांतता प्रक्रिया पुढे न्यायची असेल, तर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पुन्हा व्हायला काय हरकत आहे? इम्रानच्या या प्रश्नावर मोदींनी फक्त सूचक हास्य प्रकट केले. या हास्यातले दडलेले गूढ अर्थ खुद्ध इम्रानला त्यावेळी सांगता आले नाहीत.

 

आज पाकिस्तानच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, २५ जुलैला पार पडणाऱ्या निवडणुकांचा प्रचार रंगात आला आहे, कट्टरवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला आहे. पण इम्रानच्या भाषणात, जाहीर सभांमध्ये कडवा भारतविरोध अद्याप दिसलेला नाही. वास्तविक आजपर्यंतच्या पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये प्रमुख विरोधीपक्ष काश्मीर प्रश्न वा भारताचा विषय काढून सत्ताधाऱ्यांना जाब विचारत असतं. पण या निवडणुकांत भारताशी चांगले संबंध असावेत अशी भूमिका असणाऱ्या नवाझ शरीफ यांच्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’ पक्षाला कोणताच विरोधक हा जाब विचारताना दिसत नाही. किंबहुना, काश्मीर प्रश्नाचा निवडणूक प्रचारात कुठे उल्लेख होताना दिसत नाही. विषय फक्त भ्रष्टाचार-दहशतवाद मुक्त पाकिस्तानचा आहे. (क्वचित इम्रान व काही विरोधक भ्रष्टाचारातून कमावलेले ५ बिलियन डाॅलर शरीफ यांनी भारतात पाठवले असा आरोप करतात. पण या आरोपावर प्रचंड गदारोळ उडालेला दिसत नाही. ) बंदिवासातले शरीफ व देश पिंजून काढणारा इम्रान असा थेट सामना आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे बिलावल भुत्तो चर्चेतही नाहीत. निवडणुकांच्या वृत्तांकनावरून मीडियावर अनेक बंधने आली आहेत. इम्रानसंबंधित बातम्यांना फक्त जाणीवपूर्वक स्थान दिले जात असल्याचेही दिसते आहे. ‘डॉन’ या निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्या वर्तमानपत्राला व जिओ या वृत्तवाहिनीलाही अलिखित सेन्सॉरशीपचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियात शरीफ यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. पाकिस्तान लष्कर व इम्रान यांच्या संगनमतामुळे ‘नया पाकिस्तान’ जन्मास येईल, असे बोलले जात आहे. पाकिस्तानमधल्या जवळपास सर्वच कट्टर इस्लामी संघटना त्यांचा मुस्लिमेतर व भारतद्वेष बाजूला ठेवून इम्रान खान नावाचा ‘नया पाकिस्तान’ची घोषणा देणारा ‘नवा नायक’ काय खळबळ माजवून जातोय, याची वाट पाहताना दिसताहेत.

 

पाकिस्तानच्या गेल्या तीन दशकाच्या राजकीय इतिहासात देशाचे मुख्य राजकारण उजवे व मध्यममार्गाकडे वळलेले दिसते, ते प्रामुख्याने झिया उल हक यांनी पाकिस्तानला ‘इस्लामिक स्टेट’ असे जाहीर केल्याने. म्हणूनही झुंडशाहीचे समर्थन करणाऱ्या, कट्टर इस्लाम-शरीया कायद्याची मागणी करणाऱ्या, बिगर मुस्लिमांना सर्व हक्क नाकारणाऱ्या कट्टर संघटना नेहमीच निवडणुकांदरम्यान आपला प्रभाव टाकताना दिसल्या आहेत. काही छोट्या संघटनांची ताकद इतकी आहे, की ते जमात उलेमा-ए-इस्लाम (समिउल हक गट) व जमात उलेम-ए-पाकिस्तान या संघटनांचा पाकिस्तानच्या राजकारणावर असणारा प्रभावही बाधित करू शकतात. काही परंपरावादी पक्ष ‘मुत्तहिदा मजलिस-ए-अमल’ या नव्या राजकीय प्लॅटफॉर्मवर एकीकडे त्यांच्यापेक्षा कट्टर पक्षांचा विरोध करताना दिसतात, तर उदारमतवादी व सेक्युलर गटांचा आपणच विरोध करू शकतो, असा दावा करताना दिसतात. तरीही या संघटनांमध्ये आपापसात ऐक्य नाही. त्यामुळे कोणताही कट्टर गट आपणच इस्लामचे तारणहार असा दावा ठामपणे करू शकत नाही. 


दुसरीकडे, पाकिस्तान पीपल्स पार्टी, पीटीआय, एमक्यूएम हे मुख्य पक्ष इस्लामला नाकारताना दिसत नाहीत वा ते पाकिस्तानला इस्लामी आयडेंटी देण्याविषयीही हरकत घेताना दिसत नाहीत. या मुख्य पक्षांना आपल्याकडच्या काँग्रेसप्रमाणे त्यांचे राजकारण धार्मिक अंगाने रेटता येत नाही. त्यांच्यात पाकिस्तानात सेक्युलर संकल्पनेची फारशी चर्चा होताना दिसत नाही. पण तेथे प्रांतिक, वांशिक प्रश्नावर लढणारे पक्ष धार्मिक व सांस्कृतिक सहिष्णुता, सामाजिक-आर्थिक न्याय व समतेचा आग्रह धरताना दिसतात. हे पाकिस्तानचे राजकीय वास्तव आहे. हा इस्लामी देश असला तरी या देशात विविध वांशिक आयडेंटिटी असल्याने हा देश दहशतवादाप्रमाणेच, वांशिकवादालाही बळी पडलेला दिसत आहे.

 

भारत हा बहुसंख्य हिंदूंचा असला तरी ते हिंदू राष्ट्र नाही. भारतामध्ये जातीसंघर्ष खूप आहे. पण निवडणुकांत जातीय समिकरणे जुळवण्याबरोबरच पाकिस्तानचा मुद्दा हमखास काढला जातो. गुजरात निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी निवृत्त लष्करी अधिकारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी संरक्षणमंत्री , पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत यांनी देशविरोधी कट रचला असा सनसनाटी आरोप केला होता. तर बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप हरल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील असे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले होते. अशा आरोपांची रेंज या निवडणुकात पाकिस्तानमध्ये अजून तरी दिसलेली नाही. किंवा तेथे देशद्रोह्यांना भारतात पाठवण्याची टूम निघालेली नाही. इम्रान किंवा अन्य पक्ष हिंदूं व अन्य अल्पसंख्यांचे लाड चालणार नाहीत अशी भाषाही करताना दिसत नाही.

 

सध्या लष्कराचा फेवरिट मानला जाणाऱ्या इम्रान खानने त्याच्या राजकारणाची सुरवात २२ वर्षांपूर्वी आदिवासी टोळ्यांमधील वंशवाद व तालिबान हिंसाचाराने होरपळलेल्या बलुचिस्तान व खैबर पख्तुनख्वा या प्रांतातून केली होती. या प्रांतातील सध्याची परिस्थिती तणावाची आहे. गेल्याच आठवड्यात बलुचिस्तानात बॉम्बस्फोट होऊन १४० हून अधिक जण ठार झाले होते. पण येथे ‘मजलिस-ए-अमल’ ही कट्टर संघटना नव्या येणाऱ्या सरकारशी हात मिळवण्यास तयार असल्याचे चित्र आहे. या खैबर पख्तुनख्वा भागात इम्रान खानने पहिल्यापासून तालिबान गटांशी जुळवून घेण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची व प्रसंगी लष्करी कारवाईला विरोध करण्याची धाडसी, पण बदलेल्या राजकीय वास्तवाला समजून भूमिका घेतलेली होती. त्याला पाकिस्तानातील इस्लामी कट्टरवाद्यांकडून सर्वाधिक लक्ष्य बनलेल्या अहमदी समाजगटाबद्दलही सहानुभूती आहे. अहमदी हे मुस्लिमेतर असून त्यांना या देशातले मूलभूत हक्कही देता कामा नयेत, त्यांनी आपण मुस्लिमेतर असल्याचे जाहीर केल्यावर त्यांना नागरिकाचा दर्जा द्यावा अशी भूमिका कट्टरवाद्यांची आहे. (असेच काहीसे मत भारतात कट्टर उजव्या संघटनांचे मुस्लिमांबाबतचे असते) मात्र इम्रानने या निवडणुकांत अहमदी हे आपले भावासारखे असून, आपला पक्ष त्यांच्याबरोबर आहे असे विधान करून सगळ्यांचीच गोची केली. पण त्याची ही भूमिका पूर्वीही होती, तो आजही त्यावर कायम आहे हे, विशेष.


आज लष्कराचा पाठिंबा असूनही इम्रान तालिबान संघटनांशी चर्चा करण्याचे, अमेरिकेचा दबाव झुकारण्याचे जाहीरपणे सांगत आहे. पण त्याचबरोबर तो लष्कराची पाकिस्तानच्या राजकारणातील गरजही बोलून दाखवत आहे. एका मुलाखतीत इम्रानने पाकिस्तान लष्कराची पाकिस्तानाच्या राजकारणातल्या अपरिहार्यतेवर एक भाष्य केले होते. ते त्याच्या भविष्यातील (समजा पंतप्रधान झाला तर) राजकीय वाटचालीतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. तो म्हणतो, ‘पाकिस्तानच्या राजकारणात सत्तारुढ सरकारचा कारभार भ्रष्ट व वाईट दिसल्याचे आढळत असल्याने पाकिस्तानच्या लष्कराने या देशाची सूत्रे आपल्या घेतली आहेत. जेव्हा लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार पारदर्शी कारभार करेल, भ्रष्टाचाराचा बीमोड करेल, तेव्हा लष्कराला हस्तक्षेप करण्याची संधी मिळणार नाही. आपल्या देशात भ्रष्टाचारी व दुष्ट लोकांचे सरकार आल्याने लष्कराने ती पोकळी भरून काढली व जनतेने तो बदल सहज स्वीकारला. १९९९मध्ये नवाझ शरीफ सरकार मुशर्रफ यांनी उलथवले त्याचे स्वागत लाहोरच्या रस्त्यावर लोकांनी केले होते.’

 

अर्थात, इम्रानला लष्कराचा कितपत पाठिंबा आहे, याविषयी अनेक थिअरी मांडल्या जात आहेत. इम्रान लष्कराचे बाहुले होईल इथपासून तो देशाला नवी दिशा दाखवू शकतो,असेही म्हणणारे आहेत. तर काही जण पाकिस्तानच्या लष्कराला नवाझ शरीफ यांची लोकप्रियता जाचत असल्याने त्यांनी इम्रानची प्रतिमा उंचावण्यात आपली शक्ती पणास लावली आहे असेही म्हणणारे आहेत. इम्रानची काही राजकीय पावले पाकिस्तान लष्कराची भलामण करणारीही आहेत. त्याच्या पक्षाचा जाहीरनाम्यात ‘नया पाकिस्तान’ घोषणेत ‘इस्लामी वेलफेअर स्टेट’ची भाषा आहे. त्यातून आपण  पाकिस्तानमध्ये ’तबदिल’ घडवून दाखवू शकतो. असे आश्वासन आहे. भ्रष्टाचारमुक्त सर्वसमावेशक विकास हा पाकिस्तानला प्रगतीपथावर नेऊ शकतो, असेही तो प्रचार सभांमध्ये सांगतो. त्याच्या या ‘नया पाकिस्तान’च्या घोषणेनंतर इम्रानची प्रतिमा न्यूज चॅनेलमधून उजळू लागली आहे.

 

इम्रानला राजकारणात येऊन दोन दशके उलटली आहेत. या काळात त्याच्या राजकीय जाणिवांमध्ये बदल होणे साहजिकच आहे. पण हा नेता उद्या पाकिस्तानचा पंतप्रधान झाल्यास भारत-पाकिस्तान संबंधांवर त्याचा परिणाम कसा होईल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे बरोबर आठ नऊ महिन्यांनी सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानविरोधाचे राजकारण भाजप जर करू पाहत असेल, तर त्यांना इम्रान सत्तेवर आल्यास बऱ्याच कसरती कराव्या लागू शकतात. कारण, इम्रानने मध्यंतरी मोदी-शरीफ भेटीचे स्वागत केले होते. शरीफ यांनी स्वत:च्या घरी मोदी यांना आमंत्रण दिले होते, याची त्याने जाहीर प्रशंसा केली होती. पण मोदींच्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटं पाडण्याच्या राजकारणाला त्याचा तीव्र विरोध आहे. काश्मीर प्रश्नावर चर्चा हा मार्ग आहे, असे तो म्हणत आलाय. इम्रानला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने पुन्हा व्हावेत, अशीही इच्छा आहे. माणसांमाणसातील संपर्क वाढल्यास नवे हीरो-आदर्श समाजाला मिळत जातात, सचिन तेंडुलकर आमच्या पाकिस्तानात हीरो आहे असे इम्रानने भारतात येऊन म्हटले होते. ही मैत्रीची भाषा समजा तो पंतप्रधानपदी आरुढ झालाच तर कायम राहणार का आणि पाकिस्तानद्वेषाचे उठसूठ राजकारण करणारे आपले सत्ताधीश निवडणुक काळातल्या पाकिस्तानच्या रुपाने मिळणाऱ्या  ह्या लाभांशावर पाणी सोडणार का, हाच  महत्वाचा प्रश्न आहे.

 

इम्रानच हॉट - फेव्हरिट

२५ जुलैला होणाऱ्या निवडणुकात इम्रानच्या पीटीआय पक्षाला सत्ता मिळेल असे भाकीत जंग या मीडिया ग्रुपने केले आहे. तर पल्स कंपनीच्या जनमत चाचण्यांत इम्रानच्या पक्षाला ३० टक्के तर नवाझ शरीफ यांच्या पक्षाला २७ टक्के मतदारांनी पसंती दिल्याचे जाहीर केले आहे. गॅलप पाकिस्तान सर्वेक्षणात नवाझ शरीफ यांना २६ टक्के तर इम्रानला २५ टक्के असा कल दिला आहे तर "रॉयटर'ने घेतलेल्या जनमत चाचणीत इम्रानकडे मतदारांचा कल वाढत असल्याचे म्हटले आहे.

 

प्रतिमेला बट्टा!
पाकिस्तान निवडणुका तोंडावर आल्या असतानाच इम्रानपासून घटस्फोट घेतलेली पत्नी रेहमा खान हिने एक खळबळजनक पुस्तक लिहून इम्रानचे चारित्र्य भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता. "सेक्स, लाइज व कोकेन' म्हणजेच लैंगिक स्वैराचार, खोटेपणा आणि नशाबाजी हे इम्रानचे आयुष्य असल्याचा तिचा आरोप होता. रेहमा खानने काही उदाहरणे देत इम्रान हा इस्रायलचा प्रशंसक असल्याचाही आरोप केला होता. इम्रानची माजी पत्नी जेमिमा ही ज्यू होती, त्यामुळे तो ज्यूंच्या बाजूचा आहे असा तिचा दावा आहे. पण रेहमा खानचा दावा हा तसा नवा नाही. इम्रानवर पूर्वी तसे आरोप झाले होते . पण गेल्या २२ वर्षांतल्या राजकीय प्रवासात त्याने इस्रायल व अमेरिका विरोध कायम ठेवला आहे. इम्रानची ‘प्लेबाॅय’ इमेज आता धूसर होत चालली आहे . तो पाश्चात्य स्रीवादाचा विरोधक आहे . पाश्चात्यांच्या स्त्रीवादामुळे स्त्रीचे आईपण लयास जात आहे, अशी चिंता तो व्यक्त करताना दिसतो. त्याने ईश्वरनिंदा कायद्याच्या बाजूने आपण आहोत, असेही म्हटले आहे...

 

बातम्या आणखी आहेत...