आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरंगा दाते मूळ पुण्याच्या असून त्यांनी पदार्थविज्ञानात अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. १९७२मध्ये मायदेशी परतून टाटा कन्सल्टन्सी व त्यानंतर आयआयटी पवई येथे २००४पर्यंत संगणकशास्त्र विभागात नोकरी केली आहे. इंग्रजीत शिक्षण झालेलं असलं तरी आईवडिलांच्या उत्तेजनाने भरपूर मराठी वाचन आहे. पूर्वी त्या कविता करत, काही काळ थांबल्या होत्या. आता म्हातारपणी लहानपण परत आलं. पुन्हा कविता होऊ लागल्या. अन्नपदार्थांवरच्या कविता ही त्यांची खासियत. आजची पहिली कविता संक्रांतीच्या मुहूर्तावर, गूळपोळीवरची.
भाद्रपद ते पौष,
कणिक आणि मैदा मंडळी अगदी झोकात असतात.
मनास येईल तेवढा मसाज,
गरम मोहन,
कधी कातण्याने आकार,
कधी गोल करून तळणे,
कधी मोदकासारखं भरण्याची सवय सुटत नाही,
आणि पुरण वगैरे मंडळींची रेलचेल.
नवीन वर्ष आणि संक्रांत येते,
आणि
आणि याच कणिक-मैदा लोकांना
एकदम आरोग्यदायी जीवनशैली आठवते.
किसून किसून दमलेला गूळ,
गरम तेलात फिरून फिरून घाम काढणारं बेसन,
तडतड उडून तडकणारे
पण शेवटी अगदी पूड होऊन शरण येणारे तीळ,
आणि या सर्वांच्या साठी
कौतुकाने येऊन पडणारी जायफळाची पूड;
सर्वांनी एकत्र येऊन, गुळात एकजीव होऊन,
घट्ट डब्यात विचारात बसणे.
एरवी गोल होऊन
वक्र पृष्ठभाग गुंडाळून घ्यायची सवय असलेली कणीक,
अचानक दोन चपट्या गोल लाट्यांत
गुळाला सांभाळते,
आणि लाटण्याने, हळुवारपणे शिकवून मोठे करते.
अशी ही प्रौढ गूळपोळी,
जणू तव्यावर गरम परिस्थितीशी सामना करून
एखाददोन व्रण दाखवत,
आणि तरीसुद्धा ताठ कण्याने बाहेरच्या जगात येते.
आयष्यातही असेच असते .
कधी ओंजारून गोंजारून,
सर्वांना एकत्र करून काम करणे,
आणि कधी
जरा स्वतःला आणि दुसऱ्याला
चांगली शिस्त लावून,
यशाचा झेंडा रोवणे.
बघा ना.
आपल्याला अजून पटत नाही,
पण पोळ्यांना कधीच समजलंय!
- सुरंगा दाते, मुंबई
suranga.date@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.