आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेकी विद्रोह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगाली साहित्यात कवितेची फार मोठी परंपरा आहे. भारतीय साहित्याला नोबेल मिळवून देणाऱ्या रवींद्रनाथांची बंगाली भाषा साहित्य-संस्कृतीच्या संदर्भात नेहमीच समृद्ध राहिलेली आहे. या भाषेतील साहित्याने नेहमीच जनसामान्यांना जीवनमूल्ये दिलेली आहेत. अशा या समृद्ध बंगाली साहित्य-परंपरेमधील एक महत्त्वाचे नाव म्हणून सुबोध सरकार यांची निश्चितच नोंद घेतली जाते...

 

सुबोध सरकार यांनी गेली पस्तीस वर्षात मुख्यतः कविताच लिहिलेल्या आहेत. त्यांचा ‘कबीता -७८ ते ८०’ हा पहिला काव्यसंग्रह एकोणीशे ऐंशीच्या दरम्यान प्रकाशित झाला. त्यानंतर आजपर्यंत त्यांचे अठ्ठावीस काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. तसेच त्यांनी भाषांतरासोबतच प्रवासवर्णपरलेखनही केलेले आहे. याचवर्षी जयदीप सरंगी  यांनी  संपादित  व भाषांतरित केलेल्या त्यांच्या कविता ‘नॉट इन माय नेम’ या नावाने प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांनी काही काळ साहित्य अकादमीच्या ‘इंडियन लिटरेचर’चे संपादनही केलेले आहे. त्यासोबतच पश्चिम बंगालमधून प्रकाशित होणाऱ्या द्विभाषिक ‘भाषानगर’ चे ते मुख्य संपादक होते. आणि तरीही सुबोध सरकार यांची मुख्य ओळख उरते ती कवी म्हणूनच. बुद्धदेब बोस, शंखा घोष किंवा सुनील गंगोपाध्याय या बंगालीतील महान कवींमध्ये आजमितीस त्यांची दखल घेतली जाते. त्यांची कविता ही खास सामान्य माणसांची कविता आहे. त्यातील सामान्य माणूस एकाच वेळी पश्चिम बंगाल, गुजरात, लॅटिन अमेरिका  किंवा आफ्रिकेत कुठेही असू शकतो. त्यांची सुख-दुःखे, आशा-निराशा शब्दातून व्यक्त करण्याची कुवत मात्र त्यांची कविता बाळगून आहे. या साठी मला कवितेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन खूप महत्वाचा वाटतो. यासाठी एका प्रसंगाचा विचार करायला हवा की ज्यातून माझं अवघं आयुष्यच बदलून गेले असे ते सांगतात.

 

तर झालं असं होतं की, एक माणूस रेल्वे पटरीवर खाण्यासाठी काही शोधत होता. एका ढांगेच्या अंतरावर त्याला पावाचा तुकडा दिसला खरा पण समोरून भरधाव वेगाने रेल्वेही येत होती. कसलाच विचार न करता त्या व्यक्तीने गाडीला आडवे जात तो पावाचा तुकडा उचलला. सुबोध सरकार हे सारे प्लॅटफॉर्म वरून पाहत होते. आता तो पावाचा तुकडा घेऊन खाणारा तो माणूस त्यांना समोरच्या प्लॅटफॉर्मवर दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. ते सांगतात की गेल्या पस्तीस वर्षात मी लिहलेली एकही कविता अशी नाही की जी लिहिताना मला ते दुखरं हसणं आठवलेलं नाही. त्या हसण्यात एक अभावग्रस्थपणा होता. त्या हसण्यात भूक होती. त्यात आशिया होतं नि आफ्रिका नि लॅटिन अमेरिकासुद्धा. अशा अनेक जीवघेण्या दुःखांशी नाळ जोडत त्यांची कविता आकाराला येत गेली आहे. म्हणूनच त्यांची कवितेची कमिटमेंट ही कोणत्याही विचारधारेपेक्षा सामान्य माणसाच्या दुःखाशी, त्याच्या वाताहतीशी अधिक असलेली वाचकाला उमजत जाते.

 

सुबोध सरकार यांची कविता रस्त्यावर उतरलेल्या माणसांसाठीची आस्था बाळगून आहे. तिचा अस्सल स्वर मानवी अधिकारांसाठी नेहमीच तीव्र राहिलेला आहे. यासाठी आपणाला त्यांच्या ‘मणिपूरेर मा’ या काव्यसंग्रहाचा विचार करता येईल. मणिपूर मधील सैनिकांच्या अत्याचाराला कंटाळून निषेधासाठी रस्त्यावर महिला उतरलेल्या होत्या. ‘भारतीय आर्मी आमच्यावर बलात्कार करतेय’ अशा आशयाच्या पाट्या त्यांच्या हातामध्ये होत्या. त्या नग्न अवस्थेत रस्त्यावर उतरलेल्या स्त्रियांसाठी कवी लिहितो की ‘नोअनो उठे द्नारलो आमार मणिपुरेर मा’ अर्थात रस्त्यावर नग्न उभ्या राहिलेल्या या माझ्या मणिपुरी आईच्या डोळ्यात मला अंगार दिसतोय. एक भयानक चित्र दिसतंय आणि ते लोकशाहीप्रधान देशाला निश्चितच शोभणारे नाही. अतीव अनुभूतीच्या दबावाने आकाराला आलेल्या या संग्रहातील कविता मग फक्त राजकीय न उरता सामान्यांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाला थेट भिडतात. लोकांना त्या आपल्या वाटतात. त्यांनी दिल्लीच्या संदर्भात लिहलेल्या कविता असतील किंवा गुजरातच्या संदर्भाने लिहलेली दीर्घ कविता असेल. या कवितेतून दिसणारे राजकीय नि सामाजिक संदर्भ व त्यातील तपशील या कवितेत आहेतच. पण ही कविता फक्त तपशील पुरवण्यापुरतीच मर्यादित राहत नाही. किंवा कोण्या एक विचासरणीला बांधून घेणे नाकारत ती जनसामान्यांची होती. त्यांच्या कविता लोकांना आपल्या नि अस्सल वाटल्या याचे महत्वाचे कारण त्यांची भाषा हे आहे. रोजच्या जगण्या-मरण्याच्या प्रक्रियेतून अस्तित्वात आलेली घडीव नि उठावदार भाषा त्यांच्या कवितेला अधिक लोकाभिमुख करताना दिसत आहे. समकालीन बंगाली साहित्यात त्यांच्या कवितेचे हे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.   

 

‘भाले जायेगा कोथेय’ असा प्रश्न सामान्य माणसाला नेहमीच पडलेला असतो. आपल्या एका कवितेतून अशा अनेक समष्टीच्या प्रश्नांना मुखर करणाऱ्या सुबोध सरकार यांच्या कवितेत आपणाला एक संघर्षप्रवण काळ दिसतो. तो जनसामान्यांचा जगण्यासाठीचा रोजमरा संघर्ष आहे. तो रोजच्या रोजीरोटीसाठीचा आहे. किंवा त्याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्यासाठीचासुद्धा आहे. त्यांच्या समग्र साहित्याचं सार माणसाला अधिक चांगले नि जगण्यालायक बनवण्यासाठीचे आहे. त्यांच्या कवितेत रोजमर्रा जगण्याचा तात्विक संताप आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जगाच्या निर्मितीची सूत्रे त्यांच्या साहित्यात स्पष्ट दिसतात. त्याला समाजाची किंवा देशाच्या सीमेची बंधने नाहीत. या कवीला बदलत्या जगाचं विशेष भान आहे. म्हणून तो त्याच्या अडचणी किंवा समस्या तुकड्यातुकड्यात पाहतच नाहीये. या कवितेत जसे रामायण महाभारताचे संदर्भ सापडतात तसेच होमर नि त्याची ऑडिसी सुद्धा सापडते. जसे टागोर आहेत तसाच शेक्सपियर सुद्धा आहे. जशी दिल्ली किंवा कोलकत्ता आहे तशी लंडन आणि लॅटिन अमेरिकासुद्धा आहे. एकीकडे समग्रतेने भान येत असतानाच या कवीला आपण संत किंवा प्रेषित नाही याचीही पुरेपूर जाणीव आहे. म्हणूनच ‘हे इस्रायल असेल किंवा काश्मीर’  या कवितेत ते सांगतात की ‘हा काळ अगदी अगदी तसाच आहे नि आपणही रडायलाच हवं अगदी सुफी संतांसारखचं/ पण आपल्याकडे तरी कुठे आहेत अश्रू? किंवा आपण द्यायला हवी माफी त्यांना/ ज्यांनी केल्या आहेत कैक चुका आपल्यासंदर्भातच / पण एवढे सामर्थ्य आणायचे तरी कोठून? या साऱ्या आणि अशा कैक ओळीत सामान्य माणसांच्या मनातील द्वंद्व आणि मर्यादा कवीने बरोबर पकडलेल्या आहेत. राजकीय प्रश्नाकडे किंवा सामाजिक प्रश्नांकडे कवी मसीहाच्या नजरेतून न पाहता सामान्य माणसांच्या नजरेतून पाहतोय. हीच नजर कवीला एका मूलभूत विचारधारेकडे घेऊन जाताना दिसते. जनसामान्यांच्या जगण्यातील असंख्य मर्यादा स्वीकारत भविष्यातील भल्या काळासाठी आवश्यक असलेले तत्वज्ञान निर्माण करण्याची कुवत ही कविता निश्चितच बाळगून आहे.

 

त्यांच्यासाठी रवींद्रनाथ टागोर आणि त्यांची गीतांजली खूप महत्वाची आहे. या महाकावीचा प्रभाव त्यांच्या कवितेवर असणं सहजशक्य आहे. पण ते सांगतात की अगदी कठीण काळामध्ये जगण्याची उर्मी देण्याचं काम रवींद्रनाथांच्या कवितेनं केलेलं आहे. याच काळामध्ये त्यांच्या कृष्णानगर भागात नक्षलवादी चळवळ जोराने फोफावत होती. गरीबीच्या दबावातून त्यांच्या  वयाची मुले ज्या काळात हातामध्ये शस्त्रे उचलत होती, त्याचकाळात त्यांच्या हाती मात्र गीतांजली होती. ते अभिमानाने सांगतात की त्यांच्यासाठी गीतांजली हेच बायबल होतं.
ते सांगतात की माझी कविता ही काही आभाळातून पडत नाही. ती अंतर्बाह्य संघर्षातूनच आकाराला येत जाते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक संदर्भ त्यांच्या कवितेत सापडतात. त्यांचे वडील पूर्व पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेले होते. ते त्यांच्या लहानपणीच वारले. नि त्यातूनच पुढे या संपूर्ण कुटुंबाची एक जीवघेणी परवड सुरु झाली. जगण्यासाठी या कुटुंबाला सतत संघर्ष करावा लागला. वणवण करावी लागली. विधवा आईने नेटाने संसार करून या सहा भावंडाना जगविले. लहापणीचे भयानक दारिद्र्य आणि सोबतच वडिलांची रेफ्युजी म्हणून झालेली परवड त्यांच्या ‘माझा बाप’ या कवितेत अतिशय प्रखरपणे उमटलेले आहे. ते सांगतात की -   
माझी आई रेफ्युजी होती, माझा बाप रेफ्युजी होता
मी मात्र जन्मलो स्वतंत्र भारतात
माझा बाप पळून आला होता त्याच्या गावातून माझ्या आईसोबत
माझ्या बहीणी भावंडांसोबतच
माझा बाप पळून आला दूर
त्याला अतिशय  प्रिय असलेल्या त्याच्या  गावापासून
माझा बाप पळून आला दूर नदीपासून जिच्यावर तो जगला होता वर्षानुवर्षे  
तो पळून आला दूर शाळेपासून जिथे तो शिकला होता जिवलगांसोबत.
भारतात त्याला कुठे होता पासपोर्ट
तो इथे कायदेशीर उपराच होता
त्याला होते रेशन कार्ड
नि त्याची भाषाच होती व्हीसा
तो होत राहिला स्थलांतरित बांगलातून बांगलात.
तो मेला कॅन्सरने वयाच्या पंच्चावनव्या वर्षी - मु. पो. कृष्ण नगर जिल्हा नोंईडा पश्चिम बंगाल, भारत.
पण तसा तो मेला होता फार वर्षांपूर्वी
जेंव्हा तो फक्त धावत धावत नि धावतच  होता
त्याची तरुण बायकोही धावत होती मला गर्भात घेऊन
जन्माला यायच्या आधीही मी धावलो आहे भरपूर
बंगाल ते बंगाल
भारत ते भारत...
या आणि अशा अनेक कवितेतून वाचकाला धास्तावून सोडणारे वास्तवचित्रण आपणाला त्यांच्या कवितेत सापडते. हे असं घडतंच राहतं दिवसरात्र / कुठंतरी एखादी पोर पडते बळी / किंवा सापडतच नाही तिची बहीण / कालांतराने दिसतात कोण्या झाडावर लगडलेले त्यांचे स्कार्फ  हे चित्रण फक्त कोण्या राज्यापुरतं मर्यादित न राहता त्याच वैश्विक सार्वत्रिकीकरण होताना दिसत राहते. नि कवीला याची पुरेपूर जाणीव आहे. म्हणूनच कवी सांगतो की - ‘मी व्यक्त होतो तेंव्हा माझी कविता बनत जाते बॉम्ब’. एकंदरीत अविष्कारातील नाविन्यता आणि विवेकी विद्रोहाचा सूचक वापर हा सुबोध सरकार यांच्या साहित्याला आजच्या काळाचा महत्वपूर्ण आवाज बनवितो. मानवी दुःख वेदनेला अक्षररूप देत आजच्या काळाची कविता लिहीणाऱ्या या बंगाली कवीला निश्चितच आपण वाचायला हवे.

 

shinde.sushilkumar10@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३

बातम्या आणखी आहेत...