आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्‍या जीवांचे बोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायत्रीबाला यांच्या विपुल कवितालेखनातून आपणाला सामान्य माणसाच्या जगण्यातील दुःख आणि पीडा याचे भेदक चित्रण पाहायला मिळते. रोजच्या जगण्यामरण्याच्या संघर्षातून निर्माण होणाऱ्या कैक भाषिक प्रतिमांचा योग्य वापर करीत आकाराला येणारी त्यांची कविता समकालात उठून दिसते. 


काही वर्षांपूर्वी गायत्रीबाला पांडा या तरुण कवयित्रीचे ‘धूप को रंग’ या नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. उडिया कवितांचा तो हिंदीमधील अनुवाद होता. याच संग्रहातील ‘गवाहों को थमा दिया गया हैं, रुपया / छिनी जा चुकी हैं, उनकी जीभ’ या दोन ओळी आपल्या समकालीन न्यायव्यवस्थेचे आंतरिक स्वरूप दाखवण्यास पुरेशा आहेत. दहशतग्रस्त शांततेच्या काळात व्यवस्थेच्या क्रूरतेला जाब विचारण्याचा स्थायीभाव असलेली ही कवयित्री म्हणूनच वर्तमान उडिया साहित्यातील एक महत्वपूर्ण नाव ठरते. 


नामांकित संस्थेतून पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही वर्षे ‘संबद’ या उडिया वर्तमानपत्रात पत्रकारिताही केली. दरम्यान, त्यांचा ‘अहता प्रतिसृती’ हा  कवितासंग्रह प्रकाशित झाला. एकेकाळी उत्कल विद्यापीठाची सुवर्णपदक विजेती असलेली, ही कवयित्री आता पूर्णवेळ लेखन करत असते. आजमितीस त्यांचे उडियामध्ये दहा काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. कवितेसोबतच त्यांचा लहान मुलाच्या नजरेतून ग्रामीण जगणे टिपणारा ‘बिसर्जन’ हा कथासंग्रहही प्रकाशित झालेला आहे. त्या उडियातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ‘अन्य’ या नियतकालिकाचे संपादन करत असतात. त्यांच्या कवितेचे अनेक भारतीय प्रादेशिक भाषेत भाषांतर झाले आहे. ‘धूप को रंग’ आणि ‘खो जाती हैं लडकियां’ हे हिंदीमधून भाषांतरित झालेल्या त्यांचे दोन प्रातिनिधिक काव्यसंग्रह. गायत्रीबाला यांच्या विपुल कवितालेखनातून आपणाला सामान्य माणसाच्या जगण्यातील दुःख आणि पीडा याचे भेदक चित्रण पाहायला मिळते. ग्रामीण जगण्यातील संघर्ष त्यांच्या कवितेने प्रभावीपणे टिपलेला आहे. रोजच्या जगण्यामरण्याच्या संघर्षातून निर्माण होणाऱ्या कैक भाषिक प्रतिमांचा योग्य वापर करीत आकाराला येणारी त्यांची कविता समकालात उठून दिसते. 


‘गान’ (गाव) हा त्यांचा अत्यंत लक्षवेधी कवितासंग्रह. या संग्रहातील बहुतांश कविता या कृषिनिष्ठ जाणिवेतून आकाराला आलेल्या आहेत. ओडिशामधील बदलणाऱ्या खेड्यांचे समाजवास्तव या संग्रहात प्रकर्षाने दिसून येते. बदलत्या काळासोबत व्यवस्था अधिकच क्रूर झालेली आहे. संपूर्ण देशात खेड्यापाड्यात राबणाऱ्या कष्टकरीवर्गाचे शोषण भयानक पद्धतीने चालू आहे. उडिया साहित्यामध्ये याचे विपुल चित्रण सुरुवातीपासूनच झालेले आहे. फकीर मोहन सेनापती यांच्या उडियातील आद्य कादंबरीपासून सुरू झालेला हा वास्तवचित्रणाचा वारसा आधुनिक कवी कादंबरीकारापर्यंत समर्थपणे पोहोचलेला आहे. कृषिनिष्ठ जगण्यातील विफलतेचा दाह गायत्रीबालांच्या अनेक कवितांतून सतत जाणवत राहतो. शेतकरी आत्महत्या हा आपल्याकडे आता सर्वसाधारण विषय बनलेला आहे. यासाठी आपण धर्मा पाटील या शेतकऱ्याची आत्महत्या प्रातिनिधिक उदाहरण म्हणू पाहू शकतो. दुसरीकडे शासन व्यवस्था मात्र चातुर्याने यापासून दूर राहून ‘लाभार्थी आणि स्वच्छ प्रशासनाच्या’ जाहिराती करण्यात मश्गुल असलेली दिसते. अशा वेळी गायत्रीबाला यांच्या कवितेतील पुढील ओळीं आरसा बनून आपला क्रूर चेहरा आपल्यासमोर उभा करतात. अँगुठे से छूट रहा स्याही का रंग / बस्ते से चावल / पड़ोसी के मन से संवेदना / बच्चों के खाली पेट में / नाचते भूख के सियार /लंबे केंचुवे दुर्दशा के/ चला रहे संसार / मात्र स्वच्छ रहे सरकार. ही प्रशासकीय पातळीवरील अनास्था दुर्दैवाने सार्वत्रिक होत आहे. गायत्रीबाला यांची कविता गेल्या काही दशकातील ओडिशाच्या ग्रामीण भागातील कष्टप्रद जीवन आणि त्यातील बरेवाईट बदल बारकाईने नोंदवत आहे. 


उडिया साहित्यात स्त्रीवादी साहित्याची मोठी परंपरा राहिलेली आहे. अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच सरलादेवींनी लिहिलेल्या ‘उत्कल नारी समस्या’ या निबंधाचा यासाठी विचार करता येऊ शकतो. त्या काळात त्यांनी नवऱ्याकडून होणाऱ्या बलात्कारावर लिहिणे हे क्रांतिकारक होते. सरला देवी ते ‘माझ्या अशांतीलाच तुम्ही देत आहात मुक्तीचे नाव’ असे लिहिणाऱ्या इप्सिता षडंगी या उडियाच्या तरुण कवयित्रीपर्यंत उडिया साहित्यातील स्त्रीवादी लेखन हे सकस आणि विविधांगी राहिलेले आहे, हे आपणाला जाणवते. गायत्रीबाला यांच्या कवितेत आढळणारी स्त्री मात्र एकाच वेळी जशी पारंपरिक दिसते, तशीच ती परंपरेचे ओझे नाकारून, स्वतःची वाट स्वतः शोधणारीसुद्धा आहे. भ्रूणहत्या, बलात्कार किंवा लिंगभेद इत्यादी सामाजिक पातकांवर ती तीव्रपणे कोरडे ओढताना दिसून येते. लैंगिक परिप्रेक्ष्याच्या बाहेर जाऊन सामाजिक,आर्थिक आणि राजकीय स्तरावरील स्त्रियांचे शोषण कवयित्रीने समर्थपणे मांडलेले आहे. पारंपारिक कुटुंबव्यवस्थेत स्त्रीच्या अस्तित्वाला फारसे महत्व नसते. यातूनच आईला मध्यवर्ती ठेऊन कवयित्री सांगू पाहते की, ‘ती कधीच विचार करत नाही, स्वतःचा’. इथे आईच्या माध्यमातून कवयित्रीने कित्येक घरात राबणाऱ्या पण कसलेही अस्तित्व नसलेल्या कैक स्त्रियांच्या पूर्वपार दुःखाला शब्दरूप दिले आहे. गायत्रीबाला यांची आशयघन स्त्रीवादी कविता समजून घ्यायची असेल तर मुळातून त्यांची ‘मरि परी ना थिबा गोते स्री लोक’ (स्त्री मरत नसते कधीच) ही कविता आवर्जून वाचायलाच हवी.

 
गायत्रीबाला यांच्या कवितेतून वाचकाला दलित आणि आदिवासी समाजाच्या ओडिशातील सद्य:स्थितीचे निश्चितच संदर्भ सापडतील. ‘आदिवासी’ या कवितेत आदिवासी समाजाचे आक्रमक विचारविश्व वाचकांसमोर उभे राहते. कवयित्रीच्या मते, आदिवासींचा देश हा झाडे- वेली पशुपाखरे किंवा नद्या नाले यापेक्षा वेगळा असूच शकत नाही. ‘देश जेव्हा झेंडा बनून फडफडत असतो, तुमच्या माथ्यावर, तेव्हा आमच्या माथ्यावर मात्र फिरतात, भुकेने व्याकूळ गिधाडे’ असे कवयित्री सांगते. जागतिकीकरणाच्या काळात प्रत्येक समूहाच्या समस्या एकमेकांशी बेमालूम जोडलेल्या आहेत. जात-धर्म-भाषा किंवा लिंग अशा वेगवेगळ्या वर्गीकरणातून त्या सोडवण्याऐवजी सामूहिक पद्धतीने त्याचा विचार करायला हवा. नुकत्याच इंग्रजी भाषेत भाषांतरित झालेली, अखिला यादव यांची मूळ उडीयातील ‘भेडा’ ही कादंबरी यासाठी वाचायलाच हवी. दलित समूहाच्या समस्यांची मुळे जातिभेदासोबतच आर्थिक, धार्मिक किंवा राजकीय घटकांशी कशा प्रकारे जुळलेली आहेत याचे भेदक वर्णन करणारी ही दलित साहित्यातील महत्त्वाची कलाकृती आहे. कवी म्हणून ओडिशातील अनेक समस्यांना एकाच वेळी भिडणारी समग्रतेची दृष्टी, या कवयित्रीला असल्यामुळेच तिची कविता इतरांपासून वेगळी ठरत आहे. आपल्याकडे हल्ली विशिष्ट अशा विचारसरणीकडून भारताच्या ‘नवनिर्माणाचे’ जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यासाठी काही झुंडवादी शक्ती आक्रमक झालेल्या आहेत. विविधतेची इथली पूर्वापार परंपरा नाकारत एकसाची समाजाच्या किंवा संस्कृतीच्या नवनिर्मितीकडे त्यांचा कल आहे. धर्मभक्ती हीच राष्ट्रभक्ती ठरू लागल्याने त्यातूनच सामान्य माणसाला सातत्याने देशभक्त असल्याच्या परीक्षा द्याव्या लागत आहेत. कवयित्री सांगते -जिनके पास बाहुबल हैं / क्षमता हैं / अकूत धन हैं / देश उनका हैं / समय कहता हैं / वे लोग ज्यादा सोचते हैं, देश कें बारे में. दुर्दैवाने सामान्य माणसाच्या विचार आणि आचार विश्वाला कसलीच किंमत उरत हे लोकशाही मूल्यांना मारक असते. फाळणीच्या काळात जेवढे लोक पाकिस्तानला गेले नसतील त्याहीपेक्षा जास्त लोकांना गेली काही वर्षांत, या शक्तीशाली झुंडींनी पाकिस्तानला पाठवण्याचे जाहीर केलेले आहे. अशा वेळी बहुतांश लोकांचे गप्प राहणे हे झुंडीच्या पथ्यावर पडणारेच असते. म्हणूनच ‘एका घोड्याच्या बाबतीत’ या कवितेत कवयित्री सांगते - हात में बरछा उठाने की जरुरत नहीं/ जरुरत नहीं बम या बंदूक कि / अपनी खामोशी में / जीवण्यास लेणेवाला मनुष्य ही / खूंखार और अतिभयनाक होता हैं. सामान्य माणसाचा आवाज कोणत्याही निर्णायक लढाईत महत्त्वाचाच असतो. अशा वेळी गायत्रीबालाची कविता निर्बता अर्थात ‘खामोशी’ ला भंग करते आहे. इथल्या क्रूर व्यवस्थेला आणि झुंडशाहीला आव्हान देणारी या काळातील महत्वाची कविता गायत्रीबाला पांडा यांनी लिहिलेली आहे.   


एकंदरीतच आपल्या विपुल अशा कवितांच्या माध्यमातून या उडीया कवयित्रीने ग्रामीण जगण्यातील तीव्र जीवनसंघर्ष नेमकेपणाने टिपलेला आहे. त्यांच्या समग्र साहित्यात मागे सोडून आलेला गाव, पुन्हा पुन्हा नव्याने डोकावत राहतो. गावाचे उखडलेपण ओडिशापुरते मर्यादित न राहता, भारतभर पसरत चालले आहे. शेतात राबणारा,खाणी खोदणारा किंवा तेंदूची पाने विकून जगणारा किंवा शहरात बांधकामावर राबणारा वेठबिगारी, असा अलक्षित सर्वहारा माणूस या कवितेचा आत्मा आहे. ही कविता अस्तित्व हरवून बसलेल्या बहुतांश मुक्या जीवाचे बोल बनू पाहते आहे. त्यांना आवाज देते आहे. मानवी मूल्यांच्या पडझडीच्या काळात शोषक व्यवस्थेवर तुटून पडणारी गायत्रीबाला, यांची कविता निश्चितच आश्वासक आहे. 


- सुशीलकुमार शिंदे 
shinde.sushilkumar10@gmail.com 
लेखकाचा संपर्क - ९६१९०५२०८३ 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो आणि पुस्‍तकांची माहिती...

बातम्या आणखी आहेत...