आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृती संघर्षाचा पुकारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैथिली ही साहित्य संस्कृतीच्या दृष्टीने भारतीय भाषांमध्ये नेहमीच अग्रभागी राहिलेली भाषा आहे. अगदी रामायणातील मिथिलेच्या राज्याशी थेट संबंध सांगणारी, ही भाषा बौद्ध दार्शनिकांमुळे अधिकच समृद्ध होत गेली. आद्यकवी विद्यापती यांच्यापासून ते जनकवी नागार्जुन अर्थात ‘यात्री’ यांच्यापर्यंत ही परंपरा काळानुरूप अधिकच व्यापक होत राहिली. याच परंपरेतील समकालातील एक महत्वाचे नाव म्हणजे, कवि अरुणाभ सौरभ हे होय...

 

अरुणाभ सौरभ यांचा ‘एतबे टा नहि' हा प्रकाशित झालेला पहिला मैथिली काव्यसंग्रह. या संग्रहातील कवितेत त्यांनी बिहारी समाजाच्या जगण्यातील ताणेबाणे, सांस्कृतिक नि सामाजिक जीवनातील विरोधाभास नेमकेपणाने टिपलेला आहे. त्यांच्या कवितेत कामधंद्यासाठी गाव सोडून गेलेला जसा ‘बिहारी भैय्या' आहे, अगदी तसेच रात्रंदिवस चहाच्या मळ्यात काम करणारी ‘चाय बागान' आहे. त्यांच्या कवितेत जशी दिल्ली नि लाल किल्ला आहे, अगदी तसेच मुंबई नि इथली रोज़मर्रा जिंदगीही आहे. जागतिकीकरणानंतर बदललेल्या जगाची समज त्यांच्या या कवितेत प्रखरतेने दिसून येते. बाजार व्यवस्थेच्या तालावर नाचणाऱ्या आधुनिक मूल्यविरहित समाज कवी जवळून पाहतो आहे. या कवीकडे कोणत्याही शहराकडे पाहण्याचा स्वतःचा असा विशिष्ट असा दृष्टिकोन आहे. शहराकडे तो फक्त उदरभरणाचे साधन म्हणूनच पाहत नाही. तर त्यातील संस्कृती व वर्ग संघर्षाची कविला पुरेपूर जाणीव आहे. यासाठी त्याची मुंबईवरील कविता आपण पाहू शकतो - कवी सांगतो :
मुंबई, सिर्फ़ बांद्रा, जुहू, वर्ली में नहीं
कामकाज की तलाश में
भागते लोगों के जुतों में
जागती है
यह सिर्फ़ मायानगरी नहीं, है मेरी जान
मुंबई तो रोज़मर्रा है,
हस्बेमामूल है,
रोज़नामचा में-
होड़म होड़, जोड़-तोड़, भागम-भाग होना है
क्योंकि, मुंबई होना देश होना है...
या मायानगरीची नाळ राबणाऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या जगण्याशी जोडू पाहणारा हा कवी या शहराचा झगमगाटी तोंडवळा पुसू पाहतोय. या शहराला राबणाऱ्या सामान्य माणसांसाठीची ओळख देऊ पाहतो आहे.


अरुणाभ यांचा मैथिली भाषेतील ‘तें किछु आर' हा दुसरा काव्यसंग्रह याच वर्षी ‘नवारंभ’ने  प्रकाशित केला. तब्बल नऊ वर्षांनी प्रकाशित झालेला हा काव्यसंग्रह मैथिली साहित्यव्यवहारात  बराच चर्चिला जात आहे. मैथिली साहित्याचे अभ्यासक जीवकान्त यांनी अरुणाभ यांच्या प्रेमकवितांची तुलना मैथिलीतील सर्वश्रेष्ठ कवी विद्यापती यांच्याशी केलेली आहे. ‘दिन बनने के क्रम में'  हा त्यांचा पहिला हिंदी कवितासंग्रह भारतीय ज्ञानपीठ ने प्रकाशित केला. या संग्रहातील ‘ओ स्साला बिहारी' या कवितेने कामानिमित्त स्थलांतरित झालेला बिहारी माणूस त्यांनी अतिशय समर्थपणे उभारलेला आहे. ‘मूळचे आणि बाहेरच्या'  या निरर्थक वादात आपण एखाद्या समूहावर कसा अन्याय करतो, हा या कवितेचा गाभा आहे. ते सांगतात
अपने टपकते पसीने में सीमेंट-बालू सानकर
उसने कलकत्ता बनाया था
अपने खून में चारकोल सानकर
उसने बनाए थे दिल्ली तक जाने वाले सारे
राष्ट्रीय राजमार्ग
वज्र जैसी हड्डियों की ताकत से
उसने खड़ी की थीं
बम्बई की सारी ईमारतें
फेफड़े में घुसे जा रहे रुई के रेशे से
खांसते-खांसते दम ले-लेकर
उसने खड़ा किया था सूरत
उसके बिना जाम ही जाती हैं
हैदराबाद से लेकर शिलांग तक की सारी नालियां.
स्वतःची जिंदगी अक्षरश: झिजवून एक अनोखं जग फुलवणाऱ्या या कष्टकऱ्यांची आपण दखल घ्यायला हवी, असे कवी सांगतो. भाकरीच्या शिकारीसाठी बाहेर पडलेल्या या माणसांना आपण मानवीय नजरेतूनच पाहायला हवे, असे कविला वाटत आहे.
अरुणाभ यांना कामानिमित्त काही काळ आसाममध्ये राहण्याची संधी मिळाली. तिथले संघर्षमय जीवन त्यांनी जवळून जवळून अनुभवलेले आहे. याच दरम्यान ते आसामी भाषाही शिकत होते. त्यातूनच त्यांनी आसामच्या ‘कविता कर्मकार' या तरुण कवयित्रीच्या काही कविता हिंदीमध्ये भाषांतरित केल्या. ‘राजा की जयकार ही प्रजा की एकमात्र नियति है /सरहदें खून माँगती है /वो सरहद कहाँ जहाँ फूल खिलते हैं. असं लिहिणाऱ्या या असामी कवयित्रीचा संघर्ष हा आपल्या काळाचाच संघर्ष आहे, असे कवी सांगतो. आणि याच भूमिकेतून त्यांनी कविता कर्मकार यांच्या साहित्याचे हिंदीमध्ये भाषांतर केलेलं आहे.

 

कोसी नदीच्या प्रलयामुळे बिहारची जनता नेहमीच त्रस्त राहिलेली आहे. कित्येक दशकांपासून कोसी हि बिहारसाठी शाप ठरते आहे. या प्रलयातून विस्थापित झालेल्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. पण मायबाप सरकारला मात्र याबाबत प्रचंड अनास्था आहे याची कविला जाणीव आहे. अरुणाभ लिहितो - हम मिथिला के लोग हैं.  हर साल बाढ़,विस्थापन और ग़रीबी की मार झेलते हैं.  हर बार प्राकृतिक आपदा और पलायन को अपनी नियति मानकर जीते हैं.  फिर जीना हमारी फितरत है, पानी में डूबकर भी जीते हैं.  माँ का दूध और कोसी के बाढ़ का पानी एक साथ पिलाकर हमें पाला गया है. हे देश के नीति नियंताओं, हे पटना-दिल्ली की सरकार आप इत्मीनान से राज करें. आपका शासन-प्रशासन चुस्त-दुरुस्त है, आपके इंतज़ामों के क्या कहने.  प्रलय को आने दें, हम प्रलय में भी चट्टान सी छाती रखते हैं. हम विद्यापति का गीत गाकर जीते हैं - इन गीतों में इतनी ताक़त है कि हमें बचा लेती हैं... आम्ही नष्ट झालेल्या शेतीमातीची शपथ घेऊन सांगतो, की आम्ही कोणापुढेही हात पसरणार नाही. कवी पुढे सांगतो, की पलायन हमारी नियति है, प्रलय हमारा स्थायी सहचर. एकंदरीतच अरुणाभ सौरभची कविता एकाच वेळी बिहारची पिडित जनता नि तिचा क्रोधीत वर्तमान वाचकांसमोर उभा करण्यास यशस्वी ठरते आहे.

 

‘आद्य नायिका' ही अरुणाभ यांनी लिहिलेली दीर्घ कविता. ही कविता हिंदीमधील ‘पक्षधर' या महत्वाच्या पत्रिकेने प्रकाशित केलेली आहे. या कवितेत कवीने मौर्यकालीन इतिहासासोबतच पौराणिक मिथकांचा वापर करत आपल्या समकाळाचे एक भयाण वास्तव अधोरेखित केले आहे. १९१७च्या दरम्यान गंगेच्या काठावर झालेल्या खोदकामात मौर्यकाळातील यक्षिणीचे एक शिल्प सापडले होते. त्या यक्षिणीला मध्यवर्ती ठेवत कवीने यक्ष नि यक्षणीच्या संवादातून मौर्यकाळ ते आपला वर्तमान असा शब्दांकित केलेला आहे. तो फक्त दोन प्रेमिकांचा प्रेम-संवाद न राहता तत्कालीन काळाचे दस्ताऐवजीकरण आहे. त्या काळात पुष्यमित्राने राजाज्ञा काढून बौद्ध भिक्कूच्या केलेल्या निर्घृण हत्यांची पार्श्वभूमी या कवितेला आहे. म्हणूनच यक्ष त्याच्या प्रेयसीला सांगतोय - कि इसीलिए यह यक्ष / तुम्हें इस हत्याओं के देश से / स्वतंत्र करने / कहीं दूर ले जाने आया है. या धर्मांध युद्धकाळाची जाणीव करून देणारा कवी सांगतो, कि - मार दिए गए असंख्य विचारक / दार्शनिक कलाकार / और उनकी घरों को उनकी किताबों के साथ /जला दिए गए / हत्याएं होती रहीं विचारों की / और फफक-फफक कर / रोता रहा पाटलिपुत्र / अधजला अधमिटा / वर्तमान के साथ.

 

नि हे सारे विध्वंस आणि विकृतीचे धागे कवी अगदी आपल्या आजच्या वर्तमानापर्यंत घेऊन येतो. धर्माचा आधार घेऊन वाढणारी संप्रदायिकता आपल्या हाकेच्या अंतरावर आलेली आहे. दिवसेंदिवस फॅसिस्टवादी शक्ती अधिकच प्रबळ होताना दिसते आहे. नि दंग्याच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला सापडलेल्या या काळात आपण मात्र भूतकाळाकडून काहीच शिकत नाही, म्हणून कवी अधिकच हताश होतो आहे. मिथकों और इतिहासों से / मैं सीख नहीं पाया कुछ / विस्मृत हो गयी मेरी स्मृतियाँ / खो गयीं दिव्य शक्तियाँ असे सांगणाऱ्या अरुणाभ यांची ‘आद्य नायिका' ही दीर्घ कविता अनेक अर्थाने महत्त्वाची आहे.

 

अरुणाभच्या कवितेत आपणाला एक हतबल असा गाव आढळून येतो. तो आपल्या इथल्या गावांसारखाच आहे. खरंतर त्याची कविता ही खेड्याचा देश म्हणवणाऱ्या या महान देशाचा मुखभंग करते आहे. म्हणजे, घरादारापासून कामाधंद्यासाठी दूर गेलेल्या स्थलांतराच्या कहाण्या सांगत असतानाच, तो मागे उरलेल्या गावाकडे मात्र संवेदनशीलतेणे पाहतो आहे. ‘हेराएल कातिक पूर्णिमा' या मैथिली कवितेत तो लिहितो - अपना गाम मे / आब सामा मे / नहि रहैत अछि / भाइ आ बहिन / भारतक अलग-अलग / कोन मे बसि गेल / भाइ आ बहिन. अशा कित्येक कवितेतून त्याने मागे उरलेला गाव नि त्याचे ओसाड जगणे वाचकांसमोर ठेवलेले आहे. अरुणाभच्या कवितेतून उभे राहिलेले ‘गांव की उदासी का गीत' वाचकांना अक्षरश: अस्वस्थ करून सोडते. बदलत्या गावासोबतच हरवत चाललेल्या संस्कृतीचीही कवीला जाण आहे. कवी सांगतो - अब तो पड़ोस में सड़ रही / लाश की गंध तक हमे नही आती / पडोसी की उदासी हमारे लिए आनंद है.

 

अरुणाभ सौरभ हा कवी आपल्या कवितेतून पौराणिक मिथकांची मोडतोड करत एक आधुनिक संस्कृतिसंघर्ष उभा करू पाहतोय. तो आजच्या जगण्याला भिडणारी कविता लिहू पाहतोय. ती रस्त्यावर उतरून लढणाऱ्यांसाठी शस्त्र बनू पाहतेय. हा कवी सर्जनशील हस्तक्षेपासाठीची मोर्चेबांधणी करतो आहे. आणि तेही आपल्या मर्यादा स्वीकारून. कारण कवी सांगतोय - ‘इन सबका हिसाब किताब / मैं एक कविता लिखकर / कैसे लगा सकता हूँ'. एकूणच आपला आसपास असा राक्षसी वेगाने बदलत असताना आपले दायित्व फक्त कविता लिहिण्यापुरतेच मर्यादित आहे का, हा अरुणाभचा प्रश्न आपणाला निश्चितच विचार करायला भाग पडणारा आहे.

 

shinde.sushilkumar10@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३

 

बातम्या आणखी आहेत...