Home | Magazine | Madhurima | Swati Ganoo writes about different personalities

मि. परफेक्शनिस्ट

डॉ. स्वाती गानू, पुणे | Update - Jul 31, 2018, 06:00 AM IST

आपण प्रत्येकजण कुठलं ना कुठलं काम करतच असतो. मात्र फक्त काम करणं म्हणजे एक प्रकारची यांत्रिकता.

 • Swati Ganoo writes about different personalities

  आपण प्रत्येकजण कुठलं ना कुठलं काम करतच असतो. मात्र फक्त काम करणं म्हणजे एक प्रकारची यांत्रिकता. सर्वांना घेऊन, नियोजनपूर्वक तसंच कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घेऊन काम करणं ही प्रयत्नपूर्वक साधण्याचीच बाब आहे. आपल्या कामात व्यवस्थितपणाचं सातत्य राखणाऱ्या जबाबदार आणि प्रामाणिक स्वभावाच्या माणसांविषयी...


  शशांक शहा शाळेचा आदर्श विद्यार्थी म्हणून स्नेहसंमेलनात गौरविला गेला तेव्हा त्याच्या पालकांप्रमाणेच सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान दिसत होता. शशांकचा अभ्यास, त्याच्या वह्या, त्याचं मॉनिटर म्हणून वर्ग सांभाळणं, स्टेजवरचं भाषण, मैदानावरचं श्रमदान किंवा शिक्षकांशी त्याचं बोलणं; प्रत्येक बाबतीत त्याच्या स्वभावातलं प्रामाणिकपणे काम करणं अगदी स्पष्ट जाणवायचं.


  रोहिणी नामजोशींचं ऑफिसमधलं प्रत्येक काम पूर्ण तयारीनं केलेलं असायचं. व्यवस्थित पूर्वतयारी केल्याशिवाय ती कामाला हातच लावत नसे. तिचे पेपर्स, प्रोजेक्ट, फाइल वर्क, तिची टीम याबाबत ती चोख असायची. तिच्याकडे एखादा प्रोजेक्ट दिला की ती तो प्रामाणिकपणे व्यवस्थित पूर्ण करणारच, याची खात्री केवळ तिलाच नाही तर तिच्या वरिष्ठांनाही असायची. त्यामुळेच तिच्याबरोबर काम करताना नवीन सहकारी नेहमी उत्सुक असायचे. तिच्यासारखं आपण व्हावं अशी त्यांची इच्छा असायची. ‘महिन्यातील सर्वोत्तम कर्मचारी’ म्हणून तिचा फोटो जेव्हा कार्यालयाच्या सूचना फलकावर लागायचा तेव्हा इतर तरुण कर्मचारी आपला फोटो तिथं लागायची स्वप्नं पाहायचे. कारण तिच्या कामात स्पष्ट अधोरेखित व्हायचा तो तिचा प्रामाणिकपणा अर्थात conscientiousness.


  आपल्या घरात काम करणारी स्वयंपाकीण, केरलादी करणारी बाई किंवा अन्य काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांमध्येसुद्धा अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आपल्याला दिसतात. घरातली भांडी नीट लावून ठेवणारी, कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालणारी, सांगितलेली कामं वेळेवर आणि चोख करणारी माणसं ही प्रामाणिक स्वभावाची असतात. ऑफिसमध्ये वेळेपूर्वी दहा मिनिटं जाणारी, काम पूर्ण केल्याशिवाय टेबल न सोडणारी, जेवणाची सुटी संपताच परतणारी, दिलेलं काम जबाबदारीनं आणि वेळेत पूर्ण करणारी माणसं या प्रकारची असतात. अशी माणसं सर्वांना हवीहवीशी वाटतात. या व्यक्तींची कामाबद्दलची जाणीव त्यांच्या कामातून प्रतीत होत असते. त्यांच्या वागण्याचा प्रभाव त्यांच्या भोवतालात असणाऱ्या इतरांवर पडतोच पडतो. ही माणसं आपल्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करतात. त्यांचा स्वभाव महत्त्वाकांक्षी असतो. कामाची पूर्ण तयारी, आवश्यक गोष्टी संघटित करून ठेवल्यामुळे ते कुठलाही ताण घेत नाहीत. अगदी मजेत आरामशीर राहतात. त्यांच्याबरोबर काम करताना तणाव जाणवत नाही. अशी प्रामाणिकपणे काम करणारी माणसं तुमच्या अवतीभवती असतील तर ती त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावामुळे इतरांच्या चटकन लक्षात येतात. मित्र, कुटुंबापासून सहकारी, वा अनोळखी माणसं कुणीही या माणसांशी पहिल्यांदा झालेल्या भेटीत यांच्या स्वभावातली टापटीप ओळखू शकतात. यांचा पहिला प्रभाव पडतो तो त्यांच्या प्रामाणिक स्वभावाचा. आपल्या कामाबद्दल ते अतिशय कर्तव्यकठोर असतात. रोजच्या कामात आपल्या शब्दाचा, कृतीचा परिणाम होत असतो याची या व्यक्तींना जाणीव असते. अनवधानानेसुद्धा आपल्या वागण्या-बोलण्याने दुसरा माणूस दुखावला जाऊ नये याबाबत ते सजग असतात. त्यांचं कामाचं डेस्क, त्यांची बेडरूम, त्यांची प्रत्येक गोष्ट ‘वेल ऑर्गनाइज्ड’ असते. बघत राहावं इतकं सुंदर काम ते करतात. मानसशास्त्र सांगतं की, अशा माणसांचं आयुष्यमान दीर्घ असतं. त्यांच्या काळजीपूर्वक वागण्याने अपघातदेखील कमी होतात. ज्यांच्यावर अवलंबून राहावं, विश्वास ठेवावा अशी ही माणसं असतात. डायरी, त्याच्यातील नोंदी, कार्यक्रम यामुळे जणू ती दोन पावले पुढे असतात. पूर्ण तयारीनिशी.


  यांच्यामधलं वेगळेपण म्हणजे ते कुणी सांगितलं म्हणून काम करत नाहीत. तर आपल्या कामाच्या दृष्टीनं ते स्व:साठी ध्येयनिश्चिती करतात. आणि त्या उद्दिष्टपूर्तीसाठी ते आपली ऊर्जा वापरतात. जेणेकरून एकाग्रतेने ध्येय सिद्ध होईल असंच त्यांचं नियोजन असतं. कामात पूर्णपणे झोकून देणाऱ्या अशा कष्टाळू व्यक्ती अगदी निष्ठेनं आपलं काम करतात. कामाबद्दलच्या त्यांच्या इच्छाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी त्या आपलं पूर्ण लक्ष आणि ताकद उपयोगात आणतात. कठीण परिस्थितीतही ते आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवतात.


  काम करताना, निवड करताना, पर्याय ठरवताना, ही माणसं थोडा वेळ घेतात. मात्र आपल्या निर्णयाबद्दल त्यांना खात्री असते. घाईघाईने घेतलेल्या निर्णयापेक्षा विचारपूर्वक निर्णयांवर त्यांचा विश्वास असतो. अशा स्वभावाच्या व्यक्तींमध्येही प्रकार असतात. अशा स्वभावाच्या व्यक्तींचं मूल्यमापन त्यांचं कामातलं सातत्य किती आहे यावरून केलं जातं. त्यावरून निम्न, मध्यम आणि उच्च पातळीवरचं सातत्य दाखवणारे हे स्वभाव असतात. जी माणसं आपल्या चोख काम करण्यात खालच्या दर्जाचं म्हणजे अगदी कमी प्रमाणात सातत्य दाखवतात त्या ‘इम्पल्सिव्ह बिहेविअर’चा नमुना असतात, ज्याला आपण भावनावेगानं काम करणारे म्हणू. कारण ही माणसं आपल्या वागण्याचा, निर्णयाचा काय परिणाम होईल याचा विचार न करता उतावळेपणानं निर्णय घेतात. याउलट प्रामाणिक, चोख काम करणाऱ्या व्यक्ती योग्य पर्याय निवडण्यासाठी थोडा अधिक वेळ घेतात. पण आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याची त्यांना पूर्ण खात्री असते.


  या स्वभावाची माणसं, कोणतंही काम अपूर्ण ठेवूच शकत नाहीत. स्वयंशिस्त, सारं काही नीटनेटकं ठेवणं याबाबत त्यांचं स्वत:वर खूप नियंत्रण असतं. आपलं व्यक्तिमत्त्व, आपलं दिसणं, याबद्दल ते जाणीवपूर्णक चोखंदळ असतात. आपल्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांना, मित्रांना पालकांच्या भूमिकेतून काळजी घेऊन सांभाळतात. त्यांच्यात जबाबदारीची जाणीव खूप तीव्र असते. अशा व्यक्तीप्रमाणे आपणही आपल्या कामाबाबत जबाबदारीनं, प्रामाणिकपणे काम करावं असं मनाशी ठरवायला आणि अमलात आणायला हवं. कारण नुसतं काम करणं म्हणजे एक प्रकारची यांत्रिकता. पण सर्वांना घेऊन, नियोजनपूर्वक, तसंच कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घेऊन काम केलं तर ते कायमस्वरूपी होतं यात शंका नाही. ती यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असते. जपानी माणसं नम्रता, उद्योग आणि प्रामाणिक काम करण्यात अग्रस्थानी आहेत. काम करताना हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर प्रगतीच्या वाटा अधिकाधिक विस्तारत जातील यात शंकाच नाही.


  - डॉ. स्वाती गानू, पुणे
  ganooswati@gmail.com

Trending