आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरामय आयुष्य आणि स्वनिगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरामय आयुष्य आणि स्वनिगा हे आजचं जीवनकौशल्य प्रामुख्यानं किशोरवयीन मुलांसाठी. शाळेतल्या शिस्तमय आयुष्यातून खुल्या स्वैर जगातलं स्वत:प्रती आणि इतरांप्रतीचं वागणं अधिक काळजीनं आणि जबाबदारीनं असावं यासाठी खास.


प्रथम वर्षाच्या मुलांचा एनसीसी शिबीर सुरू होतं. दोन दिवसांपासून महाविद्यालयाची मुलं एका खेड्यात काम करत होती. या कामात एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळत असल्यानं ती मुलं खुश होती. सकाळचे दहा वाजले. विद्यार्थी शेतावर काम करत होते. कुदळ, फावडं घेऊन काम करणाऱ्या मुलांपैकी कृष्णा अचानक जमिनीवर कोसळला. सगळे जण तिथे धावले. बहुतेक ऊन लागलं असावं, रक्तदाब कमी झाला असावा म्हणून चक्कर आली असावी, असं सर्वांना वाटलं. पण छातीत प्रचंड कळा येत आहेत, असं कृष्णा म्हणाला. मग सुशांतने त्याला खोकायला सांगितलं. त्याचे कपडे सैल केले. प्रथमोपचार डब्यातली डिस्परिन त्याला जिभेवर ठेवायला दिली. तत्काळ मदत मिळावी म्हणून वैद्यकीय मदतीसाठी फोन केला. सुशांतचं प्रसंगावधान आणि प्रथमोपचारांमुळे कृष्णाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली.


नीलाक्षी ही बारावीत विज्ञान शाखेला शिकणारी, सुंदर, श्रीमंत मुलगी. प्रसन्नच्या प्रेमात इतकी बुडाली की, तिने साऱ्या मर्यादा ओलांडल्या. जेव्हा ती गर्भवती असल्याचं डॉक्टरनं सांगितलं त्या वेळी प्रसन्नने तिची जबाबदारी नाकारली आणि तिला एकटीला टाकून तो गायब झाला. वयात आल्यानंतर शरीरात होणारे बदल, येणारी प्रजननक्षमता, स्त्री म्हणून गर्भवती होण्याची प्रक्रिया याबद्दलची योग्य जाणीव नसल्यानं आपल्या शरीरातील अवयव आणि त्यांची घ्यावयाची काळजी याबाबत नीलाक्षी हवी तेवढी सावध राहिली नाही. तिचं कुटुंब आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला भावनिक आधार दिला म्हणून ती कशीबशी सावरली. पण शरीराबरोबरच मनावरही ओरखडा उमटला तो कायमचाच.


किशोरवयात मुलं मोठी व्हायला लागलेली असतात. त्यांचा शारीरिक विकास तर होतच असतो, पण त्याचबरोबर मन, भावना यांच्यामध्येही प्रगल्भता यायला हवी. सामाजिक दृष्टिकोनही तयार व्हायला हवा. या साऱ्यांसाठी मुलांमधे स्वत:च्या शरीराची काळजी, निरोगी राहणे, शरीराच्या वाढीविषयीची, रोगाबद्दलची माहिती असणे, प्रथमोपचार, लक्षणं-उपाय यांची प्राथमिक स्वरूपात माहिती असणे हे जीवनकौशल्य wellness and self care या नावानं ओळखलं जातं. ते मुलांनी आत्मसात करायला हवं, त्याचा उपयोग करायला हवा. मुलांना आपल्या शरीरातील पेशी, उती, अवयव, शरीरप्रणाली, व्यवस्था याबद्दल सविस्तर माहिती असायला हवी.


नुसतं इतकंच माहीत असून भागणार नाही तर आपल्या शरीरातील अवयवांची योग्य काळजी घेणं म्हणजे शरीराचा आदर करणं असतं हेही आपण त्यांना सांगायचं असतं. स्त्री-पुरुष यांच्या प्रजनन संस्थांची माहिती आणि प्रक्रिया माहीत असली तर नीलाक्षीच्या बाबतीत जे घडलं ते टाळता आलं असतं. शरीरात आणि मनात होणारे बदल, मासिक पाळी, पाळी चुकली तर होणारी गर्भधारणा, त्याची कारणं, त्यासाठी घ्यावयाची काळजी, लग्नापूर्वी या गोष्टी टाळण्याची आवश्यकता, याबद्दल जर व्यवस्थित माहिती आणि जाणीव दिली तर स्वत:चे शरीर सांभाळणे शक्य होते. आपल्या मुलांशी आपण या विषयांवर कधीच बोलत नाही. पण शरीराच्या गरजा निर्माण झाल्याने आणि कधी उत्सुकता म्हणून तर कधी मित्रांमध्ये बढाई मारण्यासाठी या वयातील तरुण मुलं असुरक्षित ठिकाणी जाऊन आपली शारीरिक गरज पूर्ण करतात. डॉक्टर किंवा अन्य माध्यमातून त्यांना एचआयव्ही, व्हीएसटीसारख्या भयंकर रोगाबद्दल सावध करणं अत्यंत आवश्यक आहे. निरोगी आयुष्य व स्वनिगा या जीवनकौशल्यासाठी आणखी एका भयंकर गोष्टीबद्दल, त्यांच्या परिणामाबद्दल तरुण मुलांना माहिती द्यायला हवी. जागरुक करायला हवे. या वयात शालेय शिस्तीची बंधने नसतात. अचानक मिळणारं स्वातंत्र्य, हातात येणारा पैसा, बेफिकिरी, स्वभावातील आक्रमकता, मित्रांची संगत, चंगळवाद आणि चैनीची ओढ, या साऱ्यामुळे सिगारेट, गुटखा, पान, तंबाखू यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाण्याचा धोका वाढतो. काही वेळेला तर याहीपुढे पाऊल टाकत ही मुलं अंमली पदार्थांच्या आहारी जातात. त्या व्यसनांपायी घरात, मित्रांच्या पाकीटामधून, पैशांची आणि दागिन्यांची चोरी करण्यापर्यंत मजल जाते. या गोष्टांपेक्षाही धोकादायक असतात ते या व्यसनांचे परिणाम. या गोष्टींमुळे संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकते. त्यामुळे प्रयत्नपूर्वक यापासून स्वत: दूर रहाणं आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही यापासून दूर ठेवणं म्हणजेच स्वत:ची काळजी घेणं आणि निरोगी जीवन जगणं असतं. काहींना असं वाटेल की, अज्ञानात सुख असतं. पण कधी कधी ही निरागसता मूर्खपणा ठरते आणि त्यातून मुलं चुका करतात. विशिष्ट वयानंतर म्हणजे १८ वर्षांनंतर मुलांना रक्तदानाचा, मतदानाचा, वाहन चालवण्याचा अधिकार दिला जातो. या नात्याने त्यांना स्वत:ची काळजी, दुसऱ्याची मदत आणि निरोगी राहण्याच्या दृष्टीनं जागं करणं, माहिती देणं, जीवनात येणारे मोहाचे क्षण आपल्याला कुठे घेऊन जातात ते समजावणे आवश्यक असते. यासाठी शरीरशास्त्राचा उपयोग करता येतो. मानवी पचनसंस्थेवर, प्रजनन संस्थेवर, व्यसनांचे आणि असुरक्षित शारीरिक संबंधांचे किती भयानक परिणाम होतात, त्यामुळे काय रोग होऊ शकतो हे सांगायलाच हवे. श्वसनसंस्थेला यामुळे किती धोका निर्माण होतो. या मार्गदर्शनाने मुलांना घाबरवायचे नाही तर त्यांना जपायचे आहे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे. जसे हे धोके दाखवायला हवेत तसेच शरीरामधील विविध संस्थांमध्ये कोणते रोग होतात, त्याची कारणे, त्यावरील उपाय आणि अर्थातच हे होऊ नये म्हणून यासाठी घ्यावयाची काळजीही लक्षात आणून द्यायला हवी. आपल्या शरीरावर आपण प्रेम करतो तर त्याला योग्य, चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी कोणत्या प्राथमिक गोष्टी, त्याचे निकष, अटी आपण पाळायला हव्यात याचे ज्ञान मोठ्यांनी मुलांना द्यायला हवे. शाळा महाविद्यालयामधून या जीवनकौशल्याचे शिक्षण मुलांना देण्यासाठी या विषयावर कृतीसत्रे घेता येतील. अगदी पथनाट्यातूनही याबाबत काम करता येईल. कठपुतळी, रांगोळी प्रदर्शन, नाटिका लेखन या माध्यमातून आरोग्यात निर्माण होणाऱ्या दोषांना कमी करण्यासाठी कोणती योग्य कारवाई करता येईल याचा उत्तम मार्ग दाखवता येईल.


प्रत्येकच व्यसन, धोका हा वैयक्तिक नसतो. पण विविध रोगांसाठी अर्थातच त्यावरील उपाययोजनांसाठी सरकारी किंवा निमशासकीय पातळीवर कोणत्या प्रकारच्या संस्था काम करतात त्याची पूर्ण माहिती मुलांना देता येईल. एखाद्या अचानक आलेल्या आजारपणात ही माहिती वापरता येईल. दुसऱ्यांना मदत करताना जे अनौपचारिक शिक्षण मिळेल त्यातून स्वत:ची काळजी घ्यायला हवी हे निश्चितपणे समजेल. अशा परिस्थितीत दुर्दैवाने जर सापडली तर त्यासाठीची तपासणी आणि समुपदेशनसुद्धा केलं जातं हे माहीत असलं तर मुले घाबरून जाऊन आत्महत्या करणे टाळतील. रोजच्या आयुष्यात होणाऱ्या दुर्घटनांच्या वेळी प्राथमिक उपचार देता आले तसेच गुन्हेगारी, हिंसा, अंमली पदार्थ यांच्या मोहात अडकणार नाही, असा मनाचा निर्धार करता आला, कुणी या गोष्टीत अडकवण्याचा, शोषण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विरोध कसा करायाचा याबाबत स्वत:ची धोरणे स्वत: ठरवता आली, किशोरवयीन गर्भारपण आणि त्याचे परिणाम जाणून घेतल्यानं ते टाळता आले तर, मुले एक चांगले आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकतील. हे जीवनकौशल्य त्यांना आयुष्यभर सोबत करेल. कसं जगावं याचा मार्ग दाखवेल. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की, युवकांनो उठा, जागे व्हा. बलाची उपासना करा. भारताच्या साऱ्या आशा-आकांक्षा तरुण पिढीवर एकवटल्या आहेत.’ असे आयुष्य जगण्यासाठी या ओळी निश्चितच प्रेरणादायी ठरतील.


- डॉ. स्वाती गानू, पुणे
ganooswati@gmail.com

बातम्या आणखी आहेत...