आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्‍टक-यांच्‍या बापाची माणूसगाथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कट्टर धर्मवाद्यांच्या गोळ्या लागून निधड्या छातीच्या आणि तत्त्वाच्या पक्क्या कॉ. गोविंद पानसरेंचा मृत्यू ओढवला. लौकिकार्थाने हा कष्टकऱ्यांचा आधारस्तंभ या जगातून गेला असला तरीही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे पैलू  त्यांच्यातले मोठेपण उजळवून टाकतात. प्रस्तुत छायाचित्र-चरित्र एका कार्यकर्त्याबरोबरच त्यांच्यातल्या हळव्या माणसाचेही दर्शन घडवते...


महाराष्ट्राची ओळख संतांची, वीरांची, योद्ध्यांची, सुधारकांची आणि कार्यकर्त्यांची मोहोळ असणारी भूमी अशी सार्थ आहे. वैयक्तिक लाभाची अपेक्षा न ठेवता, लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची तयारी ठेवलेले हे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभूषण आहेत. असेच एक ‘तत्वज्ञानाचा उद्देश केवळ जगण्याचा अर्थ लावण्याचा नव्हे, मानवाचा उद्धार करणे हा आहे.’ या विचारावर अपार श्रद्धा ठेवून आयुष्य जगलेला कार्यकता ज्याचे नाव आहे, दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे!
 गोविंद पानसरेंची असंख्य रूपे त्यांच्या कार्याची ओळख करून देतात. कार्ल मार्क्सच्या जग बदलण्याच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवून कष्टकऱ्यांमध्ये अखंड काम करत राहिलेला हा कॉम्रेड. पानसरेंमधील कार्यकर्त्याची ओळख, तर सर्वांनाच आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात हा माणूस कसा होता? आपल्या सहकाऱ्यांबरोबर तो कसा वागत होता? समाजाशी संवाद साधण्यासाठी तो कसा स्वतःला घडवत होता आदी काही प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे होते आणि ते काम कोल्हापुरातील कला शिक्षक, पानसरेंचे त्यांच्या कार्यातील पुढच्या पिढीतील सहकारी व पानसरेंचे मानसपुत्र अशी ज्यांची ओळख आहे, त्या मिलिंद यादव यांनी निर्मिलेल्या ‘कष्टणाऱ्यांचा बाप’ या पुस्तकातून झाले आहे.

 

वर्तमानाची  जाणीव ठेवून उद्याच्या सूर्याचे भविष्य पाहणारा  कॉ.पानसरेंचा चेहरा अत्यंत आश्वासकपणे मुखपृष्ठावरूनच आपल्याशी संवाद साधायला सुरुवात करतो. पहिले पान उघडताच, पाठमोरे चालत जाणारे पानसरे आपल्या विचारवाटेची ओळख क्षणात करून देतात आणि पुस्तकाच्या आत काय दडले आहे,याचा आपल्याला अचूक अंदाज येतो. लेखकाने हे पुस्तक अर्पण केले आहे,पानसरेंचे ज्येष्ठ सहकारी आणि ज्यांनी लेखक मिलिंद यादव यांना चळवळीतील गाणी शिकवली त्या कॉ. आत्माराम जानवेकर, कॉ. हिंदुराव गोंधळी व कॉ. गोपाळ कांबळे यांना. पुस्तकनिर्मिती मागील उद्दिष्ट सांगताना, आपल्यातील चांगला माणूस घडविण्यासाठी पानसरेंनी दिलेल्या योगदानाचा इथे लेखकाने आवर्जून उल्लेख केला आहे. या योगदानामागील मन उलगडून दाखविताना लेखकाच्या लहानपणीच्या दिवाळीशी जोडलेल्या आठवणीपासून ते पानसरेंच्या अंत्यसंस्कारापर्यंतचा या दोघांमधील बंध येथे उलगडत जातो. इतकेच नव्हे तर जवळपास १५ वर्षे वयाचे पानसरे ते ८० वर्षांचे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व असा एक दीर्घ प्रवास प्रामाणिकपणे आपल्या डोळ्यांसमोर उभा करण्यास लेखक यशस्वी होतो.
या पुस्तकाचे एक वैशिष्टय म्हणजे ,कॉ. पानसरे यांच्यातील माणुसकीचे धागे अलगदपणे आपल्यासमोर येतात. आज दिवंगत पानसरेंची देशपातळीवरील ओळख सामाजिक व राजकीय अंगाने मोठी आहे. पण माणूसपणाच्या पातळीवर त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा लेखकाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मोठमोठ्या सभा गाजवतानाचे पानसरेंचे फोटो आपण पाहिलेले असतात, पण घराच्या पायरीवर टॉवेल गुंडाळून उभे असलेले पानसरे, किंवा दाढी करताना फेस लागलेला पानसरेंचा फोटो या पुस्तकात समाविष्ट करून लेखकाने पानसरे नावाच्या योद्ध्याचे एक वेगळेच रूप समोर आणले आहे. समाजाच्या नजरेत मोठे असणाऱ्या लोकांचे हे साधे सरळ क्षण लोकांसमोर मांडणे हे विभूतीपूजक देशात धाडसाचेही आहे. एका मंदिराच्या पायाभरणीच्या प्रसंगीचा कम्युनिस्ट पानसरेंचा फोटो, निरीश्वरवादी असूनही संस्कृती-परंपरांविषयीचा त्यांच्या उदार दृष्टीकोनाचे दर्शन घडवतो. फेरीवाल्यांच्या टपरीवर चहाचे घोट घेत पुढील रणनिती डोक्यात घेवून विचार करणारे कॉम्रेडही इथे समोर येतात, तसेच लेखकांच्या चिमुरडीला आपल्या खांदयावर घेवून पाण्यात पोहणारे पानसरे आपले डोळे ओले करून जातात. कोल्हापूरचा मानाचा पुरस्कार छ. शाहू पुरस्कार घेतानाचा फोटो आणि मोलकरणींच्या मेळाव्यात, आपला घसा कोरडा करतानाचे पानसरे आपल्या आदराचा विषय बनून जातात.

 

तत्वज्ञानावर असणारा अखंड विश्वास आणि त्यानुसार केलेली आयुष्यातील कृती ही अंत्यसमयीदेखील किती दृढ होती, हे या पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा, मिलिंद यादव यांचे विद्यार्थी रोहीत कांबळेने टिपलेला पानसरेंचा चितेतून मूठ आवळत बाहेर आलेला हात पाहून समजून येते. एक विलक्षण लोकनेता म्हणून पानसरे लक्षात राहतात.   ज्या कष्टकऱ्यांकरिता पानसरेंनी आपलं आयुष्य वेचलं, त्या कष्टकऱ्यांच्या भाषेतच अनेक प्रसंग लेखक आपल्याला सांगून जातो, तेव्हा या पुस्तकाच्या अस्सलपणाची जाणीव मनोमन पटते. छोट्या मोठ्या प्रसंगातून आपण शिकण्याची आणि सहकाऱ्यांना शिकविण्याची त्यांच्यातली कला पाहून थक्क व्हायला होते. ज्या कामगारांच्या जीवावर, आपले समाजकारण करायचे आणि राजकारण करायचे, त्यांना हक्क मागताना आपले कामाप्रती कर्तव्य काय आहे, हे सांगणारा कॉम्रेड कोण विसरेल? हजारो कार्यकर्त्यांना छातीशी धरून कार्यप्रेरीत करणारे पानसरे स्वतःही त्या प्रेमाचे भुकेले आहेत, हे ओळखून त्यांना मिठीत घेणारे लेखक मिलिंद यादवही इथे आपल्या स्मरणात राहतात. डोळ्यांना कमी दिसू लागल्यानंतर’ अरे वाचता येणार नसेल, तर जगून उपयोग काय?’ असा सवाल जेव्हा पानसरे करतात, तेव्हा विचार आणि निष्ठा यांचं अनोखं नातं उलघडून जातं. हा प्रसंग डोळ्याच्या पापण्या अलगद ओल्या करतो.
‘डॉक्टरी नियमानुसार मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही, एवढंच नाहीतर मी त्यांचा मुलगाच.’ अशी आपली ओळख मिलिंद करून देतात, तेव्हा हे पुस्तक म्हणजे समाजाचा दस्ताऐवजच आहे, तसा तो भावनिक बंधही आहे हे सूचित करतो. म्हणून तर शाहू पुरस्काराच्या वेळी मिलिंद यांनी भेट दिलेला पांढरा शर्ट, ‘जशी आपली आज्ञा’ असे म्हणून पानसरे घालून जातात. छोट्या छोट्या प्रसंगातून व योग्य शब्दांनी आशयपूर्ण भावांनी व्यक्त होण्याची लेखकाची हातोटी वाखाणण्याजोगी ठरते. हे पुस्तक पानसरे नावाच्या महाराष्ट्रच्या कार्यकर्त्याला आपल्यासमोर जिवंत करते, हेच  लेखक-छायाचित्रकाराचे मौलिक यश आहे.


- कष्टणाऱ्यांचा बाप
- लेखक-मिलिंद यादव
- प्रकाशक-सायली ग्राफिक्स, कोल्हापूर (९८५०८४७३८४)
- किंमत-१०० रुपये.

 

umeshsuryavanshi111@gmail.com

 

 

बातम्या आणखी आहेत...