आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साडीतलं बाईपण’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक आणि वैभव. पंचविशी-तिशीतले सामाजिक कार्यकर्ते. कृतीतून अनुभव, नंतरच उक्ती या तत्त्वानं भोवताल बदलू पाहणारे.  मेळघाटातल्या एका शिबिरात दिशा केणेंच्या काव्यवाचन सत्राला दोघांनी साडी नेसून हजेरी लावली. तो दिवस दोघंही साडीत वावरले. बाईपण अनुभवत. कसं होतं हे पुरुषाचं साडीतलं बाईपण?


पुरुषासारखे पुरुष आणि साडी नेसलीय?
तुम्ही आमच्यासारखे ‘नॉर्मल’च आहात नं?
काही ‘प्रॉब्लेम’ आहे का?
काही बाबतीत समाज म्हणून तुमच्या आमच्या धारणा खूप पक्क्या असतात. ठोस बनलेल्या असतात. इतक्या की, त्या समजुतींना छेद देणाऱ्या लहानशा कृतीवरही आपण आक्रस्ताळेपणानं, सारासार विचार न करता प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो. मेळघाटातल्या शिबिरात साडी नेसून वावरणाऱ्या अभिषेक - वैभव यांनी असाच अनुभव घेतला. हे त्यापैकीच काही प्रातिनिधिक प्रश्न.


एक ते सात डिसेंबर या काळात मेळघाटात, डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे दांपत्यानं तरुणाई शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिरात दिशा केणेंचं काव्यवाचन सत्र होतं. या सत्रात, वैभव विमल गणेश आणि अभिषेक अनिता पुरुषोत्तम साडी नेसून उपस्थित होते. वैभव बंगळुरूच्या अझीम प्रेमजी विद्यापीठाचा, तर अभिषेक पुण्याच्या फर्ग्युसनचा विद्यार्थी. साडी नेसण्याची मूळ कल्पना वैभवची. शिक्षणासाठी वाटा वेगळ्या होण्याआधी दोघंही पुण्यात एकत्र होते. त्यावेळी स्त्रीवाद, लैंगिकता, ट्रान्सजेंडर व्यक्तींबद्दल शिकताना, मित्रमंडळींच्या गटचर्चा व्हायच्या. मात्र, चर्चेतून काही साध्य होणार नाही हे वैभवच्या लक्षात आलं. ठोस कृतीशिवाय हाती काही गवसणार नाही हे त्याने जाणलं. त्यातूनच मग काही तासांसाठी साडी नेसून एका स्त्रीचं आयुष्य जगायचं हे वैभवच्या मनानं पक्कं केलं.


‘यूट्यूबवर पाहून मी साडी नेसली. अभिषेकला शिबिरार्थी मैत्रिणीनं साडी नेसवून दिली. सार्वजनिक ठिकाणी अशा पोशाखात वावरताना मनात धाकधूक होती. पण त्या काही तासांमधे साडीत वावरण्यानं मनात प्रश्न, विचाराची वावटळ उठली. एक पुरुष म्हणून जी आधी कधीच उठली नव्हती,’ वैभव सांगतो. ‘परकर बांधणं, ब्लाउज घालणं, निऱ्या खोचणं, पदर पिनअप करणं हे सगळं आमच्यासाठी नवं होतं. अडचणीचं होतं. पण आम्ही ते केलं. साडी नेसल्यानंतर दिसणारं पोट, पाठ आणि कमरेमुळे आम्हाला विचित्र वाटत होतं. मात्र, बहुतांश स्त्रिया साडी घालून सार्वजनिक ठिकाणी वावरतात. उघड्या भागांवर पडणाऱ्या पुरुषांच्या नजरा झेलतात. नकोशा स्पर्शांचा सामना त्यांना करावा लागतो. तेव्हा त्यांना काय वाटत असेल हे प्रत्यक्ष अनुभवलं. कुणी कितीही सांगूनही समजली नसती अशी ही बाब होती. आजकाल अनेक महिला जीन्स, स्कर्ट, पंजाबी ड्रेस आणि इतर पाश्चात्त्य पोशाख वापरतात. मग स्त्री समजून घेण्यासाठी साडीच का, यावर वैभव म्हणतो, पुरुषी मानसिकता महिलांना संस्कृतीच्या आडून दुय्यमत्व देते. साडी हे त्या संस्कृतीचं प्रतीक. आजही अनेक महिला साडीतच वावरतात. कधी नाइलाज, तर कधी परंपरा  म्हणून. अशा वेळी त्यांच्या नक्की काय भावना असतील हे जाणून घ्यायचं होतं म्हणून साडी निवडली. या प्रयोगानंतर स्वत:त काय बदल जाणवतो, यावर वैभवनं दिलेलं उत्तर त्यांचा उद्देश सफल झाल्याचं दर्शवतो. तो म्हणतो, काही तासांच्या ‘बाईपणा’ने माझी आई, बहीण, मैत्रीण, कॉलेजमधल्या सहकाऱ्यांशी वागण्याची पद्धत  मी बदललीय. इतके दिवस स्त्रिया त्यांच्यावरच्या अन्यायाला उत्तर का देत नाहीत, धीटपणे का उभं राहात नाहीत, असं वाटायचं. स्त्रीवादी संस्था-संघटनांचा रागही यायचा, मात्र आता स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीत स्वत: सक्रिय सहभागी झालोय. 
हे समाधान शब्दातीत आहे, असं तो म्हणतो.


आजचा तरुण भरकटल्याची टीका वारंवार होते. नाण्याची एक बाजू खरी असली तरी वैभव आणि अभिषेकसारखे तरुण ही याच नाण्याची दुसरी आश्वासक बाजू. प्रत्येक विचार हा तर्क आणि कृतीच्या कसोटीवर पारखण्याची आजच्या तरुणांची वृत्ती आहे. याच झपाटलेपणातून वैभवनं, वाहतूक चौकात बुटपॉलिश करणारा, हॉटेलातला वेटर, रस्त्यावरचा भिकारी, अशा लोकांचं जीवनही अनुभवलंय.


मेळघाटातल्या शिबिरात एकत्रित राहताना त्यानं घरकामही केलं. भविष्यात प्रसंग उद्भवलाच तर स्त्रियांचे कपडेही धुता यायला हवेत. त्यात कमीपणा अथवा किळस वाटू नये. या भावनेतून त्याने महिलांचे कपडेही धुतले. असे प्रयोग करण्याची प्रेरणा कोल्हे दांपत्याकडून मिळाल्याचंही तो नमूद करतो. 


‘आमच्या घरात बाबा,भाऊ आणि मी असे तीन पुरुष आणि आई एकटी स्त्री. घरकाम तीच करायची. शिवाय नोकरीनिमित्त रोजचा सत्तर किमीचा प्रवासही. हे सगळं ती साडी नेसूनच करायची. आई ही भूमिका कशी निभावते याचं कुतूहल होतं. याच कुतूहलापोटी मी वैभवच्या प्रयोगात सामील झालो’, असं अभिषेक म्हणतो. सार्वजनिक ठिकाणी साडी नेसण्याचा अनुभव खूप वेगळा होता. शिबिरार्थी मैत्रिणीनं मला साडी नेसवली. पदर, निऱ्या, ब्लाउज आणि इतर ठिकाणीही साडीला पिना लावाव्यात, असं मी म्हटलं. पण सगळ्याच महिलांना पिना लावायला मिळत नाहीत, असं ती म्हणाली. मग मी फक्त पदरालाच पिन लावली. सवय नसल्यामुळे ब्लाउज सारखा नीट करावा लागत होता. हालचालींत थोडा वेळ अवघडलेपण जाणवल्याचं अभिषेक सांगतो.


राष्ट्रीय सेवा योजनेत तयार झालेला अभिषेक अनेक सामाजिक उपक्रमांत पुढे आहे. तारांगण या त्याच्या संस्थेच्या माध्यमातून गावागावातल्या किशोरवयीन मुलामधे स्त्री-पुरूष समानता, मासिक पाळी बद्दल प्रबोधन करतो. पुस्तकातलं तत्त्वज्ञान भाषणात मांडलं की, समोरचा प्रभावित होतो. मात्र त्या भाषणाला जेव्हा प्रात्यक्षिकाची जोड मिळते तेव्हा ती एक साखळी तयार होते. जे बोलतो ते करायचं. जे करू तेवढंच बोलायचं, हे तो कटाक्षानं पाळतो. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात कुठल्या तरी रूपात स्त्री असतेच. त्यांनी त्या स्त्रीला समान महत्त्व दिलं पाहिजे. त्याची सुरुवात स्वत:पासून करावी यासाठी साडी नेसण्याचा निर्णय घेतला असं अभिषेक म्हणतो. 


ज्या दिशा केणेंच्या काव्यसत्रात वैभव-अभिषेकनं हा प्रयोग केला त्या दिशाजींना याबद्दल काय वाटलं हेही जाणून घेतलं. त्या म्हणतात, ‘स्त्रियांच्या दृष्टीनं सामाजिक मानसिकतेत बदल होणं गरजेचं आहे. अशा प्रयोगातून जुन्या विचारांची चौकट मोडता येऊ शकते. तिथं उपस्थित तरुणांमधे  चौकटीपलीकडं जाण्याची तयारी मला दिसली. हा बदल त्या दोघांच्या कृतीमुळे झाला. हे  प्रशंसनीय आहे’.


भारतात स्त्रियांना आवडीचा पोशाख परिधान करण्यावर बंधनं आहेत. पूर्वापार पद्धत म्हणून साडी नेसावी लागते. पण ही वेशभूषा तिच्यासाठी आरामदायी आहे का, हे कुणीच विचारात घेत नाही. कंबरेवर घट्ट बांधावा लागणारा परकर, अंतर्वस्त्रांसहित दिवसभर अंगाला घट्ट चिकटून असणारं ब्लाउज आरोग्याच्या दृष्टीनंही अपायकारकच. स्वत: ऋतुमानाप्रमाणे सुटसुटीत कपडे वापरणारा पुरुष स्त्रियांच्या या समस्येकडे दुर्लक्षच करतो. पुरुषी उत्पादनांच्या जाहिरातीत स्त्रियांचा तोकड्या कपड्यातला अनावश्यक वापर सर्वमान्य आहे. दुसरीकडे एखाद्याच्या गैरवर्तनाबद्दल त्याला जाहीरपणे साडीचोळी दिली जाते. साडी हे उपहासाचं, कमकुवतपणाचं प्रतीक समजून  ते वापरलं जातं. पर्यायानं हा पोशाख वापरणाऱ्या स्त्रीवर्गाकडेही दुय्यमत्व ओघानंच येेतं.


या दोन मित्रांच्या अशा प्रयोगामुळे कुठे समानता येते का? असा  प्रश्न उपस्थित होऊ शकतो. दोघांची कृती भलेही छोटी असेल. त्या कृतीचे अनेक अन्वयही निघतील. कुवतीनुसार निघालेले निष्कर्ष, माणूसकीच्या वर्गात आपण कुठल्या इयत्तेत आहोत हे दर्शवतील. कारण कुठल्याही अभ्यासक्रमात नसलेले धडे अनुभवातून मिळतात. हाच अनुभव शहाणपण शिकवतो. म्हणूनच असे प्रयोग सातत्यानं व्हायला हवेत. 


स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकीन तयार करणारे अरुणाचलम मुरुगनाथम असतील किंवा साडी नेसून वावरणारे वैभव-अभिषेक. हे तिघंही सहृदयतेच्या एकाच पातळीवर आहेत. या तिघांनीही पाऊल उचललं ते आपल्यासारख्या हाडामासाच्या स्त्रीच्या वेदना समजून घेण्यासाठी. जाणिवेच्या पातळीवरची ही समजउमज अशीच कणाकणानं वाढत राहील. त्याला स्वच्छ पारदर्शी विचारांचे धुमारे फुटतील. सहवेदनेतले ‘जबाबदार पुरुष’ घडत राहतील अशी आशा करूया.


‘आमच्याकडे चालत नाही...’
स्नानानंतर बनियन घालून टॉवेल गुंडाळून पुरुष बाथरूम बाहेर येतात. मात्र, जागेअभावी किती तरी महिलांना ओलेत्यानेच साडी नेसावी लागते. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. यातला त्रास आणि गैरसोय पुरुषांनी समजून घ्यावी. त्यामुळे कदाचित ‘आमच्याकडे चालत नाही’ या सबबीखाली साडी नेसण्याची अट शिथिल होऊ शकेल...   


- वंदना धनेश्वर, औरंगाबाद
vandana.d@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...