आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिची सशक्‍त व्‍यंगरेषा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाण्यात दोन दिवसांपूर्वीच मराठी व्यंगचित्रकार संमेलन पार पडलं. यात महिला कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. राधा गावडे, शरयू परकांडे,अश्विनी मेनन,अशी सध्या कार्यरत मोजक्या महिला व्यंगचित्रकारांची यादी भविष्यात वाढेल,अशी आशा या संमेलनाच्या निमित्तानं करायला हरकत नाही...


ज्येष्ठ साहित्यिक न.चिं. केळकर यांचं एक वाक्य आहे. ‘विनोद ही डोळ्यात अंजन घालून त्यातली घाण दूर करणारी शलाका आहे.’ विनोदी साहित्य एक प्रकारे समाजाचे डोळे उघडण्याचं काम करतं. विनोदी कथा, कविता आणि व्यंगचित्रं यांचा उपयोग आजही यासाठीच जगभरात केला जात आहे. करमणूक वा मनोरंजन करतानाच वाचकाला अंतर्मुख करण्याची खूप मोठी ताकद व्यंगचित्रांच्या रेषेत असते. म्हणूनच वर्तमानपत्रातल्या बातम्यांइतकंच लक्ष वेधतात ती त्यातली व्यंगचित्रं. समाजातलं वास्तव, राजकीय घडामोडी, सामाजिक समस्या, वाईट चालीरिती, अनिष्ट प्रथा-परंपरा, अंधश्रद्धा, तात्कालिक घटना, यासह चौफेर विषयांना खमंग फोडणी देत मार्मिक भाष्य करणारी व्यंगचित्रं वाचकांना आवडतात. दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं, दिवाळी अंकात तर ही व्यंगचित्रं खास आकर्षणाचं केंद्र असतं. व्यंगचित्र विषयाला वाहिलेले दिवाळी अंक दरवर्षी आवर्जून खरेदी करणारा मोठा वाचकवर्ग आहे. आर.के. लक्ष्मण, शंकर किर्लोस्कर, रवींद्र खानंदे, वसंत गवाणकर, बाळ ठाकरे, प्रभाकर ठोकळ, शि.द. फडणीस, रूपेश तळासकर, हरिश्चंद्र लचके, वसंत सरवटे, सुधीर तेलंग, राज ठाकरे, सुरेश क्षीरसागर, गणेश जोशी, अमोल ठाकूर, महेंद्र भावसार, अशी मोठी आणि गुणवत्तापूर्ण कलेचा इतिहास असलेली व्यंगचित्र परंपरा मराठीला लाभलेली आहे. १८९५ मध्येे पहिलं रंगीत व्यंगचित्र, ‘द यलो किड’  प्रकाशित झाल्याचा उल्लेख राजेंद्र सरग यांनी एका लेखात केलेला आहे. यावरून व्यंगचित्राची परंपरा किती पुरातन आहे याचा अंदाज येतो. मात्र व्यंगचित्रकारांच्या या यादीत दुर्दैवानं एकाही महिलेचं नाव नाही. राधा गावडे, शरयू परकांडे, अश्विनी मेनन, शुभा खांडेकर, डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर आणि कल्पना नान्नजकर यांसारखी मोजकी नावं आज या क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. राज्यातल्या वृत्तपत्रांचा विचार केला तर एकही महिला व्यंगचित्रकार कार्यरत नाही. शिवाय वर उल्लेख केलेल्या महिलाही पूर्णवेळ व्यंगचित्रकार नाहीत. आवड आणि छंद म्हणून त्यांनी ही कला जोपासली आहे. हे चित्र बदलावं यासाठी ठाण्यातल्या या संमेलनात महिला व्यंगचित्रकारासाठी विशेष कार्यशाळाही आयोजली होती. 


बारा वर्षांपासून कमर्शिअल आर्टिस्ट असणाऱ्या वसईच्या राधा गावडे. १९९५पासून त्या दिवाळी अंकासाठी व्यंगचित्रं काढतात. वसईच्या चिमाजी वर्तमानपत्रात स्थानिक समस्येवरची व्यंगचित्रं पाठवण्यापासून त्यांनी सुरुवात केली. महिलांना मुळातच या क्षेत्राबद्दल पुरेशी माहिती नाही. व्यंगचित्रासाठी म्हणून विशेष असे कुठले अभ्यासक्रम नसतात. त्यामुळे इकडे महिलांना रुची वाटत नसावी, असं राधा यांना वाटतं. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मानधनही अल्प असतं, हेही महिलांच्या अनास्थेचं मुख्य कारण असावं. एरवी या क्षेत्रात स्त्रिया नसल्या तरी सोशल मीडियामुळे खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. त्यावर पोस्ट केलेल्या कार्टून्सना खूप मोठा प्रतिसाद मिळतो, असंही राधा सांगतात.


राजकीय व्यंगचित्रं, हास्यचित्रं, कॅरिकेचर (अर्कचित्रं) हे व्यंगचित्राचे महत्त्वाचे प्रकार. निवृत्तीनंतर अर्कचित्रांचा छंद जोपासणाऱ्या शरयू परकांडे यांना, राधा यांचा अल्प मानधनाचा मुद्दा पटतो. पैसा फारसा मिळत नसल्याने या कामाचा कुटुंबाला आर्थिक हातभार काहीच लागत नाही. यामुळेही स्त्रिया या क्षेत्राकडे पाठ फिरवत असाव्यात, असं पुण्यात स्थायिक असलेल्या शरयू म्हणतात. त्या सोळासतरा वर्षांपासून ग्राफिक डिझायनिंगमध्ये खाजगी कंपनीत कार्यरत होत्या. 


कंपनीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी अर्कचित्रांचा छंद जोपासला. आपला छंद पूर्ण करण्यासाठी पुरुषांना कुठलीच आडकाठी नसते. महिलांना मात्र सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, अशी खंत त्या व्यक्त करतात. वयोमानानुसार कौटुंबिक जबाबदाऱ्या आता कमी झाल्या आहेत. मुलं मोठी झाली आहेत. त्यामुळे नि:शंक मनाने या संमेलनाला मी जाऊ शकले. यूट्यूबवर पाहून शिकल्याने, परदेशात उपलब्ध पुस्तकाचं वाचन केल्यामुळे, सराव केल्यामुळे मी यात तरबेज झाले, असं त्या म्हणतात. निवृत्तीनंतर तरी स्वत:च्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी वेळा देता आला याचा आनंद आहे, हे त्यांचं वाक्य खूप काही सांगून जातं.


मुळातच व्यंगचित्रं काढणाऱ्या महिला कमी. त्यातूनही एखाद्या विषयाला वाहिलेली व्यंगचित्रं सातत्यानं काढणं ही तर दुर्लभ गोष्ट. व्यंगचित्रं प्रबोधनाचंही काम करतात. हे लक्षात घेऊन मुंबईच्या अश्विनी मेनन यांनी पर्यावरण व्यंगचित्राचं क्षेत्रं निवडलं. प्रख्यात द हिंदू या वृत्तपत्रात गेल्या वर्षभरापासून प्रत्येक रविवारी त्यांची पर्यावरणविषयक व्यंगचित्रं प्रसिद्ध केली जातात. निसर्ग संवर्धनात रमलेल्या आईवडलांकडूनच अश्विनी यांना हा वारसा मिळाला. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर रंजनात्मक पण धारदार भाष्य केलं की, लोकांना ते पटतं. हाच धागा त्यांनी आपल्या व्यंगचित्रात पकडला. विशेष म्हणजे, वृत्तपत्रात पर्यावरण विषयक कार्टून्स प्रकाशित व्हावी म्हणून अश्विनी स्वत: अनेक वृत्तपत्रांकडे गेल्या. त्यांनी पुढाकार घेऊन वर्तमानपत्रांशी पत्रव्यवहार केला. महिलांना या क्षेत्रात खूप संधी आहेत. सगळ्याच गोष्टींसाठी अभ्यासक्रम नसतात. काही गोष्टी स्वत: विकसित करायच्या असतात, हे महिलांनी लक्षात घ्यावं. तुम्ही स्वत:हून जोपर्यंत पुढे येणार नाही तोपर्यंत कोणकोणते मार्ग आहेत, हे कसं कळणार असा सवाल अश्विनी करतात.


मुंबईच्या शुभा खांडेकर मूळ पत्रकार. इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्रात त्यांना रस होता. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी या विषयाचा गांभीर्याने अभ्यास सुरू केला. तो करता करता त्या या विषयावर व्यंगचित्रंही काढू  लागल्या. २०१३ मध्ये त्यांचं पहिलं व्यंगचित्र प्रसिद्ध झालं. वर्षभरापूर्वीच त्यांच्या व्यंगचित्रांच्या संग्रहाचं आर्किओगिरी हे पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे. मधुरिमामध्ये आम्ही त्याचं परीक्षणही केलं आहे.

 
महिलांचं निरीक्षण खूप असतं. पण बघितलेलं शब्दांत आणि चित्रांत मांडायला त्या कमी पडतात. शिवाय स्त्रियांना विनोदबुद्धी कमी असते असा शिक्का मारला जातो. मात्र चपखल शब्दसंग्रह, नेमकं लेखनकौशल्य, निरीक्षण शक्ती, चौकस वाचन, विनोदबुद्धी, कल्पनाशक्तीचा योग्य वापर यांच्या मदतीनं त्यांना स्वत:वरचा हा शिक्का पुसून टाकता येऊ शकतो. रंजक, मार्मिक, आसू - हसूचा मिलाफ असणारी, प्रबोधनाची कडू गोळी साखरेच्या वेष्टनातून देणारी, वास्तवाचे पदर तटस्थपणे उलगडणारी, दु:खाचा क्षणभर विसर पाडणारी व्यंगचित्रं हे त्यासाठीचं एक सशक्त, प्रभावी माध्यम ठरू शकतं. अवकाश आहे तो स्त्रियांनी या क्षेत्रात येण्याचा. 


रंगरेषेच्या प्रदेशात मुशाफिरी करणाऱ्या आजच्या या मोजक्या महिला वाटसरूंना शुभेच्छा...


- वंदना धनेश्वर, औरंगाबाद
vandana.d@dbcorp.in

 

पुढील स्‍लाइडवर पाहा आणखी फोटो ...

बातम्या आणखी आहेत...