आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटुपुटूचा पुळका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट, नाटकं, जाहिराती, आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम अशी सगळीच प्रसारमाध्यमं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतात. आपण कसं वागावं, कसं दिसावं याबद्दल निरनिराळे संदेश त्यातून आपल्यासमोर येत असतात. कधी पारंपरिक तर कधी अत्याधुनिक! पण हे सगळे माध्यमसंदेश आपल्याला लिंगभावाबद्दल काय सुचवतात? आणि कशासाठी? याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देण्याचा प्रयत्न करणारे हे सदर.


माझी अगदी खात्रीच पटत चालली होती की, अखेर समाजसुधारकांची वर्षानुवर्षांची मेहनत फळाला आली आहे आणि महाराष्ट्रात क्रांती झालेली आहे! पुरोगामी महाराष्ट्रात किमान स्त्रियांच्या हक्कांविषयी तरी जागृती निर्माण करायची आता काही गरजच उरलेली नाहीये. कारण स्त्रियांवरच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायची जबाबदारी आता वृत्तवाहिन्यांनी घेतलेली आहे. कोणी चुकून जरी एखाद्या स्त्रीला किंचित जरी त्रास द्यायची हिंमत केली तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जागरूक वृत्तवाहिन्या त्याला उभा-आडवा फैलावर घेतील, जाब विचारतील, भंडावून सोडतील, याबद्दल मला जरासुद्धा शंका उरली नव्हती! कारण तो दिवसच तसा क्रांतिकारी होता! २० जून २०१८ या दिवसाची महाराष्ट्राच्या प्रसारमाध्यमांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हायला हवी. मनोरंजनाच्या नावाखाली स्त्रियांची प्रतिमा मलीन करणाऱ्या घटनेवर एकाच दिवशी चार मराठी वृत्तवाहिन्यांनी हल्लाबोल केला आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मातब्बर व्यक्तींना बोलावून तासभर विचारमंथन घडवून आणले. समाज कार्यकर्ते, राजकीय प्रवक्ते, कलाकार अशांनी चर्चा करत राहावे, अशी कोणती भयंकर घटना घडली होती, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? 


तर झालं असं की, सध्या कलर्स मराठी या मनोरंजन वाहिनी वरून “बिग बॉस” नावाचा एक गेम शो दाखवला जातो. एका घरात १०० दिवस एकत्र राहणाऱ्या अभिनेते मंडळींमधले परस्परसंबंध दाखवणे, असे त्या कार्यक्रमाचे साधारण स्वरूप असते. सर्वसाधारण प्रेक्षकांना अभिनेत्यांच्या खासगी आयुष्यात डोकावून पाहायला आवडते, अशा साध्या गणितावर बेतलेला हा कार्यक्रम आहे. त्यात नाट्यपूर्णता आणण्यासाठी या अभिनेत्यांना काही “टास्क” दिले जातात. या कार्यक्रमात १९ जून रोजी “हुकूमशहा” नावाचा एक रोलप्ले दाखवला जात होता. एका अभिनेत्याने हुकूमशहासारखे वागून इतर सहकलाकारांना त्रास द्यायचा, अशी खेळाची सुरुवात करून दिली होती. त्यानुसार हुकूमशहाच्या भूमिकेतला कलाकार त्रास द्यायला लागला. खेळात भाग घेणारे सगळे जण त्यात हसत हसत सामीलही झाले. काही काळाने हुकूमशहा घरातल्या सर्वांचे कपडे धुवायला लावणे, आपले पाय धुऊन घेणे, बूट पुसायला सांगणे अशी कामे देऊ लागला. नंतर त्यात स्त्री कलाकारांना नाच करायला लावणे, त्यांच्याकडून हातपाय दाबून घेणे, अशा कामांची भर पडली आणि त्याला जोड मिळाली हुकूमशहाच्या विकट हास्याची! नेमक्या याच घटनेमुळे मराठी वृत्तवाहिन्यांचे पित्त खवळले! 


दुसऱ्या दिवशी म्हणजे २० जूनला सकाळपासूनच बातम्यांमध्ये या दृश्यांच्या क्लिप्स दाखवायला सुरुवात झाली. सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत असल्याचे सांगितले जात होते. मराठी बिग बॉसमधून दुखापतीच्या कारणामुळे बाहेर पडलेल्या ऋतुजानेसुद्धा ट्विट केले – “अशा हुकूमशहाला मी धडा शिकवला असता.” याच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या महेश मांजरेकरांनीसुद्धा “मला शरम वाटते,” असे ट्विट केले असल्याची बातमी झळकू लागली. लवकरच एकेका वृत्तवाहिनीवर “बिग बॉस की बिग शेम?”, “ही करमणूक आहे की वखवख?” अशा शीर्षकाचे परिसंवाद जाहीर झाले. चार वाजता एकेका वाहिनीवर पाचसहा माणसे जमलीदेखील! राजकीय पक्षांचे प्रवक्ते, समाज कार्यकर्ते, स्त्री-पुरुष कलाकार, निर्माते सगळ्यांनाच या विषयावर बोलायचं होतं. वाहिन्यांवर सूत्रसंचालन करणारे पत्रकार त्वेषाने विचारत होते – बिग बॉसच्या घरात चाललंय तरी काय? मराठी मनोरंजन सभ्यतेच्या मर्यादा ओलांडतंय का? बिग बॉसला हा अपमानास्पद टास्क थांबवता आला नाही का? मनोरंजनाच्या नावाखाली पुरुषी अहंगंडाची वकिली होतेय का? महिलांना गुलाम म्हणून प्रोजेक्ट करणं पटतं का? हाच का जिजाबाई आणि सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र? सरकारचे डोळे आणि डोके ठिकाणावर आहेत का? बिग बॉसवर बंदी का घालू नये? – प्रत्येक वाहिनीवर चर्चेसाठी आलेले “तज्ज्ञ” या कार्यक्रमाच्या विरोधात बोलत होते. निषेध व्यक्त करत होते. काही जण तावातावाने पुढच्या पिढीवर काय संस्कार होतील याची काळजी व्यक्त करत होते, हुकूमशहाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला कार्यक्रमातून हाकलून लावायची मागणी केली जात होती. या चर्चा सुरू असताना – ‘मराठी बिग बॉसमध्ये महिला गुलाम! माताभगिनींच्या अब्रू आणि अस्मितेवरच घाला घातला जातोय! बिग बॉस चालू राहील, तर बेशरमपणा वाढत जाईल! अशा कार्यक्रमाविरुद्ध आवाज उठवायला हवा’ अशी वाक्ये टीव्ही स्क्रीनवर सरकताना दिसत होती. दुपारी चार वाजल्यापासून रात्री दहापर्यंत अवघा महाराष्ट्र पेटून उठल्याचे चित्र निर्माण झाले होते! केवळ एखाद्या गेम शोमध्ये चाललेल्या लुटुपुटूच्या भूमिका नाट्यातला स्त्रियांचा अपमान पाहून चवताळणारे इतके लोक महाराष्ट्रात आहेत, हे पाहून माझा ऊर भरून आला! पुरुषाच्या मनोरंजनासाठी स्त्रीने नाचणे, हातपाय चेपून देणे, असे अपमानकारक प्रसंग जर आपण एखाद्या खेळाचा भाग म्हणूनसुद्धा पाहू शकत नसलो तर वास्तव जीवनात अशा घटना घडल्यावर लोक अशा माणसाचा चेंदामेंदाच करून टाकतील नाही का? म्हणजे यापुढे रोजच्या रोज मनोरंजनाचा रतीब घालणाऱ्या मालिकांमध्ये बायकांच्या मुस्कटात भडकावणे, त्यांना घराबाहेर हाकलून देणे असे अनेक अपमानकारक प्रसंगसुद्धा बघावे लागणार नाहीत? कारण सगळे प्रेक्षक स्त्रियांच्या सन्मानाविषयी जागरूक झालेले आहेत. त्यांची सगळ्या कार्यक्रमांवर काटेकोर नजर असणार, या भावनेनेच मला किती सुरक्षित वाटायला लागलं होतं... पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्याच दिवशी एका मालिकेतल्या उच्चशिक्षित नायिकेला त्रास देण्यासाठी ऑफिसमध्ये जमीन पुसायला लावली गेली, आणखी एका मालिकेत एका महिलेच्या थोबाडीत लगावली गेली, पण त्यावर कुठेच आवाज उठवला गेला नाही. एका मालिकेतल्या बायकोचा नवरा आता गर्लफ्रेंडसोबत एंगेजमेंट करायला निघालाय, दुसऱ्या एका सुनेला उपदेश देण्यात आला की ‘स्वत:ला न पटणारी गोष्ट घरच्यांच्या प्रेमाखातर करायला धैर्य लागतं!’ सगळं पूर्वीसारखंच मागील पानावरून पुढे सुशेगाद सुरू आहे! 


बिग बॉस कार्यक्रमावर धुवाधार चर्चा घडवणाऱ्या कुठल्याही वाहिनीने यापुढे असे विकृत चित्रण मांडले जाऊ नये, यासाठी प्रेक्षकांची एखादी कृती समिती स्थापन करायचा पुढाकार घेतला का? मनोरंजक कार्यक्रमांचे निर्माते आणि प्रेक्षक यांच्यात संवाद घडवून आणायचा एखादा प्रयत्न तरी केला का? किमान स्वत:च्या कार्यक्रमातून स्त्री-विरोधी संदेश प्रसारित होणार नाहीत याची तरी काळजी घेतली का? सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. एकीकडे स्त्रियांवरचे अत्याचार वाढत असताना दुसरीकडे अनेक पुरुष महिलांमुळे अत्याचार होत असल्याचे सांगत असतात. स्त्रियांच्या अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्या वाहिनीने अशा पुरुषांनी स्त्रियांच्या विरोधात रचलेल्या गाण्याचेही प्रसारण केले होते. मग २० जूनला स्त्रियांच्या सन्मानाच्या नावाने जो गदारोळ माजवला गेला त्याचा काय अर्थ होता? एक दिवस अचानक माध्यमातून होणाऱ्या स्त्रियांच्या चित्रणाविषयी लोकांना कळकळ वाटायला लागली आणि लगेच त्याचा विसरही पडला? की मुळातच एवढ्या मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळलेलाच नव्हता? बिग बॉस कार्यक्रमाची प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी केलेली ती एक स्टंटबाजी होती का? बिग बॉसच्या निमित्ताने झालेल्या या चर्चा करणारे जरी विसरले तरी आपण मात्र एक जागरूक नागरिक म्हणून माध्यमांची ही खेळी ओळखायला शिकले पाहिजे!

 

- वंदना खरे, मुंबई
vandanakhare2014@gmail.com

बातम्या आणखी आहेत...