आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशवंत संस्‍कृती: एक वैचारिक ठेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतरावांचं कृष्णाकाठ म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्याचा मांडलेला लेखाजोखा होता. पण ‘यशवंत संस्कृती’ म्हणजे त्याच कृष्णेच्या दुसऱ्या काठावरून त्यांच्या आयुष्याचं केलेलं तटस्थ असं निरीक्षण आहे.


गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रभावी आत्मचरित्र वाचण्यास मिळालेले नाही, अशी खंत मराठी वाचकांमध्ये व्यक्त होताना दिसते. माझ्या बाबतीत बोलायचं झालं, तर स्व. यशवंतराव चव्हाणांच्या ‘कृष्णाकाठ’नंतर सकस असं आत्मचरित्र वाचायला मिळालेलं नाही. याचा अर्थ, आत्मचरित्रे प्रकाशित झालेली नाहीत, असे नाही. पण त्यामध्ये दखल घ्यावी, आणि ‘कृष्णाकाठ’च्या स्तरावर न्यावी अशी जवळजवळ नाहीतच. आता ‘कृष्णाकाठ’ला बरीच वर्षं झालीत. अचानक विलास फुटाणे संकलित आणि संपादित ‘यशवंत संस्कृती’ या पुस्तकाची प्रत हाती आली आणि पुन्हा एकदा ‘कृष्णाकाठ’ आठवलं.


यशवंतरावांचं ‘कृष्णाकाठ’ म्हणजे, त्यांनी त्यांच्या आयुष्याचा मांडलेला लेखाजोखा होता. पण ‘यशवंत संस्कृती’ म्हणजे त्याच कृष्णेच्या दुसऱ्या काठावरून त्यांच्या आयुष्याचं केलेलं तटस्थ असं निरीक्षण आहे, हे माझ्या लक्षात आलं. ‘कृष्णाकाठ’चं दुरून घेतलेलं ते दर्शन आहे. दर्शन यासाठी आहे की, ‘कृष्णाकाठ’मध्ये जे यशवंतराव आपल्याला दिसतात, ती त्यांची भूमिका आहे आणि ‘यशवंत संस्कृती’मध्ये त्याच भूमिकेचं केलेलं अर्थाविष्करण आहे. एकाच व्यक्तीने मांडलेला हा अर्थाविष्करणाचा पट नव्हे, तर कृष्णेच्या प्रत्येक वळणावर एका चरित्रामध्ये दिसणारे विविध घाट कसे आहेत, याचे अवलोकन, अनेकांनी केल्याची नोंद आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की, विविध क्षेत्रांतील २५ मान्यवरांनी हे लेख लिहिलेले असूनही त्यामध्ये यशवंतराव आणि त्यांच्या कार्याचं झालेलं अर्थाविष्करण यामध्ये कमालीचं साम्य आहे. सर्वांच्या मनातील अटळ असा हा ध्रुवतारा या लेखांच्या माध्यमातून दर्शन देत राहतो, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे आणि तोच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे.


बरेच लेख यशवंतराव गेल्यानंतरचे तर काही लेख आधीचे आहेत. सुरुवातीचे चार लेख महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे आहेत. त्यात स्व. वसंतदादा पाटील, स्व. वसंतराव नाईक, स्व. कन्नमवार आणि शरदराव पवारांचा समावेश आहे. उरलेले लेखही दिग्गज व्यक्तींचेच आहेत. त्यात ज्या व्यक्ती यशवंतरावांच्या अगदी सहवासात होत्या, त्यांना जाणून होत्या, वा कुठल्याशा कारणाने यशवंतरावांच्या संपर्कात आल्या होत्या, अशाच व्यक्तींच्या लेखांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे! या दिग्गज व्यक्तींमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आहेत, के. जी. जोगळेकर आहेत, मोहन धारिया, एसेम जोशी, रणजित देसाई, सरोजिनी बाबर, विठ्ठलराव गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, मा. पं. मंगुडकर, बाळ कोल्हटकर, आचार्य अत्रे, य. दि. फडके, वि. स. पागे, नरूभाई लिमये आदींचा समावेश आहे. या एकंदर नावावरून यशवंतरावांच्या स्नेहसंबंधाचं वर्तुळ हे किती विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेलं होतं, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी किती विविध विषयांना स्पर्श केला होता, याची जाणीव आपल्याला होते.


सर्वसाधारणपणे यशवंतरावांच्या कार्याचा गौरव करताना त्यातील काही मूलभूत गोष्टींचा उल्लेख करणे अपरिहार्य असते. त्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती, मुंबईसह महाराष्ट्राची भूमिका, जिल्हा परिषदांची निर्मिती आणि त्यांच्या अनुषंगाने सत्तेचे विकेंद्रीकरण करून लोकसहभागातून प्रशासन यंत्रणेला गती देणे, चीन भारत १९६२चे युद्ध, भारताची पीछेहाट, संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांचे पद जाणे आणि त्यांच्या जागेवर ऐन वेळी यशवंतरावांवर विश्वास टाकून पंडितजींनी त्यांच्या हाती संरक्षण मंत्रालय देणे, त्यानंतर सैन्याचा आत्मविश्वास वाढावा आणि भारतीय जनतेची मरगळ दूर व्हावी, म्हणून यशवंतरावांनी दूरदृष्टीने आखलेल्या योजना हे सारे काही त्यात येतेच. या साऱ्या गोष्टींचा परिचय महाराष्ट्राला आहेच, पण यशवंतरावांच्या राजकीय कारकीर्दीच्या पलिकडे जाऊन इतरही अनेक पैलू यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होते, हेही यातील काही दिग्गजांनी स्पष्ट केले आहे.


वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांनी यशवंतरावांच्या कार्याचा गौरव करताना काही मुलभूत असे गुण सांगितले आहेत, ते म्हणजे यशवंतरावांची सोशिकता आणि चिकाटी! संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी जे काही झाले, आणि अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि गुजरात या जोड राज्यांची एकमेकांपासून विलग होण्याची वेळ आली, तेव्हा कुठल्याही प्रकारची कटुता न येऊ देता, त्यांनी हे काम शिताफीने केले. १ मे १९६० रोजी म्हणूनच महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतरावांनी आणताना त्यांच्यावरच सारी जबाबदारी टाकण्यात आली होती. त्याचबरोबर विदर्भ व मराठवाड्यातील जनतेला एकत्र बांधण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे केवळ संघटनात्मकच नव्हते, तर भौगोलिक जवळीकही कशी साधली, हे कन्नमवारांनी सांगितले आहे आणि ते उत्कृष्ट संसदपटू असल्याची पावती शरद पवारांनी दिली आहे. यशवंतरावांचा कारभार किती स्वच्छ प्रतिमेचा होता आणि राज्यातील कृषी धोरणाला पूरक असे कार्य, मग ते सहकाराचे असेल वा इतर काही, यशवंतरावांनी कधीही माघार घेतली नव्हती हे पवार यांनी अधोरेखित केले आहे. यशवंतरावांवर सगळ्यात जास्त विचारांचा प्रभाव होता, तो म्हणजे डाव्या विचारांतील एक नवविचारप्रवाह निर्माण करणाऱ्या डॉ. मानवेंद्रनाथ ऊर्फ एम.एन. रॉय यांचा. पुढे पंडितजींचा सहवास लाभला आणि त्यातूनच त्यांचे लोकशाही समाजवादी व्यक्तिमत्व घडत गेले, याचा स्पष्ट उल्लेखही पवारांनी केला आहे.


या चार लेखांव्यतिरिक्त इतर लेख जे आहेत, त्यांच्याकडे यशवंतरावांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा दस्तावेज म्हणून पाहायला हरकत नाही. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यांच्या आयुष्यातील जवळपास सगळ्या महत्त्वाच्या घटनांचा धावता आढावा घेतला आहे. जोगळेकर, मोहन धारिया आणि रामभाऊ जोशी यांचे लेखही त्यांच्यावरच्या निरलस प्रेमाचे आणि त्यांनी निष्कामतेने केलेल्या कार्याचा गौरव करणारे आहेत. ‘दीनांचा कैवारी’ हा एसेम जोशींचा लेख तसा अतिशय स्वल्प असूनही, त्यात अतिशय परखड असे मत मांडण्यात अण्णांनी कुठलीही कुचराई केलेली नाहीये. रणजीत देसाई यांनी यशवंतरावांच्या स्नेहाचा उल्लेख करताना, साहित्य अकादमी मिळाल्यानंतर त्यांनी केलेला वैयक्तिक सत्कार, आग्रहाने त्यांना आपल्या बंगल्यावर ठेवून घेणे, हे सारे वर्णन केले आहे. यशवंतरावांचा दिवस पहाटे तीन वाजता सुरू होत असे, ही माहिती आपल्याला नवी आहे. एका कुशल राजकारण्याला रात्रीचाही दिवस कसा करावा लागतो याचं ते उदाहरण आहे.


एक सर्वांगसुंदर आणि या पुस्तकातील एकमेव लेखिकेचा लेख म्हणून डॉ. सरोजिनी बाबर यांचा ‘महाराष्ट्राची अस्मिता’ हा लेख आहे, असे म्हणावे लागेल. मार्च १९८४मध्ये यशवंतरावांना पुणे विद्यापीठाने डिलिट देऊन जो गौरव केला, त्याचे वर्णन सुरुवातीला आहे. तिथून प्रारंभ करून संपूर्ण लेखामध्ये यशवंतरावांच्या कार्याचा वेगळ्या दृष्टीने आढावा घेण्यात आला आहे. असाच एक वेगळा लेख म्हणून बॅ. विठ्ठलराव गाडगीळांच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या लेखाकडे पाहावे लागेल. त्यात तीन मथळे आहेत, काँग्रेस पुन्हा जोडली, ग्रंथांचा लाभ आणि उदारमतवादी! विठ्ठलरावांनी यशवंतराव हे उत्कृष्ट वक्ते होते, असा दाखला त्यात दिला आहे. गोविंदराव तळवलकरांनी पत्रकारितेच्या अंगाने लिहिलेला लेख आहे. यशवंतरावांच्या कुशल प्रशासन कौशल्याचा त्यात उल्लेख आहे. तात्यासाहेब केळकर आणि यशवंतराव यांच्या संदर्भाने लिहिताना तारतम्याचा आणि मध्यममार्गाचा जो उल्लेख तळवलकरांनी केला आहे, तो लक्षवेधी आहे. केळकर आणि मा. पं. मंगुडकर यांचे लेखही असेच साधकबाधक विचार व्यक्त करणारे आहेत. बाळ कोल्हटकर यांचा लेख पाहून थोडेसे आश्चर्य वाटू शकते, पण हा लेख श्रद्धांजलीपर आहे आणि त्यांच्या साहित्य व कलाविषयक दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारा आहे. ‘राजसंन्यास’ या नाटकाविषयी हृद्य आठवण त्यात दिली आहे. त्या प्रयोगाला मी येईल, असे यशवंतराव म्हणाले होते. वास्तविक निवडणुकीच्या धामधुमीत होते, पण झाले भलतेच, यशवंतराव मध्येच गेले. बाळ कोल्हटकरांनी, ‘तुम्ही माझ्या नाटकाला नसता आला तर चाललं असतं, पण नको, त्या दौऱ्यावर तुम्ही जायला नको होतं,’ असा उल्लेख केलाय. साळवी, वि. स. पागे, ले. जन. एस पी पी थोरात या विविध क्षेत्रातील मान्यवरांचेही लेख या पुस्तकात आहेत. ते त्यांच्या वैयक्तिक परिप्रेक्ष्यातून लिहिलेले आहेत. आचार्य अत्र्यांचा लेख अतिशय त्रोटक असा आहे. नरूभाऊ लिमये, य. दि. फडके, गो. रा. सोहनी अादींचे लेख त्यांना यशवंतराव कसे दिसले याविषयी आहेत.


सर्वच लेख वाचनीय आणि प्रामाणिक आहेत. त्या लेखांतून यशवंतदर्शन जे दिसते ते अतिशय मनोहर, बहुआयामी आणि व्यासंगी, प्रामाणिक असे आहे. वास्तविक बघता विविध व्यक्तींनी विविध काळांमध्ये केलेले ते एकाच व्यक्तीचे रेखाटन आहे. प्रत्येकाचे त्या व्यक्तीसोबत असणारे संबंध हे त्यांच्या अभ्यास क्षेत्राप्रमाणे आणि कारकीर्दीप्रमाणे आहेत. पण असे असूनही कुठे एकमेकांशी विसंगती नाहीये. यशवंतराव हे अजातशत्रू आणि जनप्रिय व्यक्तिमत्त्व होते, याचा हा मोठा दाखला आहे.


सुप्रिया सुळे यांची पुस्तकाला प्रस्तावना लाभणे हा बोलका संकेत आहे. यशवंतरावांच्या लोकशाही समाजवादी विचारांची पालखी पुढे नेणारे विचारभोई तयार झाल्याचा तो एक संकेत आहे. पुस्तकामध्ये ठिकठिकाणी  यशवंतरावांचे विविध विषयांवरचे मत नोंदवण्यात आले आहे. हे विचारधन म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनासाठी कराव्या लागणाऱ्या संस्काराची सुभाषिते आहेत, असे समजायला हरकत नाही. ‘यशवंत संस्कृती’ हा आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकाराचा गौरवेतिहास तर आहेच. पण नव्या पिढीने तो अभ्यासावा इतका तो महत्त्वाचाही आहे. या ग्रंथनिर्मितीसाठी औरंगाबादचे आदित्य प्रकाशन गौरवास पात्र नक्कीच आहे.


यशवंत संस्कृती
संपादन / लेखन : विलास फुटाणे
प्रकाशक : आदित्य प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठ सं. : १६८, मूल्य : २०० रुपये


- वसु भारद्वाज 
vpvphutane41@gmail.com

बातम्या आणखी आहेत...