Home | Magazine | Rasik | vasundhara kashikar bhagvat write on arun date

मैं जहाँ पे खो गया हूँ...

वसुंधरा काशीकर-भागवत | Update - May 13, 2018, 02:00 AM IST

निबिड अरण्यातून वाट काढताना ढगांआडून अचानक चंद्र डोकवावा आणि त्याच्या शांत-शीतल प्रकाशाने सैरभैर मन सुखावून जावं, तसा क

 • vasundhara kashikar bhagvat write on arun date

  निबिड अरण्यातून वाट काढताना ढगांआडून अचानक चंद्र डोकवावा आणि त्याच्या शांत-शीतल प्रकाशाने सैरभैर मन सुखावून जावं, तसा क्लांत मनांवर सावली धरणारा सूर होता, दिवंगत अरुण दाते यांचा. मराठी भावगीतांनी दातेंना स्वतंत्र ओळख मिळवून दिली, पण त्याआधीचे अरुण दाते गझल गायकीत मनसोक्त मुशाफिरी करू पाहत होते. उर्दू भाषेशी त्यांची लोभस यारी होती. या त्यांच्या फारशा परिचित नसलेल्या गायनपैलूवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख...

  साधारण १९४० सालची गोष्ट. लखनऊला ज्येष्ठ गझल गायिका बेगम अख्तरांच्या कोठीवर एक माणूस दुपारी त्यांची गझल ऐकायला आला आहे. एरवी बेगम संध्याकाळी गात, पण त्या दिवशी त्या माणसाची उर्दू आणि गाण्याविषयीची समज बघून त्या गायला बसतात. पण ४-५ मिनिटांनंतरच तो माणूस बेगम यांच्या हार्मोनियमवर हात ठेवतो, त्यांचं गाणं थांबवतो आणि उठून जाऊ लागतो. बेगम आश्चर्यचकित होऊन विचारतात, ‘मुझसे कोई गुस्ताखी हुई क्या...’ त्यावर तो माणूस उत्तरतो... ‘नाही. तुमचा रिषभ लागलेला मला आता कळला. याचा अर्थ तुमचा ‘सा’ कधीच लागून गेला. तुमचे स्वर हे इतके अद््भुत एकमेकांत मिसळले आहेत. आज मी हजार रुपये घेऊन आलो होतो. पण तुमच्या एकेका स्वरासाठी लाख रुपये द्यावेत, असे तुमचे स्वर आहेत. बेगम, मेरी औक़ात नही है की, मैं आपका गाना सुनू.’ हे वाक्य ऐकल्यावर बेगम अख्तर भावनाविवश होऊन रडल्या आणि त्यानंतर इतर मैफली रद्द करून बेगम फक्त त्या माणसासाठी रात्रभर गायल्या. तो माणूस होता, रामूभैया दाते...! दिवंगत भावगीत गायक अरुण दाते यांचे ते वडील.


  दाते कुटुंब हे मध्य प्रदेशमधल्या इंदूरचं. स्वत: रामूभैयांचं उर्दूवर प्रभुत्व आणि प्रेम. त्यामुळे त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना मौलवींकडे उर्दू शिकायला पाठवलं. अरुण दातेंची सख्खी बहीण, तर कुठल्याही मुसलमान माणसापेक्षासुद्धा उर्दू अस्खलित बोलत असे. घरी बेगम अख्तरांचं सतत येणं-जाणं. कुठलीही नवीन चाल बांधली, की त्या रामूभैयांना ऐकवायला लखनऊहून इंदूरला येत. त्यामुळे उर्दू, गझल आणि गाणं याकडे अरुण दाते नकळतच ओढले गेले.


  अरुण दातेंना त्यांचे वडील कुमार गंधर्वांना देवासहून आणायला कार घेऊन पाठवत असत. एकदा गाडी चालवताना कुमार गंधर्वांनी त्यांना गुणगुणताना ऐकलं. गंधर्व त्यांना म्हणाले, अरे, तू आजकाल फार गुणगुणतोस, हरकती घेतोस... चल मी तुला गझल शिकवतो. अरुण दाते विचारात पडले. कारण कुमार गंधर्वांना त्यापूर्वी कधीही कोणी गझल गाताना ऐकलं नव्हतं. पण कुमार गंधर्वांनी तर अरुण दातेंना गझल शिकवायचीच, असा निश्चय केला होता. त्यासाठी त्यांनी बेहज़ाद लखनवी यांची एक गझल तयार केली. आणि आयुष्यात पहिल्यांदा, अरुण दाते उर्दू गझल शिकले, ते साक्षात कुमार गंधर्व यांच्याकडून. त्या गझलेचे शब्द होते...


  सर-ब्् ह सजदा, कैफ़ियत है, सोज़ है, और साज़ है।
  मैं जहाँ पे खो गया हूँ, ये किसकी बज़्म-ए-नाज़ है।


  उर्दू गझल गायकीची ही अक्षरश: हेवा वाटावा, अशी सुरुवात. सुरुवात तर झाली, पण हे रामूभैयांना माहिती नव्हतं. ते कसं माहिती झालं, याचाही मजेदार किस्सा आहे. पु.ल.देशपांडे एकदा इंदूरला अरुण दातेंच्या कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. कार्यक्रमानंतर पु.ल. सगळ्या मुलांना पिपलिया पाल नावाच्या एका जागी घेऊन गेले. आजूबाजूला छान झाडं होती. पु.लं.नी हार्मोनियम मागवली आणि ते गायला बसले. गाणं झाल्यावर तुम्हा मुलांमध्ये कोणी गातं का, असं त्यांनी विचारलं. तेव्हा एकाने अरुण दातेंकडे बोट दाखवलं. ते तर चांगलेच घाबरले. कारण पु.ल. आणि रामूभैया घट्ट मित्र. त्यामुळे आपलं गाणं खराब झालं, तर ते बाबांना सांगतील ही भीती होती. पण पु.लंच्या आग्रहाखातर त्यांनी कुमारजींनी शिकवलेली गझल ऐकवली. ती ऐकल्यावर पु.लंनी त्यांना तू रामूभैयांचा मुलगा का, असं विचारलं. दातेंनी हो म्हटलं. मग काय, पु.ल. अरुणजींना घेऊन त्यांच्या घरी गेले आणि रामूभैयांना विचारलं, तुमचा मुलगा काय कमाल गातो याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? ‘आफ़त आहे यार’...! ही त्यावर रामूभैयांची खास ‘इंदोरी’ प्रतिक्रिया. वडिलांची आणि मुलाची अशी पहिली सांगीतिक ओळख करून देण्याचं श्रेय जातं, ते पु.लं.ना... हाही किती मोठा भाग्ययोग...!


  त्यानंतर मग अरुण दाते ऑल इंडिया रेडिओच्या इंदूर, भोपाळ आणि ग्वाल्हेर स्टेशनवर गजल गाऊ लागले. तेही वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी. त्या काळात यशवंत देव हे ऑल इंडिया रेडिओच्या मुंबई विभागाचे प्रमुख होते. त्यांना रेडिओवर वेगवेगळ्या राज्यातल्या गायकांची गाणी ऐकण्याचा छंद होता. एकदा असेच ते इंदूर रेडिओ लावून बसले असताना, त्यांनी अरुण दातेंनी गायलेली गजल ऐकली. गजल ऐकल्यावर ते थक्क झाले! दाते म्हणजे, हा मराठी माणूस आहे, मग त्याचे इतके सफाईदार उर्दू उच्चार कसे? त्यांनी ताबडतोब श्रीनिवास खळ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. खळ्यांनी दुसऱ्या दिवशी बरोबर त्याच वेळी दातेंचं गाणं ऐकलं.

  तो आवाज ऐकून ते चक्रावून गेले. कारण, त्यावेळी मराठीत असा खर्ज कोणाचाच लागत नव्हता. मग इंदूर स्टेशनवरून अरुण दातेंचा पत्ता या दोघांनी मिळवला. पण दाते तर इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी मुंबईलाच राहत होते. मग त्यांच्या मुंबईतल्या दादरच्या पत्त्यावर त्यांनी सलग तीन महिने गाण्याचे काँट्रॅक्ट पाठवले. पण काहीही उत्तर न आल्याने शेवटी हे दोेघे दादरला त्यांच्या घरी जाऊन धडकले. त्यावेळी घरी साक्षात रामूभैय्या दाते होते. त्यांना देव आणि खळे यांनी सर्व हकीगत सांगितली. तेव्हा रामूभैय्यांनी जरासे रागावूनच विचारलं की तू यांच्या पत्राचं, काँट्रॅक्टचं साधं उत्तरही दिलं नाही. त्यावर दाते म्हणाले, ‘बाबा आपली इंदूरची मराठी ऐकून हे पुण्यामुंबईचे लोक हसतात. ते माझं गाणं काय ऐकतील... म्हणून मी सर्व काँट्रॅक्ट फाडून टाकले’. त्यावेळी रामूभैय्यांनी त्यांना फार सुंदर उत्तर दिलं. म्हणाले, ‘बेटा, स्वराला भाषा नसते. खळे हे मोठे संगीतकार आहेत. ते म्हणतील तसं तू कर. खळ्यांनी त्यावेळी ‘शुक्रतारा’ हे भावगीत खास अरुण दात्यांसाठी कंपोज करुन आणलं होतं. त्यासाठी त्यांच्या आवाजाचा बारकाईने अभ्यास केला होता. एवढेच नव्हे तर तब्बल ११ वेळा ती चाल खळ्यांनी खास अरुण दातेंसाठी म्हणून बदलली होती. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी केशवराव भोळे, पु.ल. देशपांडे, रामूभैय्या दाते, गायक म्हणून अरुण दाते आणि गायिका सुधा मल्होत्रा, संगीतकार श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि संगीत संयोजक अनिल मोहिले इतकी दिग्गज मंडळी उपस्थित होती. संगीत संयोजक म्हणून अनिल मोहिले यांचं ते पहिलं गाणं हा ही एक योगच.


  त्यानंतर अरुण दाते यांची पुढची १० गाणी अक्षरश: लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. मात्र पुढे काही वर्षांनी त्यांनी ‘साक़िया’ हा उर्दू गजलांचा अल्बम काढला. त्यात प्रामुख्याने क़ैसर उल ज़ाफरी आणि निदा फाज़ली यांच्या गजला आहेत. ‘दिवारों से मिलकर रोना' ही क़ैसर उल ज़ाफरी यांची गजल अरुण दातेंना खूप आवडायची. म्हणून बसल्या बसल्या त्याच मीटरमध्ये क़ैसरसाहेबांनी एक गजल लिहिली.


  आईने से आँख मिलाते डर सा लगता है।
  सारा चेहरा टूट चुका हो ऐसा लगता है। ...


  ही ती गजल. आपल्या ‘साक़िया’ या अल्बममध्ये अरुण दातेंनी ही गायली. पण मराठी भावगीत गायनामुळे कालांतराने त्यांची उर्दू गजल मागे पडली क्वचित त्यांच्या बोलण्यात याची खंतही येत असे. ‘अरे यार, मला मराठीने मारुन दिलं’. असं ते हसत हसत म्हणत. पण ही आनंदाची खंत होती.


  अरुण दातेंच्या आवाजातली कातरता, हळूवारपणा, शब्दांना जोजवणं, हा उर्दू गजलेचाच परिणाम आहे, असं एक अभ्यासक म्हणून मला वाटतं. कारण, पुढे उर्दूतली अदब, सुसंस्कृतपणा, उत्कटता, समर्पण त्यांनी जसंच्या तसं मराठीत भाषांतरीत केलं. व्यक्तिमत्वाचंच भाषांतर होतं, ते असंही म्हणता येईल. अगदी लखनौतला एखादा बहिरा माणूस दातेंच्या भावगीताच्या कार्यक्रमाजवळून गेला असता, तर स्टेजवरील दाते बघून त्याला उर्दू मुशायरा सुरू असल्याचा भास झाला असता. मराठीतल्या त्या काळातल्या सर्व भावगीत गायकांपेक्षा दाते वेगळे ठरले ते यामुळेच! उर्दूतला उत्कट भाव त्यांनी मराठी रसिकांना त्यांच्या भावगीतांतून दिला. खरं तर उर्दूच्या बज़्ममध्ये रमलेल्या दातेंना अक्षरश: खनपटीला बसून यशवंत देव आणि श्रीनिवास खळे यांनी मराठी भावगीताच्या दुनियेत आणलं. किती तरी काळ रसिक श्रोते तृप्त-तुडुंब होत राहिले. म्हणूनच हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातला दर्दी रसिक नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील.

  (विशेष आभार : अतुल दाते (अरुण दाते यांचे सुपुत्र) आणि डॉ.अभय भागवत, इंदूर)

  - वसुंधरा काशीकर-भागवत
  [email protected]

 • vasundhara kashikar bhagvat write on arun date

Trending