आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन पाऊस पाऊस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही शेती करत असाल तर नक्कीच, पण शेतकरी नसाल तरीही, ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असता तो आलाय. या पावसाला आता आपण सर्रास मान्सून या नावाने ओळखतो. त्या मान्सूनचं स्वागत करणारी ही कव्हर स्टोरी.

 

मान्सून केरळात दाखल, लवकरच महाराष्ट्रात.
वर्तमानपत्र उघडल्यावर सकाळीच ही बातमी वाचली, वाचूनच मनावर जलधारेचा शिडकाव झाला. चैत्र पालवीला वैशाख वणव्यानं चांगलंच भाजून काढलेलं, सूर्याच्या प्रखरतेनं पोळून निघालेल्या सृष्टीच्या चराचराला मृग नक्षत्राचे वेध लागलेले...
रापलेली जमीन असो की पालापाचोळा पायाशी घेऊन उभी असलेली झाडं आणि वेली, पाणी हरवलेली नदी-ओहोळ असो की घरट्यातली पाखरं, गोठ्यातली जनावरं, घराघरातले आबालवृद्ध; सारेच जण सृजनाचा हा वर्षाव झेलण्यासाठी आसुसलेले असतात.
पाऊस या नावातच भिजवून टाकण्याचं सामर्थ्य. कळी उमलणं, पाकळी पाकळी विलग होत असताना तिच्यात केसर सांडणं, कळीचं फूल होणं जितकं सहज, नेहमी बघायला मिळणारं तरीही त्याचं रंगरूप, गंध नव्यानं हवासा वाटणारा. तसंच पावसाचंही. दरवर्षी तो येतो. कधी वेळेवर. कधी अवेळी. तर कधी त्याची वाट पाहताना डोळ्यात पाऊस उभा राहतो. पण जेव्हा प्रथम पावसाच्या सरी कोसळतात तेव्हा प्रत्येकाचंच मन चिंब चिंब होतं. मनात कोंदणात साठवलेल्या त्या सगळ्या अबोल आठवणी जाग्या होतात. या पावसाची रूपं तरी किती सांगावीत? कधी धुक्याच्या कुशीत कुंद होऊन हळुवार बरसणारा तर कधी धो धो कोसळणारा, कधी धारांबरोबर तुडुंब भरून येणारा, तर कधी ढगांच्या काळोखातून मुक्त बरसणारा, कधी भुरभुरता तर कधी सरसरता. कधी हिरव्यागार घाटातून उधळत येणारा. पावसाची ही वेगवेगळी रूपं बघितली की, मन मंत्रमुग्ध होतं. पण या पहिल्या पावसाची बातच काही और. पावसाचं येणं मनाला अलवार झोक्यावर नेतं. त्याचं झिमझिमणं, कडाडणं, कोसळणं, मनात आरपार घुसणं, यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मनमोराचा पिसारा फुलत जातो. रोजच्या धावपळीत हरवलेल्या सुखद क्षणांची पाऊस आठवण देतो. ठुसठुसणाऱ्या दुखऱ्या सलांवर हळुवार हलकेच फुंकर घालतो. एकूण काय तर सृष्टीबरोबरच मनालाही तृप्तता देतो.


पहिला पाऊस पडला की ते रणरणतं ऊन, असह्य उकाडा, जिवाची तगमग, आपण क्षणात विसरून जातो. नव्या उमेदीनं जीवनाला सामोरं जातो. म्हणूनच रोजचे हेवेदावे, नात्यांमधलं कोरडेपण, निव्वळ व्यावहारिक वागणं, अनपेक्षितपणे सामोरी आलेली दु:खं, मीपण हरवून बसलेल्या मनावर हा पाऊस प्रसन्नतेची शिंपण करतो. ढगांचं ते गरजणं आणि त्यातून कोसळणाऱ्या धाराधारांतून मन सैरभैर करणारा निसर्गाचा हा सोहळा, आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पाऊस सरींची ती उधळण. धरणीच्या कुशीत आपल्या अस्तित्वाची बीजं पेरून झाडंवेलीपक्षी यांना बेभानपणे धुंद करतो तो हा पाऊस. एखाद्या माळरानावरही आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा निसर्गाचा हा निर्मिती सोहळा. खरं सांगायचं तर प्रत्येक ऋतू हा सर्वांगातच बहरत असतो. आतून सळसळत असतो. निसर्गाच्या या दिव्य दर्शनानं रोमांचित झालेल्या तनामनाला चिरंतनाची सूक्ष्म साक्ष देत असतो.

 

पावसाला जसं आरसपानी देखणं रूप आहे, ओलेतीचा रंग आहे, तसाच एक अनाहत नाद आहे. पावसाचा सांगावा देणारा मृद्गंध अवघा आसमंत दरवळून टाकतो. धरतीची भेगाळलेली काया, झाडांचं ओठंगलेलं अंग या शिडकाव्यानं तृप्त होतं. अखंड वर्षावाचा ध्यास घेत फुलारून येतं. पावसाच्या संततधारेनं तृप्तीचे ओहोळ धरतीच्या अंगोपांगी खळाळू लागतात. पावसाच्या सरी सृष्टीला रोमांचित करतात. प्रत्येक वेळी पावसाला भेटताना सृष्टी नव्यानं शृंगारते. मोहोरते. फुलून येते. लपतछपत हिरव्या रानात केशर पेरीत येणाऱ्या श्रावणाचं वर्णन करणारे कवी कुसुमाग्रज, पाडगावकरांचा सोनिया उन्हातला भुरभुरता पाऊस, आरती प्रभूंच्या अंतस्थानातला पाऊस, महानोरांचा रानातला पाऊस, ग्रेसांचा दुखरा पाऊस, कवी विठ्ठल वाघ यांचा कवितेतला पाऊस, इंदिरा संतांच्या कवितेतला विनवणीचा पाऊस अशी पावसाची अगणित रूपं मनात रुंजी घालत असतात. अहो कवीच कशाला, तुमच्यामाझ्यासारख्या सामान्यांच्या मनात तो कोसळत असतो. अविरत. त्याच्याही नकळत. मनात आणि जनात बरसणाऱ्या पावसाच्या ओल्याकंच अनुभवाचे शब्दविभ्रम कवीच्या कुंचल्यातून कागदावर उतरत असतात. क्षितिजाला गवसणी घातली की दिसणारं उतरत्या ढगाचं चित्रही अप्रतिम. जणू तो धरणीला बिलगतोय. कधीतरी रात्रभर अखंड कोसळणारा, तर कधी भल्या पहाटे सूर्याआधी हजेरी लावणारा, माध्यान्हीला झाकोळून टाकणारा तर कधी सायंकाळी सोनपिवळ्या उन्हात सृष्टीला तृप्त करणारा पाऊस. निसर्गालाही स्वतंत्र व्यक्तित्व असतं, ही जाण मनाला करून देणारा हा पाऊस. मानवी जीवनाची अपूर्णता आणि कृत्रिमता याकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं तरी आपल्याला आपल्यातलंच संवेदनशील मन नक्की जाणवेल. निसर्गाचा हा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी हवे संवेदनशील मनच. ज्याच्यावाचून जगण्याला जगणं म्हणता येणार नाही, ज्याच्यावाचून संपूर्ण होण्याचं स्वप्न पाहता येत नाही असा हा पाऊस. कधी आर्त वाट पाहायला लावणारा. सारे भेद, सारे अंतर मिटवून अंतर्बाह्य भिजवणारा.
आसमंत धुंद झाला,
वाऱ्याने भरून गेला
चहूकडून रोरावत,
झेपावत थेंब आला
चिंब असा भिजवणारा,
पाऊस होता येईल का?
घनघोर बरसणारा,
मेघ होता येईल का?
घनघोर बरसणारा
मेघ होता येईल का?
   

बातम्या आणखी आहेत...