आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहोरात्र कबाडकष्‍टाचे कथन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य असो वा कला, निर्मिती महत्त्वाचीच. पण त्याहून महत्त्वाचं माणसाचं जगणं. किंबहुना माणसांचं संकटांना पुरून उरत जगणं आहे म्हणून निर्मितीला अर्थ आहे. म्हणजेच वास्तवातल्या जगण्याचा कलानिर्मितीशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. या संबंधांच्या मुळाशी जात, 
अंधाऱ्या कोपऱ्यांना धुंडाळत स्थळ, काळ आणि व्यक्तींचा शोध घेणारे हे पाक्षिक सदर... 


शिक्षणासाठी दत्तक घेतलेल्या सचिन ऐवळेच्या ‘उमदी’ या गावाला जाताना पहिल्यांदाच मी बसमधून प्रत्यक्ष जत तालुका पाहिला, ‘माणदेश दरसाल दुष्काळ’ या माझ्या पुस्तकात जत तसा माझ्याकडून पाहायचा राहिलेलाच होता. इथं आल्यावर फेसबुकाच्या मायाजाळात ‘जत तालुक्यातील कोणी भेटेल का मला ओळखीचे’ अशी पोस्ट टाकली होती अन् त्या काळोख्या चांदण्या रात्री नवनाथ गोरे या मित्राची माझी ओळख झाली... 


‘फेसाटी’ ही नवनाथ गोरेची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रसिद्ध झालेली पहिलीच कादंबरी. दोनशे पानांच्या कादंबरीची नाममात्र किंमत केवळ शंभर रुपये आहे. कादंबरीची सुरुवातच त्याच्या पिढीजात परंपरेनुसार ‘सुंबरान’ने होते. ‘सुंबरान’ म्हणजे स्मरण. आपल्या भूतकाळाची आठवण, आपले समूळ अस्तित्व खोलवर गेलेल्या झाडांच्या मुळांसारखे जमिनीशी रत असते. सुंबरान असते, निसर्गाशी जोडून घेणं...झाडझुडपांसह, डोंगरदऱ्यांसह, ओढावगळ जितरांबासह भूमीला जोडून घेणं, सुंबरान असते ‘कथन’, कष्ट करणाऱ्या माणसाचे... 


तशीच काहीशी विजापूरजवळच्या जत तालुक्यातील एका जन्मदरिद्री अल्पभूधारक मेंढपाळ समाजातील शेतकरी कुटुंबातील एका गरीब मुलाच्या बी.ए.पर्यंतच्या शिक्षणाची ही गाथा आहे. अन्न, वस्त्र, पाणी, निवारा अन् किमान शिक्षण याच्या शोधार्थ निघालेल्या एका वैफल्यग्रस्त कुटुंबाची समाज अन् निसर्गाच्या अंतर्विरोधात कशी होत असते ससेहोलपट, याचे प्रत्ययकारी दर्शन ‘फेसाटी’ वाचताना आपणाला होते. अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी दिवसरात्र कराव्या लागणाऱ्या  काबाडकष्टांचा जीताजागता वृतांत आहे या तरुण लेखकाची ‘फेसाटी.’

 
प्रागैतिहासिक काळात नव्याने कुटुंबसंस्थेत आलेल्या एखाद्या आदिम माणसाच्या हाडामासी भिनलेला संघर्ष, त्यातील अमानवीय क्रौर्य जितके पशुवत अन् नैसर्गिक असते, तसलेच काही जत तालुक्यातील दूरदराज माळावरील वाड्यावस्तीवरच्या माणसांचे हे जगणे आहे. वर वेळी-अवेळीचा पाऊस, साल-दोन सालांनंतरचा, पाचवीला पुजलेला. सततच्या अवर्षणात डोळ्यातलं पाणीसुद्धा आटवणारा दुष्काळ. कशी राहणार माणसं इथं? यामुळेच उन्हाळ्यातील वावटळीगत घरच विस्कटून जावं, असं जन्मठिकाण सोडण्याचं स्थलांतर प्रत्येकाच्या नशिबाला येतं. आणि आहे त्या ठिकाणी, टाचा घासत जगण्याचा केलाच जर कोणी अट्टहास, तर उजाडल्यापासून रात्री भुईला पाठ टेकेस्तोवर विंचवासारखे जिव्हारी नांगी मारणारे शेटसावकार, जळवांसारखे चिकटलेले रक्ताचे भावबंद, पिढी दर पिढी पाठ न सोडणारे देवधर्म, सातबारा, महागाईतून बोकांडी बसलेलं शासन आणि जाती-धर्मांच्या अनिष्ट रूढी यांचा सततचा जाच उभ्या आयुष्याला लागतो. अशा सर्व अवरोधात दुष्काळी जत तालुक्यातील कस्पटासमान झालेल्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याची कथा नवनाथ गोरे आपल्यासमोर कादंबरीतून मांडतो. 


कदाचित हे खूप लांबचं महाकाव्यातील एखाद्या अथांग स्वर्गातील दृष्टांताचे उपकथानक कुणाला वाटेल. पण नवनाथ गोरे जगत असलेला अवकाश एकोणीसशे चौऱ्यांण्णव ते सांप्रत दोन हजार सतराचा म्हणजे, खूप अलीकडचा आहे.  साधारण एकोणीसशे तीसच्या आसपास विभूतिभूषण गंगोपाध्याय यांनी लिहिलेली ‘पाथेर पांचाली’, सत्तरच्या दशकात उद्धव शेळकेंनी लिहिलेली ‘धग’आणि आता चार महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेली नवनाथ गोरेंची ‘फेसाटी’ या तिन्हीही कादंबऱ्यांतील भारतातील दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्या कोट्यवधींच्या दैनंदिन जीवनात कसलाही मूलभूत फरक पडलेला नाही, ही देशाच्या एकूण आर्थिक अन् सामाजिक विकासातील शोकांतिकाच आहे. आर्थिक अन् सामाजिक कमालीच्या विषमतेत महासत्तेचं दिवास्वप्न पाहणाऱ्यांच्या कानांखाली वाजवलेली ही सणसणीत चपराकच आहे. हा सगळा माझा उरस्फोटी संताप अथवा ‘फेसाटी’च्या अनुषंगाने शब्दांत मांडलेला गहिवर वाचून कोणी सुखवस्तू मराठी वाचक म्हणेल, ग्रामीण हलाखीचे आख्यान मी कशाला वाचायला हवं? तर मित्रा, या तीस-बत्तीस वर्षांच्या तरुणाने आणि त्याच्या कुटुंबाने दिवसरात्र मानेवर जू टाकलेल्या जनावरांगत पोटांची खपाटीच भरण्यासाठी जे कष्ट उपसले, ज्याला आपले दु:ख व्यक्त करण्यासाठी वा अभिव्यक्त होताना आपलं व्यक्तिगत भाषिक विश्व संपन्न करण्यासाठी मराठी सारस्वतांचे कुठलं समृद्ध वाचनालय उपलब्ध झालेलं नाही. वाऱ्यावर उडून आलेलं दिवसाच्या वर्तमानपत्राचे पान मैल-दोन मैलांच्या परिसरात जिथे सापडत नाही, तरीही या लेखकाने ऊन-वारा पावसात घाम अन् रक्तात क्रोध अन् आकांतात आठवणीच्या आवकाशात व्यक्तिगत अनुभवातून सीमाभागातील कानडीच्या प्रभावापासून आपली मराठी जिवंत ठेवलीय, ही गोष्टच मुळी आहे आश्चर्यकारक. 


लेखकाने शिक्षण घेण्यासाठी जे भोगलंय, दररोजच्या उपास-तापासाची पाच-साडेपाच मैलांची जी पायपीट केली आहे, फी, पुस्तकं आणि लाज राखण्यासाठी अंगावरल्या धडुतांसाठी ज्या प्रकारे तो राबला आहे, यात त्याचे सगळं अनुभवविश्व घायपात अन् येड्याबाभळीच्या विखारी काट्यांनी रक्ताळलेलं आहे. सराटं अन् बोरी-बाभळीने जागा मिळेल तिथं येरबाडलेलं आहे. 


हे असे दैनंदिन आयुष्य आजही दुष्काळी भागाच्या खेड्यापाड्यांतील हजारो लहान,तरुण  पोरं अनुभवत आहेत. त्यांच्या अंगाला ना धड कापड, ना पोटाला अन्न असतंय. रोजची उपासमार अन् वैफल्यात कित्येक हताश अन् उद्ध्वस्त होत आहेत. व्यसनाधीन होऊन लाखोंच्या निरक्षर माणसांच्या कळपात सामील होत आहेत, अर्थात त्यातूनही शिकायची इच्छा असणाऱ्यांसाठी आजच हे सरकार शाळा कमी करून शिक्षणाचे दरवाजे खेडुतांसाठी बंद करत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या शिक्षित बेरोजगार तरुणांच्या जगण्याचा नवनाथाने जो काय वृत्तांत मांडला आहे, तो काहीसा निबीड अरण्यातील एकलव्याच्या धनुर्विद्येतील अलौकिक कौशल्यासारखाच आहे. 


समजायला लागल्यापासून कष्ट करून फाटक्या कुटुंबाच्या सपराच्या मेढेसारखा आधार देणाऱ्या न्हात्याधुत्या गरीब गायींसारख्या बहिणी, तिला खात्यापित्या घरातील चांगला नवरा मिळून इथून पुढचा तरी सुखाचा व्हावा संसार म्हणूनची आयबापाची धडपड,परत रूढीग्रस्त सासरात तोंड बांधलेल्या अजाण पोरींचा पारंपरिक छळ, रोजची मारहाण अन् अन्नाशिवायचे उपास, बदल्यात मुकाट जनावरागत कष्ट, अन् माहेरच्या दौलतीची अपेक्षा. अगदी नकोशी झाल्यास प्रसंगी अंधाऱ्या रात्री घराबाहेर दरदरा ओढत विहिरीत ढकलून जिवंत मारणं, वर पाय घसरून पडल्याचा खोटा दांभिक आक्रोशाचा कांगावा करणं, अशी गावात सरसकट घडणारी उदाहरणं लेखकालाही आपल्या लहान वयात भोगावी लागलेली आहेत. 


मॅक्झिम गोर्कीच्या नाटकातल्यासारखे हे सगळे पशुवत ‘तळघरातील माणसांचे जगणं’ नवनाथच्या पहिल्याच कादंबरीत मांडतो.शिक्षित सरंजामी पर्यावरणातून शहरात अय्याश करायला आलेला किंचित अाधुनिक शरदचंद्र चटोपाध्यायांचा ‘देवदास’ आपल्या मध्यमवर्गीय अभिरुचीला पटतो, पण तोच खेड्यातील ज्यांच्या ढुंगणावर पँट फाटलेली आहे, शहरी चोचले करण्यासाठी ठिगळ पडलेल्या खिशात पाचपन्नास रुपये नाहीत, ज्याच्यावर मेहेरबानी म्हणून लाभलेल्या प्रेमात दिवसदिवस उपाशी असल्याची त्याला भ्रांत नाही, पळून जाण्याच्या प्रस्तावापुढे तो असाह्य हतबल आहे तो, हा खेड्यातला प्रेमवीर नायक आपलं वैफल्य, अतीव दु:ख सोबत घेऊन दोस्तानं पाजलेल्या दारूत पायांना पारावर नसलेल्या रात्रीत एका भकास शहरात भरकटत जातो. दगडधोंड्यांच्या कपारीत पडतो. रक्तबंबाळ होतो अन् गुडघा दुखवल्याची त्याला शुद्ध राहत नाही. निराश्रित उघड्यावर पडतो, हे गावठी कफल्लक प्रेम कित्येकांच्या मानसिकतेस परवडणारे नसते.पण गावातील गरीब तरुणात हीच तर सार्वत्रिक तऱ्हा असते, अाडदांड प्रेमाची. 


लेखकाचे प्रेमाचे अशा पद्धतीचे वर्णन वाचताना, ते अंगावर येतं. वाचन अन् आधुनिक संस्काराचा साहजिक अभाव असल्याने लेखकाला लिहिताना काय चांगले काय वाईट, कुणाची सहानुभूती असायला हवी अभिप्रेत, याचे म्हणावे तेवढं अकलन नसल्यानेच पारधी समाजाचे रूढार्थाने फारसे कुणाला माहीत नसलेलं दहशतीचे जग तो आपणाला दाखवतो. हा नवनाथ यानंतरच्या भेटीत ते अनभिषिक्त सावकारी साम्राज्य मला दाखवणार आहे. प्रस्तुत कादंबरी वरवर पाहता लेखकाचं आत्मचरित्र असली तरी त्यामुळे जत तालुक्यातील सर्वसामान्य माणसाचे, खडतर दैनंदिन जीवनच उजागर होतं. हे या कादंबरीचे मोठं यश. सोबत भविष्यात एका विशिष्ट उपेक्षित प्रदेशाचा लेखक म्हणून त्याच्यावर मोठी जबाबदारीसुद्धा पडते. त्याचे कौटुंबिक जगणं मी जवळून पाहिलंय, तरीही इथून पुढच्या काळात व्यक्तिगत स्तरावर एक स्थिर आयुष्याची तजवीज करतच आपल्यावर पडलेल्या वाङ््मयीन जबाबदारीसाठी प्रचंड वाचन,  मनन अन् प्रसंगी लोकांच्या संघर्षात सामील झाल्यावर त्याच्याकडून अक्षर साहित्याची अपेक्षा निश्चितच करता येईल.  


सततच्या दुष्काळात जत तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना व्याजाने वाढत जाणाऱ्या कर्जाच्या कराल करड्या सावल्यांखाली खुरडत जगणं हे जर सार्वत्रिकरीत्या अनुभवायचे असेल जर नवनाथ गोरेच्या प्रस्तुत कादंबरीला पर्याय नाही.   


- आनंद विंगकर 
anandwingkar533@gmail.com
लेखकाचा संपर्क - ९८२३१५५७६८ 
लेखक ज्येष्ठ पुरस्कारप्राप्त कादंबरीकार व कवी असून, अभावग्रस्त समाज हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे.

बातम्या आणखी आहेत...