आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शापित अप्सरा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका बेसावध क्षणी श्रीदेवीने एक्झिट घेतली. अगदी मुली आणि नवऱ्यालाही न सांगता. एवढी सुंदर, गुणवान, काळासोबत प्रगल्भ होत गेलेली ती,अशी अचानक निघून जाते, तेही असंख्य प्रश्न मागे ठेवून. अशा प्रसंगी तिच्या असण्याचा, जाण्याचा, यशाचा अर्थ तरी काय लावायचा? कोण होती ती? कशासाठी जगली ती , कोणासाठी जगली ती? स्वत:साठी की फक्त इतरांसाठी? 

 

जगाचा नियमच आहे, हा. या नियमानुसार  श्रीदेवीची अवघ्या काही क्षणांत ‘बॉडी’ झाली. एकेकाळची सुपरस्टार आणि वर्तमानातली कमबॅक स्टार श्रीदेवीची बॉडी. रुपेरी पडद्यावरच्या एका अप्सरेची बॉडी. नाही, एका शापित अप्सरेची बॉडी. 

 

दुबईच्या हॉटेलात अपघाती मृत्यू होऊन तब्बल तीन दिवस उलटले तरीही श्रीदेवीचं पार्थिव घरी आणता आलं नाही. मृत्यूनं खरं तर सगळ्यालाच पूर्णविराम मिळाला. तरीही, लौकिक जगाच्या नियमांनी श्रीदेवीला मरणानंतरही जखडून ठेवलं. एका भल्यामोठ्या प्लास्टिकच्या आवरणात. मोठाल्या डोळ्यांची, सदासतेज भासणाऱ्या चेहऱ्याची ती निस्तेज, निष्प्राण अवस्थेत पडून राहिली. एका शवागरात. शंका, संशय आणि अविश्वासाची कितीतरी जाळी तयार झाली, तिच्याभोवती. पण याला तरी काय अर्थ आहे?  

 

जन्म हादेखील अपघात आणि मृत्यू हादेखील अपघातच. पण जन्म आणि मृत्यू या दोन घटनांदरम्यान तरी कुठे अपघात चुकतात. आपल्या आयुष्याचं तरी नियंत्रण कुठे आपल्या हाती असतं? विशेषत: तुम्ही प्रेक्षकांच्या इच्छेबरहुूकूम अभिनय करणारी सौंदर्यवती श्रीदेवी असता तेव्हा.
अनेकांच्या नजरेत स्वप्नवत आयुष्य जगलेल्या श्रीदेवीचं जन्मापासून स्वत:च्या आयुष्यावर होतं का नियंत्रण? होतं का, तिला तिचे निर्णय स्वत:च घेण्याचं स्वातंत्र्य? की इतरांनी घेतलेले निर्णय परिस्थितीवश तेवढे ती मुकाटपणे स्वीकारत होती मरेपर्यंत? की तसे निर्णय  स्वीकारणं अंगव‌ळणी पडलं होतं तिच्या? असा काय म्हणून तिचा दोष होता की, वकील बाप आणि सुशिक्षित-सुसंस्कृत आईच्या पोटी जन्माला येऊनही वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी तोंडाला रंग लावून तिला कॅमेऱ्यापुढे उभं राहणं भाग पडावं? ही कुणाची महत्त्वाकांक्षा होती? स्वत:च्या आई-वडिलांपलीकडे जगाची ओळख नसलेल्या चार वर्षांच्या श्रीदेवीची?  तिच्यात स्वत:च्या अपूर्ण इच्छा-आकांक्षा भरू पाहणाऱ्या तिच्या आईची, वकील बापाची? 


पण समजा, तसंही नसेल, आई-बापाच्या महत्त्वाकांक्षा नव्हे, सहज गंमत म्हणून, कुणा ओळखींच्या लोकांच्या लाडीक आग्रहावरून जरी लहान वयात मेकअप करून सिनेमात झळकायचं म्हणजे बालपण अकालीच खुंटणं नव्हे का? मग, अशा वेळी काय पर्याय असतो, स्पेशली मुलींकडे? तेही आजच्या नव्हे, पन्नास वर्षांपूर्वीच्या रुढी-परंपरावादी तामिळ समाजातल्या मुलींकडे? पुरुषप्रधान व्यवस्थेचे नियम तर तेव्हाही कडकच होते. ही व्यवस्था तेव्हाही तर म्हणतच होती-काय करायचं ते तुम्ही नाही ठरवायचं. ठरवणार आम्ही. तुम्ही फक्त पालन करायचं. मन मारून. भावना ठेचून. बुद्धी आयुष्यभरासाठी आमच्याकडे गहाण ठेवून. अंतर्मुख, मीतभाषी, अतिसावध, समाजविन्मुख श्रीदेवीचंही असंच झालं असेल का? 

 

म्हणजे, लहान वयातच तिच्या "चबी चिक्स'वाल्या गोलगोल चेहऱ्याचं कौतुक झालं. तिच्या बालसुलभ अभिनयाचं कौतुक झालं. बालपणीचा सावळा रंग उजळला. उजळत उजळत गोरा झाला.  गोऱ्या रंगासोबत शरीरही बहरलं आणि माघारीचे, स्वातंत्र्याचे सगळे मार्ग एकेक करत बुजत-थिजत गेले. चारचौघींसारखी शाळा नाही, कॉलेज नाही. शाळा-कॉलेजातले जीवाला जीव देणारे मित्र नाहीत, मैत्रीण नाहीत. त्यांच्यासोबत काढलेले मंतरलेले दिवस नाहीत की  मंत्रमुग्ध रात्री नाहीत. आता फक्त पुढे जायचं. धावायचं. धावत सुटायचं. अथक. एकदा यश मिळालं की पुन्हा यश मिळवायचं. आता थांबायचं नाही. थांबण्याचं, क्षणभर विसावा घेण्याचं  सुख मागायचं नाही. त्याला पर्याय नाही. बालपण सरू दे. तारुण्य फुलू दे. तारुण्याला वेगाने बहरू दे याला पर्याय नाही. आता निर्णय आपला नाही. आपण फक्त सकाळी उठायचं. चेहऱ्यावर मेकअप थापायचा. कॅमेऱ्यासमोर जायचं. दिग्दर्शकांने अॅक्शन म्हटलं की,  रडायचं. हसायचं. चिडायचं. रुसायचं. मादक व्हायचं. प्रेम करायचं. यालाच सुख मानायचं. हे सगळं केलं की यश मिळतं. यश मिळालं की नाव मिळतं. नाव मिळालं की किंमत मिळते. पण किंमत मिळाली ती चढ्या भावाने ती वसूलही केली जाते. सगळ्यांकडून, अगदी आई-बहिणीपासून निर्माता-दिग्दर्शक आणि प्रेक्षकांकडूनही, या जाणिवेने तिला छळलं असलं का कधी?
म्हणजे, वसूल करणारे कुणीही असू शकतात. आपले नात्यातले, गोत्यातले, परके. पण देणारे मात्र आपण एकटेच. हेच आपलं जग. यापलीकडे बघायचं नाही. सर्वसामान्य सुखाची अपेक्षा करायची नाही. असंच घडलं असेल का श्रीदेवीच्या आयुष्यात? अगदी बहराच्या काळात. तामिळ-तेलगू-कन्नड-मल्याळम-हिंदी भाषांतल्या सुपरड्युपर हिट चित्रपटांच्या काळात. या काळात तिचं स्वत:कडे कधी लक्ष गेलं असेल का कधी? मनोरंजनाच्या बाजारातली एक शोभिवंत वस्तू बनलोय आपण, हे जाणवलं असेल का तिला कधी? स्वत:च्याच स्वर्गीय सौदर्याची चीड आली असेल का तिला कधी? याच चिडेतून बंडखोरीचा प्रयत्न केला असेल का कधी, कधी तरी स्वत:लाच संपवून टाकण्याचा टोकाचा विचार वगैरे ?  की हेच आपलं भागधेय आहे, म्हणून  स्वत:ची समजूत काढली असेल तिने?

 

आपण काय करतोय हे? कुणासाठी करतोय हे सगळं असं म्हणून रडली असेल का ती? एकांतात? कुणाच्याही न कळत. "श्रीदेवी इज वन ऑफ दी सेक्सिएस्ट अँड दी मोस्ट ब्युटीफुल वूमेन गॉड एव्हर क्रिएटेड'अशी जाहीर तारीफ करणाऱ्या रामगोपाल वर्माचा राग आला असेल का तिला कधी? "प्रत्येक भावनेसाठी आणि प्रसंगांसाठी श्रीदेवीकडे खूप प्रकारचे भाव आहेत.आपल्याला काय हवंय, हे एकदा तिला सांगितलं की, आपल्या भात्यातून ती आवश्यक ते भाव बाहेर काढते आणि पडदा जिवंत करते,' अशी  दाद देणाऱ्या "मि. इंडिया'वाल्या शेखर कपूरच्या कौतुकात दडलेला गर्भीतार्थ कळला असेल का तिला कधी? किंवा तिच्या मर्जीतले छायाचित्रकार असलेल्या गौतम राजाध्यक्षांना  सई परांजपेंनी एकदा एका प्रसंगी'काहीही म्हण तू, पण मला श्रीदेवी अशिक्षित वाटते'अशी प्रतिक्रिया दिल्याचा राग आणि मग स्वत:चीच कीव आली असेल का तिला कधी?  

 

पण हा तरी विचार तिच्या डोक्यात यावा, इतकी उसंत तरी कुठे असावी तिला. सतत यश, यश आणि यश. आधी दक्षिणेत स्टार  मग हिंदीत मादक स्टार, चढत्या क्रमाने अभिनयगुण संपन्न सुपरस्टार. वन वुमेन इंडस्ट्री वगैरे.  पण आता आपल्याला पर्यायच नाही म्हटल्यावर अभिनयाचे सारे रंग आत्मसात केले असतील का तिने आयुष्याच्या एका टप्प्यावर? म्हणजे अगदी चार्ली चॅप्लिनस्टाईल मूकाभिनयासह सगळे? पर्यायच नाही म्हणून. जसं एकेकाळी आशाताईंनी केवळ सर्वाइव्ह होण्यासाठी म्हणून गाणं आपलंसं केलं आणि त्यात मास्टरी मिळवली तसं? ‘थंडर थाईज’ हा आपला युनिक सेलिंग पॉइंट, म्हणजेच ‘युएसपी’ बनवलाय या इंडस्ट्रीने याची स्वत:पुरती किळस वाटली असेल का  तिला कधी?  
सिनेमाच्या धंद्यात शिरल्यापासून आईचाच धाक, आईचीच साथ आणि आईचाच विचार आणि आई गेल्यानंतर नवऱ्याच्या सावलीत वावरल्यामुळे स्वतंत्रपणे निर्णय घेणे, स्वतंत्रपणे विचार करणं, जमलं असेल का तिला कधी? कारण, आई-वडिलांपश्चात तिच्या सख्ख्या बहिणीने, श्रीलताने तिला  प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. त्या एका घटनेने घर सुटलं तशी नातीसुद्धा संपली. 


तेव्हा स्वत:चे व्यवहार स्वत:च करण्याची वेळ तिच्यावर ओढ‌वली.  बँकेत पैसे भरताना आवश्यक असणारी पे स्लीप तिने आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा बघितली.  अचानक उद्भवलेल्या या गुंत्याने ती सैरभैर झाली.
 याच वावटळीत आईचा आधार गेल्यानंतर  विवाहित बोनी कपूरसोबत लग्न करून सोन्याच्या पिंजऱ्यात स्वत:हून कैद होण्याचा निर्णय घेतला असेल का तिने?  सुरक्षित आयुष्याची हमी म्हणून?  की आईच्या अखेरच्या आजारपणात सगळी जबाबदारी बोनी कपूरने उचलल्याचं दडपण सहन झालं नाही म्हणून? आणि  याच दडपणातून बाहेर पडण्यासाठी लग्नानंतरच्या पंधरा वर्षानंतर तिने स्वत:हून  नव्याने चेहऱ्यावर मुखवटा चढवण्याचा, पुन्हा कॅमेरासमोर येण्याचा निर्णय घेतला असेल का तिने ? की  अभिनेत्री म्हणून स्वत:चा इगो गोंजारायचा असेल तिला? अभिनयाचा निखळ आनंद लुटायचा असेल की  किंवा  परिस्थितीवश  पुन्हा स्वत:ला सिद्ध करून दाखवणं भाग पडलं असेल? यातच तिला अधिकाधिक स्वतंत्र आणि सुरक्षित वाटत असेल, असं काहीतरी? 
की ज्या क्षणी श्वास कोंडला, हृदय थांबलं त्या क्षणी ती खऱ्या अर्थाने ती झाली असेल स्वतंत्र आणि सुरक्षितही?

 

ताणतणावातून का होईना, बड्या निर्मात्याशी लग्न झालं. दोन गोड मुली झाल्या. पडद्यावरचं कमबॅक यशस्वी ठरलं. पुन्हा लोकप्रियता, पुन्हा प्रसिद्धी, पुन्हा पैसा. पुन्हा पुरस्कार. परदेश दौरे. रिअॅलिटी शो, प्रगल्भ अभिनयाचं कौतुक. सेलेब्रिटी चित्रकार सुभाष अवचटांशी तिच्या असलेल्या मैत्रीचे कुतूहल, तिने रंगवलेल्या चित्रांची वाहवा, मुलीच्या नायिका म्हणून आगमनाची तयार झालेली हवा...पण असं सगळं  असलं म्हणून सोबत सुखही येतं याची शाश्वती असते का?  
एवढी मोठी नटी. एवढ्या मोठ्या निर्मात्याची बायको. नवऱ्याला सरप्राइज डिनरला घेऊन जायचं म्हणून टबबाथ घेण्यासाठी बाथरुममध्ये गेली आणि तिच्यापुरतं सगळं संपलं. कसं शक्यय हे? कार्डिअॅक अरेस्ट? नाही, टबातल्या पाण्यात बुडून मृत्यु. शरीरात अल्कोहोलचा अंश.  नाही, शरीरावर ठिकठिकाणी झालेल्या प्लास्टिक सर्जरीचाच हा परिणाम. नवरा बोनी कपूरची तथाकथित चौकशी. तो तिला एकटा सोडून भारतात परतलाच कसा? तिचे लग्नसोहळ्यातले फोटो-व्हिडिओ. त्यातली  एन्जॉय करण्याच्या प्रयत्नात असलेली ओढग्रस्त चेहऱ्याची ती. तिचे मद्याचा अंमल चढल्यानंतर स्वत:वरचा ताबा नसल्याचं ठासून सांगणारे जुने व्हिडिओ. ती तर दारु पीत नव्हती. मग शरीरात अंश कसा? हे नक्कीच गँगस्टर दाऊद इब्राहिमचं कारस्थान. बोनी कपूरचंसुद्धा असू शकतं.  या प्रकरणाची नव्याने चौकशी झालीच पाहिजे आणि सगळ्यांत शेवटी दुबई पोलिसांचा आदेश-श्रीदेवी डाइड ऑफ अक्सिडेंटल ड्राउनिंग- केस क्लोस्ड. फिनिश! 
पूर्वी बोलणाऱ्यांचं तोंड धरता यायचं नाही, आता मीडिया-सोशल मीडियावर लिहिणाऱ्या-बोलणाऱ्यांचे हात आणि तोंड धरता येत नाहीत.

 

प्रत्यक्षात किती गोष्टी एकत्रित घडल्या असतील? तिने टॅब सुरु केला. टबात पाणी भरलं. तिला पडल्यापडल्याच भोवळ‌ आली. मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला. तिची शुद्ध हरपली. ती पाण्यात बुडत गेली. श्वास कोंडला. हृदय बंद पडलं. बाहेर तिचा नवरा, बोनी कपूर ती तयार होऊन येईल,म्हणून वाट बघत थांबला.  पण ती आलीच नाही, परतून.
या सगळ्याचे अर्थ लावायचे तर खूप लावता येतात. किंवा जसं  एखादं धडधाकट माणूस कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक पाय घसरून पडल्याचं निमित्त होऊन मरण पावतं. तशीच श्रीदेवीसुद्धा मरण पावली, असाही स्वत:पुरता सरळ साधा निष्कर्ष काढता येतो. 
पण, काय होतं हे सारं? परीकथा? शोकांतिकेची किनार असलेली परीकथा की परीकथेचा निव्वळ भास देणारी शोकांतिका? 

 

divyamarathirasik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...