आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिपशिखा कालिदास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लवकरच येणाऱ्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हणजेच महाकवी कालिदास दिनानिमित्त त्यांच्या काव्यातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवणारा लेख.


वैशाखाच्या उष्मादाहानंतर वर्षाऋतूची मोहक चाहूल लागते. आकाशामध्ये ढग दाटीवाटी करतात. कविमन उद्युक्त नाही झाले तर नवलच! पावसांच्या सरींबरोबर कविता, चारोळ्यांच्या सरी देखील बरसू लागतात. पर्वतीय प्रदेशामध्ये जलभारामुळे नभ जणू काही डोंगरावरच उतरले आहेत असा भास होतो. परंतु या नियमित घडणाऱ्या भौगोलिक घटनेकडे पाहून शंभर-सव्वाशे श्लोकांचे नितांत सुंदर विरहकाव्य रचणाऱ्या महाकवी कालिदासांची काव्यप्रतिभा हजारो वर्षांपासून रसिक मनांना भुरळ पाडत आली आहे. प्रिय पत्नीच्या “अस्ति कश्चित् वाग्विशेष:?” या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघालेल्या कालिदासांकडून रघुवंश, मेघदूत, कुमारसंभव यासारख्या काव्यांची निर्मिती होणे ही दैवी घटनाच वाटते!


कवी कालिदासांच्या चरित्राबद्दल सांगणारे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यांच्या स्थल-काळाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते त्यांचा काल गुप्तशासक विक्रमसंवतस्थापक विक्रमादित्याच्या समकालीन म्हणजे इ. स. चौथ्या किंवा पाचव्या शतकामध्ये असावा. कालिदासांच्या अनेक रचनांमध्ये तत्कालीन समृद्ध जीवनशैलीचे वर्णन आढळते. मानवी भावभावनांचे वर्णन व त्यांना दिलेली चपखल उपमा यामुळे कालिदासांची प्रत्येक रचना वेगळी ठरते. रघुवंश या महाकाव्यामध्ये इंदुमती स्वयंवर प्रसंगीचा एक श्लोक आहे...

 

संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा।
नरेन्द्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपालः।।


या श्लोकामध्ये कवी कालिदासांनी राजकुमारी इंदुमतीस रात्रीच्या प्रहरी मार्गामध्ये येणारा प्रदेश उजळून टाकणाऱ्या दीपशिखेची (मशालीची) उपमा दिली आहे. राजकुमारी इंदुमती हातामध्ये वरमाला घेऊन राजासमोर उभी राहते, तेव्हा राजकुमारीच्या अभिलाषेमुळे त्या राजाचे मुख उजळते. परंतु जेव्हा राजकुमारी राजाला अव्हेरून पुढे सरकते तेव्हा त्या राजाचे मुख म्लान होते, असा या श्लोकाचा अर्थ आहे. उपमा अलंकाराचा असा सौंदर्याविष्कार निव्वळ अद्वितीयच आहे! उपमेतील या सौंदर्यामुळे कालिदासांना पुढे “दीपशिखा कालिदास” असे संबोधन मिळाले. स्वयंवर प्रसंगी वधूच्या मनातील लज्जा, भीती, कुतूहल, संकोच इ. भावना कवीने अप्रतिमरीत्या टिपल्या आहेत. कालिदास रचित रघुवंश महाकाव्य म्हणजे संस्कृत साहित्यातील उत्कृष्ट रसाविष्कारच म्हणावा लागेल. यातील सीतात्याग, राम निर्वाण इ. प्रसंग करुणरसाने ओतप्रेत भरलेले आहेत. वनवासी सीता, वसिष्ठाश्रम इ. चे वर्णन करताना शांत रस प्रकर्षाने जाणवतो. तर राम, परशुराम, रघूचा दिग्विजय अशा प्रसंगामध्ये वीररससागर खळाळतो. रघुवंश हे महाकाव्य म्हणजे आर्यधर्माचा श्रुतिस्मृतिपुराणोक्त अविष्कार!


महाकवी कालिदासरचित आणखी एक काव्यरत्न म्हणजे “कुमारसंभव”. कुमार कार्तिकेयाच्या जन्माची ही कथा. एकूण १७ सर्गांचे हे काव्य असून आठव्या सर्गामध्ये शंकर-पार्वती यांच्या रतिक्रीडेचे  वर्णन केले आहे. देवतांचे वैयक्तिक जीवन सार्वजनिक केल्यामुळे कालिदासांना तत्कालीन जनसमुदायाच्या टीकेला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे त्यांनी हे काव्य आठव्या सर्गानंतर अर्धवट सोडले. उर्वरित सात सर्ग प्रक्षिप्त असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. संस्कृत अभ्यासकांमध्ये “उपमा कालिदासस्य” ही लोकोक्ती प्रसिद्ध आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी काव्यामध्ये वापरलेल्या समर्पक उपमा. उदाहरणार्थ कुमारसंभवमधील पुढील श्लोक.


अनंतरत्नप्रभवस्य यस्य  हिमं न सौभाग्यविलोपि जातम्।
एको हि दोषों गुणसन्नितीनिमज्जतिन्दो: किरणेष्विवाङ्क:॥


याचा अर्थ असा आहे की, ज्याप्रमाणे हिमकणामुळे हिमालयाची शोभा कमी होत नाही त्याचप्रमाणे व्यक्तीमधे पुष्कळ उत्तम गुण असतील तर एखादा अवगुण दिसून येत नाही. जशी चंद्रावरील डागांमुळे त्याच्या किरणांची शोभा कमी होत नाही. अवतीभवती असणाऱ्या नैसर्गिक गोष्टींची उपमा मानवी स्वभावाला देण्याचे कसब वाखाणण्यासारखे आहे. सृष्टीतील ऋतुचक्राचे वर्णन कालिदासांनी “ऋतुसंहार” या खंडकाव्यामध्ये केले आहे. ऋतूंच्या बदलांचा पर्यावरणावर तसेच तरुण मनावर कसा परिणाम होतो याचे प्रतिभाशाली वर्णन ऋतुसंहारमध्ये पाहावयास मिळते. 


कालिदासांची प्रतिभा विशेष खुलली आहे ती संस्कृत काव्यमालेतील मेरुमणी असलेल्या “मेघदूत” या खंडकाव्यामध्ये! मंदाक्रांता वृत्तामध्ये रचलेले हे विरहकाव्य अतिशय नादमधुर आहे. या काव्यामध्ये कवी कालिदासांच्या ओघवत्या व रसाळ लेखणीची प्रचिती येते. शापित यक्षाचा संदेश पत्नीकडे घेऊन जाणाऱ्या मेघाचे प्रवासवर्णन करताना कवीने अनेक अलंकारांचे आणि रसांचे अप्रतिम मिश्रण केले आहे. मेघदूतामध्ये उत्तर-मध्य भारतामधील अनेक स्थळांचे वर्णन करताना भौगोलिक रुक्षता येऊ दिली नाही हे विशेष! शृंगाररसाने ओतप्रेत भरलेल्या या काव्यामध्ये कोठेही नैतिकतेची कास सोडलेली आढळत नाही.


बहुतांश वेळेस कालिदासांच्या साहित्याची तुलना भवभूतींच्या साहित्याशी केली जाते. परंतु दोघाही साहित्यकारांच्या रचनेचा लहेजा वेगवेगळा आहे. भवभूतींच्या साहित्यामध्ये बाह्यसौंदर्यापेक्षा आतल्या सौंदर्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्यांचे साहित्य प्रामुख्याने करुणरसभरित आहे तर कालिदासाची काव्ये विविधरसमिश्रित आहेत. कवी भारवि हे कालिदासांच्या समकालीन होते, असे म्हणतात. त्यांच्या रचनांमध्ये केलेले निसर्गवर्णन तसेच मानवी स्वभावाचे पैलू यामध्ये कालिदासांच्या शैलीची छाप असल्यासारखी वाटते.


कालिदासांच्या रचनांमध्ये नैसर्गिक वैविध्य आणि मानवी जीवन यांच्यातील साम्यस्थळे दाखवली गेली आहेत. व्याकरणदृष्ट्या उपमा, रूपक, उत्प्रेक्षा, अर्थांतरन्यास अलंकाराने परिपूर्ण असलेले त्यांचे साहित्य म्हणजे संस्कृत अभ्यासकांसाठी मेजवानीच आहे! वरील साहित्यकृती व्यतिरिक्त गंगाष्ट्क, विक्रमोर्वशीयम, शृंगारतिलक, मालविकाग्निमित्रम् या रचनादेखील अजरामर आहेत. राजशेखराने त्याच्या काव्यामीमांसेमध्ये शब्दकवी, रसकवी, अर्थकवी, मार्गकवी, अलंकारकवी, उक्तीकवी, शास्त्रार्थकवी असे कवींचे सात प्रकार सांगितले आहेत. या सर्व प्रकारांचे यथोचित मिश्रण कालिदासांच्या प्रत्येक रचनेत दिसून येते. बाणभट्टाने “हर्षचरितम्” या ग्रंथामध्ये कालिदासांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. कर्नाटकमधील ऐहोळे येथील शिलालेखामध्ये कालिदासांची स्तुती केलेली आढळते. महाकवी कालिदासरचित काव्यनाट्यरत्नांनी व सुभाषित मौक्तिकांनी संस्कृतसाहित्यसागर समृद्ध झाला आहे. भारतीय गीर्वाणवाणी साहित्यरचनेच्या मुकुटामध्ये कालिदासांच्या साहित्याने विविधरंगी मोरपीस खोवले गेले आहे. रघुवंश, कुमारसंभव, मेघदूत, ऋतुसंहारादी काव्ये म्हणजे जणू त्या मयूरपंखावरील मनोहारी रंगछटा! आपल्या साहित्याद्वारा संपूर्ण भारताचा इतिहास उजळून टाकणाऱ्या दीपशिखा कालिदासांच्या काव्यप्रतिभाप्रकाशामध्ये आजही अखंड जग न्हाऊन निघत आहे!

- अश्विनी उंब्रजकर, सोलापूर
uashu.8787@gmail.com

बातम्या आणखी आहेत...