आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रातलं गाण आणि गाण्यातलं चित्र!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या कुटुंबातले सगळे सदस्य अतिशय खेळीमेळीने एका घरात नांदतात, तशा ‘संगीतकार’, ‘गायक’, ‘कवी’, ‘चित्रकार’ या चारही भूमिका अतिशय सलोख्याने मिलिंद जोशी यांच्या ठायी नांदत असतात. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाशी झालेला हा कलात्मक संवाद...


सं गीतकार मिलिंद जोशी यांच्या घरात हॉलच्या एका भिंतीवर हिरव्या गर्द रंगाचं एक मोठ्ठं चित्र लावलं होतं. चित्रकलेवर माझं प्रेम असल्याने मी साहजिकच त्यांना विचारलं "वाह! कुणाचं पेंटिंग?’ ते म्हणाले, "माझं!’ मला आश्चर्य वाटलं. बिनधास्त, गोळाबेरीज, अशाच एका बेटावर, शेंटिमेंटल यांसारख्या सुप्रसिद्ध सिनेमांसाठी, ठष्ट, टॉम अँड जेरी, गेट वेल सून, डिअर आजो यांसारख्या लोकप्रिय नाटकांसाठी, चाळीसहून अधिक दूरदर्शन मालिकांसाठी शीर्षक संगीत किंवा पार्श्वसंगीताचं काम करणारा संगीतकार, कवितेचे गाणे, रंग नवा, गाणारी गझल यांसारखे वेगळ्या धाटणीचे कविताप्रधान कार्यक्रम स्वतःच्या कवितांसह सादर करणारा कवी, गायक इतकी सुंदर पेंटिंग्जही करतो? त्यावर ते म्हणाले, "गाण्यात कविता आणि कवितेत चित्र असतंच की!’ 
"हो, असतं! पण तुम्हांला ते कसं आणि कधी सापडलं?’
तेव्हा ते म्हणाले, "लहानपणापासून मी आईकडे शास्त्रीय संगीत शिकत होतो. तिसरीत असल्यापासून मी गातही होतो आणि चित्रही काढत होतो, पण कलेतच करिअर करायचं हा विचार पक्का होण्यामध्ये गणित आणि विज्ञान या विषयांचाही खूप मोठा वाटा आहे. दहावीपर्यंत गणित आणि विज्ञानाचा मला प्रचंड कंटाळा होता. डोकं जड होणे, डोळे लाल होणे अशा काही विकारांना सामोरं जावं लागतंय की काय इतकी भीती असायची मनात! तेव्हा मी औरंगाबादला राहत होतो. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला कुठून तरी अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली की, चित्रकलेचं असं स्वतंत्र कॉलेज असतं आणि त्यात गणित आणि विज्ञान हे विषय नसतात. ही गोष्ट १९८२-८३ सालची. ज्या कुटुंबातले बहुतांश लोक सरकारी किंवा बँकेत नोकरी करत असतात, अशा आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाने चित्रकलेचं शिक्षण, तेही दुसऱ्या शहरात जाऊन घ्यायचं ही खूप धाडसाची गोष्ट होती, पण माझ्या आईचा मला पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे मी पुण्यात येऊन अभिनव कला महाविद्यालयात कमर्शियल आर्ट या विषयाचं शिक्षण घेतलं. त्या दरम्यान पुण्यात राम माटे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं आणि फैयाज हुसैन खान यांच्याकडून गझल गायकीचं शिक्षणही घेतलं. एकीकडे कार्यक्रमांमधून गाणं सुरू होतंच.’ मिलिंद जोशी यांचा औरंगाबादपासून सुरू झालेला प्रवास मुंबईनगरीपर्यंत येऊन ठेपला. त्या वेळी चित्रकलेच्या कोर्सची अंतिम परीक्षा मुंबईत जे. जे. कला महाविद्यालयात होत असे. "ते ११ दिवस जे मी मुंबईत राहिलो होतो, तेव्हा मी ठरवलं की हीच ती जागा, आपण इथे येऊन काम केलं पाहिजे. पण मी नापास झालो. माझा नाराज होण्याचा स्वभाव नसल्यामुळे मी म्हटलं ठीके, ही परफॉर्मन्स ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. आपल्याला सर्टिफिकेट कोण विचारतोय? मी तो रिझल्ट आणि पोर्टफोलिओ घेऊन कुलाब्याला एका एजन्सीमध्ये गेलो. तिथे मी सांगितलं की, मी परीक्षेत नापास झालोय, पण माझा पोर्टफोलिओ बघा. त्यांनी पोर्टफोलिओ पाहिला, तिकडे नोकरी मिळाली. नोकरी आणि त्यासाठी डोंबिवली ते कुलाबा असा रोजचा प्रवास करावा लागल्याने दिवस सकाळी सहा वाजता सुरू होऊन रात्री तीन-साडेतीन वाजता कधीही संपायचा. त्यामुळे या काळात माझा गाण्याचा रियाज, सादरीकरण वगैरे पूर्ण बंद झालं. पण गाणं काही डोक्यातून जात नव्हतं.’


मुंबईत ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्याकडून शब्दप्रधान गायकीचं शिक्षण घेण्याचं भाग्य मिलिंद जोशी यांना लाभलं. "जाहिरात क्षेत्राकडून मला खूप काही शिकायला मिळालं असलं तरी मी फार काळ त्यात रमलो नाही, कारण माझा तो पिंड नाहीये. हे सगळं करून झाल्यावर आजही मला असं वाटतं की, मी कॉलेजमध्ये असताना फाइन आर्ट घ्यायला हवं होतं. कारण त्यानंतर मी स्वतःहून ड्रॉइंग आणि पेंटिंग करायला लागलो. गाण्याच्या बाबतीतही तेच आहे. मी सिनेमासाठी आयटम नंबर कंपोज करून देतो, पण खरं तर मला कविता गायला आवडते. मी कमर्शियली गीतलेखनसुद्धा केलं आहे, पण माझा कविता लिहिण्यातला आनंद वेगळा आहे. स्वानंदासाठी आपल्या आवडीप्रमाणे कलाकृती साकारणारा कलाकार आणि अर्थार्जनासाठी नाटक, सिनेमा, इ. करताना कलाकृतीच्या गरजेप्रमाणे काम करणारा व्यावसायिक कलाकार या दोन वेगळ्या स्तरांवर काम करावंच लागतं. त्याहीपेक्षा, हा फरक कायम टिकला पाहिजे, त्यामुळेच कलाकार जिवंत राहतो, असं मी म्हणेन. आपली स्वप्नं, प्रयत्न आणि सत्य या गोष्टींचा समतोल राखता आला पाहिजे,’ असं ते सांगत होते.
संगीत आणि चित्रकला या दोन्ही कलांवर त्यांचं सारखंच प्रेम आहे. त्या दोन्हीमध्ये ते सारखेच रमतात. त्या दोन कला जणू त्यांच्यासाठी एकरूप झाल्या आहेत. यांमधला समान दुवा काय असं विचारल्यावर ते म्हणाले, "मला हे सूर आवडतायत, पण त्यातला भाव लोकांपर्यंत पोहोचतोय का, हा विचार अत्यंत महत्त्वाचा असतो. जाहिरात क्षेत्रात काम करत असताना चार वर्षांनंतर मला पहिली जिंगल करायला मिळाली. पण ते ‘अप्लाटड म्युझिक' करावं लागतं. त्यामुळे क्रिएटिव्हिटी मॅनेज करणं हे काम जाहिरात क्षेत्रातही करावं लागतं आणि संगीत क्षेत्रातही. दोन्हीकडे काळाबरोबर तंत्रज्ञान, प्रेझेंटेशन आणि टारगेट ऑडियन्स सतत बदलत असतो. त्यामुळे जाहिरात क्षेत्रातला हा अनुभव मला संगीत क्षेत्रात काम करतानाही उपयोगी ठरला. चित्रातली चित्रमयता आणि संगीतातली चित्रमयता, चित्रातले रंग आणि संगीतातले रंग आनंद देतात. अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग करण्यात जे स्वातंत्र्य आहे ते वाद्यसंगीत कंपोज करण्यामध्ये आहे. रियलिस्टिक चित्र काढणं हे शब्दांना चाल लावण्यासारखं आहे. त्यामुळे दोन्ही कलांचा एकमेकांशी संबंध निश्चितच आहे."


चित्रकला असो वा संगीत, एखादी कलाकृती स्वानंदासाठी करण्यात आणि कमर्शियली करण्यात फरक आहे का, यावर ते म्हणाले, "जाहिरात क्षेत्राचं काम सोडल्यानंतर मी खऱ्या अर्थाने पुन्हा चित्रकलेकडे वळलो. मी लँडस्केप्स काढू लागलो, वाॅटर कलर्समध्ये रमू लागलो, तेव्हाच कवितेकडेही वळलो. आवडीचं चित्र काढणं हे मला कविता करण्यासारखं वाटतं. विकण्यासाठीचं चित्र म्हणजे जाहिरातीची जिंगल केल्यासारखं असतं. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या घरी मला शिकायला जायचं होतं. त्या वेळी त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना असा परिस्थितीत त्रास नको, म्हणून मी काही त्यांच्याकडे गेलो नव्हतो. ते मला म्हणाले, "तू काही माझ्याकडे येत नाहीस.’ मी म्हटलं, "अहो, तुमची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून मी आलो नाही.’ त्यावर त्यांचं उत्तर आठवून आजही मी अवाक् होतो. ते म्हणाले, "मला खूप व्याधी आहेत. त्यामुळे माझा सगळं आवरून बसायला संध्याकाळचे चार वाजतात. पण चार ते सात या वेळात दोन चाली होतात. तू त्या वेळात ये की!’ हे कलेच्या आत शिरणं आहे. मी उभा आहे आणि माझ्याभोवती कला आहे, असं नाहीये. हे वातावरण मला माझ्याबाबतीत टिकवण्यासाठी माझी चित्रकला खूप मदत करते. जर मी कमर्शियली संगीत करत असेन, तर चित्र काढणं ही मला माझी स्पेस वाटते. त्याद्वारे मी मोकळा होतो. या चित्रात काय आहे? असं कोणी विचारलं तर मला नाही सांगता येणार, पण मला ते चित्र काढताना खूप आनंद मिळालेला आहे. ग्रेसांच्या कविता, जी. ए. कुलकर्णींच्या कथा वाचताना आपल्याला कधीकधी त्यांना नेमका काय अर्थ अपेक्षित आहे ते कळत नाही, पण ते साहित्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचलं तर साधारण एक आपला आपला वेगळा अर्थ काढतो आपण त्यातून. अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगचंही तसं होतं.’ आपल्या मनातल्या भावनांचा आदर करून त्याप्रमाणे काम करण्यासाठी धाडस आणि कलेबाबत आत्मविश्वास लागतो. जेव्हा दोन किंवा अधिक कला अंगी असतात, तेव्हा या कलांना मॅनेज करण्यासाठी वेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, या सगळ्या बाबींचा समतोल राखत यशस्वी वाटचालीसाठी मिलिंद जोशी यांना शुभेच्छा!


- भक्ती आठवले, मुंबई
bhaktiathavalebhave@gmail.com

बातम्या आणखी आहेत...