आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक झुंज रेड्यांची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट हा खेळ म्हणून एकाच वेळी उत्क्रांत आणि प्रगतही होत गेला असेल, पण सर्वव्यापी होण्याच्या हव्यासापायी तो अधिकाधिक व्यापारकेंद्री, अधिकाधिक मनोरंजनकेंद्री होत गेला, हे एक सत्य. या बदलांचा जितका फायदा खेळ आणि देशोदेशीच्या खेळाडूंना झाला, त्याहून अधिक फायदा प्रस्थापित व्यवस्थांना झाला, हे दुसरे सत्य. आज याच व्यवस्था "लाख दुखों की एक दवा'म्हणून "आयपीएल' नामे अफूच्या गोळीचा सर्रास वापर करताहेत. भारतातला ही गोळी देण्याचा यंदाचा मोसम अनिश्चिततेच्या फेऱ्यात का होईना नुकताच सुरू झालाय. या "आयपीएल'चा उत्तरोत्तर वाढत गेलेला झगमगाट आणि  सामान्य माणसाच्या वाट्याला येणारा  वास्तवातला  भगभगाट यातल्या विसंगतीवर बोट ठेवणारा हा मार्मिक लेख...


स्मान उन्हाळा दरवर्षी येतो. पाण्याची मारामार. टँकरची घरघर. उन्हाचे चटके. वर्षभर काही जिल्ह्याच्या ठिकाणी दहा-दहा दिवस नळाला पाणी नाही. ऐन उन्हाळ्यात तर पाण्याचा खणखणाट. अश्मयुगात हातात दगडी हत्यारे घेऊन शिकारी मागे पळणाऱ्या माणसांसारखे लोक हातात रिकामे हंडे घेऊन टँकरमागे पळतात. सार्वजनिक नळावर कधी नवसाचं पाणी आलंच तर पाण्यासाठी भांडणं होतात. टाळकी फुटतात. पाण्याऐवजी लाल रक्त वाहतं. हापसा फक्त कुत्र्याला तंगडी वर करण्यासाठी. नदी, नाले, तळे आटलेले. शेतशिवार करपून गेलेलं. दुबार पेरणी, नापिकी, कर्ज, दुष्काळ, गारपीट, आलाच माल तर भाव पडलेले... अशी सालभराची भकास कथा. अशा वेळी कदरदान मायबाप सरकार टँकरची खेप वाढवतं. चारछावण्या सुरू करतं. पण ही यंत्रणा पुन्हा एकदा पुढाऱ्यांच्याच हातात असते. "रोहयो' सारखा इथेही पैसे कमावण्याचा बेशरम धंदा सुरू होतो. मृत माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यापेक्षाही जिवंत माणसाचं पाणी छिनून घेणं अधिक भीषण आहे. एप्रिल ते जून पाण्याचं दुर्भिक्ष तीव्र असतं. या दिवसांत खेड्यापाड्यात दररोज इंडियन परेशान लीगची (आयपीएल) मॅच सुरू असते. चेंडूमागे पळाल्यासारखे लोक जीवाच्या आकांतानं टँकरमागे मळत असतात. टँकरची वेळ साधायला क्रिकेटसारखी टायमिंग लागते. स्लिपमध्ये सतर्क उभं राहिल्यासारखं हापशावर रांगेत उभं राहावं लागतं. शेवटच्या चेंडूवर त्रिफळाचित झाल्यासारखं, टँकर येऊनही पाणी मिळालं नाही, हे सत्य पचवावं लागतं. क्रिकेटमध्ये पत्त्यासारखा डाव कोसळतो तसं सारं शिवार करपून जातं. एकापाठोपाठ आपले सहकार फलंदाज बाद होतात, तसे इकडेही कुणी झाडाला लटकवून घेतं, कुणी विष पितं. इंडियन परेशान लीगमध्ये फक्त झगमगाट नसतो.


या परेशानीवर तातडीचा उपाय म्हणून बऱ्याच गावांत राजकीय नेते कीर्तन महोत्सव घेतात, भजन सप्ताहाचे जंगी आयोजन करतात. मोठमोठे मंडप टाकून अध्यात्म उगाळलं जातं. लोकांना पाणी हवंय, तर अध्यात्म वाटलं जातं. तो कोपलेला नियंताच जबाबदार आहे, असा दैववादाचा फवारा भाबड्या लोकांवर मारला जातो. या परिस्थितीला वाढलेलं पाप कारणीभूत ठरविलं जातं. नदीपल्याडच्या एका गावातले लोक समस्या घेऊन सारखे येऊ नयेत म्हणून एका लोकप्रतिनिधीने दहा वर्षं त्या नदीवरचा पूलच मंजूर होऊ दिला नाही. हीच आहे, ती इंडियन परेशान लीग.


खेडोपाडी ही परिस्थिती असताना शहरात एक एप्रिल येतो. माणसं एकमेकांना एप्रिल फूल करतात. खरं तर एक एप्रिललाच लोक प्रामाणिक वागतात. कारण त्या दिवशी गंमत म्हणून फसवलं जातं. पण एरवी वर्षभर स्वार्थापोटी एकमेकांचे गळेकापू एप्रिल फूल आपण करीतच असतो. सरकार नावाची व्यवस्था तर एप्रिलफूल करण्याकरीताच असते. ‘गरिबी हटाव’ आणि ‘अच्छे दिन’ हे दोन महाएप्रिल फूल भारतीय माणसाला कायमचे स्मरणात राहतात. दर पाच वर्षांनी उसाचा बर्फगार रस देतो म्हणून ही यंत्रणा आपल्यालाच चरकात घालीत असते. अर्धमेली झालेली माणसं पुढच्या मतदानाला हवीत म्हणून मायबाप सरकार काळजी घेतं. उदाहरणार्थ, एप्रिल महिना तापत असतो. एक एप्रिलची मूर्ख बनण्यातली व बनवण्यातली मजा मनात रेंगाळत असताना, मानवी जमातीच्या कल्याणासाठी भारतात एक महायज्ञ गेल्या काही वर्षांपासून आरंभिला जातो. तो महायज्ञ म्हणजे, इंडियन प्रिमिअर लीग उपाख्य आयपीएल उपाख्य ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यांचा हैदोस. बोलो... शेर से शेर लढा तो कोन जितेगा? बाबा रे, खेळता तुम्हीच, जिंकता तुम्हीच. आम्ही आपले जिंदगी बर्बाद करून तुमच्यासाठी टाळ्या वाजवणारे, टीआरपी वाढवणारे गांडूळ आहोत. इंडियन परेशान लीगमधली माणसं "आदिदास' ‘नायके’च्या टोप्या घालून, ब्रँडेड पोशाखात, शीतपेये पीत स्टेडियममध्ये आयपीएल एन्जॉय करू शकत नाहीत. तरी टीव्ही नावाची साथीची बिमारी घरोघर पसरलेलीच असते. एकदा या टीव्हीसमोर बसल्यावर जाहिरातीतला एसी ऑन असला, तरी आपल्याला थंड वाटतं. खाना-खजानाचे खवय्ये कार्यक्रम बघून ढेकर येतो. मोहमयी दुनिया आहे...


लटकणाऱ्या कपड्यांना
लगडतात माणसं,
या चकचकीत लोणच्यापासूनच
तयार होते कैरी,
यो मोहक फुलांसाठीच
जन्मलीत फुलपाखरं,
हेच दूध नेऊन भरलं जातं
गाई-म्हशींच्या आचळात,
ही अंडी उधार नेऊन
पक्षी करतात स्वत:ची वंशवृद्धी,
कधीही येऊ शकतात मधमाशा
या नॅचरल मधाच्या बाटलीवर


ही या टीव्हीच्या संमोहनाची कमाल आहे. एकदा आमच्या एका शेतकरी मित्रानं भारी कल्पना बोलून दाखवली. आयपीएलची मॅच सुरू होती. पडद्यावरच्या हिरव्यागार मैदानावर रंगीत कपडे घातलेले खेळाडू हलत होते. ‘हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे मधे जेवढा हिरवा रंग जाणवला नव्हता, त्यापेक्षा कैक पटींनी पडद्यावरचं हिरवं-पोपटी एचडी’ मैदान आकर्षून घेत होतं. मॅच रंगात आलेली होती. ते लुसलुशीत गवतानं भारलेलं मैदान पाहून शेतकरी मित्र म्हणाला, ‘आयला, काय गवतंय. आपल्या गावची सारी ढोरं चरायला सोडली तर जगून टर्रर्र होतील.’ अर्थात, या व्यवस्थेचा फक्त एका गावापुरता सुखनैव शांतीचा विचार नाहीच. भारतातल्या तमाम असाहाय्य, अस्वस्थ असंतुष्ट लोकांना शांत करण्यासाठी आयपीएल असतं.


 म्हणजे बघा, रात्री थकून -भागून घरी आलेला भारतीय नागरिक रात्री रोमहर्षक ट्वेंटी-ट्वेंटी मॅच बघून झोपला की, त्याला सुखेनैव झोप लागते. झोप चांगली लागली, की आरोग्य चांगलं राहतं. माणसं सुखी होतात. देश समृद्ध होतो. माणसे उठाव करण्याचा विचार विसरतात. (आयपीएलचा हा मूळ उद्देश असावा असे वाटते.) प्रश्न होते, आहेत आणि राहतील. शेवटी जगायला एक नशा लागते. लोकांचा असंतोष दाबून टाकण्यासाठी त्यांचं लक्ष दुसरीकडं वळवावं लागतं. त्यांना करमणुकीसाठी एक खेळ द्यावा लागतो. आपला हेतू साध्य करण्यासाठी त्या खेळाची वाट लागली तरी चालते. जशी की, आयपीएलमध्ये मूळ क्रिकेटची वा लागलेली आहे. पैसा प्रेरणा होताना बॅटचा हातोडा आणि बॉलचा तोफ गोळा झाल्यामुळे खिलाडूवृत्ती, सद््भावना आणि खेळही संपला. लिलावात विकत घेतलेले खेळाडू यांत्रिकतेने खेळत असतात. धावसंख्या वाढते, गडी बाद होतात. थरार होतो. पण जिवंत कुणीच नाही. संवादाविना नवरा-बायकोला मूल व्हावं तसे धावांचे डोंगर उभे राहतात. विक्रम प्रस्थापित होतात. मनाला चुटपुट मात्र लागत नाही. रेड्यांची टक्कर पाहिल्याचा अघोरी आनंद मात्र मिळतो.
 
 
टक्कर लावून त्याची मजा बघत बसण्याची परंपरा खूप जूनी आहे. एका देशातल्या राजेशाहीत राजाच्या करमणूकीसाठी सिंह आणि बंदीवान कैद्याचा जाहीर सामना लावला जायचा. प्रजाजनांना बसायला खास सोय असायची.


बंदिवान कैद्याला सिंहासमोर सोडलं जायचं. तो माणूस जीव वाचवण्यासाठी सिंहाशी संघर्ष करायचा. बरेचदा त्या कैदी माणसाचे सिंह तुकडे-तुकडे करायचा. एखाद वेळी एखादा कैदी सिंहाला वरचढ ठरायचा. अशा वेळी त्या कैद्याची पुढील शिक्षा माफ व्हायची. पण मूळ हेतू राजाचे मनोरंजन हाच होता. अशीच मनोरंजनासाठी रेडा, बोकुड, कोंबडा, तितर यांचीही टक्कर लावली जाते. कोंबड्यांची झुंज रोमहर्षक करण्यासाठी त्यांच्या पायांना ब्लेड बांधले जाते. खेड्यात रेड्याच्या टक्करी फार लोकप्रिय. अमूक तमूक मालकांचे तय्यार रेडे एकमेकांवर तुटून पडायचे. रेड्यांचीही ख्रिस गेल, वॉटसन, युसूफ पठाण, युवराज सिंह यांच्यासारखी ख्याती होती. रेड्यावर मेहनत घेऊन त्याला तयार केलं जायचं. कारण तो रेडा त्या मालकाची प्रतिष्ठा बनायचा. मालकाच्या अस्मिेचं प्रतीक बनायचा. त्यामुळे कुणासाठी तरी, कुणाच्या तरी इशाऱ्यावर लढणारा रेडा कठपुतळी वाटायचा. दोन रेडे एकमेकाला भिडायचे, तेव्हा खऱ्या अर्थाने दोन सरंजामशाहीची अहंता पणाला लागायची. एका वर्षी आमच्या गावी टकरीत गवळ्याचा रेडा हरला. देसायाचा रेडा जिंकला. जमलेल्या गावकऱ्यांच्या साक्षीनं देसायांना चांदीचं कडं (ट्रॉफी) देण्यात आलं. गवळी पराभवाने थरथरत होता. गवळ्याची प्रतिष्ठा धुळीला मिळालेली होती. संतापलेल्या गवळ्याने तो हरलेला रेडा चक्क खाटकाला कापण्यासाठी विकून टाकला. जय-पराजयाला सोबत घेऊन जाणारा खेळ इथं हरला होता. रेड्यांची टक्कर प्राण्यांची असते. आयपीएल तर माणसं खेळतात. तरी वृत्ती-प्रवृत्तीत किती तरी साधर्म्य जाणवतायत.


आयपीएलमध्ये एक धनाढ्य मालक पैशाची बोली लावून खेळाडूला चक्क विकत घेतो. अशा खेळाडूंची टीम तयार होते. गाव-प्रदेशाची अस्मिता चेतवून त्या टीमचं नामकरण केलं जातं. टीम ‘पुणे वॉरियर्स’ असते, पण तिचा कर्णधार एखादा परदेशी खेळाडू असतो. बरेचदा त्या टीममध्ये पुण्याचा स्थानिक एकही खेळाडू नसतो. मग पुणे नाव कशासाठी? तर भावनिक अस्मिता जागी करून चुरस वाढवणे आणि टीआरपी कमावणे हा मूळ उद्देश आहे. 


विकृत स्वार्थापायी प्रत्येक गोष्टीचं मूळ सत्त्वच आपण नष्ट करीत आहोत. फुलाकडे फूल म्हणून पाहता येतं, तसं माणसाकडं माणूस म्हणून पाहता येत नाही. कारण माणूस कोणत्यातरी जातीधर्माचा असतो. शाकाहारी/मांसाहारी असतो. काळा/गोरा असतो. शैव/वैश्णव असतो. शिया/सुन्नी असतो. कॅथलिक/प्रोटेस्टंट असतो. अक्करमाशी/बारामाशी असतो. यात त्याचं माणूसपणच हरवून जातं. आपण नदीचं नदीपण हिसकावून घेतलं. डोंगराला टरबुजासारखं कापलं. समुद्राला मागे हटवलं. तसं ‘आयपीएल’च्या निमित्तानं क्रिकेट खेळाला आंतर्बाह्य भ्रष्ट करून टाकलं. हे खरं, की काही उपेक्षित खेळाडू प्रकाशात आले, धनवान झाले. ही ‘आयपीएल’ची उजळ बाजू. पण, वरकरणी चकचकीत दिसणारं आयपीएल आतून संशयास्पद अर्थकारणाचं आणि राजकारणाचं मायाजाल आहे. रसिकतेच्या बाजूनं बघावं तर मॅच पाहायला आलेले लोक रेड्याची टक्कर बघायला आल्यासारखे चेकाळलेले असतात. टीमचे मालक कशासाठी येतात तेच कळत नाही. टीम मालक शाहरुख खान मॅच बघण्याऐवजी फ्लाइंग किस देण्यात मश्गूल असतात. मालकीण प्रीती झिंटा चित्रपटातील अपुरी इच्छा स्टेडियममध्ये ठुमके लगावून पूर्ण करते. घरी खूप उकडतंय म्हणून अंबानीचं कुटुंब स्टेडियममध्ये हवेला येऊन बसल्यासारखं वाटतं. इतर प्रेक्षकही खानपान करत अघोरी चेकाळत असतात. या प्रचंड गोंगाटाला घाबरून बिच्चारं क्रिकेट तिथून पसार झालेलं असतं. तरीही खेळाडू खुश, आयोजक खुश, जाहिरातवाले खुश, विक्रेते खुश, चिअर गर्ल्स खुश,आयपीएल मंडळ खुश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीड महिना लोक ‘आयपीएल’च्या गुंगीत राहणार म्हणून राजसत्ता खुश. एवढ्या मायदाळ खुशीचं कारण म्हणजे, आयपीएल! बोला... ‘आयपीएल’च्या नावानं... चांगभलं!


- दासू वैद्य
dasoovaidya@gmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...