आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगरमध्ये मध्यंतरी विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धा घेण्यात आल्या. वयाची कोणतीही अट नसलेल्या या स्पर्धेच्या तयारीचा आणि स्पर्धेचा अनुभव सांगणारा हा लेख...
नवीन वर्षात नगरमध्ये एक धमाल घटना झाली. आम्हा मैत्रिणींच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर मेसेज येत होता अहमदनगर शहरात होणार पहिली विमेन्स प्रीमियर लीग, चला मैत्रिणींनो खेळू या क्रिकेट. वेगळं काही तरी करू या आणि हो, वयाची कोणतीही अट नाही.
आतापर्यंत फक्त टीव्हीवर क्रिकेटचे सामने पाहिलेली मी. आणि आज समोर आली होती मलाही हा खेळ खेळण्याची संधी. छे, आपल्याला काय डोंबल येणार हे क्रिकेटबिकेट खेळता, म्हणून हा विचार बाजूला सारला आणि मी कामाला लागले. पण सारखं मन म्हणत होतं, काय हरकत आहे प्रयत्न करून पाहायला. खरंच क्रिकेट खेळता येईल का मला, रोज सरावाला जाणं जमेल का, घरातून परवानगी मिळेल का, परंतु या सर्व प्रश्नांवर इच्छाशक्तीने मात केली. डब्ल्यूपीएलमध्ये सहभाग नोंदवला. नगरच्या श्रद्धा बिहाणी आणि त्यांच्या समितीने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. महिलांनी, महिलांच्या सहकार्याने आणि महिलांसाठीच अशी ही स्पर्धा होती.
एकूण २० दिवस प्रशिक्षण आणि नंतर दोन दिवस सामने असं वेळापत्रक होतं. रोज सकाळी नऊ ते साडेदहा सराव असायचा. आम्हाला प्रशिक्षण देणाऱ्याही मुलीच होत्या, अकरावीत शिकणाऱ्या ज्ञानेश्वरी वाघ आणि आरती केदारे. या दोघी राज्य स्तरावर क्रिकेट खेळलेल्या आहेत. आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोचण्यासाठी खडतर मेहनत घेत आहेत. वयाने लहान असल्या तरी नेतृत्व आणि खेळातील समर्पण त्यांच्यात आहे. पाथर्डीसारख्या ठिकाणी राहूनही त्यांचा इथवर झालेला प्रवास वाखाणण्याजोगाच. विमेन्स प्रीमियर लीगमध्ये आठ संघ होते, म्हणजे १२० महिलांनी भाग घेतला. पहाटे उठून सकाळची कामं, मुलांचे टिफिन, स्वयंपाकाची तयारी असं सर्व उरकून पहिल्या दिवशी आम्ही बरोबर ८.५५लाच मैदानात हजर होतो. मग सुरू झालं आमचं प्रशिक्षण. बॅट कशी पकडायची, बाॅल कसा फेकायचा, वेळेचं भान ठेवत धावा कशा काढायच्या हे आम्ही शिकत होतो. क्रिकेटचे सर्व नियम, तंदुरुस्तीचं महत्त्व, व्यायामाचे विविध प्रकार, असं सगळं काही शिकण्याचा आम्ही मनापासून आस्वाद घेत होतो.
सराव करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांतच तनामनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. खेळाचा पोशाख, मैदानावर उत्साहाने केलेला सराव मनाला दिवसभर आनंदी ठेवायचा. प्रत्येक महिला आपापल्या परीने उत्कृष्ट सराव करण्याच्या प्रयत्नात होती. या दरम्यान अनेक नव्या मैत्रिणी मिळाल्या. समयसूचकता, प्रसंगावधान, एकता या गोष्टींची चर्चा झाली. काही दिवस का होईना, गप्पांचे विषय बदलले. शाॅपिंग, पार्लर, स्वयंपाक, भिशी, संसारातील त्याचत्याच गप्पांऐवजी बाॅलिंग, बॅटिंग, रनिंग, महिला क्रिकेट खेळाडू, या गोष्टींवर गप्पा रंगल्या. अनेक नवीन गोष्टी माहीत झाल्या. कुणी एखादी मॅच हरत होते, कुणी जिंकत होते. मात्र हरण्याजिंकण्याच्या पलीकडे जाऊन खिलाडूवृत्तीने आम्ही मैदानावर धमाल केली. खेळाला कदाचित वयाची अट असेल, पण खिलाडूवृत्तीला नाही, हे अगदी खरं. कारण हरलेल्या संघानेही विजयी संघाबरोबर जल्लोष केला. चौकार, षटकार, घेतलेली विकेट, या सगळ्यावर गाण्याच्या तालावर ठेकाही धरला. अशी ही क्रिकेट धमाल आम्हाला एका वेगळ्याच विश्वात कमालीची रमवून गेली. एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे, हा खेळ आपल्याला वाटतो तितका, दिसतो तितका सोपा नाही. प्रचंड मेहनत, चिकाटी, समर्पण, या गोष्टी त्यामागे असतात. अशी मेहनत घेत देशाचं नाव जागतिक पातळीवर पोचवणाऱ्या सर्व पुरुष व महिला खेळाडूंना त्रिवार सलाम. हे क्षण, आयुष्यातील निवडक दिवसांची आठवण करून देतील, याच शंकाच नाही.
- दीपाली चुत्तर, अहमदनगर
deepalisanklechachuttar@gmail.com
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.