आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रुमर्दिनी-शुभगामिनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदिरांवरील शिल्पे ही विचार आणि विवेकाचा अपूर्व संगम असतात. त्यांचे विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट आकारात असणे, याला निश्चित असे प्रयोजन असते. ही शिल्पे एक प्रकारे संस्कृती, सभ्यता आणि सौंदर्याची प्रतीकेच ठरतात... 


मंदिरात जाताना देवदर्शन घेणे हाच उद्देश असतो, हे मानले तर त्यासाठी भक्तांचे मन कसे असले पाहिजे, हे मंदिराच्या बाह्यभिंतीवर शिल्पित केलेल्या सुरसुंदरी भक्ताला सुचवीत असतात. शास्त्रोक्तपणे दर्शन घ्यायचे तर आधी बहिर्देवपूजा अभिप्रेत असते. म्हणजे, असे की मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावरील देवकोष्ठात (कोनाड्यात) असलेल्या देवतामूर्तींचे पूजन/दर्शन घ्यायचे असते. सध्या आपण सरळच थेट गाभाऱ्यात जात असतो आणि देवदर्शन घेऊन मग प्रदक्षिणा करतो. म्हणजे, नेमकं उलटं करीत असतो.  या प्रदक्षिणापथावरून जाताना बाह्यभिंतीवरील सुरसुंदरीच्या शिल्पाकडे आपले लक्ष जाते तेव्हा त्यांचे तेथे असण्याचे प्रयोजन काय असू शकते, याचा संभ्रम पडतो. यापैकी दोन सुंदरींना या बाबतीत काही सांगायचे असते, त्याकडे लक्ष वेधणे हे या लेखाचे प्रयोजन आहे.  या सुरसुंदरी म्हणजे, शत्रुमर्दिनी आणि शुभगामिनी. नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर या गावाजवळच्या होट्टल या छोट्या गावातील सिद्धेश्वर मंदिरावर यांच्या मनोहारी प्रतिमा आहेत. यांच्यापैकी शत्रुमर्दिनीचे शिल्प येथे आहे आणि शुभगामिनी सुरसुंदरी आहे, गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कण्डा येथील मंदिराजवळ. दोन्हींचे प्रयोजन एकच आहे. 


सुरसुंदरींची शिल्पे मंदिरावर असतात, ती देवदर्शनाला जाणाऱ्या भक्तांचे प्रबोधन करण्यासाठी असे वाटते. पाश्चात्त्यांना व त्यांचे अनुकरण करणाऱ्या भारतीय कलासमीक्षकांना या सुरसुंदरींचे देहसौष्ठवच केवळ दिसते. काही मंडळींना तर प्रश्न पडतो की, यांना मंदिरावर दाखवून मंदिराचे पावित्र्य घालविले जाते. खरे तर त्यांच्या मंदिरावरच्या उपस्थितीची संकल्पना माहीत नसल्यामुळे असे होत असते. त्या सुंदर, मनोहारी, आकर्षक असतात, हे खरे आहे. किंबहुना, आपले त्यांच्याकडे लक्ष वेधले जावे हा त्याच्यामागे उद्देश असतोच. त्या काय हितगुज करीत आहेत, हे त्याशिवाय कसे कळणार! आता या शत्रुमर्दिनी सुरसुंदरीकडेच पाहा. तिला काय सांगायचे आहे, हे आपण जाणून घेऊ. कोणत्याही शिल्पाचा उद्देश हा कालमान परिस्थिती आणि स्थान हे लक्षात घेतल्याशिवाय यथार्थाने अवगत होत नसतो.  देवदर्शनास जाताना काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि अहंकार या षड््रिपूंना मनातून घालवून देऊनच जायचे असते. मन निर्मळ, विकारविरहित नसेल तर देवदर्शनापासून कसलाच लाभ व्हायचा नसतो. गीतेत(३.३७) म्हटलेय 


काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।  
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् 


म्हणजे, हा काम आहे, हा क्रोध आहे, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा अधाशी आणि महापापी आहे. या लोकी हा आपला वैरी आहे. ‘काम आणि क्रोध म्हणजे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत, विवेकदरीचे वाघ आहेत, भजनमार्गाचे भांग आहेत, मारक आहेत’ असे संत ज्ञानेश्वरांचे या श्लोकावरचे भाष्य आहे. विषयासक्ती, इंद्रियनिग्रहाचा अभाव इत्यादिकांस कारण हे विकारच आहेत. तेव्हा या शत्रूंचा नि:पात करूनच मंदिरात देवदर्शनासाठी जायचे असते आणि हेच तर ‘शत्रुमर्दिनी’ सुरसुंदरी सांगत उभी आहे सिद्धेश्वर मंदिरावर. ही उभी आहे ते डावं पाऊल आडवं ठेवून आणि उजवं पाऊल किंचित मागं घेऊन. तिच्या उजव्या हातात उगारलेली कट्यार आहे. कट्यारीच्या मुठीवर हिच्या मुठीची मजबूत पकड आहे. त्यावरून शत्रूचा नि:पात करण्याचा तिचा निर्धार मनावर ठसतो. याचे प्रत्यंतर तिच्या डाव्या हातातील धडापासून वेगळ्या झालेल्या शत्रूच्या मुंडक्याकडे पाहिल्यावर येते. ‘असिपुद्र धरा नृत्या शोभते शत्रुमर्दिनी’ असे तिचे वर्णन क्षीरार्णव या ग्रंथात आलेले आहे. ही सुरसुंदरी मध्यम वयाची प्रौढा दिसते. ती सर्वांगाने भरलेली आहे. तिचे गोलाकार मांसल खांदे म्हणजे जणू गजशावकाची डोकीच होत. प्रौढेला साजेसे तिचे वक्षस्थल पूर्णाकार आहे. तिने ल्यालेल्या अलंकारामुळे तिच्या सौंदर्याला यथोचित उठाव प्राप्त झाला आहे. तिला जे सांगायचे आहे त्यासाठीचा आवश्यक तेवढा गंभीरपणा तिच्या चेहऱ्यावर प्रत्ययकारीपणे दिसतो आहे.  मंदिरात माणसे कोणकोणत्या मिषाने जातात याचे छान वर्णन समर्थांच्या दासबोधात आलेले आहे. आणि मंदिरात कसे जावे हे सुरसुंदरी संकेताद्वारे दर्शवितात. षड््रिपूंचा नाश करून देवळात जायचे असते हेही शत्रुमर्दिनी सांगते आहे. महाराष्ट्रातील मोजक्याच मंदिरांवर ही आढळते. 


आधी उल्लेख केल्याप्रमाणे याच विषयाशी संबंधित अशी अजून एक सुरसुंदरी आहे. ती शुभगामिनी या नावाने ओळखली जाते. खरे तर हे नाव २००४ पर्यंत कोणासच माहीत नव्हते. तोपर्यंत आणि आताही हिच्याबद्दल लिहितात ते, ही स्त्री पायातला काटा काढण्यात किती मग्न आहे, ितचे देहसौष्ठव त्यामुळे कसे आकर्षक झाले आहे, एकूणच कलाकार कसा कुशल आहे, इत्यादी. मंदिरांच्या बाह्यभिंतीवर असलेल्या तिच्या प्रतिभेचे प्रयोजन काय, याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. हिंदू मंदिरांचा शास्त्रीय आणि सर्वांगीण अभ्यास केलेल्या जर्मन विदुषी व संस्कृत पंडिता डॉ. स्टेला क्रॅमरिश म्हणतात, की मंदिराचा आणि मंदिरावरील कोणताही भाग विनाकारण नसतो. त्याच्यामागे काही मंदिराशी सुसंगत असा अर्थ असतो. आपल्या प्रतिपाद्याचा विषय असलेली ही शुभगामिनी काय सांगतेय ते पाहूया.  


क्षीरार्णव ग्रंथात ‘शुभा कंटक निर्गता पाद शृंगार कर्मीच हंसा कमल लोचना’ असे तिचे वर्णन आलेले आहे. खजुराहो येथील मंदिरावर अशा सुरसुंदरींचे शिल्पांकन झालेले आहे आणि कलेच्या दृष्टीने पाहता ‘देखिल्याने मन धारी’ अशा त्या आहेत. हेही पटते. मात्र हिच्याकडे प्रयोजनानुसारी दृष्टीने पाहिले पाहिजे असे वाटते. वसंत सेनेसारख्या अभिसारिकेच्या पायात काटा मोडतो त्याचे प्रयोजन वेगळे असते. शिल्प वा चित्र विषयाकडे पाहताना त्याचा आस्वाद घेताना ते कोणत्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर बेतलेले आहे, कोठे घडवलेले आहे याचाही विचार करावयाचा असतो, तर त्याची संगती लागते. मंदिरावर ती असते तेही मनामध्ये खोलवरपर्यंत असलेले कामादी विकार पायात रुतलेल्या काट्यांसारखे उपसून टाकायचे असतात या संकेताचा विचार करावा लागतो. 


अशी एक शुभगामिनी सुरसुंदरी गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडिया गावच्या मार्कंडादेव मंदिरावर आहे. हे मंदिर आहे शिवाचे. या मंदिराच्या बाह्यभिंतीवर एकूण ४४२ शिल्पे आहेत. मंदिराला वेढा घालून असणाऱ्या तीन शिल्पजडित पट्टिकांपैकी एकीवर ही आहे. आपला मार्ग निष्कंटक करून तो शुभमार्ग (निर्धोक) करून मंदिरात जायचे असते, हेही सांगते आहे. 


एक सुभगा बैठकीवर बसली आहे. तिने डावा पाय मुडपून, खाली सोडलेल्या उजव्या पायाच्या मांडीवर ठेवला असून उजव्या हाताने ती पायात रुतून बसलेला काटा उपटून काढते आहे. मोठ्या गांभीर्याने ती हे कार्य करते आहे हे कलाकाराने तिची एकाग्रता, तिची दृष्टी पायावर खिळलेली, याद्वारे प्रकर्षाने आपल्यासमोर आणलेली आहे. तिच्या धनुष्याकृती भुवया, सरळ नासिका आणि उन्नत उरोज यामुळे तिच्या यौवनगर्भ सौंदर्यात भरच पडलेली आहे. तिचा सुटलेला डाव्या खांद्याच्या बाजूने घरंगळलेला केशकलाप आणि उजवीकडे पडलेले उत्तरीय लक्षात घेता तिची झालेली पळापळ लक्षात येते. मात्र रुतलेला काटा काढायचा तर बसून तत्परतेने तो काढावा लागतो, हे शिल्पकार विसरलेला नाही. 


तात्पर्याने आणि संकेताप्रमाणे घ्यायचे ते हे की, मंदिरात देवदर्शनास जाताना मनातले सर्व विकार, पायात रुतलेला काटा काढावा तसे काढून टाकावे लागतात. मंदिरावरील सुरसुंदरींच्या शिल्पांचे योजन असते ते असे. 


- डॉ. जी. बी. देगलूरकर 
udeglurkar@hotmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

बातम्या आणखी आहेत...