आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळ म्हणजे त्रास!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्चनाच्या आयुष्यातल्या पोस्टपार्टम सायकाॅसिस च्या अवघड काळात तिला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन, परस्परांना जमेल तसा, जमेल तेवढं समजून, सावरून, सांभाळून घेत, मानसोपचाराबद्दल कुठल्याही शंकाकुशंका न घेता डोळसपणा दाखवणाऱ्या एका कुटूंबाचा प्रवास...

 

अर्चनाची आई एका लग्नात भेटली.
मी विचारलं, “आता कशी आहे अर्चना?”
‘गोळ्या सुरू हायेत पन् आता तशी बरीये,” त्या म्हणाल्या.
अर्चनाची केस म्हणजे टिपिकल ‘पोस्टपार्टम सायकाॅसिस’ची. बेबी ब्लूज आणि पोस्टपार्टम डिप्रेशन यात थोडासा फरक आहे. बेबी ब्लूज म्हणजे फक्त चिडचिड, विनाकारण मूड जाणे, झोप न येणे, वगैरे जे बऱ्याच वेळा आपोआप नियंत्रणात येतात. मात्र यात आत्महत्येचे विचार किंवा बाळाला इजा करण्याचे विचार आले की, ते पोस्टपार्टम डिप्रेशन आहे हे डॉक्टर्स समजून जातात. जर ते वेळीच लक्षात आलं नाही तर स्वभाव कायमस्वरूपी बदलू शकतो किंवा मानसिक विकार त्रासदायक पातळीवर जाऊ शकतो. याला पोस्टपार्टम सायकाॅसिस म्हटलं जातं.
प्रसुती झाल्यानंतर तीन महिने बाईची परिस्थिती मानसिक/शारीरिक पातळीवर अगदीच कमकुवत असते. अशा परिस्थितीत जर कुठला मानसिक धक्का बसला तर मनःस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. या सायकाॅसिसचे दुष्परिणामही दूरगामी असतात.
अर्चनाचं उदाहरण असंच.
लग्न झाल्यावर अगदी सहा महिन्यांतच तिला दिवस गेले. पहिला मुलगा झाला. सगळा आनंदीआनंद असायला हवा होता. पण अर्चना उदास उदास होती. त्या उदासीचं कारण फार ठोसही नव्हतं.


जेमतेम बारावी पास झाली आणि घरच्यांनी लग्न लावलं. नवीन संसारात तशी ती खूश होती. एकत्र कुटुंब म्हटल्यावर काही तडजोडी कराव्या लागतात. त्या तिनं हसतमुखानं केल्याही होत्या. बारावी झालेली असूनही घरातली नेहमीची कामं करून शेतीची कामंही ती वाघिणीसारखी चपळाईनं करायची. लग्नानंतर लवकरच दिवस राहिले म्हटल्यावर सर्वजण खूप खूश होते.


दिवस गेल्यानंतरही ती रोजची कामं करत होती. थोडं थकल्यासारखं व्हायचं खरं पण तरीही तिला वाटायचं की, हिंडतीफिरती राहिली तर डिलिव्हरी नॉर्मल होईल. “उगीचच पोट कापाया लागनार नाई.’ म्हणून ती थकवा येत असतानाही कामं  उरकायचा रेटा लावी. शेतात उन्हातल्या कामानं तिचा गोरा चेहरा लालेलाल होऊन जायचा. पण ती मागे हटत नव्हती. थोडीशी मळमळ, थकवा सोडलं तर इतर काही फार त्रास नव्हता. पण तरीही सासूबाई म्हणाल्या, “उन्हातल्या कामाच्या उपयोगाची नाई राहिली तू. तू आपलं घरातलं उरकीत जा. शेतीतली कामं मी आणि तुझी जाऊ करीत जाऊ.’


त्या चांगल्या भावनेनं बोलल्या पण बोलणं मात्र टेचात होतं. गोडीत बोललं की, सून डोक्यावर बसेल की काय ही पूर्वापार समजूत त्यांच्या डोक्यात असावी. अर्चनानं दाखवलं नाही पण तिला एकदम वगळलं गेल्याची भावना आली. सांगोपांग विचार करून बोलणं आणि ऐकणं या दोन्ही गोष्टींचा अभाव. पीळ पडायला सुरुवात झाली ती झालीच.

 

मग जावेनं किंवा सासूनंही चांगल्या उद्देशानं जरी काही सांगितलं की, ‘हे काम करू नको. आम्ही करून घेऊ,” तरी तिला उगीचच वाईट वाटायला लागलं. सासू आणि जाऊ दोघी अनुभवी असल्यानं त्या तिला सतत सूचना देत. ‘हे खाऊ नको. ते खाऊ नको. इथे बसू नको. तिथे बसू नको. तिन्ही सांजेला नदीकडे जाऊ नको.” सतराशेसाठ सूचनांमुळे तीही वैतागून जायची. त्यात नवराही तिला जपायचं म्हणून थोडं अंतर ठेवी. खरं तर ही चांगली गोष्ट होती. किती पुरुष असा संयम दाखवू शकत नाहीत. पण यातही तिनं चांगलं शोधलं नाही. उलट तिला नवरा तिच्यापासून लांब गेला असं वाटायला लागलं. आणि हे सगळं लवकर आलेल्या गर्भारपणामुळेच झालंय असं तिच्या मनाने घेतलं. तिची चिडचिड होऊ लागली.


तिच्यातल्या या सूक्ष्म बदलांचं मोठ्या समस्येत रूपांतर होईल असं कोणालाच वाटलं नाही. कारण एक तर खेड्यातल्या शेतकरी कुटुंबात कामं भरपूर असतात. तिथे या गोष्टी मनावर घ्यायला ना कुणाला वेळ असतो ना रस.


‘स्लो पॉयझनिंग’सारखं समस्या रूप धारण करत होत्या. नववा महिना लागला. आणि तिला कळा सुरू झाल्या. बाळाचं वजन जास्त होतं. त्यामुळे बाळंतपण तिच्यासाठी बरंच वेदनादायी ठरलं. ‘बाळ म्हणजे त्रास’ असं समीकरण तिच्या डोक्यात तयार झालं. माहेरी सव्वा महिना असेपर्यंत तिची लक्षणं मर्यादित होती. त्यामुळे ती फार लक्षात आली नाहीत. किंवा सांभाळून घेतली गेली. पण सासरी अगदी थोड्याच दिवसात तिच्या लक्षणांनी उग्र रूप धारण केलं. बाळासाठी होणारी जागरणं, त्याचं सगळं करणं तिला नकोसं वाटू लागलं. सतत ती करवादलेली असायची. कुणावरही तोंड टाकायची. कधीतरी कुटुंबातल्या एका व्यक्तीशी तिची बाचाबाची झाली. आणि अर्चनाचा तोल गेला तो गेलाच. त्या दिवशी ती अक्षरशः कुऱ्हाड घेऊन धावून गेली त्या व्यक्तीवर. सगळे हबकले. रागावलेही.


नवऱ्याच्या मध्यस्थीमुळे प्रकरण तात्पुरतं मिटलं. पण ते तेवढ्या दिवसापुरतंच. नंतर मात्र हे असं वारंवार होऊ लागलं. कधी ती कुऱ्हाड घेऊन धावे. कधी दगड घेऊन तर कधी खुरपं घेऊन.


एकदा तर तिनं कहरच केला. अवघ्या सव्वादोन महिन्यांच्या आपल्या बाळाला तिनं गोठ्यातल्या मारक्या जनावरांपुढे नेऊन ठेवलं. मग मात्र घरच्यांचा संयम सुटला. त्या दिवशी त्यांनी तिला अंगणातल्या झाडाला बांधून टाकलं आणि घरातल्या सर्वांनी जळक्या लाकडानं बेदम मारहाण केली.


ही बातमी कुठूनतरी अर्चनाच्या आईपर्यंत आली. ती लगबगीनं अर्चनाला आणायला म्हणून तिच्या गावी गेली. तिथून तिला कळालं की, अर्चना खूप त्रास देते आहे. तिला सगळे घरचे मिळून अंगणातल्या बाभळीच्या झाडाला फाशी देणार आहेत. हे ऐकल्यावर अर्चनाची आई हादरली. तिच्या पोटात खड्डाच पडला. तरीही तिनं नरमाईनं सासरच्यांना विनंती केली की, काही झालं तर आम्हाला बोलवा पण तिच्या अंगाला हात लावू नका.


सासरच्यांनीही उद्विग्नतेनं तिचे प्रताप सांगितल्यानंतर बिचारी आई लेकीला आणि बाळाला घेऊन माहेरी आली. तोपर्यंत अर्चना कुणालाच जुमानत नसणारी झाली होती. त्या लहानग्या बाळाचं सगळं करणं, अर्चनाचं ताळतंत्र सांभाळणं यातच दोघा नवराबायकोचा (अर्चनाच्या आईवडलांचा) वेळ जात होता. तेही थोडेथोडके दिवस नव्हे, तब्बल दोन वर्षं.


दिवसरात्र दोघे अर्चनाजवळ बसून राहात. बाळाला तर ती जवळ घेत नव्हती, दूधही पाजत नव्हती. त्या दोन वर्षांत घरातलं कुणीच असं नव्हतं की, ज्यांनी अर्चनाच्या हातचा मार किंवा शिव्या खाल्लेल्या नव्हत्या. घरातली लोकं कमी पडली म्हणून की काय, ती रस्त्यावरनं जाणाऱ्या लोकांशीही भांडण काढी. स्वतःच्या आईला तर तिनं एवढं मारलं होतं की, तिचे सगळे पुढचे दात पडून गेले होते. शेवटी अर्चनाला कोंडून किंवा बांधून ठेवावं लागे. त्यात त्या बिचाऱ्या लहानग्या जिवाची बरीच फरफट झाली.


ती दोन वर्षं अर्चनाच्या जवळच्या सर्वांसाठी एखाद्या दुःस्वप्नासारखी होती. आईवडील थोडा वेळसुद्धा तिला व तिच्या बाळाला सोडून कुठेही जाऊ शकत नव्हते. नवरा बिचारा भेटायला येई. एवढ्या चांगल्या, सुंदर बायकोला हे काय झालं म्हणून खंतावे. अर्चनाची आई जावयाला म्हणे, “जाऊ द्या पाव्हनं. तुम्ही दुसरं लग्न करा. हिचा विचार सोडून द्या.” कुठली आई असं म्हणेल? पण अर्चनाच्या आईची एवढी फरपट झाली होती, की सगळे दुर्दशा बघून तिला वाटे ही मेली तर बरं होईल. सगळे सुटतील तरी तिच्या जाचातून. 


अर्चनाचा नवरा बिचारा समजदारच म्हणावा लागेल की, त्यानं तिच्या बरं होण्याची वाट बघितली. लाडीगोडी, धाकदपटशा, देवधर्म, कोंबडं, बकरू, बाबाबुवा सगळं सगळं झाल्यानंतर  डॉक्टरांच्या मदतीनं मानसोपचार तज्ज्ञांची मदत मिळाली. आयुष्याची वाताहत झालेली असूनही सगळं सावरण्याची दुसरी संधी नियतीने तिला दिली. बरीचशी औषधं, शॉक ट्रीटमेंट, रेग्युलर फॉलोअप या सगळ्या प्रयत्नांमुळे अर्चना त्यातून बाहेर आली. आणि आता तिचा संसार सुरळीत सुरू आहे. माझा सलाम आहे त्या मायबापांना आणि तिच्या नवरा व सासरच्यांनाही. तो इतका अवघड काळ त्यांनी परस्परांना जमेल तसं, जमेल तेवढं समजून, सावरून, सांभाळून घेत पार पाडला. अर्चनाची ट्रीटमेंट व्यवस्थित केली, मानसोपचाराबद्दल कुठल्याही शंकाकुशंका न घेता. ग्रामीण भागातील कुटुंब, पण त्यांनी हताश न होता, उशिरा का होईना जो डोळसपणा दाखवला तो खरंच कौतुकास्पद आहे.


- डॉ. क्षमा शेलार, पुणे
shelarkshama88@gmail.com

बातम्या आणखी आहेत...