आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्‍नन्‍सी आणि सेक्‍स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवस राहिले की, नेहमीच विचारायला हवा असा आणि क्वचितच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘आता शरीरसंबंध आले तर चालतील का?’ त्याच प्रश्नाचं शास्त्रशुद्ध उत्तर देणाऱ्या लेखाचा हा पहिला भाग.


दिवस राहिले की, नेहमीच विचारायला हवा असा आणि क्वचितच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘आता शरीरसंबंध आले तर चालतील का?’ 
हा प्रश्न मनात असतो, ओठांपर्यंत येतो, पण बाहेर मात्र क्वचितच पडतो; मात्र खचितच पडायला हवा.


पण एखाद्याने विचारला जरी प्रश्न, तरी त्याचं ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढं त्रोटक उत्तर देता येत नाही. याचं उत्तर चांगलं लांबलचक आहे. संभोग, सेक्स वगैरेबाबतीत मूलभूत दृष्टिकोन समजावून सांगणे आहे. शिवाय शरीरसंबंध हे जोडप्यात घडत असल्याने उत्तर दोघांच्या कानी पडणे आवश्यक आहे. बरेचदा नवरोजी सोबत नसतात, तेव्हा निव्वळ बायकोला काही सांगणं फारसं परिणामकारक ठरत नाही. किंवा बायकोला बाहेर बसायला सांगून नवरोजी हा प्रश्न डॉक्टरांच्या कानात कुजबुजतात. डॉक्टर जे सांगतात ते ‘जसंच्या तसं’ जोडीदाराच्या कानावर घालणं अवघडच.  मग डॉक्टर आपलं काही तरी उत्तर देऊन वेळ मारून नेतात. 


तेव्हा सादर आहे दोघांनाही माहिती हवं असं संपूर्ण उत्तर.
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत तर सेक्स म्हणजे त्या स्त्रीच्या दृष्टीने संकटच असतं. प्रचंड मळमळत असतं. पोटात नुसतं ढवळून येत असतं. साध्या प्रवासाने काही काळ मळमळलं तरी आपण कोण वैतागतो. काही म्हणजे काही करावंसं वाटत नाही. मग दिवस-दिवस हा त्रास काढणाऱ्या बाईला तर काय होत असेल? अशा वेळी तिने रतिसुखाला होकार देणं अपेक्षित तरी आहे का? पण ही गोष्ट पुरुष समजावून घेत नाहीत. बायका सहसा इतक्या मोकळेपणाने बोलत नाहीत. मग बेबनाव सुरू होतो.


सुरुवातीला खूप थकवाही जाणवतो. एरवीची सवयीची कामंही आता जाचक वाटायला लागतात. खूप झोप येते. रात्र झाली की झोपायचं, रात्री झोपून झोपून कंटाळा आला म्हणून दिवसा झोपायचं, पुन्हा रात्र झाली की रात्र झाली म्हणून झोपायचं; अशी स्थिती होते. त्यातून उलटीसाठी गोळ्या दिल्या असतात, त्यानेही झोप येते. या झोपेचा निराळा अर्थ काढला जातो. आता त्या स्त्रीला कामेच्छाच उरली नाही, अशी समजूत करून घेतली जाते.
गरोदरपणात स्त्रीचं रूप खूप खूप बदलतं. इतकं की तिचाच तिच्या बदललेल्या रूपावर विश्वास बसत नाही. 


‘लावण्य जातेस उतू। वायाच चालला ऋतू।
अशाच वेळी गेलीस कां तू। करून जिवाची दैना।
समुद्र बिलोरी ऐना। सृष्टीला पाचवा महिना।।’ 

अशी कवींनी सृष्टिसौंदर्याची तारीफ केली असली तरीही या कालावधीतले अनेक बदल मुळीच सुसह्य नसतात. 


बरेचदा गालावर, नाकावर एक मोठा काळा डाग येतो (Malesma), दिसायला भारी वाईट दिसतो. पोटावर बेंबीपासून खाली जणू कोळशाने ओढावी अशी एक काळी रेघ उमटते (Linea Nigra). हीदेखील विद्रूप दिसते. एकूणच त्वचा काळवंडते. निपलभोवती, मायांगाभोवती काळेपणा वाढतो. शरीरातल्या वाढत्या मेलानिन या द्रव्याच्या या खुणा. प्रसूतीनंतर या मावळतात. पण किंचित मागमूस राहू शकतो, राहतोच. पुढे पुढे पोटावर, मांड्यांवर, स्तनावर, पांढऱ्या रेघा उमटतात (Strie Gravisarum). हे चट्टेपट्टे अगदी विचित्र दिसतात. या रेघा उठतात त्या पोटाची त्वचा अति ताणल्यामुळे. त्वचेचा आतला पापुद्रा चक्क विरतो. कधी खाज सुटते, कधी लाली येते. किरकोळ औषधांनी हा त्रास थांबतो. पण खुणा येऊ नयेत किंवा आलेल्या पूर्ण जाव्यात असं औषध नाहीये. असूच शकत नाही. कारण पोट तर वाढणारच आणि त्यामुळे त्वचा तर विरणारच. म्हणूनच अशा हेतूने विकल्या जाणाऱ्या औषधांची कामगिरी यथातथाच  आहे. त्वचेच्या बदलत्या रंगरूपाबरोबरच पायावर, हातावर, चेहऱ्यावर सूज येते, केसही गळायला लागतात. या पाठोपाठ शरीराची ढब बदलते. सरळ ताठ उभं राहताच येत नाही. पुढे पोक काढून उभं राहावं लागतं. स्तनांचा आकार वाढतो, ते खाली ओघळतात आणि अगदी काखेपर्यंत या गाठी वाढतात. यामुळे बेडौलपणा येतो. स्तनांना हुळहुळेपणा येतो. एरवी हवेहवेसे स्वर्गीय वाटणारे स्पर्श, आता नकोसेच नाही तर तापदायक वाटायला लागतात. स्तनातून अगदी सुरुवातीपासून चीक बाहेर पडतो. हे लक्षात येताच काहींना उगीचच ओशाळल्यासारखं होतं. योनी स्त्रावातही बरेच बदल होतात. त्या स्त्रावाचं प्रमाण आणि गंध बदलतो. योनी मार्गाला आणि एकूणच स्त्री अवयवांना वाढलेला रक्तपुरवठा  हे याचं प्रमुख कारण. रक्तपुरवठा इतका वाढतो की, कधीकधी अलगद स्पर्शानेही रक्तस्त्राव सुरू होतो. मग कोण धावपळ, हा रक्तस्त्राव गर्भाशी थेट संबंधित नाही अशी खात्री होईपर्यंत कोण काळजी. या साऱ्याचा स्त्रीच्या मानसिकतेवर होणारा परिणाम अधिक गहिरा असतो. अनेकींना स्वतःबद्दल विलक्षण न्यूनगंड वाटायला लागतो. ‘आता आपण पूर्वीसारख्या आकर्षक, सुंदर दिसत नाही; निस्तेज, काळवंडलेली कांती, बांधाही बेढब, आता हे सारं पूर्वीसारखं होणं जाम अवघड. आता आपण आपल्या नवऱ्याला पूर्वी इतक्याच आवडू का?’ अशी चिंता भेडसावायला लागते. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. अशा वेळी नवऱ्याने दिलेला विश्वास हा लाखमोलाचा ठरतो. पुरुषांनी हा मुद्दा लक्षात ठेवायला हवा, आचरणात आणायला हवा.


- डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
shantanusabhyankar@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...