आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक क्षण अनुभवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मुलांना आपण खूप बोलायला शिकवतो. पण इतरांसमोर ती बोलली नाहीत की, आपण त्यांना ‘शामळू’चं लेबल लावून टाकतो. चुरूचुरू बोलणाऱ्यांचं कौतुक होतं.


थो र विचारवंत व लेखक लिओ टॉलस्टॉय यांची एक कथा फार सुंदर आहे. कथेचे शीर्षक आहे, “How much land does a man need?” माणसाची तृष्णा, त्यासाठीची धडपड व याचा परिणाम यांचे सुंदर चित्रण कथेत केलेले आहे. कथेत एक मनुष्य पैज पूर्ण करण्यासाठी धावत असतो. संध्याकाळपर्यंत जिथपर्यंत तो धावणार तितकी जमीन तो जिंकणार असे असते. जास्तीत जास्त जमीन मिळवण्याच्या इच्छेपायी तो धावत राहतो. पण शेवटी संध्याकाळी त्याचा जीव गेलेला असतो. ही गोष्ट खूप विचार करायला भाग पाडते. माणसाला काय हवं आहे आणि कशाची गरज आहे हे समजण्यासाठी मनाचा समतोल असायला हवा. हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टींची यादी खूप मोठी असू शकते, पण गरजेच्या आवश्यक गोष्टींची यादी मर्यादित असते. हे कळणंच अवघड आहे. 


आज आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतील ज्या जणू कुठली पोकळी भरण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दशकांपूर्वी रोज वापरावयाच्या वस्तू किंवा चैनीच्या वस्तू ठरलेल्या होत्या. त्यात खूप विविधता नव्हती. परंतु आज असे नाही. अगदी चपलांपासून चष्म्यापर्यंत वस्तू आकर्षक रंगात, किमतीत उपलब्ध आहेत. माणसाच्या चंचल मनाला थोड्या वेळासाठी का होईना पण भुरळ पाडणाऱ्या वस्तूंनी आजची बाजारपेठ सजली आहे. मनात एखादी कल्पना आली की, त्याला साजेशी वस्तू तुमच्यापर्यंत अवघ्या काही वेळात पोहोचू शकते. या बदललेल्या जीवनशैलीचे तरंग आपल्या जीवनात रोज उमटत असतात. शहरांपासून खेड्यापर्यंत हा परीघ वाढत जातो आहे. ही झाली एक बाजू. 


दुसरी बाजू मात्र एवढी सुखावह नाही. वस्तूंची किंमत देत असूनही त्याचे मोल मात्र आपल्याला नाही. कारखान्यात तयार झालेल्या कुठल्याही उत्पादनावर वेळ व श्रम खर्च झालेले असते. याबरोबरच उत्पादनामुळे पर्यावरणातील काही घटकांवर परिणामही होणार असतो. अशा वेळी तयार झालेल्या वस्तू चैनीच्या वस्तू या प्रकारात मोडल्या गेल्या तर ती एक खेदाची बाब म्हणावी लागेल. भारतीय ग्राहक हा वस्तूच्या गुणवत्तेबद्दल जितका चौकस असतो तितकेच ग्राहकाने वस्तू निर्मिती प्रक्रिया किंवा वस्तूंचा पुनर्वापर यांसाठी पुढाकार घ्यायला हवा. नवीन उत्पादनांनी दुकाने भरली जातात व बऱ्याचदा गरज नसतानाही ती वस्तू खरेदी केली जाते. अनावश्यक वस्तूंनी अनेक घरे भरलेली असतात व त्याच वेळी समाजातील काही घटक मूलभूत गोष्टींसाठी झगडत असतात. हा विरोधाभास क्लेष देणारा आहे. यावर उपाय काय? सरकार, कारखानदार किंवा व्यक्ती यांतलं कोण सगळ्यात जबाबदारीने काम करू शकेल?
या चर्चेत पडण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःला काही उपाय योजून देणे गरजेचे आहे. 


यूट्यूबवर Minimalist नावाने एक व्हिडिओ आहे. अमेरिकेतील अतिश्रीमंत वर्गात मोडता येईल त्या वर्गातील दोन जबरदस्त आकांक्षा व स्वप्ने असणारे तरुण. त्यांच्या जीवनात जणू वस्तूंचा खजिनाच. परंतु एके दिवशी त्यांना जाणवलं की, कुठेतरी काहीतरी कमी आहे. खूप शांतपणे विचार केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की, आपल्या जवळच्या सामानाचं आपल्या आयुष्यावरच ओझं झालंय. मग त्यांनी एक निर्णय घेतला की, कमीत कमी गोष्टींत आयुष्य जगायला लागायचं व आयुष्यातला खरा आनंद शोधायचा. जवळच्या मूल्यवान वस्तू, अनावश्यक सामान त्यांनी दान करून टाकले व साधी जीवनशैली अंगिकारली. आजही हे दोघे समाधानी व आनंदी आहेत. व त्यांना लाभलेलं हे सुखसमाधान इतरांना मिळावं म्हणून प्रयत्न करत आहेत. सगळ्यांनाच असं शक्य होईल असे नाही, पण आपल्यासाठी असलेला सम्यक मार्ग आपणच शोधायला हवा. आजूबाजूच्या प्रकृतीकडेही डोळसपणे बघायला हवे. आपल्या गरजा मर्यादित आहे की नाही, हेदेखील वारंवार तपासून बघायला हवे. 


एखाद्या वस्तूपेक्षाही आयुष्यात काही क्षण भरभरून जगल्यास आनंद मिळू शकतो. सकाळची कोवळी उन्हं, पक्ष्यांचं दाणे टिपणं, पारिजातकाचा सडा हेदेखील आनंद देणारं असू शकतं. खरं तर जागृत राहून प्रत्येक क्षण अनुभवणं हे ज्याला साधलं तोच सुखी. प्रत्येक वेळी नाही पण जास्तीत जास्त वेळी जीवनाचे हे तत्त्वज्ञान आपल्याला समजून घेता यायला हवे. असे झाले तरच कृत्रिमतेच्या खाली झाकलेले साधेपणाचे, सत्याचे व आनंदाचे जीवन आपल्या अनुभवास येईल.


- गौरी कल्लावार, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...