आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तें नावाचे कोडे उलगडताना...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आताचा काळ हा, अपेक्षाभंगाचा काळ आहे. सत्ताधारी व्यवस्थेच्या सत्शील समर्थकांच्या आणि विरोधकांच्या सैरभैर समर्थकांच्याही! जाती-धर्माच्या सीमारेषांची नव्याने आखणी होण्याचीसुद्धा हीच घातक वेळ आहे. हिंसा जितकी प्रत्यक्षात दिसतेय, त्याहीपेक्षा अधिक ती मनामनांत दडून आहे. समाज म्हणून आपण सर्रास मुखवटे घालून वावरण्यात तरबेज झालो आहोत आणि राजकीय संस्कृतीने तळ गाठलेला आहे. या पार्श्वभूमीवर समाजमनाचा उभा-आडवा छेद घेणाऱ्या नाटककार विजय तेंडुलकरांची (१९ मे २०१८) दशकस्मृती पाळताना त्यांच्या नाटकांत दिसलेली हिंसा आणि न दिसलेल्या राजकारणाचा शोध घेण्याच्या उद्देशाने घेतलेली नाट्यलेखक-दिग्दर्शक-अभिनेता अतुल पेठे यांची ही संग्राह्य मुलाखत...

 

प्रश्न : केवळ मराठीच नव्हे भारतीय नाटककार म्हणून  तेंडुलकरांचं महत्व या घडीला कशाप्रकारे विशद करता येईल? 

उत्तर : १९४७ मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य अनेक पातळ्यांवरचे स्वातंत्र्य होते. ‘भारतीय’ म्हणून आपली स्वत:ची नेमकी ओळख काय, असा प्रश्न तेव्हा सर्वांनाच पडला होता. एक समाज म्हणून आपण जेव्हा पारतंत्र्यात जगत होतो, तेव्हा वेगवेगळे प्रभाव आपल्यावर लादले गेलेले असतात, किंवा लादले जात असतात - यालाच प्रभुत्ववाद (हेजिमनी) म्हणतात - हे प्रभाव, दबाव झुगारून देऊन, आपल्या मुळाशी जात आपले सत्व काय, आपले स्वत्व काय याचा शोध तो समाज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घ्यायला लागतो.  स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपणही असा शोध घ्यायला लागलो. आपण भारतीय आहोत, म्हणजे नेमके काय आहोत - ही उलथापालथ होऊ लागली. नाटक, चित्रपट, साहित्य, कविता, चित्रकला या माध्यमातून आपले आणि आपल्या समाजाचे भारतीयत्व नेमके कशात आहे, हे प्रत्येक जण  शोधण्याचा प्रयत्न करू लागला. हेच ‘भारतीयत्व’ चार वेगळ्या नाटककारांनी शोधले, त्यामध्ये बादल सरकार, मोहन राकेश, गिरीश कर्नाड आणि विजय तेंडुलकर यांचा समावेश होता. आपल्या मुळांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांतील ‘गोइंग बॅक टु रूट्स’ अशी चळवळच स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झाली होती, त्यातील विजय तेंडुलकर हे अतिशय महत्वाचे नाटककार मानले जातात.

 

अर्थात, नाटककार तेंडुलकरांनी असे काय वेगळे केले, ज्यामुळे त्यांच्या नाटकांना ‘भारतीय नाटक’ मानले जावे, याचा विचार करताना प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे, की तेंडुलकरांची नाट्यसंपदा प्रचंड मोठी आहे. या अस्सल नाटककाराची जवळपास ४० नाटके आज उपलब्ध आहेत. तेंडुलकरांनी नाटकांप्रमाणेच कथा, कादंबरी, ललित लेखन, पटकथा-संवादलेखनही विपुल प्रमाणात केले. बहुआयामी, बहुप्रसवा असा हा लेखक होता. अशा तेंडुलकरांचे महत्व वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला अधोरेखित करता येते. मुळात, एखाद्या नाटककाराने ४०-४५ वेगळी नाटके लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड दमसास लागतो. त्यामुळे विलंबित ख्याल गायल्यासारखी ही तेंडुलकरांची ‘लेखन गायकी’ आहे, असेच म्हणावे लागते. 


तेंडुलकरांच्या नाट्यलेखनात पाच महत्त्वाची सूत्रे आहेत, जी खऱ्या अर्थाने भारतीय मूल्यं जपणारी, मुळांचा शोध घेणारी ठरतात. एक - ज्या नाटकाचा तत्कालीन समाजाशी आणि काळाशी असतो, ते नाटक लिहिण्याचा तेंडुलकरांनी प्रयत्न केला. त्यांच्या कुठल्याही नाटकात आपल्याला तो - तो काळ लखलखीतपणे दिसतो. तेंडुलकरांचे कुठलेही नाटक आपण घेतले, तर तत्कालीन समाजाला नेमके कोणते सामाजिक - राजकीय प्रश्न भेडसावत होते, ते सोडविण्याच्या प्रयत्नात ते समाजघटक कुठल्या मार्गाने जात होते, याचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. त्यांच्या नाटकांतून त्या काळाचा राजकीय - सामाजिक पट अभ्यासता येतो. दोन - तेंडुलकरांच्या नाटकात दोन मूल्यं महत्त्वाची ठरतात - त्यातले एक म्हणजे, तत्कालीन नाटक पाहणारा जो मध्यमवर्गीय प्रेक्षक होता - आणि जो असतोच - त्याला संपूर्ण तडा, त्याच्या चौकटींना तेंडुलकरांनी नाटकांतून तडा दिलेला आढळतो. दोन - तेंडुलकर मराठी लेखक होते, त्यामुळे त्यांच्या नाटकांतून येणारे मराठी, भाषेचा वापर, आशय, शैली ही संपूर्णत: इथे उगवलेली आहे. अर्थात या शैलीलाही परंपरा आहे - ती परंपरा वरेरकर, देवल, दि. बा. मोकाशी यांसारख्या पूर्वसूरींमध्ये शोधता येते आणि तेंडुलकरांचे जे समकालीन लेखक होते, म्हणजे भाऊ पाध्ये, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे आदी, यांच्यामध्येही दिसते. तेंडुलकरांच्या नाटकाचे तिसरे सूत्र म्हणजे, त्यांच्या नाटकातील भाषा नेहमीच त्या त्या समाजाची असते. ओढूनताणून ती संभावित किंवा प्रमाण भाषा नसते. चौथे सूत्र - सेक्स (लैंगिकता) आणि व्हायोलन्स (हिंसा किंवा क्रौर्य) यांचा तेंडुलकरांनी सातत्याने नाटकांतून शोध घेतलेला दिसतो आणि पाचवे सूत्र म्हणजे, तेंडुलकरांच्या नाटकांतील विषय तुरळक अपवाद वगळता मेटॅफर (रूपक) बनण्याची प्रक्रिया घडते. यामुळे तेंडुलकरांनी मराठी भाषेत लिहिलेली नाटके अखिल भारतीय स्तरावर पोचली. भारतीय ठरली. "घाशीराम कोतवाल' नाटकाचे उदाहरण इथे घेता येईल. मुळात घाशीराम हे स्थानिक गोष्टीविषयीचे नाटक आहे. पण ती गोष्ट, त्यातील आशय ‘स्थानिक’ न राहता, त्यात मांडलेला पॉवर गेम किंवा सत्ताखेळ हा कालातीत आणि वैश्विक आहे - जो तेंडुलकर मांडतात. त्यामुळे घाशीराम हे रूपक बनते आणि केवळ मराठीच नव्हे तर भारतीय नाटककार म्हणून तेंडुलकर महत्त्वाचे ठरतात. तेंडुलकरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतात - एखाद्या गोष्टीचे संपूर्ण केंद्रच बदलणे, परिमिती बदलणे, डायमेन्शन पालटणे, हे त्यांच्या नाटकांतून त्यांनी केले आहे, त्यामुळेही ते अखिल भारतीय स्तरावरचे महत्त्वाचे आणि आधुनिक नाटककार या स्थानी आहेत.

 

प्रश्न : तुम्ही तेंडुलकरांवर ‘तेंडुलकर अँड व्हायोलन्स' नावाची फिल्म तुम्ही तयार केली. त्यांच्या नाटकातून दिसणाऱ्या शारिरिक आणि शाब्दिक हिंसेचा , त्यांच्या नाट्यलेखन प्रेरणांचा, आशय, आकृतीबंध आणि नाट्यलेखन शैलीचा कसोशीने शोध घेतला. त्या प्रसंगी तुम्हाला दिसलेले-जा‌णवलेले तेंडुलकर कसे होते?

उत्तर : ‘तेंडुलकर आणि हिंसा - काल आणि आज’ या नावाचा माहितीपट आम्ही तयार केला. आपल्या नाट्यलेखन संस्कृतीमध्ये किंवा नाट्यलेखनप्रवासात तेंडुलकरांचे योगदान मान्य करुन तेंडुलकरांनाच काही प्रश्न विचारावेत, या हेतूने तयार केलेला तो एक  अभ्यासपूर्ण असा माहितीपट आहे. तेंडुलकरांच्या नाटकांत सातत्याने येणारे क्रौर्य आणि लैंगिकता यांचा मुळातून शोध घ्यावा, असाही यामागचा हेतू होता. तेंडुलकरांनीच म्हटल्याप्रमाणे, ‘मानव कितीही सुशिक्षित झाला, तरी हिंसा आणि क्रौर्य ही लपलेल्या श्वापदाप्रमाणे त्याच्यात असतातच. संस्कारित झाल्याने मेंदूवर त्यांच्या संयमाच्या काही मर्यादा निर्माण करता येत असल्या, तरी मूळ प्रवृत्ती हिंसकच असतात. आपण प्राणीच आहोत, असे तेंडुलकरांचे ठाम मत होते आणि ते त्यांनी ठिकठिकाणी मांडलेही आहे.


खरं तर तेंडुलकरांसारख्या लेखकाला कोणते अनुभव आले, त्याचा विचार त्यांच्यातील लेखकाने कसा केला, हिंसा आणि लैंगिकता यांनी ते इतके पछाडलेले का बरं होते, हे शोधण्यासाठीच तो माहितीपट होता आणि त्यादृष्टीनेच मी माझा समकालीन लेखक मित्र मकरंद साठे - आम्ही मिळून त्याची संहिता तयार केली होती. या माहितीपटात मकरंदचे योगदान फार महत्त्वाचे होते. आम्ही काही मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. ‘इंटेलेक्च्युअल डिबेट’ असे त्याचे स्वरूप होते. साधारणपणे माहितीपटात प्रामुख्याने त्या व्यक्तीचे गुणगौरवगान असते. लेखकाचा जन्म कुठे झाला, शिक्षण, कुटंुब, भोवताल, अगदी कपडे, छंद यांची माहिती देणे, असे त्यांचे स्वरूप दिसते. पण आमच्या माहितीपटात तेंडुलकरांना महत्वाच्या वाटणाऱ्या हिंसा आणि लैंगिकता या दोन केंद्रबिंदूंचा शोध होता. तेंडुलकरांना या विषयी आडवेतिडवे प्रश्न विचारणारा हा माहितीपट होता. प्रा. राम बापट यांच्यासारखे महत्त्वाचे विचारवंत या माहितीपटात होते. गो. पु. देशपांडे होते. तेंडुलकरांची नाटके दिग्दर्शित केलेल्या विजया मेहता, डॉ. जब्बार पटेल, पं. सत्यदेव दुबे होते आणि तेंडुलकरांची पाच महत्त्वाची नाटके आम्ही त्यासाठी निवडली होती. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर, गिधाडे, कन्यादान आणि शांतता कोर्ट चालू आहे. या नाटकांतून दिसणारे तेंडुलकरांचे हे केंद्रबिंदू, तत्कालीन समाज कसा होता, तेंडुलकरांना त्यावर अशी नाटके का बरे लिहावीशी वाटली, याचा शोध घेण्याचा तो प्रयत्न होता. एकच उदाहरण देतो - ‘घाशीराम’मध्ये दिसणारी हिंसा तुम्हाला कुठे दिसली, असा प्रश्न विचारल्यावर तेंडुलकरांनी वसंतराव नाईक आणि शिवसेनेचा उदय याविषयीचे अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले. ‘कन्यादान’मधून संपूर्ण दलित चळवळ पुढे आलेली दिसते. नामदेव ढसाळांसारखा बंडखोर, क्रांतिकारी कवी आला. ‘मला उध्वस्त व्हायचंय’ यासारखे मल्लिका अमरशेख यांचे आत्मचरित्र आले - याचा संबंध ते काय लावत होते आणि माणूस म्हणून ते काय भोगत होते . त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू माणूस हाच होता आणि चांगुलपणासोबत वाईटपणा, हिस्रता, क्रौर्य, लबाडी हे सारे सामावलेले होते, त्या माणसाचे अनेक पदर, पापुद्रे उलगडून दाखवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला, त्याचा शोध माहितीपटातून घेण्याचा प्रयत्न होता. यात एकेक नाटक घेऊन तेंडुलकरांना प्रश्न विचारले गेले आणि काही प्रमाणात तेंडुलकर या माहितीपटातून गवसत गेले, असे वाटते. 


या माहितीपटाच्या निमित्ताने मला तेंडुलकरांशी खूप गप्पा मारता आल्या. तेंडुलकर नसते तर मराठी नाटक खऱ्या अर्थाने भारतीय स्तरावर जसे आज मानले जाते, ते झालेच नसते असे मला ठामपणे समजले. एलकुंचवारांनी म्हटले आहे, की तेंडुलकर नसते तर आम्हीच नसतो, ते खरे आहे.  तेंडुलकरांनी नाटक, जगणं आणि भाषा खुली करून दिली. तोवरच्या नाटकात जे संकुचितपण आणि संकोचलेपण होते, ते तेंडुलकरांनी घालवून दिले - हा मान नि:संशय तेंडुलकरांनाच अनेक पिढ्या देतात आणि देत राहतील.


 माहितीपटाच्या निमित्ताने तेंडुलकर जे दिसले ते खुले, निर्भयपणे बोलणारे, बिनधास्तपणे मते मांडणारे, मुलाहिजा न ठेवणारे, अत्यंत वेगळ्या नजरेने जग पाहणारे असे दिसले. त्यांच्याशी मैत्री आधीपासून होती. अनेकदा मी त्यांना आणायला - सोडायला गेलो होतो आणि खूप गप्पाही झाल्या होत्या. अत्यंत वेगळा पण मानवीय दृष्टीकोन ठेवणारा, कायम पाय जमिनीवर असणारा हा लेखक मला कायमच आकर्षित करत आला होता. एखादा नाटककार नाटक नावाच्या गोष्टीकडे, जगणं नावाच्या गोष्टीकडे कसा पाहतो, माणूस नावाच्या गोष्टीला समजून घेण्यासाठी कसा ‘तयार’ होतो, त्यासाठी स्वत:मध्ये किती उलटपालट करवून घेतो - हा माझ्यासाठी तर ‘दृष्टान्त’च होता. त्यामुळे माझे जीवन अधिक समृद्ध, संपृक्त झाले. लेखक म्हणजे काय, अस्सल कलावंत म्हणजे काय, नाटकवाला असणं म्हणजे काय, याचा साक्षात्कारच या माहितीपटाच्या निमित्ताने झाला आणि माझे जगणे अधिक व्यापक, विस्तीर्ण होण्यास या माहितीपटामुळे मदत झाली. 
 

प्रश्न : घाशिराम कोतवाल असेल, वा सखाराम बाइंडर वा कन्यादान, शांतता कोर्ट चालू आहे किंवा बेबी... तेंडुलकरांची ही सगळी नाटकं सामाजिक गुंतागुंत, स्त्री-पुरुष नातेसंबंध याचा  वेध घेणारी होती, सुसंस्कृत-असंस्कृत विचारांचा पिच्छा पुरवणारी होती. या सर्व नाटकांवर विशेषत: सामाजिक दृष्टिकोनातून लिहून आले. पण ना त्यांच्या "दंबद्विपचा मुकाबला' या एकमेव राजकीय म्हणता येईल, अशा नाटकाची फारशी चर्चा झाली, ना त्यांच्या नाटकांतल्या राजकीय अंत:प्रवाहाकडे कुणी लक्ष वेधले. तुमचे याबाबतचे निरीक्षण काय आहे? तेंडुलकरांची नाटकं केवळ सामाजिक आहेत? त्यात राजकारणाचा पदर नाही? 

उत्तर : मला वैयक्तिक असे वाटत नाही. केवळ सामाजिक वा केवळ राजकीय, अशी स्पष्ट रेषा काढणे अवघड आहे. तेंडुलकरांच्या नाटकांवर जे हल्ले झाले, ते केवळ सामाजिक नाटक म्हणून नाही झाले. त्यांची काही नाटके दुर्लक्षित राहिली असेही मला वाटत नाही. एखाद्या नाटककाराने ४० हून अधिक नाटके लिहिली असतील, त्यातील काही प्रचंड गाजली असतील तरी इतर नाटके दुर्लक्षित राहिली, असे म्हणता येणार नाही. तेंडुलकरांच्या नाटकांकडे एकूणच गांभीर्याने पाहिले गेले, असे माझे मत आहे. दंबद्विपचा मुकाबला हेही त्यांचे गाजलेले नाटकच आहे. त्यातील इंदिरा गांधी, महत्वाचा राजकीय परिप्रेक्ष्य यावर चर्चा झाली आहे. त्याचे अनुवादही झाले आहेत. ते दुर्लक्षित अजिबात नाही.


अनेकदा काय घडते - घाशीराम कोतवाल हे राजकीय नाटक म्हणूनच प्रसिद्ध झाले. ‘कन्यादान’ नाटकही अत्यंत महत्त्वाचे होते. त्याला केवळ सामाजिक म्हणता येत नाही. याविषयी खूप मोठ्या लोकांनी लेखन केले आहे. कुमुद मेहता, कमलाकर सारंग, पुष्पा भावे. अनेक नावे घेता येतील. या नाटकांवर समर्थन करणारे आणि विरोध करणारे, प्रचंड लेखन झाले आहे. जाहीर वादही झडले आहेत. ज्याला अॅकॅडेमिक चर्चा म्हणावे, असेही बरेच झाले आहे. अन्य भाषांतही झाले आहेत. आक्षेप घेणारे लेखन तर प्रचंड आहे. तत्कालीन समीक्षकांनी तेंडुलकरांच्या जवळपास प्रत्येक नाटकावर झोड उठवली होती. त्यांच्यावर प्रेमही केले, आदरही दाखवला. तत्कालीन वर्तमानपत्रांत तेंडुलकर ही हॉट लाइन असे. ‘गिधाडे’वर अमाप चर्चा, वाद झाले आहेत. त्यांची नाटके दुर्लक्षित राहिलेली नाहीत. तेंडुलकरांच्या नाटकांतून दिसणाऱ्या राजकीय अंत:प्रवाहाकडे अनेकांनी वारंवार लक्ष वेधले आहे. ‘घाशीराम’ हे त्याचे ठणठणीत व ठसठशीत उदाहरण आहे. शिवसेनेने घेतलेले आक्षेप, तत्कालीन ब्राह्मण समाजाने केलेली टीका - हा संपूर्ण लढा, संघर्ष पुस्तकरुपातही आपल्यासमोर आहे. कमलाकर सारंग, दीपक घारे, अनेकांनी पुस्तके लिहिली आहेत. आज हे सारे एखाद्या दंतकथेप्रमाणे वाटते. पण ते वास्तव होते. आपण त्यातील दोन राजकीय प्रवाहांची नोंद घेऊया. सर्वश्रुत म्हणून "घाशीराम' घेतले तर, नाटक आले तेव्हा तत्कालीन ब्राह्मण समाज ख‌वळून उठला होता. कर्तारसिंग थत्ते नावाच्या माणसाने तेंडुलकरांच्या कार्यालयात जाऊन त्यांना छड्या मारल्या होत्या, त्यांना बाहेर फिरणे  अवघड झाले होते, खुद्द त्यांच्या घरातही ‘हे काय लिहिले तुम्ही’ अशी प्रतिक्रिया होती. पण, केवळ नाटकांपुरता हा विचार नव्हता.


तेंडुलकरांनी लिहिलेले सामना, सिंहासन, आक्रोश, अर्धसत्य... हे चित्रपट म्हणजे त्यांची राजकीय िवधानेच होती-आहेत. "आक्रोश'मध्ये दलितांवरील अत्याचार किती धारदारपणे तेंडुलकरांच्या लेखणीतून व्यक्त झाला आहे. किंबहुना, तेंडुलकरांना वगळून हे चित्रपट पाहणे शक्य होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘सामना’मध्ये तत्कालीन साखर कारखानदार आणि एक गांधीवादी माणूस यांच्यातील युद्ध हे काय होते, हे सणसणीतपणे समोर येते. तसेच काँग्रेसी खाक्या काय होता यावरही ‘कॉमेंट’ करणारा हा तेंडुलकरांचा चित्रपट होता.  तो नाटकाच्या अंगानेच लिहिला होता. त्यावर हा चित्रपटच नाही, हे तर नाटकच शूट केले आहे, अशा शब्दांत टीका झाली होती, पण त्यामुळे त्यातील तेंडुलकरांची भाषा आणि त्यांची राजकीय विधाने झाकोळू शकली नाहीत. त्यातील राजकीय अंत:प्रवाह स्पष्ट राहिलेले दिसतात. ‘एक हट्टी मुलगी’ ‘अशी पाखरे येती’ मधील राजकीय गंमत विसरता येत नाही. त्यातील बंडा आरएसएसचा आहे. त्याचा चित्रपट झाला, तेव्हा तो कम्युनिस्ट केला गेला. राजकीय टप्पल मारणे, थोबाडीत मारणे, हल्ला चढवणे हे सारे तेंडुलकरांच्या नाटकांतून दिसते. कधी बोल्डली दिसते,तर कधी सूक्ष्म पातळ्यांवर. बाईंडरमधील पुरुष, त्याची बाईला वागवण्याची पद्धत, अधिसत्ता हे ‘जेंडर पॉलिटिक्स’च आहे. एक प्रकारे पुरुषसत्ताक मानसिकतेची त्यांनी उडवलेली ती टिंगलटवाळीच आहे. पॉलिटिक्स म्हणजे, थेट तत्कालीन राजकारणावर बोलणे इतका मर्यादित अर्थ न घेता, वेगवेगळ्या पातळ्यांवर या राजकारणाचे संदर्भ काय असू शकतात, याचा वेध आणि शोध तेंडुलकर घेताना दिसतात. ‘शांतता’मध्ये बेणारेबाईंवर हल्ला करणारी माणसे कोण आहेत? त्यात जज्ज आहेत, शिक्षक आहेत. ज्या प्रकारे ही माणसं त्या बाईचा धच्चा उडवतात, तिला पकडतात, हे सारे अभिरूप न्यायालयाच्या चौकटीत घडवतात, ही सारी माणसे मध्यमवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि मध्यमवर्गीय समाजावर टीका करणे, हीच तेंडुलकरांची कायमची भूमिका राहिलेली दिसते. मध्यमवर्गीय चौकटी मोडणे, त्यावर प्रहार करणे, मध्यमवर्ग कसा आणि किती ढोंगी, लबाड, खोटारडा आहे, हे दाखवून त्याच्या चौकटी, मुखवटे फाडणे... हे तेंडुलकरांनी केले आहे. गिरीश कर्नाड म्हणत, की एखादा बॉम्ब पडावा तशी तेंडुलकरांची नाटके आपल्याला हादरवून टाकतात, सोलवटून काढतात. तेंडुलकर म्हणजे, अशा चौकटी मोडून काढणारा बॉम्बच होता. तीच त्यांची राजकीय भूमिका होती.
 
 
इथे राजकीय म्हणजे पक्षीय नव्हे, हे मी पुन्हा सांगू इच्छितो. या अर्थाने राजकीय व सामाजिक नाटके ही हातात हात घालूनच जात असतात. चांगले सामाजिक नाटक असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा अभ्यासाच्या सोयीसाठी काही वर्गीकरण केलेले असते. देवलांचे "शारदा' हे वर्गीकरणात सामाजिक असले तरी त्यातील राजकीय भाग महत्त्वाचा आहे. त्या नाटकातील व्हिलन ब्राह्मण समाजच आहे. शारदेचा बाप तिला विकायला निघाला आहे. भद्रेश्वरशास्त्री त्यातला दलाल आहे. एका परीने संपूर्ण अवनत झालेला समाज देवलांनी "शारदा'मध्ये दाखवला आहे. त्याला राजकीय पदर ठळकपणे आहेत. फारतर सामाजिक संदर्भ असलेले राजकीय नाटक असे म्हणता येईल. या अर्थाने तेंडुलकरांची परंपरा ही वरेरकर प्रभृतींशी जवळीक दाखवते. साधी मराठी लिहिणे  हाही राजकीयपणाचाच भाग असतो. अनलंकृत भाषा ही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. याही अर्थाने तेंडुलकरांच्या सर्व नाटकांना राजकीय-सामाजिक नाटके असे म्हणता येते. 


प्रश्न : मूल्यभ्रष्ट मध्यमवर्गीय माणूस हाच मुख्यत: तेंडुलकरांच्या नाट्यलेखनाचा (उदा. कन्यादान, बेबी, माणूस नावाचं बेट, मित्राची गोष्ट इ.) मध्यवर्ती विषय होता. नाटककार तेंडुलकरांना, या मध्यमवर्गीय माणसाच्या जगण्यातल्या विसंगतीवर केवळ बोट ठेवयाचं नव्हतं, तर त्याला उघडंनागडं करायचं होतं, असं म्हणता येईल का? आणि अशा व्यक्तिरेखांबद्दल नाटककार तेंडुलकरांच्या मनात कशा भावना होत्या? या व्यक्तिरेखांबद्दल त्यांच्या मनात दुस्वास, तिरस्कार तुम्हाला कधी जाणवला होता का? 

उत्तर : या प्रश्नाच्या उत्तरासाठी थोडे मागे जावे लागेल. तेंडुलकरांच्या आधी मराठी रंगभूमीवर काय होते, याचा मागोवा घेतला तर प्रामुख्याने व्यावसायिक रंगभूमीवर कानेटकर, कालेलकर, बाळ कोल्हटकर यांची नाटके  सुरू होती.  सात्विकतेचा मुखवटा घेतलेली, उपदेशात्मक.  ज्यात संस्कार नावाचा  एक अपरिहार्य भाग होता. उच्च संस्कृती नावाचा बडिवार माजवणारी, नातेसंबंधांमधला फक्त गोडवाच असणारी, अशी ती नाटकं होती. अशी नाटके वर्षानुवर्षे पाहणाऱ्या मध्यमवर्गीय आत्ममग्न प्रेक्षकांना तेंडुलकरांनी तडा दिला.तेंडुलकरांच्या नाटकांचा कालखंड १९६० नंतरचा आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवे. त्याच काळातील भाऊ पाध्येंच्या  ‘वासूनाका सांगोपांग’ या कादंबरीने असाच मध्यमवर्गीयांचा धज्जा उडवला होता. आपल्या आसपासची, चाळीतली ही मुले नाक्यावर काय बोलतात - ती मुले तशीच भाषा बोलत होती, बायकांविषयी लैंगिक संदर्भ असलेले काही तसेच बोलले जात होते - पण ते मात्र लपवून ठेवायचे,  ही मध्यमवर्गीय मानसिकता होती. नाटक पहायला गेल्यावरही कुठल्याही वास्तवाला न भिडता एका कल्पनारम्यतेला भिडायचे आणि खोटी भ्रामक सृष्टी उत्पन्न करायची, याला तेंडुलकरांनी संपूर्ण तडा दिला. तेच लेखनातून चित्रे, नेमाडे, पाध्ये करत होते. 


आपल्या पिढीचे रखरखीत वास्तव काय आहे, आपल्या पिढीची भाषा काय आहे, माणसे नेमकी काय बोलतात, त्यांच्या जळलेल्या आशाआकांक्षा, वास्तवाचे चटके यांचे प्रखर दर्शन जेव्हा तेंडुलकरांच्या नाटकांनी घडवले, तेव्हा बघणाऱ्या प्रेक्षकांची गोची झाली. त्यांना गोड, मधुर नाटके पाहण्याची सवय होती. त्यांच्यासमोर एकदम हे मुखवटा फाडणारे, तुम्ही जसे आहात तसे उघडेनागडे स्वरूप दाखवणारे नाटक आल्यावर कसे आवडणार?  आपल्यात काही चांगल्या गोष्टी आहेत पण तितक्याच कमी अधिक प्रमाणात वाईट, कुटिल, घाणेरडे, भ्रष्ट असेही आपणच आहोत..त्याची मात्रा कमी-अधिक प्रमाणात असू शकते. याची धक्कादायक जाणीव तेंडुलकरांनी  दिली. 


तेंडुलकर म्हणत - मूलत: कुणीच व्यक्ती राम वा रावण नसते. रामातही रावण असतो आणि रावणातही राम असतो. केवळ कृष्णधवल चित्राएेवजी माणसांमधले हे ‘ग्रे एरिया’ (करडे अवकाश) असतात, हे पहायला तेंडुलकरांनी शिकवले, हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अधिक समजून घ्यायचे, तर तेंडुलकरांची नाटके कधीच एका रंगात रंगवलेली नसतात. ‘मी माणूस समजून घ्यायला बसलो आहे. त्याची टिंगल करायला, त्याचे कॅरीकॅचर करायला, त्याचे व्यंग करायला नाही, ही त्यांची भूमिका होती. ‘घाशीराम कोतवाल’मध्ये मोहन आगाशे जे किंचित व्यंगात्मक काम करायचे, ते तेंडुलकरांना फारसे रुचत नसे. घाशीरामचे संगीतही  ‘जास्त’ होत आहे, त्यातून एक गुंगी येते, असेही त्यांचे मत होते. स्वत:च्या सर्वाधिक गाजलेल्या, जगभरात त्यांना ओळख देणाऱ्या, गुणवंत नाटकाविषयी हे तेंडुलकरांचे मत होते, ही फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट, इथे लक्षात घ्यायला हवी. त्याऐवजी तेंडुलकरांना बी. व्ही. कारंथ यांचे ‘घाशीराम’ आवडायचे. त्यांना अपेक्षित सत्तेचा खेळ (पॉवरगेम) त्यात अधिक चांगला समोर येतो, असे ते म्हणत. पेशवाईच्या उतरत्या काळात पंचमकाराधीन झालेला समाज अन्य समाजघटकांचे कसे शोषण करत होता, सामूहिक अवनत अवस्था कशी आली होती, याचे दर्शन तेंडुलकरांना घडवायचे होते. टिंगल करायची नव्हती, तर वास्तवाचे रखरखीत दर्शन अपेक्षित होते - पण बघणाऱ्या प्रेक्षकाला याची सवय नव्हती. सवय नसतेच - कारण अचानक नवे समोर येते, नवी भाषा येते, साधीसोपी वाक्यरचना येते, अनलंकृत भाषा येते -  ‘मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना’ अशी भाषा आपण कुणीच वास्तवात वापरत नाही. साधी, छोटी, अल्पाक्षरी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पॉजेस - विराम (शांतता) हा तेंडुलकरांच्या नाटकांचा महत्त्वाचा भाग होता - त्याचे अंत:स्वर फक्त बोललेल्या वाक्यांतून जसे पोचायचे, तसेच ते न बोललेल्या विरामांमधूनही पोचायचे. या विरामांमधून त्यांची नाटके प्रेक्षकांपर्यंत पोचायची. त्या विरामांचा त्या शांततेचा लोकांना त्रास व्हायचा. त्या त्रासावर लोक आरडाओरडी करायचे. कारण असे काही समोर यायचे की त्याची अपेक्षाच त्यांनी केलेली नसायची. त्यांच्या परिचयाच्या त्या चौकटीत, त्या रंगभूमीवर पवित्र असे काहीतरी बघायची सवय झालेली असताना, हे असे अपवित्र काय घडतेय, सारे घर भांडतेय, गिधाडांसारखे एकमेकांचे लचके तोडतेय. तोवर भाऊबहिणींची नाटके पाहणाऱ्यांना तेंडुलकरांचे भाऊबहीण नवीनच होते. त्या नाटकात त्या गरोदर बाईला लाथ मारली जाते, तिचा गर्भपात होतो हे बघणे आणि समजावून घेणे अशक्यच होते. अर्थात हे ‘त्या’ काळात होते. आज त्या काळाचा पुढचा टप्पा आपण कधीच गाठला आहे. हिंसा, भ्रष्टाचार, अत्याचार, लैंगिकतेची कित्येक रूपे आपल्या सवयीची झाली आहेत, पण त्या काळी हे वास्तव पाहण्याची सवय प्रेक्षकांना तेंडुलकरांनी लावली. त्यांच्या "कन्यादान'मधली मुलगी त्यातील समाजवादी माणसाला स्पष्ट सांगते, की बस झालं, तुम्ही माझ्या पिढीला जे शिकवलं ते बास, आता मला माझं जगणं शोधू दे, मला तो लाथ घालत असेल, पण प्रेमही तेवढंच करतो. तुम्ही लाथ घातली नाहीत हे खरं, पण अशा उत्कट प्रेमाचंं दर्शनही कधी मला घडलं नाही. त्या मुलीचा तो शोध आहे. तिच्या रुपाने अरुण आठवलेच्या पदरात दिलेलं हे दानच म्हणावे लागेल. तेंडुलकर त्यांच्या व्यक्तिरेखांचा तिरस्कार, दुस्वास करत नाहीत. ते व्यक्तिरेखा समजून घेत राहतात. आपल्या व्यक्तिरेखांविषयी ते किती व्यापक विचार करतात, याचे दर्शन त्यांच्या नाटकांतून घडते. 

 
प्रश्न : तेडुंलकरांच्या नाटकांची भाषा, दृश्यं, निवेदनशैली, पात्रांची रचना, देहबोली (उदा. गिधाडे, सखाराम बाइंडर इ.) हे सारं ओबडधोबड स्वरुपात आलेलं आहे. असं करताना नाटककार तेंडुलकर काही हिशेब मनात ठेवून गिमिक करतात, असं कधी तुम्हाला वाटलं का? त्यांच्या या मांडणीचा एक अभ्यासक, एक नाट्यकर्मी म्हणून तुम्ही कसा अर्थ लावत गेलात? 

उत्तर : अनेकदा एखाद्या मोठ्या माणसाच्या कामाविषयी प्रश्न पडतात आणि ते पडावेतच - अनेक प्रसंगी शंका घ्यायला जागाही असते. तेंडुलकरांच्या नाटकांत काहीएक गिमिक असायचे  पण ते लक्ष वेधले जावे, या अपेक्षेपुरतेच असायचे. आमच्या माहितीपटामध्ये विजया मेहता म्हणाल्या आहेत, की त्यांची नाटके वर्तमानपत्रातील हेडलाइन्ससारखी असायची - विजयाबाईंनी केलेलं, हे अतिशय महत्त्वाचे विधान आहे. आम्ही त्यांना विचारले, की तेंडुलकर, तुम्हाला आमच्या नाटकात काय कमतरता जाणवते? त्यावर ते म्हणाले आहेत, की तुम्ही ओचकारला-बोचकारायला पाहिजे. ओचकारले-बोचकारले की, लोकांचे लक्ष वेधले जाते - त्यांच्या या विधानात फार महत्त्वाचे अर्थ दडले आहेत. माझा वैयक्तिक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. काही विशिष्ट काळात अशी आरडाओरडी करणे  गरजेचे असते, हे मी समजू शकतो, पण ती सर्वकाळ करावी का? याविषयी माझे उत्तर नाही असे आहे. 


गरज असेल तर लक्ष वेधले जाण्यासाठी असे करणे ओके, पण ज्या बाजारात तुम्ही उभे आहात, तो बाजार जर बजबजपुरीने भरलेला असेल तर तुम्हाला अशी काही कृती करावी लागते की, तुमच्या मालाकडे लक्ष वेधले जावे. ही ट्रिक करणारी खूप माणसे आहेत. प्रश्न असा आहे, की तुमचा ‘माल’ कसा आहे? आज सोशल मीडियावर तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रचंड ट्रिक्स केल्या जातात, मी त्याकडे ट्रिक्स म्हणूनच पाहतो, पण तेंडुलकरांच्या काळात नेमके काय घडत होते, याचा विचार केला, तर ती कदाचित काळाची गरज असू शकते आणि ती महत्त्वाची असते, हे लक्षात येईल. त्याच काळात लिहिणाऱ्या नेमाडेंनी अशी उडव पद्धती (भावगीतात काही अर्थ नाही वगैरे) वापरली - ज्या पद्धतीने अनियतकालिकांच्या त्या टोळीने (नेमाडे, शहाणे, चित्रे इत्यादी) ‘सत्यकथा’ उडवले. त्यावर जी टीका, चेष्टा, टिंगल केली (काही वेळा अधिकच केली, असे आज म्हणता येते) ती त्या काळाची गरज होती - अन्यथा ती उद््ध्वस्तच झाली नसती. त्यांना ते उद््ध्वस्त करायचे होते, कारण ते इमले उद््ध्वस्त केल्याशिवाय पुढचे बांधताच येत नाही. आधीच्या बांधकामावर हे नवे बांधकाम करता येत नाही- ते मोडून - तोडून टाकणे हीदेखिल काळाची गरज असू शकते. 


हे पार्श्वभूमीला ठेवून तेंडुलकरांच्या नाटकांत गिमिक असायची (सगळ्याच नाटकात ती नाहीत, हेही खरे), त्यातही काही दडलेले अर्थ असू शकतील. माणूस असे का करतो - याचा शोध घेण्याचा अवसर नव्वदीनंतरच्या माझ्या पिढीला मिळाला आणि आमची पिढी समंजस, शहाणीपण आहे. त्यांना काय उध्वस्त करायचे होते, काय उडवायचे होते, हे समजून घेता येते. त्यांनी जी बंडखोरी केली, जे उडवले, उध्वस्त केले, त्याच्याच बळावर आज आम्हाला आमची बंडखोरी करता येते, यात शंकाच नाही. नव्या गोष्टी, नवी नाटके. आमच्यासाठी सगळा समाजच नवीन आहे, वेगळा आहे. तेंडुलकरांच्या साहित्याचे अन्वयार्थ आज २०१८ मध्ये लावत असताना काळच बदलला, हे आपण लक्षात घ्यायला हवे. तेंडुलकरांनी स्वत:ही कल्पना केली नसेल इतका वेगाने काळ बदलला. मोबाइल, इंटरनेट, चॅनेल्स, समाजमाध्यमे, यांनी माणसामाणसांतले संबंधच बदलून टाकले, एकूणच जगाचे स्वरूप आणि जगण्याचे अर्थ कधी नव्हे इतक्या अल्पावधीत वेगाने बदलले - असे असूनही तेंडुलकरांची नाटके आऊटडेटेड झालेली नाहीत, हे महत्त्वाचे. कदाचित आज ती बटबटीत वाटू शकतात, पण आपण २०१८ मध्ये वावरतो आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. आज जे लेखक लिहीत आहेत, नाटके करत आहेत, करू शकत आहेत, ती दृष्टी तेंडुलकरांनी दिली होती, जी घेऊन आपण पुढे जात आहोत. त्यांचे हे योगदान मान्य करायला हवे. त्या काळाची ती गरज होती, म्हणूनच तेव्हा तेंडुलकरांची नाटके आली. आज सुमारे ६० वर्षांनंतरही ठिकठिकाणी त्यांच्या नाटकांचे प्रयोग नवनव्या पिढ्यांचे कलाकार करतात, त्यांची नाटके रि इंटरप्रिट होतात. यात त्यांचे वेगळेपण आहे. मला ती गिमिक वाटत नाहीत. ती काळाची गरज होती, असेच मी म्हणेन.

 
प्रश्न : तेंडुलकरांच्या नाटकांत बऱ्याचदा आशयापेक्षा विषयाला अधिक महत्व दिलं जायचं, किंबहुना तेंडुलकर लोकांना दचकवून टाकणारे विषय जाणीवपूर्वक निवडायचे आणि आशयाच्या बाबतीत तडजोड करायचे, असे आक्षेप त्यावेळी नोंदले गेले होते. त्या अंगाने तुम्ही तेंडुलकरांच्या नाटकांकडे पाहिलं का? या आक्षेपांबाबत एक लेखक-नाटककार म्हणून तुमचं काय मत आहे?

उत्तर : तेंडुलकरांच्या नाटकात आशयालाही महत्त्व असायचे, तो आशय ते दचकवून टाकणाऱ्या विषयातून मांडायचे किंवा दचकवणाऱ्या विषयातून आशयाला भिडायचे. ते हे जाणीवपूर्वक करायचे, त्यांचे हे करणेही व्यामिश्र, गुंतागुंतीचे, गमतीदार असायचे. एखादा नाटककार एकाच मार्गाने समजून घेता येत नाही. पिकासोची चित्रे पहा. त्यात कित्येक गमतीजमती आहेत. त्याने त्याच्या आयुष्यात कुणाचे शोषण केले, कुणाला वापरले, फेकून दिले, हे त्याच्या चित्रांतून कळते - पण त्याची चित्रे यापलीकडे जातात आणि उरतात - जी आपल्याला संपूर्ण चित्रकलेच्या इतिहासात महत्त्वाची मानावी लागतात. त्या चित्रांनी दृष्टी दिली, असे म्हणावे लागते. याचा अर्थ पिकासोने लबाड्या केल्या नाहीत का? प्रचंड केल्या, कल्पना ढापल्या. स्वत:च्या नावावर खपवल्या. तेंडुलकरांनीही असे काही केले, पण तरीही तंेडुलकर याच्या वरती उरतात, हेही महत्त्वाचे ठरते. आमच्या माहितीपटात आम्ही तेंडुलकरांचे विच्छेदन केले आहे. एवढा हिंसाचार तुम्हाला कुठे दिसला - इतका बरबटलेला समाज, इतकी शिवीगाळ, वस्त्रहरणे, खून... हे दिसले कुठे? तेंडुलकरांमध्ये हाही एक घटक होता, की एखाद्याची जास्त रेवडी उडवायची, एक टप्पल जास्त मारायची. जरा झोबंले की लोकांचे जास्त लक्ष जाते. हे ते करायचे, पण यापलीकडेही जायचे.


तरीही मी मर्यादित अर्थाने तेंडुलकरांकडे पाहात नाही. तडजोड म्हणता येणार नाही पण एका मर्यादेपलीकडे ते  आशयाच्या खोल जायला, ते स्वत:ला उद्युक्तच करायचे नाहीत, असे वाटते. मी हा लहान तोंडी मोठा घास घेत असेन, पण नाटकातून मेटॅफिजिकल-अधिभौतिक-तत्त्वज्ञानात्मक असा व्यापक विचार मांडण्याआधीच, ते थांबतात. माणूस क्रूर असतो, हिंसक असतो - मान्य - पण तो असा असण्यामागे समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय किंवा सामाजिक-राजकीय-आर्थिक घटना आहेत का, या शोषणाची, हिंसेची मुळे काय आहेत, हे ते पहात नाहीत. आज समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय पद्धतीने या साऱ्यांची कारणे शोधता येतात, ते शास्त्रीय पद्धतीने शोधता येतात, त्यावर उपाय करता येतात आणि ते बरे करता येतात. इकडे तेंडुलकरांनी दुर्लक्ष केलेले दिसते का, असा प्रश्न मनात येतो. तेंडुलकरांनी ‘गहराई’ चित्रपट लिहिला, तेव्हा अंधश्रद्धेवर कसा विश्वास ठेवता, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्या काळात असे होते, मी पाहिले होते, असे ते म्हणतात. धक्का देण्याचे त्यांचे तंत्र कधी आपल्याला बुचकळ्यात टाकणारे असते. असो. तरीही जगण्याचे, नाटकाचे भान, समज आणि जाण इतर कुठल्याही  तत्कालीन नाटककारांपेक्षा तेंडुलकरांमध्ये व्यापक होती, ती अधिक व्यापक असती तर बरे झाले असते... परंतु तरीही तेंडुलकरांचे श्रेय महत्त्वाचे आहे, हे पुन्हापुन्हा सांगावेसे वाटते.

 

प्रश्न : डॉ. लागूंनी "गिधाडे' नाटकाचे वर्णन करताना, प्रेक्षकांवर नेमका, प्रांजळ आणि रांगडा घाव घालणारे नाटक - असा उल्लेख केला होता. तेंडुलकरांकडे भोगलोलुप, मनोविकृत माणसांचा शोध घेण्याची निराळी दृष्टी होती का? सांस्कृतिक ऱ्हासाचं त्यांना वाटणारं वैषम्य याच्या मुळाशी होतं, असं तुम्हाला वाटतं का?

उत्तर : भोगलोलुप - मनोविकृतपणाचे काही अंश प्रत्येकात असतात, असेच तेंडुलकरांचे मत होते. त्यांनी फक्त नाटकांतून प्रेक्षकांमधील माणसांना तुम्हीही असे आहात, हे उघडेनागडे करून दाखवले. समाजातील कुणा विशिष्ट भोगलोलुप वा मनोविकृत व्यक्तींना सुधारण्याचा त्यांचा हेतू नव्हता आणि केवळ यामुळेच सांस्कृतिक ऱ्हास होतो, असेही त्यांना वाटत नसावे.किंबहुना वेड्या, मनोविकृत माणसांचा शोधही त्यांना अपेक्षित नव्हता. या विकृतींचे काही अंश कमीअधिक प्रमाणात प्रत्येक माणसात दडलेले असतात, हाच त्यांचा शोध होता. ज्या शोधाचे दर्शन त्यांनी आपल्या नाटकांतून घडवण्याचा प्रयत्न केला. 


प्रश्न : ‘तें आणि आपण’ या पुस्तकात भास्कर चंदावरकर म्हणतात - ‘घाशीराम’मध्ये संगीत असावे ही कल्पना तेंडुलकरांना प्रारंभापासून होती. मात्र गिधाडे, श्रीमंत, मित्राची गोष्ट, मधल्या भिंती, दंबद्विप लिहिणारे तेंडुलकर संगीतात उतरत नाहीत. तुम्ही कधी संगीत, संगीतिका या प्रकारांबद्दल तेंडुलकरांशी बोलला होत का? या प्रकारापासून ते दूर का राहिले, याचा तुम्हाला म्हणून काही अंदाज आला का?

उत्तर : ‘घाशीराम’ तेंडुलकरांना  सुचले ते संगीतातूनच. त्यांनी पाहिलेले, ऐकलेले, अनुभवलेले मेळे, खेळे, दशावतार, जत्रा, रात्रीच्या प्रवासात कामगार वस्त्यांतून कानावर पडणारे संगीत आणि त्यांनी अनुभवलेले तेव्हाचे जग, यांच्या एकत्रित परिपाकातून घाशीरामचा आशय, शैली, संगीत परस्परांशी एकजीव होऊन एकजिनसी स्वरुपातच बाहेर पडले. तेंडुलकरांचे बालनाट्य - राजाराणीला घाम हवा, हेही संगीतक होते. त्या त्या नाटककाराचे हे वैशिष्ट्य मानायला हवे, की सुचलेली कल्पना नाट्यरूप घेताना, कोणता घाट घेऊन प्रकटते. तेंडुलकरांनी अन्य नाटके संगीतके नाहीत. संगीत, संगीतिका याविषयी तेंडुलकरांशी अनेकदा चर्चा झाली आहे. आपल्याकडे जी संगीत नाटके प्रसिद्ध आहेत (सौभद्र, मानापमान वगैरे) तीही मुळात संगीत नाटके नाहीतच. ‘एकच प्याला’ हे संगीत नाटक नाहीच आणि नव्हतेही. त्यातील पदे वेगळ्याच व्यक्तीची आहेत. ती गडकऱ्यांची नाहीतच. त्यातील पदे ही नंतर लोकांच्या रंजनासाठी घातली गेली. तत्कालीन नट हे गायकनट होते, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय १९१८ च्या सुमारास जे प्रचलित शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत होते, त्याच्याशी नाते सांगण्याचाही हेतू होता. पारशी रंगभूमीचा प्रभाव होता, ऑपेराचे आकर्षण होते - यातून आपल्या तत्कालीन संगीत नाटकांत संगीत येत गेले - मुळात ती संगीत नाटके अशी नव्हती. डॉ. लागू यांनी संगीताशिवाय ‘एकच प्याला’ या नाटकाचे दमदार सादरीकरण केले होते. मात्र नाट्यपदांच्या गोडव्याची भूरळ आपल्यावर होती, पदे खूप गाजली, त्यांच्या चाली उत्तम होत्या आणि ती गाणारे गायकही उत्तम होते, यात शंकाच नाही. 


असे नाटक जे संगीतातच बोलते, अभिव्यक्त होते - ते तेंडुलकरांना अभिप्रेत होते. यमक, अनुप्रास, अलंकार... हे सारे ‘घाशीराम’च्या लेखनातच आहेत. ते कुठेही जोडलेले नाहीत, त्यांचे कलम केलेले नाही, की ते घुसडण्यात आलेले नाहीत. संगीत हा त्या नाटकाच्या आशयाचाच एक भाग आहे. घाशीरामचे संगीत यावर श्यामला वनारसे यांनी फार चांगले पुस्तक लिहिले आहे. ज्या पद्धतीने यामध्ये संगीत येते, ते तसेच आणण्यातही तेंडुलकरांची लेखकीय दृष्टी दिसते आणि त्याचवेळी तोडमोड करण्याचीही वृत्ती दिसते. त्यामध्ये कीर्तन आले, खेळे आले, मेळे आले, दशावतार आले, लावणी आली - लोकसंगीतातले हे प्रकार आले, पण ते ‘लोकसंगीत’ म्हणून नाही आले. लोकसंगीतातल्या फक्त चाली आल्या - बाकी भाषा आधुनिक बोलली जाणारी होती. इंग्रजीत याला ‘सबवर्ड’ करणे म्हणतात. हा प्रकार तेंडुलकरांनी या नाटकात मुळातच लिहिला होता. असे दुसरे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे, ‘महानिर्वाण’. त्यात कीर्तन आहे, पण ते आधुनिक आहे. असे लिहिणे अतिशय अवघड असते. तसा विषय सुचणे आणि तो विशिष्ट घाट, चपखलपणे उपयोजणे ही दुर्मिळ बाब आहे. तेंडुलकरांनाही पुन्हा असे संगीत ऐकू आले नसावे, किंवा एक यशस्वी ठरले, की त्याच त्याच प्रकारे स्वत:ला रिपीट करण्याचा धोका किंवा भीती वाटली असावी, पण संगीतापासून ते नंतर दूरच राहिलेले दिसतात.


प्रश्न : तेंडुलकरांची नाटके जितकी थेट असतात, तितकीच ती पलायनवादीही (उदा. कन्यादान, चिमणीचं घर मेणाचं) असतात, असाही एक सूर त्याकाळी समीक्षकांमध्ये उमटला होता. तुम्हाला असे कधी जाणवले होते का? यालाच जोडून दुसरा प्रश्न - सत्यदेव दुबेंनी "बेबी' हे तेंडुलकरांचे सर्वश्रेष्ठ नाटक आहे, असं म्हटलं होतं. तुमच्या दृष्टीने तेंडुलकरांचे सर्वश्रेष्ठ नाटक कोणतं आणि का?

उत्तर : तेंडुलकरांच्या नाटकांवर जी आणि जशी चर्चा, समीक्षा झाली, तेवढी अन्य कुणाचीही झाली नाहीत. हे सद््भाग्य फक्त तेंडुलकरांच्याच वाट्याला आले. अर्थात, हे योग्यच झाले. कारण त्यांची योग्यता आणि नाटकांचे महत्त्व मोठे होते. तत्कालीन समीक्षकांना सतत त्यावर लिहावेसे वाटावे - इतकी ती उचकवणारी होतीच. त्यांच्या नाटकांतील पलायनवादी भागाचीही खूप चर्चा झाली. लोकांना आदर्शवाद आवडायचा, तर तेंडुलकरांना वास्तववाद प्रिय... नियतीला रोमँटिक अवास्तव करणं, हे तेंडुलकरांच्या प्रकृतीला न मानवणारे... त्यांची नाटके तेंडुलकरी शैलीनुसार थेट जगण्यातून उगवलेली होती. त्यांचा नायक शेवटी खून करायचा, पळून जायचा. पण तो कधीच आदर्शवादी झालेला दिसत नाही. त्यांची अनेक नाटकं मला वेगवेगळ्या कारणांसाठी आवडतात, घाशीराम हेही मला अतिशय आवडणारे नाटक आहे. तरीही ‘शांतता कोर्ट चालू आहे’, हे नाटक मला थक्क करणारे वाटते. त्या नाटकाचा जो विषय आहे, त्याच्यात आढळणारी जी पात्रे आहेत, ती आदी किती साधी वाटतात आणि हळुहळू ती कशी आणि किती क्रूर होत जातात. या नाटकाच्या प्रस्तावनेत तेंडुलकरांनी फार सुंदर गोष्ट लिहिली आहे. ती मी परत परत वाचत राहतो. तेंडुलकरांची नेमकी दृष्टीच त्यातून उलगडत जाते.


सुटीचे दिवस आहेत. मुले खेळायला बाहेर पडली आहेत. थोड्या वेळाने जेवायला या, असे आई सांगते. मुले खेळ सुरू करतात. त्यांच्या लक्षात येते की, एक चिमणी एका खोलीत अडकली आहे. मग मुले त्या चिमणीशी हळुवारपणे खेळायला लागतात. तिला उडवायला लागतात. चिमणी थकते, दमते, घाबरते, मग कुणी जाऊन तिचे पीस उपटतात, होता होता ती चिमणी रक्तबंबाळ होते आणि एका जागी निपचित पडते. तेवढ्यात आईची हाक ऐकू येते आणि ती मुले जेवायला जातात. त्या खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या त्या चिमणीचे चित्र तेंडुलकरांच्या नजरेसमोर सतत असायचे. तोच या नाटकाचा विषय आहे. आधी निष्पाप वाटणारी ती मुले हळुहळू कशी क्रूर होत जातात. त्या क्रूरतेचे विविध पदर आहेत. खेळ खेळणे, खेळवणे, अडकवणे, सर्व वाटा बंद करणे, हल्ला करणे, पिसे उपटणे, रक्त येवू लागल्यावर त्याचा आनंद घेणे, हतबलतेचा आनंद घेणे, हे सारे त्या निष्पापपणापासून सुरू होते. मुले निष्पाप असतात आणि मराठी मध्यमवर्गीय समूह सज्जन असतो, हे आपले गोड गैरसमज इथे गळून पडतात. ज्या मध्यमवर्गीयांचा सज्जनपणा आपण गृहीत धरतो, पण तो क्षण आणि ती वेळ येताच हीच माणसे निर्लज्ज, निर्घृण आणि टोकाची कसी होऊ शकतात - याचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे दर्शन तेंडुलकर या ‘रूपका’तून घडवतात. त्यांची बेणारेबाई विलक्षण आहे. बाई म्हणूनही तिचे वेगळे पदर आहेत. त्या खेळाचे जे दर्शन तेंडुलकर घडवतात, ते मला अद्भुत वाटते. त्यातील भाषा, संवाद, माणसे, त्यांचे स्वभाव. यामुळे मला हे फार महत्त्वाचे नाटक वाटते. 


प्रश्न : घाशीराम - सखाराम वादाच्या वेळी तेंडुलकर आणि त्यांच्या कुटंुबियांची जी अवहेलना झाली, त्यातून एखादा लेखक आयुष्यातून उठला असता. पण तेंडुलकर संयमी आणि शांत वृत्तीने परिपूर्ण होते, असे निरीक्षण सतीश आळेकरांनी एके ठिकाणी नोंदवले आहे. तेंडुलकरांच्या स्वभावाबाबत तुमचा अनुभव कशा प्रकारचा होता?

उत्तर : अवहेलनेला तेंडुलकर ज्या पद्धतीने सामोरे गेले, ते ग्रेट आहे. अनेक हल्ले झाले, अतिशय वाईट लिहून आले. अर्थात, हे सारे तेंडुलकरांप्रमाणेच खानोलकर, पाध्ये, मर्ढेकर या प्रतिभावंतांच्याही वाट्याला आलेले दिसते. थोड्याफार फरकाने त्यांचा काळही समान होता. त्या साऱ्यांनाच फटकारे बसले. ‘संस्कृतीवरचा हल्ला’ अशा अस्मितेचे लेबल घेऊन माणसे भांडायची. मात्र एक गोष्ट आवर्जून नोंदवायला हवी, की तेंडुलकरांशी भांडणारी, हल्ले करणारी जशी मंडळी होती, तशीच तेंडुलकरांच्या बाजूने लढणारी, पण काही मंडळी होती. तेंडुलकरांना स्वत:ला मात्र त्यांच्या नाटकांनीच लढण्याचे बळ पुरवले असावे. पण त्याच काळात त्यांची नाटके गाजत होती, त्यांचे प्रयोग हाऊसफुल होते. समाज त्यांच्या विरोधात होता, ते कोर्टातही लढले. पण ते एकटे होते, असे वाटत नाही. आज, मात्र दुर्दैवाने तशी परिस्थिती आहे की नाही, याविषयी माझ्या मनात शंका आहे. या काळात तेंडुलकर अत्यंत खुल्या दिलाचे वाटले. प्रतिभावान, ताकदवान लेखक असल्याने  त्यांनी भाबडेपणाने काहीच लिहिलेले नाही. त्यामुळे या लेखनाचे काय होणार याचा त्यांना अंदाज होता. त्याला तोंड देण्याची तयारी  लिखाण सुरू असतानाच त्यांनी केली असावी, आपल्याला कशाला सामोरे जायचे आहे, याची खूणगाठ त्यांच्या मनात असावी. त्यांच्या सहवासात त्यांचा संयमीपणा जाणवला. ते हिशेबी होते आणि धीरोदात्त पण होते…


प्रश्न : २००२ च्या गुजरात दंगलीनंतर  उद्विग्न होऊन तेंडुलकरांनी केलेल्या ‘मला बंदूक मिळाली तर मी मोदींना गोळ्या घालीन’ या आशयाच्या विधानाने खूप वादंग माजले होते. त्यावेळी त्यांच्या या विधानाबाबतची तुमची प्रतिक्रिया काय होती? आज तुम्ही या विधानाकडे  कसे पाहता? 

उत्तर : गुजरातमध्ये जे घडले ते ठरवून केलेले होते, ठरवून केलेला तो नरसंहार होता, त्यातील उद्वेगातूनच तेंडुलकरांनी उपरोक्त उद््गार काढले होते, यात मला तरी शंका वाटत नाही. ट्रम्प यांचा नग्न पुतळा असे शिल्प केल्याचे मी नुकतेच वाचले. कुठल्याही समाजात असा मोकळेपणा, खुलेपणा असायला हवा, असे मला वाटते. तेंडुलकर जेव्हा, असे म्हणाले, तेव्हा काही ते लगेच बंदूक घेऊन निघणार नव्हते, पण झाल्या घटनेचा राग इतका पराकोटीचा होता, की त्यांनी असे उद््गार काढले. शिवाय हे एका श्रेष्ठ लेखकाचे उद््गार होते, हेही  लक्षात घेतले पाहिजे. मात्र, ही गोष्टसुद्धा इथे स्पष्ट केली पाहिजे की, तेंडुलकरांनी असे विधान करणे तत्वत: मला मान्य नाही. कारण, हिंसेच्या बाबतची उक्ती आणि कृती याच्या पूर्णपणे मी विरोधात आहे. अर्थात, गेल्या पाच - आठ वर्षांत आपल्या देशाचे नेमके काय झाले आहे, त्याला जबाबदार कोण आहे? याचेही अर्थ आपण समजून घेतले पाहिजेत. आज २०१८मध्ये आपण त्याची फळे भोगतो आहोत. एका अर्थाने तो समाज कुठून कुठे न्यायचा होता, त्याची नांदी तेंडुलकरांना त्याच वेळेस जाणवली होती, त्यामुळे ‘सावध एका पुढल्या हाका’ असेच त्या श्रेष्ठ लेखकाला म्हणायचे होते. त्यांचा त्या वेळेचा उद्वेग मला समजून घेता येतो, एवढेच मी म्हणेन.


प्रश्न : तेंडुलकर गेल्यानंतरच्या दहा वर्षांत सामाजिक-राजकीय आणि सांस्कृतिक पातळ्यांवर मोठीच उलथापालथ झालेली आहे. तेंडुलकरांनी एकेकाळी बघितलेली अनुभवलेली हिंसा अधिक गडद आणि सर्वव्यापी होत चाललीय. अशा वेळी हल्लीच्या नाटकांत या वातावरणाचे फारच त्रोटक प्रतिबिंब उमटताना दिसतेय. त्या अर्थाने, तेंडुलकरांचा लेखनवारसा समर्थपणे पेलला गेला नाही, असं म्हणता येईल का?

उत्तर : तेंडुलकर गेल्यानंतरच्या या दहा वर्षांत सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-आर्थिक सर्वच पातळ्यांवर प्रचंड उलथापलथ झाली आहे. समाजात दरी पडते आहे. आहे रे - नाही रे या गटापुरती ती मर्यादित न राहता, ती अनेक पातळ्यांवर ही दरी रुंदावते आहे. आपली जी बहुसांस्कृतिक भारतीय भूमी आहे, तिलाच तडा देण्याचे काम गेल्या दहा वर्षांत जास्त होऊ लागले आहे. वेगवेगळ्या अस्मितांनी जोर पकडला आहे. कधी नाही, एवढी आज लोकं पेटल्यासारखे वागायला लागली आहेत. अगदी साधी साधी माणसेसुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरुन ज्या पद्धतीनं भडकतात.  हे सारे कठीण आहे.


असे म्हटले जाते की, २०२० मध्ये जगाला कुठला आजार त्रस्त करेल, तर तो आहे मानसिक आजार. आपल्याला सतत कुठल्या तरी भीतीने, शंकेने ग्रासलेले आहे. ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत आपण कुणीच नाही. सगळेजण इंपेशंट(अधीरे) झाले आहेत. हा मानसिक आजारच आहे आणि तो सामाजिक-राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक घडामोडींतून, बदलांतून तयार होतो. त्याचे वेगवेगळे पदर आपल्या मनावर आघात करतात, आपल्यात प्रतिबिंबित होतात. एका बाजूने प्रचंड तांत्रिक प्रगती, पण त्या प्रमाणात माणसाची बौद्धिक, मानसिक प्रगती झाली का, मला तेवढे पचवता येतेय का, हा प्रश्न आहे. आजचा जो अनाकलनीय स्पीड आहे, अनाकलनीय जागेतून वेगवेगळे घटक माझ्यावर आदळत आहेत - त्यांचा अर्थ मी कसा लावू? तो अर्त इतका धूसर व्हायला लागलाय, की तेंडुलकरांचा ९० च्या पूर्वीचा समाजही एकजिनसी वाटावा. त्या समाजात गुंतागुंत नव्हती का? तर प्रचंड होती, पण ती व्यामिश्रता समजून घ्यायला, त्यांच्याजवळ वेळ, काळ होता. लोकांना समजून सांगण्यासाठी, संवादासाठी कुठलाही अवसरच आज नाही. आज हा अवसरच इतक्या गोष्टींनी व्यापून टाकला आहे. सर्वांजवळ मोबाइल आहेत - त्याचा रोग जडलाय, पण अटेंशन स्पॅन कमी झालाय किंवा उरलेलाच नाहीये. आज आम्ही मानसिक आरोग्यासंदर्भात काम करतो, तेव्हा लक्षात येते की, माणसाला विविध समस्यांनी घेरलेले आहे. त्या समस्या अन्न, वस्त्र, निवारा, पाणी यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत - त्याही पलीकडे तुम्हाला कसलीतरी भीती वाटते - कॉम्पिटिशनमध्ये राहण्याची, अपडेटेड राहण्याची, आऊटडेटेड न होण्याची, जगातली सर्व माहिती बदाबदा तुमच्यावर कोसळत असताना आपण त्याच्यात कुठे आहोत, आपले स्थान नेमके कुठे आहे. याच्याविषयी माणूस आज चाचपडतो आहे. ही व्यामिश्रता तेंडुलकरांच्या काळात आढळत नाही. आपला समाज आज अनेक रेषीय स्वरुपात समोर येत आहे. माणसांचे प्रश्न अधिक गहिरे, अधिक व्याकूळ करणारे दिसतात. माणूस नावाचा केंद्रबिंदू परिघाबाहेर ढकलला जाताना दिसतोय आणि त्याची कृत्य अत्यंत वेडसर, बेधुंद, बेफाम होताना दिसत आहेत. लोकांना खरेच काय करायचे ते कळेनासे झाले आहे. या परिस्थितीत आपले शहाणपण (व्हिस्डम) टिकवायचे कसे, हा खरा प्रश्न दिसतो. 


क्रौर्य, हिंसा पूर्वीही होतीच, पण आजकाल जास्त लोकांना ती संधी मिळायला लागली, की वचपा काढायचा, या अर्थाने याचा विचार करायचा? एका अर्थाने तेंडुलकर जे म्हणायचे, की संधी मिळण्याचा अवकाश सामान्य लोकसुद्धा तितकीच क्रूर झालेली आपल्याला दिसतात - त्याचेच प्रत्यंतर येताना दिसतेय की काय? फक्त माणूस हा मूलभूत तसाच असतो, असे म्हणण्यापेक्षा या माणसाच्या भोवतीची परिस्थिती, व्यवस्था कसी बदलली आहे, याचा शोध घेणे गरजेचे वाटते. आज दिसणारी हिंसा अधिक सर्वव्यापी होत चालली आहे का, असा प्रश्न सतावत आहे. उत्तर कोरिया, सिरिया येथे जे चालले आहे, ते हादरवून टाकणारे वाटते. कदाचित हे आधीही घडत असेल, घडले असेल, पण आज मला ते प्रत्यक्ष दिसते. ते पाहण्यामुळे माझ्या मनावर विलक्षण परिणाम होतात. काल निदान वाचल्यावर कळायचे किंवा कळायचेच नाही (न कळण्यातले सूख) आज एका सेकंदात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातही लहानशीही घटना मला क्षणात दिसू शकते - पण यातून माझे दु:ख अधिक गहिरे, सर्वव्यापी होऊ लागते. उत्तर व दक्षिण कोरियांचे प्रमुख एकत्र आले, की पुण्यातल्या कोथरूडमधल्या मला बरे वाटते, ही वस्तुस्थिती मला नाकारता येत नाही. कारण माझा जगाशी असलेला संपर्क त्यातून स्पष्ट होत असतो.


अशा वेळेस जिवंत कलांचे काय होते? नाटक नावाच्या कलेचे काय होते? सिनेमा, संगीताचे काय होते? हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. काळाच्या प्रवाहात काही कला निघूनही जातील - जशी शिल्पकला गेली.माणसाची शेपूट गेली. माणसाची उत्क्रांती सुरूच आहे. आज आपण काहीही न करण्याच्या  पातळीपर्यंत  उदासीनतेपर्यंत आलोय. माणसाचे वय वाढतेय. सहज नैसर्गिक मरणापेक्षा  अनैसर्गिक मरण येतेय, लोक सहज ८० - ९०  वयापर्यंत उड्या मारत आहेत. या सगळ्यात माणूस नावाच्या प्राण्याचे काय होणार, हे बघणे फार गमतीदार आहे.  नाटक हे चिमुकले माध्यम आहे. या फुफाट्यात ते माणसाशी जिवंत संवाद साधू शकत आहे, हे महत्त्वाचे आहे. 


तेंडुलकरांनंतरच्या नव्वदीनंतरच्या पिढीचे आम्ही तेंडुलकरांपेक्षा वेगळे बघायला निश्चित लागलो आहोत. तेंडुलकरांसारखे आज आम्हाला बघता येत नाही. तेंडुलकरांचा चष्मा लावून आज आम्ही जगाकडे, नाटकाकडे पाहू शकत नाही. वेगळ्या नाटकांचे प्रयोग जयंत पवार, संजय पवार, मकरंद साठे,  राजीव नाईक, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, अजित दळवी करून पाहात आहेत. माझ्यासारखा दिग्दर्शक दुबे, पटेल, विजयाबाईंपेक्षा वेगळा असेल, जो त्याच्या जीवनाचा अर्थ लावून बघण्याचा प्रयत्न करतो. आजचे नाटक हे ठिकठिकाणी जाऊन करणे अधिक कठीण, गमतीदार होत असताना, तेच नाटक टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही वेगळे मांडायचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अधिक समंजस, अधिक शहाणपणाची भूमिका घेतो आहोत. त्यात ओरबाडलेले, ओचकारलेले नसते - पण अधिक खोलवर जाण्याचे प्रयत्न मात्र या नाटककारांनी केलेले दिसतील. आज जयंत पवार कथांतून जी उडी मारतो, ती मला लोकविलक्षण वाटते. वारसा चालवणे, याचा अर्थ तेंडुलकरांचे महान योगदान मान्य करून आपल्या नव्या वाटा, आजच्या काळाला आणि जगण्याला अनुसरून  शोधत राहणे - हे मात्र आमची पिढी नक्कीच करते आहे, असे मला ठामपणे म्हणता येते. 


आमच्या पुढच्या पिढीतले मोहित टाकळकर, आशुतोष पोतदार, धर्मकीर्ती सुमंत, इरावती कर्णिक यांची नाटके पाहताना - ते ‘पॅन इंडियन’ होत आहेत . ते फक्त मराठीत काम करत नाहीत, ते वेगवेगळ्या भाषांत काम करतात, हे अत्यंत महत्त्वाचे वाटते.  धर्मकीर्तीची नाटके या अर्थाने पाहता येतील.  ते बहुप्रसवा लेखक असतील वा नसतील - ते काळ ठरवेल, पण त्यांचे प्रयत्न मला मोलाचे वाटतात, हे आवर्जून सांगायाला हवे. 

 

- अतुल पेठे - इ मेल - atulpethe50@gmail.com
मुलाखतीचे लेखन : जयश्री बोकील - इ मेल - jayubokil@gmail.com

बातम्या आणखी आहेत...