आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.
गेल्या दोन लेखांमध्ये आपण इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतला. आता त्यापुढील काळ पाहून मग वर्तमानात प्रवेश करू.
ब्राह्मण आणि क्षत्रियांखेरीज बाकीच्या जाती-जमातींचे जीवन हे दैनंदिन जगण्यातच रस असलेले असावे आणि या राजकारणात व लढायांत आणि शास्त्राभ्यासात लक्ष घालण्याची त्यांना सवड व निकडही जाणवत नसावी, असे म्हणता येईल. क्वचित कुणाला रस वाटला, तरी एकूण बंदिस्त समाजरचना पाहता हे शक्यही नसावे. तथापि, यज्ञकर्मे करण्यासाठी ब्राह्मण मिळत नव्हते म्हणून परशुरामाने कूर्ग प्रांतातल्या कोळ्यांना ब्राह्मण्य दिले, अशी कथा ‘परशुरामसृष्टिकथे' या कन्नड पुराणात आढळते. काही जाती (उदा. न्हावी, भाटिये, आग्री, भिस्ती, दर्जी, गोल, गोंधळी, निळारी, खारक, शिंपी, वंजे इ.) या आपण पूर्वी क्षत्रियच होतो, परंतु परशुरामाच्या भयाने क्षत्रियत्व टाकून देऊन आपण अन्य व्यवसाय पत्करला व त्यामुळे आपल्याला वैश्यपण किंवा शूद्रपण प्राप्त झाले असे सांगतात. अशा दंतकथा अनेक जातीजमातींमध्ये आढळतात.
‘गावगाडा' या पुस्तकातील स्त्रियांविषयीचे उल्लेख पाहिले तर ब्राह्मण व मराठा वगळता बाकी जातीजमातींमधील स्त्रिया घरकामासोबत व्यवसायात मदत करत, घराबाहेर पडून वस्तूविक्रय करत असे दिसते.
इ. स. १८२८नंतर इंग्रजी प्रशासनात स्त्रियांच्या स्थितीत बरेच बदल होण्यास सुरुवात झाली. राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या पुरोगामी वृत्तीच्या नेत्यांनी सामाजिक सुधारणांना अनुकूल असे वातावरण तयार केले. सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली.
इ. स. १८६६मध्ये विष्णुशास्त्री पंडित, तळेकरशास्त्री, गोपाळराव देशमुख, थत्ते यांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना करून १८६९मध्ये मुंबईला एक पुनर्विवाह घडवून आणला. सुधारकांच्या या प्रयत्नांना न्या. रानडे यांनी तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिले. धर्मसुधारणेच्या चळवळीची दुसरी लाट इ. स. १८६७मध्ये महाराष्ट्रात आली. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाने अंधश्रद्धा निर्मूलन, मजुरांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी आश्रम, पंढरपूरला अनाथाश्रम सुरू केला. स्त्रीशिक्षणाला प्राधान्य देऊन स्त्रियांसाठीही शाळा उघडल्या. लोकहितवादींनी (१८२३ - १८९२) बालविवाह, हुंडा, बहुपत्निकत्व, पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण अशा स्त्रीविषयक मुद्द्यांवरही पुष्कळ लेखन केले. स्त्रियांना पुरुषांसारखे अधिकार दिले जावेत आणि शिक्षण, विवाह याबाबत त्यांना स्वातंत्र्य असावे अशी त्यांची मते होती. तथापि एकोणिसाव्या शतकातील पूर्वार्धात स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह यासारख्या सुधारणा उच्चवर्णीयांपुरत्याच मर्यादित राहिल्या.
मिशनऱ्यांच्या द्वारा सेवाभावाच्या प्रेरणेने आधुनिक सुधारणेचे लोण बहुजन समाजापर्यंत नेऊन पोहोचविले. या सुधारणाप्रवाहाचे मुख्य प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले (१८२७ - १८९॰) होते. म. फुले यांच्या सत्यशोधक समाजाने मात्र बहुजनसमाजाला आपल्याकडे आकृष्ट करून घेतले. याचे मुख्य कारण जोतिबा हे बहुजन समाजातले पहिले क्रांतिकारक वृत्तीचे समाजसुधारक होते. दलितोद्धाराच्या प्रेरणेनेच त्यांनी मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी सर्वप्रथम शाळा काढल्या. (१८५१-५२), बालहत्याप्रतिबंधक गृह काढले (१८६३), पुनर्विवाहासारख्या सुधारणांना सक्रिय पाठिंबा दिला. स्वतःच्या स्त्रीला शिक्षण देऊन तिला मुलींच्या शाळेत शिक्षिका केले. त्या कामी घरच्या व लोकांच्या विरोधाला त्यांनी धैर्याने तोंड दिले. (महाराष्ट्र संस्कृती : घडण आणि विकास; पृ. ३३९ - ३४१)
एकोणिसाव्या शतकात या पातिव्रत्याच्या कल्पनेचे उदात्तीकरण करण्यात आले. त्यामुळे काय साधले? एक, पातिव्रत्यात पतिनिष्ठा हे केंद्र असल्यामुळे पती हाच देव आणि गुरू ठरला. परिणामतः पत्नीकडे (म्हणजे स्त्रीकडे) दास्यत्व व पतीकडे (म्हणजे पुरुषाकडे) स्वामित्व अशी विभागणी आपोआप झाली. दोन, स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य उरले नाही. तीन, पती हाच सर्वश्रेष्ठ ठरल्याने तो गौरवाचा धनी ठरला. चार, स्त्रीच्या शीलभ्रष्टतेस वस्तुतः पुरुष जबाबदार असला तरी अपराधी मात्र स्त्री ठरली, कारण पातिव्रत्याचे कठोर पालन तिने केले नाही असे म्हणायला अवसर उरला. स्त्रीच्या शोषणाचा सुलभ मार्ग पातिव्रत्याच्या आकांक्षे-अपेक्षेमधून जातो हे ताराबाई शिंदे यांनी ओळखले होते. (विलास खोले, प्रस्तावना, ताराबाई शिंदे लिखित स्त्री-पुरुषतुलना, १९९७) एकोणिसाव्या शतकातील ब्राह्मणी समाजव्यवस्थेचे कायदे व चालीरीती स्त्रीला दुय्यम स्थानावर ठेवायला कारणीभूत असल्याचे जोतीराव फुल्यांनी आणि ताराबाईंनी नेमकेपणाने सांगितले आहे. दोन भिन्नलिंगीय व्यक्तींना परस्परांपासून दूर राखण्याचे पडदा हे एक साधन आहे. पुरुषाच्या दृष्टीपासून रक्षण करण्याचे जसे ते माध्यम आहे, तसेच दृश्य स्त्रीला अदृश्य करून टाकण्याचाही तो एक मार्ग आहे. त्या काळात स्त्रिया अदृश्यच असत. स्त्रियांना हळूहळू दृश्यता लाभू लागली ती जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले (१८३१ - १८९७), विष्णुशास्त्री पंडित (१८२७ - १८७६), लोकहितवादी, रानडे प्रभृतींच्या प्रयत्नांतून. सत्यशोधक समाजाचे कार्य या दृष्टीने महत्त्वाचे आहे. नंतरच्या काळात स्त्रीसुधारकांच्या सहकार्याने कार्य करू लागलेल्या पंडिता रमाबाई (१८५८-१९२२), रमाबाई रानडे (१८६२-१९२४), डॉ. आनंदीबाई जोशी (१८६५-१८८६), रखमाबाई (१८६४-१९५५), काशीबाई कानिटकर (१८६१- १९४८) यांनी काळावर यथाशक्ती आपापली मुद्रा उमटवली. १८०० ते १८८५ या कालखंडात भारताबरोबरच महाराष्ट्रानेही आधुनिक युगात पदार्पण केले. १८८५ ते १९४७ हा कालखंड भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या नवसंस्कृतीच्या विकासाचा आविष्कार या उत्तरार्धामध्ये झाला.
- कविता महाजन, वसई
kavita.mahajan2008@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.