आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातला शेतकरी अंटार्क्टिकावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने महाराष्ट्राच्या संस्कृतिसंचिताचा व्यक्ती-संस्था व संस्कृतिवैभव अशा तीन प्रकारे शोध चालवला आहे. त्या शोधकार्यात महाराष्ट्राच्या तालुक्यातालुक्यांत ज्ञानोत्सुक, कर्तबगार व्यक्ती तशाच संस्था गवसतात. मात्र, ते प्रयत्न एकांडे आहेत; अशा प्रसंगी गरज आहे, ती त्या अज्ञात मंडळींना समाजासमोर आणण्याची, त्यांच्या खटाटोपाचा समाजाच्या संदर्भात अर्थ लावण्याची. अशा निवडक व्यक्ती व संस्थांवर प्रकाशझोत टाकणारे हे पाक्षिक सदर... 


नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस नावाचे छोटेसे गाव आणि पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील बर्फाळ अंटार्क्टिक खंड यांचा संबंध काय? उत्तर एकच. अशोक सुरवडे! अशोक हा विलक्षण आणि बहुगुणी माणूस आहे. मी त्याच्या शेतीतील कर्तृत्वाची कहाणी ऐकून त्याला फोन केला. गप्पांच्या ओघात तो अगदी सहजतेने म्हणाला, ‘मी अंटार्क्टिका खंडावर जाऊन पेंग्विन पक्ष्यांवर संशोधन केलं आहे.’ मी तीनताड उडालो. नाशिकमधील एक शेतकरी अंटार्क्टिकाला जातो? आणि त्याला तेथे जाऊन पेंग्विन पक्ष्याबद्दल संशोधन करावेसे वाटते? एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात रूंजी घालू लागले. अशोकशी बोलताना, केवळ त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, तर ज्ञानोत्सुक महाराष्ट्राचे प्रतिकात्मक चित्रदेखील नजरेस पडले. 


अशोकचा जन्म शेतकरी कुटुंबातला. त्याने सॉइल मायक्रोफ्लोरा या विषयाच्या ओढीने पुण्यात मायक्रोबायोलॉजीला प्रवेश घेतला. पुढे बायो डायव्हर्सिटी या विषयाशी निगडित अभ्यासप्रकल्पांच्या निमित्ताने त्याला भटकंती, गिर्यारोहण आणि ‘वाइल्ड लाइफ’ यांची आवड निर्माण झाली. त्याच सुमारास अशोकच्या वाचनात एडमंड हिलरी यांचे ‘व्ह्यू फ्रॉम दी समिट’ हे पुस्तक आले. त्याच्या भटकंतीच्या इच्छेला नवे धुमारे फुटू लागले. NCAOR (नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अॅण्ड ओशियन रिसर्च) या संस्थेने अंटार्क्टिक मोहिमेसाठी तरूणांना संधी देण्यात येत असल्याचे घोषित केले. अशोक त्या संधीकडे अक्षरश: झेपावला. त्याने पेंग्विन पक्ष्यांच्या अभ्यासाचा प्रस्ताव सादर केला. NCAOR कडून अशोकची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर अशोकने ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन, दिल्ली, येथील वैद्यकीय चाचणी, हिमालयात इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस यांच्या प्रशिक्षण केंद्रातील शारीरिक चाचणी व गिर्यारोहणाचे प्रशिक्षण, गोवा येथे फायर फायटिंगचे प्रशिक्षण, अशा सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता  करून तो अंटार्क्टिक मोहिमेसाठी सज्ज झाला. 


अशोक चमूसह विमानाने केपटाऊन, तेथून आइस क्रशर जहाजाने वीसेक दिवसांचा प्रवास करत अंटार्क्टिकचा किनारा आणि तेथून पुढे हॅलिकॉप्टर अशी मजल-दरमजल करत अंटार्क्टिकावरील भारतीय संशोधन केंद्र ‘मैत्री’पर्यंत पोचला. अंटार्क्टिकाच्या अतिथंड आणि खारट पाण्यात केवळ क्रिल (Krill) मासे अस्तित्वात असतात. पेंग्विन त्यांना खाण्यासाठी अंटार्क्टिकाला उन्हाळ्याच्या दिवसांत स्थलांतर करतात. पेंग्विन क्रिल माशांच्या भक्षणानंतर जी विष्ठा सोडतात, त्यामध्ये विशिष्ट जंतू आढळतात. ते जंतू हा अशोकच्या अभ्यासाचा विषय होता. अशोकने पेंग्विनची विष्ठा, त्यांच्या पाणवठ्यांमधील पाण्याचे नमुने, नैसर्गिकपणे मरण पावलेल्या पेंग्विनचे शरीरविच्छेदन अशा तऱ्हेने अभ्यास पूर्ण केला. त्याने त्यासोबत स्क्वा (Skua) या पक्ष्याचे अस्तित्व आणि प्रजनन यांचीदेखील माहिती घेतली. 


अशोक सहा महिन्यांनी अंटार्क्टिकावरून परतला. मात्र अंटार्क्टिकाने त्याला पुन्हा साद घातली. भारताकडून अंटार्क्टिकावर ‘भारती’ नावाचे संशोधन केंद्र निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अशोकची निवड त्याच्या पाहणी दौऱ्यावरील चमूमध्ये झाली. अशोकने पुन्हा एकदा अंटार्क्टिकाच्या भूमीवर पाय ठेवला. त्यावेळी तो तेथील प्राणिगणनेच्या कामातही सहभागी झाला. अशोक म्हणतो, की ‘अंटार्क्टिकावर राहण्याचा अनुभव इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा वेगळा आहे. तेथील प्रदूषणरहित वातावरण, धीरगंभीर शांतता यांमुळे मनाला विलक्षण स्वस्थता लाभते. तो एकांतवास (सॉलिट्यूड) अभूतपूर्व असतो.’ 


अशोकने २००५ आणि २००६ अशा लागोपाठ दोन वर्षांच्या अंटार्क्टिका मोहिमेनंतर  शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत त्याच्या शेतामध्ये पारंपरिक प्रकाराने शेती केली जाई. अशोकला फळबागांमध्ये जास्त फायदा असल्याचे लक्षात आले. त्या वेळेस नाशिकमध्ये वाइन उद्योग स्थिर होऊ पाहत होता. अशोकने शारडोणे जातीच्या वाइनसाठीच्या खास द्राक्षांची लागवड केली. तो ती द्राक्षे ‘सुला’ वाइनला पुरवू लागला. त्याला स्वत:चा वायनरी प्रकल्प उभा करायचा होता. मात्र त्यासाठी निदान पन्नास-साठ लाख रुपयांची गुंतवणूक हवी असते. अशोक म्हणतो, ‘माझ्या त्या धडपडीत वीणा गवाणकरांचे ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक  मदतीला आले. मी त्यातील ‘उपलब्ध साधनांमधून साहित्य तयार करण्याचा मंत्र’ आचरणात आणला. अशोकने एमआयडीसीमधील कारागीर गाठले. त्यांच्याकडून वायनरीसाठी आवश्यक भांडी तयार करून घेतली आणि वायनरी प्रकल्प केवळ साडेआठ लाखांमध्ये उभारण्याची किमया साधली. त्याने त्याचे नाव ठेवले - ‘निफा’! अशोकचे लग्न २००७ मध्ये झाले. त्याची पत्नी ज्योत्स्ना आणि तो, असे दोघे मिळून उद्योगाची जबाबदारी सांभाळू लागले. अशोकच्या  वाइन उद्योगाची क्षमता पंधरा हजार लीटर आहे. कांद्यासारखे नगदी पीक एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळवून देते. मात्र, अशोक त्याच्या उद्योगातून एकरी पंधरा लाख रुपये कमावतो. त्यातील खर्च वगळता त्याचा फायदा पाच लाखांचा असतो.  अशोकने  वाइन बनवण्याच्या वेगळ्या वाटादेखील धुंडाळल्या. करवंदे आणि जांभळे यांपासून प्रायोगिक तत्त्वावर  वाइन तयार केली. मधुमक्षिका पाळून मधाची  वाइन तयार करण्याचा प्रयोग केला. मात्र तशा प्रयत्नांसाठी शासकीय धोरण अनुकूल नाही. त्यामुळे त्या प्रयोगांचे उद्योगात रूपांतर करणे त्याला अद्याप शक्य झालेले नाही. अशोकच्या उद्योगाचा काळ हा थंडीच्या दिवसांतील. त्यामुळे उरलेल्या दिवसांत काय करावे या विचाराने, अशोकने चीज आणि योगर्ट तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशोकने  आता वाइन उद्योगाला पर्यटनाची जोड दिली आहे.   


अशोकने त्याचे मोहिमेतील ज्येष्ठ सहकारी अरूण चतुर्वेदी यांच्यासोबत मिळून ‘Antarctica - The coming impact’ हे पुस्तक २०१६ मध्ये लिहिले. त्यामध्ये अंटार्क्टिकावरील भारताचे संशोधन आणि जगातील घडामोडींचा अंटार्क्टिकावरील आणि पर्यायाने मानवी जीवनावरील परिणाम अशी दुहेरी मांडणी आहे. अशोक अंटार्क्टिका मोहिमेच्या सहकाऱ्यांसोबत किंवा तिथे जाऊन आलेल्या लोकांशी सतत संपर्कात असतो. शालेय  मुलांसोबत अंटार्क्टिका या विषयावर स्लाइड शोसह गप्पा मारतो. त्यांच्यासमोर ‘अंटार्क्टिका’ हा अभ्यासाचा नवा पर्याय ठेवतो. त्याचे स्थानिक नियतकालिकांमधून त्या विषयावर लेखन सुरू असते. अशोकने अंटार्क्टिका येथे केलेले संशोधन NCAOR च्या गोवा संग्रहालयात उपलब्ध आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, झुलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनोग्राफी आणि अशा तऱ्हेच्या इतरही संस्थांना विविध विषयांतील संशोधनात अशोकच्या अभ्यासाचा फायदा होतो. त्याने त्या अभ्यासादरम्यान काढलेली छायाचित्रे अंटार्क्टिकासंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वापरण्यात आली आहेत. अशोक शेती, भटकंती, लेखन, उद्योग, प्रयोग अशा तऱ्हेने जीवनाच्या चहुबाजूंना भिडतो. त्या भिडण्यात आवेग आहे आणि कल्पकतादेखील. म्हणूनच अशोक रूढ सीमारेषांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू शकला. त्याच्या हातून जे काही घडले, ते सारे त्याच्या पराकोटीच्या जिज्ञासेमुळे! त्याच्या प्रत्येक प्रयत्नांत ज्ञानप्राप्तीची आस ठळकपणे जाणवते. तोच त्याच्या उत्कर्षाचा गाभा आहे. 


- किरण क्षीरसागर 
kiran2kshirsagar@gmail.com


अशोक सुरवडे यांचा संपर्क - ९९२२७९३८३९
लेखकाचा संपर्क : ९०२९५५७७६७ 
लेखक व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

बातम्या आणखी आहेत...