आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोत्यांची शेतकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हा प्रकल्प गावोगावच्या कर्तबगार व्यक्तींचा सातत्याने शोध घेऊन ती माणसे समाजासमोर मांडत अाहे. अाजच्या या सदरामध्ये महाराष्ट्राबाहेर जाऊन मोत्यांच्या शेतीसारख्या वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या मयूरी खैरे-अांबटकरच्या संघर्ष अाणि जिद्दीची कहाणी.


मयूरी खैरे ही बुलडाण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी. वय वर्षे केवळ २५! एमपीएससी देऊन सरकारी नोकरी करावी अशी इच्छा एकीकडे होतीच, पण ती अचानक शेतीकडे वळली. तीदेखील साधीसुधी नाही, मोत्यांची शेती! मात्र, ही यशस्वी उद्योजक काही वर्षांपूर्वी अाजाराने इतकी खंगून गेली होती की, तिने अात्महत्येचा प्रयत्न केला होता. तिने जिद्दीच्या जोरावर अात्मविश्वासाने सळसळत्या उद्योजक तरुणीपर्यंतचा जो टप्पा गाठला, तिथपर्यंतचा प्रवास फार रोचक अाहे.


मयूरीचे अाईवडील नोकरदार. वडील लक्ष्मण बँकेत तर अाई ज्योती अारोग्य खात्यात कामाला. भाऊ अाशुतोष बारावीच्या अभ्यासात गुंतला अाहे. मयूरी दहा वर्षांपूर्वी अौरंगाबादला महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेली. मात्र तिथे ती आजारी पडली. मोठमोठे डॉक्टर केले, मात्र कुणीच तिच्या अाजाराचे निदान करू शकले नाही. मयूरी अाणि कुटुंबीय अौषधे-तपासण्या-रिपोर्ट यांच्या जंजाळात सापडले. अखेर तिला बुलडाण्याच्या घरी अाणलं. त्यापुढची सहा वर्षं मयूरी अाणि तिच्या कुटुंबीयांसाठी यातनामय होती. तिने बारावीची, तसेच पदवी परीक्षादेखील घरून दिली अाणि उत्तीर्ण झाली. पण तिच्या प्रकृतीत उतार नव्हता. तिला सगळ्याच शारीरिक गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागे. मयूरीच्या उपचारांवर मोठा खर्च झाला. ती बाब तिला सतत बोचत असे. हा पैसा लहान भावाच्या उपयोगाला येऊ शकेल अाणि कुटुंबीयांमागचा त्रासही दूर होईल अशा अविचाराने मयूरीने झोपेच्या गोळ्या खाऊन अात्महत्येचा प्रयत्न केला. मात्र ती तिच्या अाईच्या तत्परतेमुळे वाचली.


मयूरीच्या प्रकृतीत २०१३ साली सुधारणा झाली. त्या काळात तिचे सारे मित्रमैत्रिणी, भवतालचे जग पुढे निघून गेले अाणि ती मागे राहून गेली अशी भावना तिला सतत नाउमेद करत होती. तिला अाजारपणात वाचनातून विरंगुळा लाभे. वाचनातून भेटल्या सिंधुताई सपकाळ. स्वत: बेघर असताना इतरांना छत मिळावे याची चिंता करणाऱ्या सिंधुताईंची कहाणी मयूरीला भावली. जोडीला प्रकाश अामटेही पुस्तकातून भेटले. तिने त्यांच्याकडून प्रेरणा घेत नव्या उमेदीने पुढे जायचे ठरवले. ती पुण्यात अाली. 


एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. नवे मित्र मिळाले. मात्र अजूनही काहीतरी कमी असल्याचे तिला सतत वाटत राहिले. मग तिने मित्रांसोबत ‘ऊर्मी’ नावाची सामाजिक संस्था स्थापन करून ‘डिजिटल लिटरसी’चा मुद्दा घेऊन कामास सुरुवात केली. त्या कामादरम्यान तिची सिंधुताई सपकाळ यांच्याशी ओळख झाली. यथावकाश तिला प्रकाश अामटे यांनाही भेटण्याची संधी मिळाली. ‘ऊर्मी’चे काम दीड वर्ष चालून थांबले. मात्र त्या काळात अभ्यास, मित्र, सिंधुताई यांचा सहवास या गोष्टींनी मयूरीला अाश्वस्त केले. त्या काळात मयूरीच्या वाचनात मोत्यांची शेती या विषयावरील लेख अाला अाणि तिची झोप उडाली. तोपर्यंत मयूरीचा शेतीशी कसलाच संबंध नव्हता. तिच्यासाठी मोत्यांची शेती ही कल्पना नवी होती. एमपीएससीऐवजी ही शेती करावी असे तिचे मन सांगू लागले. तिने घर गाठले अाणि ही कल्पना अाईवडलांना सांगितली. अाईवडील थोडे चिंतित झाले. त्यांच्याकडे शेतीसाठी जमीन नव्हती. मयूरीने म्हटले, ‘अाजारपणाने माझ्याकडून बऱ्याच गोष्टी हिरावून घेतल्या. अाता मला थोडे माझ्या कलाने जगू द्या.’ अाईवडलांनी होकार दिला. ‘पर्ल फार्मिंग’चे प्रशिक्षण CIFA (Central institute of fresh water Aquaculture) या भुवनेश्वर येथील संस्थेत दिले जाते असे कळले. मयूरी अाणि वडील भुवनेश्वरला पोचले. मात्र मयूरीचे कमी वय अाणि मर्यादित जागा यांमुळे तिला प्रवेश नाकारण्यात अाला. पण मयूरीला तिथे भेटले हरी यादव. त्यांची उत्तर प्रदेशमध्ये मोत्यांची शेती अाहे. 


यादव यांना महाराष्ट्रातून एवढ्या दूर अालेल्या मयूरीचे कौतुक वाटले. त्यांनी मयूरीला धीर दिला आणि तिला त्या शेतीचे तंत्र शिकवण्याचे कबूल केले. मयूरी अाणि वडील भुवनेश्वरवरून थेट मुगलसरायला गेले. तिथे तीन दिवस राहून मोत्यांच्या शेतीची माहिती घेतली. मयूरी पुण्यात अाली तोपर्यंत मोत्यांची शेती करण्याचा तिचा विचार पक्का झाला होता. मात्र शेतजमिनीची अडचण होती. तेव्हा तिचे बोलणे इंदूरमध्ये राहणाऱ्या शुभमशी झाले. तिची मोत्यांच्या शेतीची कल्पना ऐकून शुभम म्हणाला, ‘अामची जमीन अाहे. तुला काही करायचे असेल तर तू इथे करू शकतेस. कधी येशील?’ मयुरी दुसऱ्याच दिवशी इंदूरला पोचली. शुभम हा तिचा फोन-फ्रेंड! तिने त्याला कधी पाहिले नव्हते. मात्र मोत्यांच्या विचाराने मयुरी झपाटून गेली होती. शुभमचे घराणे पाटीदार समाजाचे. त्यांच्या स्त्रिया ‘घुंघट’ घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. मात्र त्यांनी बाहेरून अालेल्या या नवख्या मुलीला त्यांच्या शेतात हवा तो व्यवसाय करण्याची मुभा दिली. जवळून वाहणारी नर्मदा नदी मयुरीच्या व्यवसायाला पूरक होती. ते शेत होते शुभमचे काका हुकूमचंद पाटीदार यांचे! मयुरीने त्यांना भागीदार म्हणून सोबत घेतले, स्वत:चे दीड लाख रुपये गुंतवले अाणि व्यवसाय सुरू केला. मयूरी अाजारपणातून उठून फार दिवस झालेले नव्हते. तरी तिने काम झेपवले. 


मोत्यांच्या शेतीसाठी फार मोठी जमीन लागत नाही. नदीतून शिंपले अाणल्यानंतर ते धुऊन स्वच्छ केले जातात. त्यानंतर ते अाठ दिवस पाण्याने भरलेल्या टँकमध्ये ठेवले जातात. त्या पाण्याचे तापमान नदीच्या तापमानाइतके ठेवण्यात येते. शिंपले पाण्याला सरावले की, त्यांच्यावर लहानशी शस्त्रक्रिया केली जाते. त्यामध्ये त्यांच्यात मोत्यांच्या बीजांचे रोपण केले जाते. बीज दोन पद्धतीचे असते. एक ‘डिझायनर पर्ल’ अाणि दुसरे ‘राउंड पर्ल’. प्रक्रिया केलेले शिंपले काही दिवस वेगळ्या पाण्यात ठेवले जातात. त्यापैकी काही शिंपले मरण पावतात, तर काही त्या बीजांना स्वीकारतात. तसे शिंपले काढून मोठ्या टँकमध्ये ठेवले जातात. त्यानंतर पाण्यात शिंपल्यांसाठी खाद्य टाकणे, पाण्याचे तापमान ठरावीक पातळीवर मर्यादित ठेवणे, मरण पावलेले शिंपले दूर करणे अशी काळजी घ्यावी लागते. डिझायनर पर्ल तयार होण्याचा कालखंड अाठदहा तर राउंड पर्लसाठी पंधरा महिने लागतात. तयार झालेले डिझायनर पर्ल ८० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत, तर राउंड पर्ल १,००० रुपयांपासून पुढे विकले जातात. 


मयूरीने शिंपल्यांचा पहिला लॉट तयार केला. मात्र त्यातील सारे शिंपले मरण पावले. हुकूमचंद यांनी मयूरीला धीर दिला. तिने पुन्हा कंबर कसली. तिने या वेळेस अडीच हजार शिंपले तयार केले. त्यापैकी हजार शिंपले मरण पावले. दीड हजार तगले. मयूरीच्या शेतीची चर्चा अाजूबाजूच्या परिसरात होऊ लागली. मध्य प्रदेशातील स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये मयूरीबाबत काही बातम्या छापून अाल्या. मयूरीच्या हाती जे पहिले ‘पीक’ अाले, त्यातून तिला सात ते अाठ लाख रुपये मिळाले. खर्च वजा होऊन साडेपाच लाख रुपयांचा निव्वळ फायदा! बातम्या वाचून गुजरातचे हेमंत पटेल यांनी मयूरीशी संपर्क केला. मयूरीने पटेल यांच्यासोबत नवसारी येथे भागीदारीमध्ये ‘पर्ल फार्मिंग’चा प्रकल्प सुरू केला अाहे. मयूरीचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले. तिचा पती भावेश अांबटकर तिला भेटला तेसुद्धा ‘पर्ल फार्मिंग’मुळेच!


मयूरीच्या यशाच्या कहाण्या छापून अाल्या अाणि उत्सुक व्यक्तींनी मार्गदर्शनासाठी तिच्याकडे धाव घेतली. मयूरीने ‘पर्ल फार्मिंग’च्या प्रशिक्षणाचा कोर्स डिझाइन केला. ती अाता गुजरातमध्ये तिच्या प्रकल्पावर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देते.


मयूरी लग्नानंतर पतीसह नागपूर येथे राहण्यास अाली. अाता ती स्वत:च्या जमिनीवर एकट्याच्या मालकीची ‘पर्ल फार्मिंग’ करू पाहत अाहे. तिला देशभरच्या शेतीविषयक कार्यक्रम-कॉन्फरन्समध्ये भाषण देण्यासाठी निमंत्रणे येतात. पर्ल फार्मिंगची प्रशिक्षणे सुरू अाहेत. ती या वाटचालीत तिच्या कुटुंबीयांप्रति, खासकरून वडलांप्रती, प्रचंड अादर अाणि कृतज्ञतेची भावना बाळगून अाहे. 

(लेखक ‘थिंक महाराष्ट्र’चे सहायक संपादक अाणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अाहेत.)

 

- किरण क्षीरसागर, मुंबई
info@thinkmaharashtra.com

बातम्या आणखी आहेत...