आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिच्चारी आजची पिढी?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही लहान असताना किती खेळ खेळायचो, नदीत पोहायचो, घरी येण्यासाठी आईला हाका माराव्या लागायच्या. नाहीतर आताची मुलं, सारखं त्या मोबाइल नाहीतर टीव्हीत डोकं घालून बसलेली असतात.


आम्ही लहान असताना दाणे, कुरमुरे, मऊभात, पेज, शिळी भाकरी/पोळी दह्यात कुस्करून, धपाटे वगैरे पौष्टिक खायचो. नाहीतर आताची मुलं, डाव्याउजव्या हाताने ब्रेडचे तुकडे मोडत असतात.


“आम्ही लहान असताना’ची ही यादी कोणत्याही घरगुती समारंभात कानावर पडतेच. आताच्या पिढीचं कसं होणार, किती दुर्दैवी ही मुलं असं म्हणताना त्याचा दोष मधल्या पिढीचा (पक्षी : सुनेचा) असल्याचाही सूर असतोच.

 
पण खरंच का आताची पिढी बिचारी आहे?
नदीत पोहायचात तुम्ही तेव्हा गावाची लोकसंख्या किती होती, आता किती आहे? तुमचं वय झालं तशी नदीही म्हातारी झाली, सुकून गेली, प्रदूषित झाली, पोहण्याजोगी उरलीच नाही. मग तरणतलाव आले, ते तर कायम भरलेले असतात. मुलं थोडी मोकळी जागा मिळाली, चारपाच जण जमली की काही ना काही खेळ सुरू करतातच. भले त्यांचे खेळ नवीन असतील, पण ती खेळतात हे नक्की. सर्व शाळांमध्येही खेळांचे वर्ग असतात, चांगलं खेळणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. 


आताची मुलं ब्रेड खातात, याचं दु:ख वाटतं. पण सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण, मधल्या वेळचं खाणं आणि रात्रीचं जेवण करणारी तुमची आई/काकू/आजी नोकरी करत नव्हती. आता तुमची मुलगी/सून नोकरी करते, दिवसातले दहाबारा तास घराबाहेर असते. मग ज्या घरांमध्ये सर्व सदस्य कामं वाटून घेतात, आपापल्या जबाबदाऱ्या पार पडतात त्या घरांमध्ये वेगळे पदार्थ रोज तयार होतात, कारण त्या बाईवर सगळा भार नसतो. जी बाई एकटी सगळी काम करत असते, तिला ब्रेडचा आधार वाटल्यास काय नवल? आणि फोडणीच्या पोळीतून, गोड शिऱ्यातून तरी काय पोषण मिळतं मोठं? ब्रेडबराेबर चीज, भाज्या, चटणी असं खाल्लं की पूर्ण आहार मिळतो.


कोणताच काळ परिपूर्ण नसतो. प्रत्येकालाच आपलं बालपण सर्वोत्तम वाटतं कारण तो मनुष्यस्वभाव आहे. आताची पिढीही मजेत आहे, त्यांचे आनंदाचे क्षण आणि त्यांचे संघर्ष वेगळे आहेत एवढंच. उगाच गतकातर होऊन अश्रू ढाळणं काय कामाचं?


- मृण्मयी रानडे, मुंबई

mrinmayee.r@dbcorp.in

 

बातम्या आणखी आहेत...